भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था : (स्थापना – १९७०) सन १९३० साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात इम्पेरीयलIकाउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या शेती संशोधन परिषदेतील एका लहान संख्याशास्त्र विभागात, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचा (भाकृसांसंसं) पाया घातला गेला. आता भारतीय कृषी संशोधन परिषदेचा भाग असलेली भाकृसांसंसं दिल्ली येथे असून कृषीसंख्याशास्त्र, जैव-माहितीज्ञान व संगणक-उपयोजन यांमध्ये संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण करीत आहे. या संस्थेला त्यासाठी ISO 9001:2008 प्रमाणपत्र सुद्धा मिळाले आहे.

कृषी संशोधनातील गुणवत्ता सुधारण्यासाठी संख्याशास्त्र, माहितीशास्त्र यांचा उपयोग हे भाकृसांसंसंचे उद्देश आहे. जैव-माहितीज्ञान व कृषीसंख्याशास्त्र या दोन्हींचा समन्वय साधून त्यांचा कृषी संशोधनासाठी उपयोग करण्याचे काम भाकृसांसंसं करते. संशोधन व शिक्षणाच्या जोडीने कृषी संशोधनातील आव्हाने तसेच नवीन क्षेत्रातील आव्हाने यांसाठी काम करताना गुणवत्ता सुधारणे यावरही भर दिला जातो.

राष्ट्रीय कृषी संख्याशास्त्रीय व्यवस्था (नॅशनल ॲग्रीकल्चरल स्टॅटिस्टिक सिस्टीम –एनएएसएस) या संस्थेतही भाकृसांसंसं ने मानाचे स्थान मिळवून एनएएसएस अधिक सक्षम होण्यासाठी अनेक प्रकारचे योगदान दिले असून त्याचा परिणाम राष्ट्रीय धोरणातही होत असतो.

संस्थेमध्ये १) संगणक उपयोजन २) कृषी जैवमाहितीशास्त्र ३) सांख्यिकीय आनुवंशिकता ४) नमूना सर्वेक्षण ५) अनुमानशास्त्र व कृषीशास्त्र ६) व्यवस्था प्रारूप आणि ७) प्रयोग अभिकल्पना असे विभाग असून संगणक उपयोजन, कृषीसंख्याशास्त्र व जैवमाहितीशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर तसेच पीएचडीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

भाकृसांसंसंमध्ये काही मूलभूत संशोधनझाले आहे. ते असे, कृषी संशोधनासाठी खास नमुना सर्वेक्षणाच्या विविध तंत्रांचे विकसन जसे की लागोपाठ नमुना निवड (successive sampling), क्रमबद्ध नमुना निवड (systematic sampling), समूह नमुना निवड (cluster sampling), घटक नमुना निवड (component sampling), परिवर्ती संभाव्यता नमुना निवड (sampling with varying probabilities), नियंत्रित निवड (controlled selection), नमुना निरपेक्ष दोष (non-sampling errors); आकलनाच्या (estimation) विविध पद्धती जसे की गुणोत्तर आणि समाश्रयण पद्धत (ratio and regression methods).

उपयोजित संशोधनाच्या बाबतीत संस्थेकडून सुरवातीपासूनच पिके, पशुधन, मत्स्य उत्पादन व त्यासंबंधीत इतर क्षेत्रे, यातील विविध प्राचलांच्या आकलनासाठी योग्य त्या नमुना सर्वेक्षणाच्या पद्धतींचा विकास झालेला आहे. त्यापैकी वानगीदाखल काही म्हणजे भाज्या व फळे यांची लागवड व उत्पादन यांचा विकास, सुपारी, नारळ व काजू यांच्या वृक्षरोपणाचे आकलन आणि समुद्र, नद्या आणि तलाव यातील मासेमारीचे आकलन. त्याशिवाय दुग्ध व्यवसाय कार्यक्रमात सुधारणा, IADP (Intensive Agriculture District Program) आणि HYVP (High Yielding Variety Program) ह्या विकास कार्यक्रमांचे मूल्य निर्धारणही भाकृसांसंसं ने केले आहे.

संस्थेने पुढील संगणक प्रणाली विकसित केल्या असून त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कृषी संशोधन सामग्री विश्लेषण (APAR2), वाढीत संकल्प (SPAD), बहु घटकी प्रयोग (APFE1), संतुलित अपूर्ण खंड संकल्पन (SPBD), पशु पैदास (SPAB2.0) आणि सर्वेक्षण सामग्री विश्लेषण (SSDA1.0). भाकृसांसंसं व भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने आता डुक्कर पालन app-off line (pig farming app) तसेच पशु प्रजनन app विकसित केले गेले आहे.

भाकृसांसं संस्थेच्या पुढील सल्लागार सेवा आहेत. १) संगणक उपयोजन विभाग: मुख्यत: सांख्यिकी आधार सामग्री प्रक्रिया-वृक्ष तसेच पशूंची पैदास, कृषीवन अशा अनेक बाबतीतील आधारसामग्रीचे विश्लेषण करणे; त्याशिवाय संगणक संबंधी इतरही सेवा पुरवल्या जातात, माहिती तंत्रज्ञानासंबंधी प्रशिक्षण आयोजित केले जाते २) नमुना सर्वेक्षण विभाग : पिके, पशुधन, मत्स्य व्यवसाय, बागा, भाजीपाला व तत्संबंधीत आवश्यक त्या प्राचलाच्या आकलनासाठी नमुना सर्वेक्षण करणे, तसेच क्षेत्र व उत्पादन यांचे आकलन, कृषी क्षेत्रातील दुर्गम भागातून मिळवलेली आधार सामग्री वापरून अंदाज वर्तवणे ३) प्रयोग संकल्पन विभाग : (अ) खालील बाबतीत तज्ञ सल्ला दिला जातो – कृषी, बागा, कापणी नंतर, अन्न प्रक्रिया, मत्स्योत्पादन, कृषीवन, पशू  यांतील प्रयोगांसाठी योजना व संकल्पन याबाबत, (आ) प्रयोगानंतर मिळालेल्या आधार सामग्रीच्या विश्लेषणासंबंधी.

खालील बाबींबाबत संस्थेचे वैशिष्ट्य आहे.अ) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तज्ज्ञ प्रणाली (Expert Systems) जशी की गव्हासाठी EXOWHEM ब) बीज जातीसाठी तज्ज्ञ प्रणाली क) बीज जातीसाठी इ–प्लॅटफॉर्म आणि ड) कृषी संशोधनाधार सामग्री-पुस्तक.

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपति आणि केंद्रीय कृषिमंत्री डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्मदिवस म्हणजे ३ डिसेंबर, हा भाकृसांसं संस्थेत दरवर्षी कृषी शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो.

संकेतस्थळ : www.iasri.res.in, www.iasri.icar.gov.in

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर