विद्यार्थ्यांच्या विविध ज्ञानपातळी किंवा क्षमतांची संपादणूक किती आहे, याचा पडताळा पाहण्यासाठी प्रमाणित मानकांची संदर्भ गटांशी तुलना करणारी एक कसोटी. यास मानक संदर्भ कसोटी असेही म्हणतात. रॉबर्ट ग्लेसर यांनी प्रमाणक संदर्भ कसोटी ही संकल्पना प्रथम मांडली.
प्रमाणक संदर्भ कसोट्या या अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केल्या जातात. खूप मोठ्या गटावर चाचणी देऊन मिळालेल्या फलीतानुसार त्यात आवश्यक ते बदल केले जातात. या चाचणीत निरनिराळ्या काठीण्य पातळ्यांचे प्रश्न समाविष्ट केले जातात. स्थळ, वेळ आणि परीक्षक यांत बदल केला, तरीही एखाद्या विद्यार्थ्याला चाचणीत मिळालेल्या गुणांत फरक न पडता ते साधारणतः तेवढेच राहतात का, याचा पडताळा घेतला जातो. विविध प्रक्रिया करून प्रमाणक संदर्भ चाचणी अंतिम किंवा विकसित केली जाते. प्रमाणक संदर्भ चाचणी विकसित झाल्यानंतर त्या गटातील विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांसारखेच वैशिष्ट्ये असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना चाचणी दिली जाते. त्या चाचणीत त्यांनी मिळविलेले गुण मोठ्या विद्यार्थी गटाच्या गुणांशी पडताळून पाहून ते सरासरीच्या पुढे किंवा मागे आहेत का, याचा पडताळा घेतला जातो. तपासणीसाठी प्रमाणक कोष्टक तयार करावे लागते. प्रमाणक कोष्टक तयार करताना वेगवेगळ्या वय, इयत्ता व शततमक प्रमाणके ठरविताना प्रत्येकातील यादृच्छिक न्यादर्श गट निवडले जातात. त्यांच्या ज्ञानाची आणि क्षमतांची प्रभावित चाचणीद्वारा पाहणी करून प्रतिनिधिक गुणांक घेतले जातात. विद्यार्थ्याने प्रत्यक्षात मिळविलेल्या गुणांकांची तुलना प्रमाणक कोष्टकातील गुणांकांबरोबर करून त्यांचे वय, इयत्ता व शततमक निश्चित करता येते. ही चाचणी अधिक सप्रमाण आणि विश्वसनीय असल्याने प्रमाणक संदर्भ चाचणीची आवश्यकता आहे. या चाचणीमुळे विद्यार्थ्यांचे निश्चित मूल्यमापन करता येते.
प्रमाणक संदर्भ चाचणीचे नियोजन काळजीपूर्वक करावे लागते. त्यासाठी प्रथम वय प्रमाणक, इयत्ता प्रमाणके आणि शततमक प्रमाण निश्चित करावे लागते. या प्रमाणकांचा संदर्भ समोर ठेवून प्रमाणकानुसार चाचणी तयार करून ती संबंधित विद्यार्थ्यांना द्यावी लागते.
विद्यार्थ्यांना प्रमाणित कसोटीत मिळालेल्या गुणांचा अन्वयार्थ प्रमाणकानुसार लावला जातो. उदा., एखाद्या विद्यार्थ्याचे जन्मवय अकरा वर्ष आहे. त्याने गणिती कौशल्य प्रमाणित चाचणीत ८० गुण मिळविले आहे. ते गुण वय, इयत्ता व शततमक प्रमाणक चाचणीनुसार तेरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याच्या सरासरी गुणांकाइतके असल्यास त्या विद्यार्थ्यांचे गणिक कौशल्य वय तेरा वर्षे होईल. प्रमाणक संदर्भ मूल्यमापनामध्ये कोणत्याही वर्गातील वा कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांशी तुलना करता येते.
वैशिष्टे :
- मोठ्या गटावर प्रयोग करून प्रमाणक निश्चिती करता येते.
- विद्यार्थ्यांशी एकमेकांशी तुलना करणे सहज शक्य होते.
- विद्यार्थ्यांचे यश वय, इयत्ता आणि शततमक या आधारे निश्चित करता येते.
- विद्यार्थ्यांचे ज्ञानपातळीचा किंवा क्षमतांचा संपादणूक तपासला जातो. उदा., बुद्धिमापन चाचण्या.
फायदे :
- एकमेकांशी तुलना करता येते.
- गटाच्या तुलनेत विद्यार्थ्याने किती यश मिळविले आहे हे ठरविता येते.
- प्रमाणक संदर्भ कसोटीची मर्यादा म्हणजे ते विद्यार्थ्याला निश्चित प्रमाणात यशप्राप्तीसाठी प्रेरणा देईलच याची खात्री देता येत नाही.
- ज्या ठिकाणी अनेक उमेद्वारांमधून योग्य उमेदवाराची निवड करायची असते. त्या वेळी या चाचणीचा वापर केला जातो इत्यादी.
समीक्षक : अनंत जोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.