परकीय प्रभावांच्या विरोधात देशी परंपरा, विचार, मूल्ये यांची पाठराखण करणे म्हणजे देशीवाद होय. मुळात देशीवाद ही एक सामाजिक, राजकीय, मानसिक आणि भाषिक संकल्पना आहे. माणसाचे मन म्हणजे कोरी पाटी नसून जन्मताच माणसामध्ये विचारक्षमता बीजरूपात अस्तित्वात असते, असे मानसशास्त्रामधील देशीवाद प्रतिपादतो. राजकारणामध्ये देशीवाद विचारसरणी अथवा धोरण म्हणून परक्या समूहांना टाळून स्थानिक समूहांच्या हितास प्राधान्य देतो. देशीवाद एक वृत्ती आहे, जी परकीयांपेक्षा स्वकीयांना झुकते माप देते. साहित्य व्यवहारामध्ये देशीवाद बाह्य परंपरा, मूल्य, संस्कृतींचे आक्रमण थोपवून आपापल्या प्रदेशातील आंतरिक आणि स्वाभाविक वैशिष्ट्यानुसार वाङ्मयीन कलाकृती निर्मितीचा पुरस्कार करतो.

देशीवाद ही संकल्पना विविध ज्ञानशाखांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रचलित असल्यामुळे तिची विशिष्ट व्याख्या करणे कठीण आहे. त्याच बरोबर वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या अभ्यासकांमध्ये देशीवादाच्या विविध लक्षणांच्या आविष्कारांबाबत सहमती असेलच असे नाही. देशीवादाचे प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक स्वरूप लक्षात घेतले जाते.

देशीवादाचा राजकीय स्वरूपातील आधुनिक उदय अमेरिकेत सुमारे इ. स. १८३५ ते इ. स. १८४५ या दरम्यान झाला. या काळात यूरोपमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होणाऱ्या कॅथलिक लोकांविरोधात अमेरिकेत चळवळ उभी राहिली. यालाच अमेरिकावाद असेही म्हणतात. इ. स. १८४४ मध्ये निर्माण झालेली ‘नो नथिंग पार्टी’ स्थलांतरित कॅथलिकांना जोरकस विरोध करू लागली. इ. स. सोळाव्या ते सतराव्या शतकांपासून यूरोपातील प्रोटेस्टंट-कॅथलिकांमधील वादाचे लोण अमेरिकेत पसरले. एकेकाळी यूरोपातून, प्रामुख्याने ब्रिटनमधून, स्थलांतरित झालेले प्रोटेस्टंट लोक अमेरिकन राज्यक्रांतीतील विजयानंतर आक्रमकरित्या अमेरिकन भूमीवर आपला हक्क सांगू लागल्याने हा वाद उफाळून आला.

याच सुमारास इ. स. १८५५ मध्ये भारतातदेखील ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांविरोधात हिंदू सावकार व ख्रिश्चन मिशनऱ्यांविरोधात तत्कालीन बंगाल प्रांतातील संथाल परगण्यात संथाल आदिवासींनी उठाव केला. बाहेरून स्थायिक होऊन आदिवासी परंपरांची निंदानालस्ती व त्यांचे भौतिक शोषण करणाऱ्या या समुदायाला ते ‘दिकू’ म्हणत. ब्रिटिश राजवटीपासून बिगर आदिवासींचे आदिवासीबहुल प्रांतात स्थलांतर निरंतर वाढू लागल्याने अशा चकमकी वारंवार उडू लागल्या. अलिकडे, ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणणाऱ्या अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे, ब्रिटनचे ब्रेक्झिटमधून (यूरोपीयन संघ) बाहेर पडणे अथवा देशोदेशी स्थलांतरितविरोधी आंदोलनांनी उचल खाणे, ही उदाहरणे आजघडीच्या देशीवादी धोरणांचा परिपाक आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत देशीवादी स्वरूपाचा आग्रह धरून पुनरुज्जीवनवादी, धार्मिक मूलतत्त्वादी विचार व परंपराही अधिक धारदार बनत आहेत. यातून लोकशाही मूल्ये धोक्यात येऊन बहुसांस्कृतिकता व सांस्कृतिक एकोपा यांची क्षती होत राहील. दुसरीकडे, आर्थिक क्षेत्रात ‘स्वदेशी’ विरुद्ध ‘बहुराष्ट्रीय’ अशी तेढही वाढीस लागल्याचे दिसते.

अमेरिकन मानवशास्त्रज्ञ राल्फ लिंटन यांनी इ. स. १९४३ मध्ये अमेरिकन ॲन्थ्रोपॉलॉजिस्ट मध्ये लिहिलेल्या आपल्या ‘नेटिव्हस्टिक मुव्हमेंट्स’ या निबंधात सर्वप्रथम देशीवाद सिद्धांताचे स्वरूप मांडले. मानवशास्त्रानुसार देशीवाद म्हणजे भिन्न संस्कृती संपर्कातून होणाऱ्या बदलांविरोधातील प्रतिक्रिया होय. उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवाशांना स्थलांतरित परकीय पण आधुनिक लोकांच्या संस्कृतीमुळे आपला समाज व पारंपरिक वहिवाट नष्ट होण्याची भीती वाटू लागली. स्थलांतरित यूरोपीयन आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांनी सुसज्ज असल्यामुळे त्यांना प्रखर विरोध करणे शक्य नव्हते. यातून स्थानिक समूहमनात भीती व वैफल्यग्रस्तता निर्माण होत असे. या भीती आणि वैफल्याचा प्रतिरोध म्हणून स्थानिक लोक स्वतःच्या विजयाच्या व परकीय आक्रमक संस्कृतीच्या पराभवाच्या कल्पना करत. यासाठी त्यांनी भूतकाळातील मिथक, प्रतिक, परंपरा यांना उजाळा देऊन स्वकीय गतवैभवाच्या कल्पना दृढ केल्या. या प्रेरणाविश्वातून एतद्देशीयांमध्ये समूह जाणीव व जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी, परकीय संस्कृतीला विरोध करणाऱ्या आणि स्वसंस्कृतीचे गौरवीकरण करणाऱ्या चळवळींना उत्तेजन मिळाले. या संदर्भात स्थानिकांकडून प्रसृत संभाषिताला लिंटन यांनी देशीवाद संबोधले आहे.

भारतात देशीवादाची मांडणी प्रामुख्याने मराठी साहित्यातून १९८० च्या दशकात झाली. ही मांडणी प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक भालचंद्र नेमाडे यांनी केली. ‘जेव्हा एखाद्या संस्कृतीचे अस्तित्व दुसऱ्या प्रबळ संस्कृतीच्या अस्तित्वामुळे धोक्यात येते, तेव्हा दडपलेल्या समाजात देशीयतेची जाणीव निरनिराळ्या स्वरूपांमध्ये उद्भवते’ या लिंटन यांच्या मांडणीचा आविष्कार नेमाडे यांनी आपल्या साहित्य व समीक्षाद्वारा करून नवीन साहित्य सिद्धांतनाचे विकसन केले.

नेमाडे यांच्या मते, ‘परकी, बाह्य  मूल्ये, भाषा, संस्कृती हे देशी कला, भाषा व संस्कृतींवर जेव्हा वरचढ ठरतात, तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी दडपलेल्या मानवी समूहांना देशीवादी व्हावे लागते’. आपली भाषिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन संस्कृती व परंपरा जोपासणे, त्यांच्यावर होणारे बाह्य आक्रमण थोपविणे, आपल्या प्रदेशातील आंतरिक आणि स्वाभाविक वैशिष्ट्यानुसार वाङ्मयीन कलाकृती निर्माण करणे हे नेमाडे यांच्या देशीवादाचे सार आहे.

नेमाडे यांच्या देशीवादामध्ये तीन मुद्दे प्रमुख आहेत.

  • (१) पाश्चिमात्य आधुनिकीकरण, ब्रिटिश वसाहतवाद यांनी लादलेल्या मूल्यांच्या तसेच जागतिकीकरण निर्मित एकसाची संस्कृतीच्या विरोधात नेमाडे यांचा देशीवाद उभा राहतो. त्यांच्या मते, वसाहतवाद, जागतिकीकरण यांसारख्या परकीय प्रभावांच्या रणधुमाळीत प्रादेशिक समूहांपाशी आपली भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी देशीवाद हे एक उपयुक्त शस्त्र आहे.
  • (२) साहित्य-समीक्षा व सिद्धांताचे वैश्विक मानदंड नाकारून नेमाडे यांनी देशी मानदंडाची आवश्यकता प्रतिपादिली आहे. जगातील सर्व जाती-जमातींमध्ये माणसांचे रीतीरिवाज, वर्तनशैली कशा असतात, हे माहीत असल्याशिवाय जागतिक वा वैश्विक मानदंड ठरविता येत नाही. मानवी जीवनातील अनेक गोष्टी समूहविशिष्ट असल्यामुळे, तसेच जगण्याच्या परिमाणामध्ये जमातगणिक फरक असल्याने त्यांना देशी मानदंडाची आवश्यकता भासते.
  • (३) देशीकरणात जुनाट, बुरसटलेली मूल्ये व परंपरांना स्थान नसते. देशीवादामध्ये अनेक संस्कृती, मूल्ये, परंपरा यांना सामाविण्याची जशी ताकद आहे, तशीच गतानुगतिक टाकून देऊन नवीन, कल्याणकारी मूल्ये स्वीकारण्याचीदेखील तयारी आहे.

देशीवादाला जगभरातील वेगवेगळ्या समाजातील काही घटकांकडून समर्थन मिळत आहे, तसा काही घटकांकडून विरोध व सैद्धांतिक पातळीवर टीकाही होत आहे. ‘येथील’ आणि ‘बाहेरील’ असा भेद देशीवादाच्या मुळाशी आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक देशीवादी धोरणे ही ‘देशी’ विरुद्ध ‘परके’ या मांडणीवर आधारित असल्याने समाजामध्ये कलह व संघर्षाचे कारण बनत आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे मेक्सिको व इतर देशांतील स्थलांतरितांविरोधी धोरण, यूरोपमध्ये मध्य आशिया, आफ्रिकेतून होणाऱ्या शरणागतांच्या वाढत्या स्थलांतरांविरोधात फोफावणाऱ्या नव-उजव्या चळवळी, भारतातील परभाषिक, परप्रांतीयांच्या विरोधातील आंदोलने या सर्वांना देशीवादाची किनार आहे. स्थलांतरित लोक स्थानिकांचे रोजगार बळकावतात, सरकारी खर्च वाढवतात, स्थलांतरित स्थानिक भाषा शिकत नाहीत, स्थानिक संस्कृतीत समरस होत नाहीत, समाजात दुही माजवतात, दहशतवादाचा धोका निर्माण करतात, परस्पर सौहार्द व सामंजस्य बिघडवतात इत्यादी आक्षेप घेत मूळ रहिवाशी समुदायाच्या परंपरा, मूल्ये व श्रम यांचे जतन, संरक्षण व उदात्तीकरण केले जाते. वंश, वर्ण, धर्म, भाषा, जात यांची ऐतिहासिकता पोटात घेऊन देशीवाद संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली संकुचित, भेदभावपूर्ण मनोवृत्तीला या संदर्भात खतपाणी घालत आहे.

युवाल हरारी या अभ्यासकाच्या मते, आजच्या जगात वांशिक विषमता कमी होत असून संस्कृतीवाद आणि संस्कृती श्रेष्ठत्वातून निर्माण होणाऱ्या विषमता वाढत आहेत. गैरस्थानिक लोकांना बलात्कारी, दहशतवादी, असंस्कृत, लुटारू अशी अवास्तव, एकांगी व विखारी नामाभिधाने वापरून देशीवादी मनोवृत्ती कट्टर केली जात आहे. यातून एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीविषयी असणारा तिरस्कार, मत्सर प्रतीत होतो. संस्कृतींचा विकास एकमेकांचे सहकार्य व देवाणघेवाणीतून होतो याचा विसर पडून, जग संस्कृती-संघर्षाच्या वाटेवर जाण्याचा धोका अतिरेकी  देशीवादातून उद्भवतो.

मूलत: देशीवाद एखादा भूभाग व तेथे नांदणारा सांस्कृतिक वारसा यांमध्ये जैविक नाते असल्याचे मानतो. मानवी इतिहासात वरचढ बळाद्वारा कित्येक स्थानिक संस्कृतींचा नाश केला गेल्याचे दाखले सापडतात. जेथे सामाजिक अभिसरण वा स्थित्यंतर समोपचाराने न होता हिंसकरित्या घडले असेल, तेथे एतद्देशीयांमध्ये वरिष्ठ सत्ताधीशांबद्दल असंतोष धुमसतच राहणार. कृत्रिमरित्या बाह्य संस्कृतीचे आरोपण हे फार काळ तग धरू शकत नाही, अशी देशीवादी धारणा आहे. देशीवादाच्या गृहीतकांना पर्यावरणवादातून बऱ्यापैकी पुष्टी मिळते. स्थानिक वनस्पती व प्राणी निसर्गत:च सभोवताली उपलब्ध जल, वायु, तापमान यांवर अवलंबून असतात. त्यांच्यातील नाते परस्परावलंबी असते. मानवी समाजाचे संक्रमण व निसर्गातील संक्रमण एकसमान नसले, तरी मानवी समाजाचा पोत हादेखील काही अंशी त्या त्या प्रदेशातील स्थानिक वैशिष्ट्यांतून घडत असतो.

देशीवादी प्रेरणांतून उद्भवलेल्या सर्वच चळवळी या संकुचितपणाच्या द्योतक आहेत, असे मानणे चुक ठरेल. काही चळवळी या स्थानिक वंचितांच्या व शोषितांच्या न्याय हक्कांसाठीसुद्धा झगडत असतात. इतिहासातील व समकालीन बहुतेक आदिवासी लढे हे जंगल, जमीन व पाणी यांवरील त्यांचा पारंपरिक हक्क परप्रांतीयांनी व शासनाने बळजबरीने बळकावण्याविरोधात राहिले आहेत. बलाढ्य शत्रूविरोधात आदिवासींनी प्रतिकारासाठी स्वीकारलेले हिंसक मार्ग हे या संघर्षांची तीव्रता दर्शवतात. देशीवादी प्रेरणांतून साकारलेले हे लढे केवळ सांस्कृतिक नव्हे, तर भौतिक संसाधनांवरील मालकी हक्कांशीही संबंधित असतात. थोडक्यात, प्रतिगामी व पुरोगामी हे देशीवादाचे दोन्ही चेहरे आहेत.

संदर्भ :

  • कसबे, रावसाहेब, देशीवाद : समाज आणि साहित्य, मुंबई, २०१६.
  • देसाई, दत्ता, देशीवाद, आधुनिकता आणि जनवादी संस्कृती?, पुणे, २०१८.
  • थोरात, हरिश्चंद्र, मुल्यभानाची सामग्री, मुंबई,२०१६.
  • नेमाडे, भालचंद्र, टीकास्वयंवर, औरंगाबाद, २०१६.
  • नेमाडे, भालचंद्र, साहित्य,संस्कृती आणि जागतिकीकरण, मुंबई, २००३.
  • Harari Noah Yuval, Sapiens : A brief history of humankind, London, 2014.

समीक्षक : महेश गावस्कर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.