कोट्स, टॉम : (जन्म: १९ जुलै १९७२-) केंब्रिज विद्यापीठातून गणित विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर कोट्स ह्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून ॲलेक्झांडर गिवेंटल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळवली. रीमान-रोश थिअरम इन ग्रोमोव-विटन थिअरी असे त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक होते. सध्या ते इम्पीरियल कॉलेज, लंडन येथे गणित विषयातील प्रपाठक (रीडर) म्हणून कार्यरत आहेत.
समष्टि भूमिति आणि वक्र अवकाश हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. त्यांचे काम ग्रोमोव-विटन अविकारी (Gromov–Witten invariants), पुंज प्रतिसमजातता (Quantum Cohomology), दर्पण सममिति (Mirror Symmetry), द्विगुणोत्तरिय भूमिति (Birational Geometry) मधील अनेक मूलभूत प्रश्नांची उकल करते.
कोट्स यांनी ॲलेसिओ कोर्टी (Alessio Corti) आणि अल कॅस्प्रझिक (Al Kasprzyk) यांच्यासोबत फॅनोसर्च (Fanosearch) नावाचा एक आंतरराष्ट्रीय गणिती प्रकल्प हाती घेतला आहे. तीन, चार व पाच मितितील सर्व भौमितीय आकारांची एखाद्या आवर्त सारणीप्रमाणे (Periodic Table) मांडणी करणे हा सदर प्रकल्पाचा उद्देश आहे. या शुद्ध गणिती कार्यासाठी संगणकाचा वापर महत्त्वाचा ठरत आहे हे नोंद घेण्यासारखे आहे. विविध भौमितीय आकारांचे गुणधर्म व त्यांचे परस्परांशी संबध ह्यांचे आकलन होण्यास आणि पर्यायाने गणित आणि भौतिकशास्त्रातील अनेक समस्यांच्या निराकरणासाठी ह्या प्रकल्पाचा उपयोग होईल अशी गणिततज्ञांना आशा आहे.
कोट्स यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये द लिवेर्हल्म ट्रस्टतर्फे फिलिप लिवेर्हल्म पुरस्कार आणि लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीतर्फे एल. एम्. एस. व्हाइटहेड पुरस्कार यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या, यूनायटेड किंगडम मधील ४० वर्षाखालील संशोधकांना दर वर्षी केंब्रिज विद्यापीठातर्फे देण्यात येणारा, अत्यंत मानाचा समजला जाणारा ॲडम्स पुरस्कार टॉम कोट्स व अरेंड बेयर ह्यांना संयुक्तिकरित्या प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या बैजिक भूमिति ह्या विषयातील कार्यासाठी दिला गेला. जपान, फ्रांस, अमेरिका अशा अनेक देशातील नामवंत विद्यापीठांत वक्ता म्हणून कोट्स यांना वेळोवेळी निमंत्रित केले गेले आहे.
कोट्स यांच्या संशोधनाची सखोलता लक्षात घेऊन विविध संस्थांनी त्यांना संशोधनासाठी सतत वित्तीय अनुदान दिले आहे. सुमारे ४० दर्जेदार शोधलेख कोट्स यांच्या नावावर आहेत.
गणित प्रसाराचे कार्यही कोट्स जोमाने करत आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी नॅशनल जिओग्राफिक दूरचित्र वाहिनीसाठी, The Truth Behind Crop Circles या शीर्षकाची चित्रफीत तयार केली. त्यात त्यांनी अपोलोनिअस या प्राचीन ग्रीक गणितीचे प्रमेय वापरून वर्तुळांची एक संरचना निर्माण केली. ती इतकी क्लिष्ट आहे की ती दैवी असून मनुष्य निर्माण करू शकत नाही असा समज होता.
संदर्भ :
- coates.ma.ic.ac.uk/
- https://www.maths.cam.ac.uk/adams-prize-winners-2014-15-announced
- myscience.org.uk
- http://www.imperial.ac.uk/
- http://coates.ma.ic.ac.uk/fanosearch/wp-content/uploads/2011/06/CoatesUCL.pdf
समीक्षक : विवेक पाटकर