ज्युलियस, डेव्हिड जे : (४ नोव्हेंबर, १९५५ – ) डेव्हिड जे ज्युलियस यांचा जन्म  न्यूयॉर्क राज्यातील ब्रायटन बीच ब्रुकलिन येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अब्राहम लिंकन स्कूलमध्ये झाले. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यानी जैवविज्ञानातील पदवी मिळवली. पुढील चार वर्षे अलेक्झांडर रिच यांच्या प्रयोगशाळेत त्यांना अमिनोसिलेशन प्रक्रियेवर (tRNA) संशोधन करण्याची संधी मिळाली. यू सी बर्कले येथून त्यांनी पदवीसाठी जैवरसायनशास्त्रात संशोधन केले. जेरेमी थॉर्नर आणि रॅन्डी शेक्मन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून त्यानी पीएच्.डी. मिळवली. डॉक्टरेटनंतरचे संशोधन त्यानी रिचर्ड अ‍ॅक्सेल यांच्या मार्गदर्शनाखाली कोलंबिया युनिव्हर्सिटीत केले. यासाठी त्यांनी सिरोटोनिन वन सी(1c) ग्राही प्रथिनाचे कार्य केले व या प्रथिनाचे क्लोन तयार केले. यामधून  त्यांना सिरोटोनिन गटातील ग्राही प्रथिनांच्या जनुकांचे आकलन झाले.  त्याच वेळी त्यांनी रॅन्डी शेक्मन यांच्याबरोबर यीस्टमधील पेप्टाइड सम्प्रेरक कसे स्त्रवते याचा अभ्यास केला.

ज्युलियस आणि सॅनफ्रॅन्सिस्कोमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील त्यांचे सहकारी यिफान चेंग यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने TRPV1 ग्राहीची रचना अणूपातळीपर्यंत शोधून काढली. त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू आपल्या शरीरातील स्पर्श आणि वेदना यांच्या ज्ञानातील रेण्वीय भाग कसे कार्य करतो हे जाणण्यावर होता. त्यांच्या सहकार्‍यानी नैसर्गिक उत्पादनाच्या सर्वेक्षणातून उष्णता किंवा शीत संवेदी आयन प्रवाह ग्राही (receptor) मुळे संवेदी चेता कशा उत्तेजित होतात हे शोधून काढले होते. हे आयन प्रवाहग्राही म्हणजे विशिष्ट प्रथिन संरचना आहे.

या ग्राही संकुलास ट्रिप (TRP) असे नाव आहे. ही प्रथिने रासायनिक रेणूंना प्रतिसाद देतात. त्यातल्यात्यात ज्या रेणूमुळे उष्णता किंवा शीत संवेदाची जाणीव होते अशा रसायनांवर त्यांचा परिणाम होतो. उदा., मिरचीतील कॅप्सिसिनमुळे उष्णतेची जाणीव होते. हे ट्रिप ग्राहीसंकुल दोन्ही उष्ण आणि शीत संवेदास प्रतिसाद देते. उदा TRPV1 ग्राही, उष्णता किंवा मिरचीतील तिखटपणा संबंधित रसायन कॅप्सिसिन दोन्हीस प्रतिसाद देते. त्याचप्रमाणे TRPM8ग्राही, शीत तापमान आणि मेंथोल यांना प्रतिसाद देते. TRP ग्राही वैद्यकीय दृष्ट्या महत्वाचे आहेत. कारण वेदना मार्गावर त्यांची संख्या अधिक आहे. सध्या वेदना कमी करण्यासाठी अफूयुक्त रसायनांचा वापर होतो. पण त्यांच्या दुष्परिणामांचा विचार करता अधिक सुरक्षित उपाय शोधण्यासाठी या शोधाचा अधिक चांगला उपयोग कसा करता येईल यावर औषध उद्योगाचे लक्ष आहे.

ज्युलियस यांना एडवर्ड पर्ल या नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसिनतर्फे देण्यात येणारे पर्ल यूएनसी न्यूरोसायन्स पारितोषिक, शॉ पुरस्कार, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनतर्फे डॉ. पॉल जॉन्सन अ‍ॅवार्ड, गाईरेंडनर फाउंडेशन इंटरनॅशनल अ‍ॅवार्ड, एचएफएसपी नाकासोने अ‍ॅवार्ड, अ‍ॅस्टुरियास प्राइज, कावेली न्यूरोसायन्स प्राइझ आणि बीबीव्हीए फाउन्डेशन फ्रान्टियर्स नॉलेज अ‍ॅवार्ड देण्यात आले.

चेताविज्ञान संशोधनासाठी स्थापन झालेली मॅक नाइट एंडोवमेंट फंड यांच्या संचालक मंडळावर ज्युलियस यांची निवड झालेली आहे. बायो मेडिकल सायन्सच्या प्यू स्कॉलर प्रोग्रामच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. तसेच डॅमोन रुनयान कॅन्सर रिसर्च फाउन्डेशनच्या सल्लागार समितीवर त्यानी या पूर्वी काम केलेले आहे.

2021 साली त्यांना स्पर्श आणि उष्णताग्राही यातील संशोधनाबद्दल अर्डेम पॅटापौटियन यांच्या बरोबर विभागून फिजिऑलॉजी आणि मेडिसिन शाखेतील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. या शोधासाठी त्यांना अवरक्त किरणांच्या सहाय्याने भक्ष्य शोधण्यासाठी पिट व्हायपर या विषारी घोणस प्रजातीच्या सापाचा आणि मिरचीतील कॅप्सिसिन या तिखटपणा देणार्‍या नैसर्गिक रसायनावर संशोधन करावे लागले.

सध्या ते सॅन फ्रान्सिस्को येथे डिपार्ट्मेंट ऑफ फिजिऑलॉजी यूसी  प्रोफेसर आणि मॉरिस हरज़्चेन चेअर मॉलेक्युलर बायॉलॉजी अ‍ॅन्ड मेडिसिन या पदावर कार्यरत आहेत.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी