जी. हरिशंकर : (१० जून १९५८ – ११ फेब्रुवारी २००२). गोविंद राव हरिशंकर. कर्नाटक संगीतक्षेत्रामधील थोर खंजिरावादक. हे वाद्य वाजवताना ते केवळ एकाच हाताचा उपयोग करायचे. त्यांचा जन्म चेन्नई येथे झाला. जी. हरिशंकर यांनी लहानपणापासूनच त्यांचे वडील गोविंद राव यांच्या मार्गदर्शनाखाली खंजिरावादनास सुरुवात केली होती. कालांतराने त्यांनी सी. एस. रामनाथपुरम मुरुगभूपती आणि पालघाट मणी अय्यर यांच्याकडे मृदंग वादनाची तालीम सुरू केली. पुढे त्यांनी रामनाथपुरम सी. एस. संकेश्वरम यांच्याकडूनही वादनाचे धडे गिरवले. ते खंजीरा उजव्या हाताने वाजवत असत; पण मृदंग मात्र डाव्या हाताने वाजवत.

जी. हरीशंकर हे आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर लागणारी खंजिरावादनामधील अपेक्षित गतिमानता, विशिष्ट नाद निर्माण करताना वापरावी लागणारी ताकद, लयबद्धतेमधील क्लिष्टता आणि वाद्याच्या नादमधुरतेच्या सौंदर्यामध्ये असलेल्या विशेष कौशल्याचे उद्गाते म्हणून ओळखले जातात. कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका व संगीतकार एम. एल. वसंतकुमारी यांच्यासोबत त्यांनी पहिल्यांदा मैफलीत सादरीकरण केले.

भारतातील अनेक ज्येष्ठ तालवादकांनी त्यांच्यासोबत सादरीकरण करताना किंवा त्यांचे वादन ऐकताना वा पाहताना हे प्रत्यक्ष अनुभवले आहे की, एकल वादन वा जुगलबंदीच्या प्रसंगीदेखील ते आपल्या कौशल्यपूर्ण खंजिरावादनाने त्यांच्या मृदंगावरील सहवादकाला नामोहरम करत असत. एकल तालवाद्य सादरीकरण (थायी आवर्तनम्) प्रसंगी त्यांचे वादनकौशल्य सर्वोच्चस्थानी पोहोचत तर होतेच; पण ते अतुलनीय देखील होते. त्यांच्या मलेशिया आणि यूरोप मधील अनेक मैफलींमध्ये जुगलबंदीच्या प्रसंगी त्यांनी अनेक ख्यातकीर्त तबलावादकांना मागे पाडले होते.

एन. अमृथ, सी. पी. व्यासविठ्ठल आणि नेरूकुंम एस. शंकर या त्यांच्या शिष्यगणांनी जी. हरिशंकर यांच्या खंजिरा वादनशैलीमधील महत्त्वाचे गमक जाणून घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या विद्येचा आणि विशेष तंत्राचा अभ्यास व वापर आपल्या खंजिरा वादनात केला व त्यांचा वाद्यवादनाचा वारसा पुढे चालविला.

१९८० ते १९९० च्या दशकात मृदंगवादक करियकुडी आर. मणी, घटमवादक टी.व्ही. वासन आणि मोरचंगवादक श्रीरंगम कन्नन यांच्यासोबत त्यांनी केलेले एकत्रित वादन हे ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांच्या खंजिरावादनाच्या लयचित्र, श्रुतिलय आदी ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत.

तमिळनाडू राज्यशासनाकडून ‘कलायम् मणी’ हा देऊन पुरस्कार जी. हरीशंकर यांना गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमीचा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले खंजिरावादक होते.

जी. हरिशंकर यांचे ऐन उमेदीत वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी चेन्नई येथे देहावसान झाले.

                                                            मराठी अनुवाद : शुभेंद्र मोर्डेकर