माहेश्वरी, सतीश चंद्र : (४ ऑक्टोबर १९३३ – १२ जून २०१९ ) सतीश चंद्र माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानमधील  जयपूर येथे झाला. आग्रा, जयपूर, दिल्ली, सोलन, प्रयाग, ढाका, ढाक्याहून पुन्हा जयपूर आणि शेवटी पुनश्च दिल्ली या शहरांत सतीश चंद्र यांचे शिक्षण झाले. पूर्व पंजाबात असणाऱ्या सोलन येथून सतीश चंद्र मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण  झाले.  दिल्लीतील प्रख्यात सेंट स्टीफन्स कॉलजमध्ये ते शिकत होते. सतीश चंद्रांनी वनस्पती विज्ञानात पदवी मिळविली. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी एमएससी पदवी घेतली. द लेम्नेसी ए कॉंन्ट्रिब्युशन टु देअर बायॉलॉजी, मॉर्फॉलॉजी अँड सिस्टिमॅटिक्स या विषयावरील संशोधनासाठी सतीश चंद्रांना दिल्ली विद्यापीठाने पीएच्.डी. दिली. (The Lemnaceae: A contribution to their biology, morphology and systematics under Professor Brij Mohan Johri and, for this research, he was awarded a Ph.D. (in Botany) in 1958 from the University of Delhi.)

पीएच्.डी. पश्चात संशोधनाकरीता माहेश्वरी यांनी वनस्पती भ्रूणशास्त्र हा विषय निवडला होता. डकवीड नामक लेम्नेशिया कुलातील सपुष्प आणि पाण्यावर दाट गालिचाच्या रूपात तरंगणाऱ्या वनस्पतीवर त्यांनी संशोधन केले. डकवीडच्या वेगवेगळ्या जाती असल्या तरी त्यामुळे, पाने, फुले यासकट संपूर्ण रोप अर्धा मिमी ते दोन सेंमी भरेल एवढ्या  लहान आकाराचे असते.

ख्यातनाम वनस्पती जीवशास्त्रज्ञ  ब्रिज मोहन (बी. एम.) जोहरी हे त्यांचे पीएच्.डी.चे मार्गदर्शक होते. माहेश्वरींनी दिल्ली विद्यापीठात विज्ञान शाखेत अध्यापनाचे काम स्वीकारले. पाच वर्षांच्या सेवेनंतर माहेश्वरींना फुलब्राईट स्मिथ मुंड्ट (Mundt) ही संशोधक शिष्यवृत्ती मिळाली व ते अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील येल विद्यापीठात गेले. पासाडेना, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट  ऑफ टेक्नॉलॉजीमध्येही त्यांनी संशोधन केले. कॅल्टेक विद्यापीठामध्ये माहेश्वरींनी केलेल्या संशोधनात त्यांना, आर.एन.ए पॉलिमरेझ हे विकर हरितलवकात आढळले. त्यांचे तेथील सहकारी, रॉबर्ट बांडुर्स्की आणि माहेश्वरी यांना संयुक्त संशोधनात हरितलवकात डी.एन.ए. ही आढळले. पेशीकेंद्रक सोडून अन्य पेशीअंगकात डी.एन.ए. सापडणे ही विशेष बाब होती.

भारतात परतल्यावर दिल्ली विद्यापीठ आणि जयपूर विद्यापीठ यांच्याशी आधी व्याख्याता म्हणून  ते संलग्न होते. पुढे पदोन्नती मिळत ते पूर्ण प्राध्यापक पदावर पोचले. त्यांचा सेवाकाळ संपेपर्यंत सलग चाळीस वर्षे माहेश्वरी आणि दिल्ली विद्यापीठ यांचा संबंध राहिला. याच काळात ते अतिथी प्राध्यापक या नात्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाशीही जोडले गेले. हार्वर्ड बायॉलॉजीकल लॅबॉरेटरीजशी होमी भाभा फेलो म्हणून त्यांचा संबंध होता. अतिथी संशोधक आणि जवाहरलाल नेहरू फेलो या नात्यानेही माहेश्वरी येल विद्यापीठाशी संबंध ठेऊन होते. ते उत्तम शिक्षक आणि संशोधक म्हणून नावाजले गेले होते. युरोप आणि अमेरिका येथील अभ्यास दौरे माहेश्वरी यांना ज्ञान सखोल आणि अद्ययावत ठेवण्यास मदत करीत. त्यामुळे त्याकाळचे नवे विषय – वनस्पती शरीरक्रिया शास्त्र, रेण्वीय जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र शिकविण्याचे काम माहेश्वरी यांच्याकडे सोपविण्यात येई. विज्ञान शिकवताना विज्ञानाचा इतिहास सांगणे त्यांना महत्त्वाचे आणि विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यास आवश्यक वाटे.

माहेश्वरी यांचे संशोधन कार्य एकूण चार क्षेत्रात विभागलेले होते.

१) डकवीड सपुष्प तरंगती एकबीजपत्री पाणवनस्पती

२. एकगुणितता (म्हणजे प्रत्येक पेशीत गुणसूत्रांचा एकच संच असण्याचा गुणधर्म) आणि वनस्पती ऊती संवर्ध,

३. जनुक नियंत्रण आणि

४. पेशीवर्णके (फायटोक्रोम्स)

डकवीड – लेम्ना, वूल्फिया या  सपुष्प तरंगत्या पाणवनस्पतींना दिवस कमी काळाचे आणि रात्री दीर्घ असतात तेव्हाच फुले येतात हे माहेश्वरी यांनी केलेल्या संशोधनातून उघड झाले. वनस्पतींच्या परागकणात असणाऱ्या एकगुणित पुंयुग्मकापासून संवर्धनाने विशेष पर्यावरण पुरविल्यास संपूर्ण वनस्पती तयार करता येते हे माहेश्वरी यांनी धोत्र्याच्या रोपावर केलेल्या प्रयोगांतून सिद्ध झाले. शिवाय गुणसूत्रांचा एकच संच असल्याने कोणतेही जनुक प्रभावी वा अप्रभावी असत नाही. प्रत्येक जनुक आपले गुणधर्म व्यक्त करतेच.

