दाक्षिणात्य संगीतातील एक तालवाद्य. थविल हे वाद्य नादस्वरम् (सनईसारखे वाद्य) या वाद्याबरोबर वाजवले जाते आणि दोन्ही बाजूंनी वाजवता येते. थविल बनविताना फणसाच्या झाडाचे खोड आतून पोखरून एक दंडगोलाकार घडविला जातो आणि त्याच्या दोन्ही टोकाला जंगली म्हशीचे कातडे ताणून बांधलेले असते. या तालवाद्याच्या उजव्या बाजूचा गोलाकार हा डाव्या बाजूच्या गोलाकारापेक्षा थोडा लहान असतो.

थविल वाजवताना वादक डाव्या हाताच्या बोटांवर धातूपासून तयार केलेले आणि टोपीच्या आकाराचे वेष्टन घालून त्या बाजूला वादन करतो आणि उजव्या हातात लहान काठी वापरून त्या बाजूने वाद्यावर आघात करून सुसंगत ध्वनीची निर्मिती केली जाते.

थविल हे मूलत: ‘भेरी’ या वाद्यप्रकारापासून तयार झालेले तालवाद्य आहे. हे तालवाद्य एक ‘मंगलवाद्य’ म्हणून ओळखले जाते. हे विशेषकरून विवाह समारंभ आणि मंदिरामध्ये आयोजिल्या जाणाऱ्या विविध अनुष्ठानांवेळी आणि इतर मंगलकार्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वापरतात. या तालवाद्याचा उपयोग लोकसंगीताच्या बरोबरीने शास्त्रीय संगीतामध्ये देखील केला जातो. थविलचा पहिला संदर्भ अरुणगिरीनाथ यांच्या १४ व्या शतकात रचलेल्या थिरुपुग्गज  या रचनेमध्ये आढळतो.

बऱ्याच प्रथितयश आणि दिग्गज वादकांनी आपल्या कौशल्याने या तालवाद्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. विशेषत: नादमंगलम् मीनाक्षी सुंदरमपिल्लई आणि जाफना तेछ्नापुर्ती पिल्लई हे या तालवाद्याच्या शास्त्रीय कर्नाटक संगीत चळवळीमधील वापराचे प्रमुख साधक म्हणून ओळखले जातात. श्रीमान वलयपट्टी ए. आर. सुब्रमण्यम्, हरिद्वारमंगलम् ए. के. पल्नीवेल आणि तंजौर टी. आर. गोविंदराज हे देखील थविल वाद्यवादन परंपरेचे आजमितीचे साधक म्हणून नावाजले गेले आहेत.

मराठी भाषांतर : शुभेंद्र मोर्डेकर