विद्यार्थ्यांच्या विविध ज्ञानपातळीचे शैक्षणिक प्रगतीचे किंवा अनेकविध क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी निकषांचे संदर्भ पुढे ठेवून विकसित केलेली एक शैक्षणिक कसोटी. तसेच अपेक्षित प्रभुत्व पातळीच्या तपशीलासह लिहिलेल्या अपेक्षित वर्तनबदलाच्या संदर्भात विद्यार्थ्यांची स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी विकसित केलेली कसोटी म्हणजे निकषात्मक संदर्भ चाचणी होय. रॉबर्ट ग्लेसर यांनी निकषात्मक संदर्भ कसोटी ही संकल्पना प्रथम मांडली. थोडक्यात, विशिष्ट वर्तनक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा दर्जा निश्चित करण्यासाठी काही निकषात्मक संदर्भांचा वापर केला जातो.

गरज : निकषात्मक संदर्भ चाचणी वापरून इतर विद्यार्थ्यांच्या प्रगतिशी तुलना करणे अपेक्षित नाही. १९७० च्या दरम्यान त्याचा वापर मानसकारक (सायकोमेट्रिक) तपासणीसाठी केला जात असे. निकषात्मक संदर्भ चाचणीची गरज पुढील कार्यासाठी होते.

  • विद्यार्थ्यांची विशिष्ट पाठ्यक्रमातील प्रगती मोजण्यासाठी.
  • विशिष्ट पाठ्यवस्तूंच्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी.
  • अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व परिणामकारक करण्यासाठी.
  • शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी, क्षमतांचा शैक्षणिक उद्दिष्टांनुसार पडताळा पाहून आपल्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी.
  • शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना अप्रगत ज्ञान व कौशल्यांबाबत अचूक मार्गदर्शन करण्यासाठी इत्यादी.

निकषात्मक संदर्भ चाचणीचे नियोजन करताना शिक्षकाला विविध टप्प्यांमधून कार्य करावे लागते.

  • विशिष्ट प्रमाणित क्षमतांचे कौशल्य आणि पैलूंचे निकष ठरविणे.
  • निकषांचे संदर्भ समोर ठेवून प्रमाणित कसोटी विकसित करणे.
  • ज्या विद्यार्थ्यांची क्षमता, कौशल्य, पैलू यांचे मापन करायचे आहे, त्यांना कसोटी देऊन मूल्यमापन निकषांचे संदर्भ समोर ठेऊन त्याचा अन्वयार्थ लावणे इत्यादी.

विद्यार्थ्याने विशिष्ट आशयाचे अध्ययन केल्यानंतर निकष संदर्भ कसोटी चाचणीने अपेक्षित वर्तन बदलांच्या यादीचा संदर्भ समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीचा पडताळा पाहिला जातो. अपेक्षित वर्तनबदलांपैकी विद्यार्थ्याने कोणते वर्तन बदल प्राप्त केले व कोणते नाही, याबाबतची उपयुक्त माहिती शिक्षकाला मिळते. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी पुढे काय करायचे, ते शिक्षकाला ठरविता येते. उदा., विद्यार्थाला दोन अंकी संख्यांची बेरीज करणे अपेक्षित असेल, तर त्याने सोडविलेल्या चाचणीतील किमान ८०% उत्तर बरोबर येणे अपेक्षित आहे. निकष संदर्भ कसोटीत मिळालेल्या गुणांचा अन्वयार्थ संबंध विषयाशी जोडता येतो.  ही कसोटी मानक किंवा प्रमाणक संदर्भ कसोटीच्या विरुद्ध असते.

निकषात्मक कसोटी नैदानिक स्वरूपाची आहे; कारण या कसोटीद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील अडथळे लक्षात येतात. शिक्षकांना आपल्या अध्यापनातील उणीवा समजतात. अडचणी व उणीवा दूर करण्यासाठी उपचारात्मक कार्यक्रम आखून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी निकष संदर्भ कसोटीचा उपयोग होतो. उदा., १९९५ मध्ये प्राथमिक स्तरासाठी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आला. मातृभाषा, सामान्यविज्ञान आणि गणित या विषयांसाठी क्षेत्र आणि इयत्तानिहाय विद्यार्थ्याला कोणते वर्तन करता येणे अपेक्षित आहे, त्याबाबतचे तक्ते विकसित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अपेक्षित वर्तन प्राप्त केले किंवा नाही याचा पडताळा पाहण्यासाठी निकषात्मक चाचणीचा वापर करता येतो.

समीक्षक : अनंत जोशी