निसर्गातील वनस्पती द्विगुणित, चतुष्गुणित, षष्ठगुणित इ. प्रकारच्या असतात. म्हणजेच त्यांच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्रांचे अनुक्रमे दोन, चार, सहा  असे संच असतात. पण माणूस एकगुणित वनस्पती बनवू शकतो हे माहेश्वरी यांनी दाखवून दिले. पेशीपटलाला आणि केंद्रक पटलाला सूक्ष्म छिद्र पाडून त्यातून जनुके अंत:क्षेपित करता येतात. त्याचा परिणाम म्हणून एखाद्या वनस्पतीचे जनुकीय गुणधर्म बदलता येतात. हे माहेश्वरी यांच्या दिल्ली विद्यापीठातील संशोधक चमूने केलेल्या प्रयोगांतून स्पष्ट झाले. डकवीडमध्ये फुलोरा येण्यासाठी सायटोकायनीन, सॅलिसिलिक अम्ल, ८-हायड्रॉक्सीक़्विनोलोन अशा रसायनांचा जनुक नियंत्रणासाठी उपयोग होईल का हे ते पडताळून पहात होते.  लेम्ना पॉसीकॉस्टॅस्टा जातीच्या डकवीडमधील काही रसायनांचा जैविक घड्याळाशी संबंध त्यांच्या लक्षात आला. ती रसायने म्हणजे – सायक्लिक एएमपी – हे संप्रेरकसम संदेशवाहक द्रव्य आणि सायक्लिक एएमपी डाय एस्टेरेझ – हे विकर. माहेश्वरी आणि सहकाऱ्यांनी डकवीडवर केलेल्या कामामुळे जगभरच्या संशोधकात डकवीड अतिशय प्रयोगयोग्य वनस्पती आहे ही  जाणीव जागृती निर्माण झाली. त्यामुळे डकवीड्सवर काम करण्यास अनेक संशोधक आणि त्यांचे गट पुढे आले. प्रत्यक्ष संशोधन करणारे आणि त्यात रस घेणारे यांची संख्या एवढी वाढली की या नव्या क्षेत्रावर चर्चा करण्यासाठी सात-आठ वर्षांत पाच आंतरराष्ट्रीय विद्वत परिषदा आयोजित केल्या गेल्या. यापैकी चौथ्या आंतरराष्ट्रीय विद्वत परिषदेचे आयोजन कासरगोड, केरळ येथे झाले. ती माहेश्वरींना त्यांच्या कार्याबद्दल आदर दाखविण्यासाठी समर्पित केली गेली होती.  त्यांनीच प्रमुख भाषण केले आणि नव्या संशोधकांच्या लहान मोठ्या गटांबरोबर चर्चा करून डकवीडवर काम करण्यास जगभरच्या संशोधकाना उत्तेजन दिले.

पेशीवर्णकांसंबंधी संशोधन काम माहेश्वरी आणि सहका-यांनी मुख्यत: तंबाखूच्या रोपांवर आणि कोबी, फ्लॉवरसारख्या वनस्पतींवर केले. या कामातून माहेश्वरी यांनी पुढे तांदुळाच्या जनुकीयदृष्ट्या विकसित जाती निर्माण करण्याचा पाया घातला. पेशीवर्णके ही प्रथिनयुक्त प्रकाशसंवेदी द्रव्ये असतात. ती रक्त (रेड) आणि अवरक्त (इन्फ्रारेड) प्रकाशलहरी शोषून घेतात.  त्यांचा वनस्पतींच्या विविध भागांची वाढ, वनस्पतींचा प्रकाशाला प्रतिसाद, फुलोरा येणे अशा क्रियांशी संबंध असतो.

माहेश्वरी यांनी पेशीवर्णकांची रचना, स्वरूप समजण्यात मदत केली. त्यांचे अलगीकरण, शुद्धीकरण, पृथःकरण करण्याच्या चांगल्या पद्धती शोधून काढल्या. पेशीवर्णके, वनस्पती संप्रेरके आणि वनस्पती यांतील आंतरसंबंध समजण्यात मोलाची भर घातली.

नेचर, प्लांटा, जर्नल ऑफ अमेरिकन बोटॅनिकल सोसायटी, फायटोमॉर्फॉलॉजी, जर्नल ऑफ इंडियन बोटॅनिकल सोसायटी, फ्लोरा, प्लांट सेल फिजियॉलॉजी, प्रोसिडिंग्ज ऑफ इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी  – सारख्या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नल्स मध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

माहेश्वरींना रेण्वीय वनस्पती जीवशास्त्र विषयातील प्राविण्यासाठी शांतीस्वरूप भटनागर अॅवार्ड, बिरबल साहनी सुवर्ण पदक, जे.जे. चिनॉय सुवर्ण पदक असे सन्मान लाभले.   भारतातील प्रतिष्ठित अशा इंडियन अकॅडमी इन्स्टिट्यूट  ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी या संस्थांनी त्यांची सदस्य म्हणून निवड केली.

जयपूर, राजस्थान येथे त्यांचे फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा