नेमाडे ,भालचंद्र : (२७ मे १९३८).मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते – देशीविदेशी साहित्याचे पुरस्कर्ते.भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. १९५५ मध्ये जळगाव जिल्ह्यातील भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून प्रथम श्रेणीत शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भाषा विज्ञान या विषयात एम्.ए. केल्यानंतर १९६४ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम्.ए. (इंग्रजी) केले. १९८१ मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पीएच्.डी. केले. अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, गोवा, लंडन, मुंबई अशा विविध ठिकाणी १९६४ ते १९९८ पर्यंत ते अध्यापक. प्रपाठक, विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. १९९१ ते १९९८ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासनमध्ये अध्यापन केले. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मयप्रकार, भाषाविज्ञान, भारतीय साहित्य, तौलनिक साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य इ. त्यांचे अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय आहेत. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळावर सल्लागार सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांची इंग्रजी आणि मराठी ग्रंथसंपदा विपुल आहे. नेमाडे यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात फेब्रुवारी १९५६ पासून झाली. ‘निळे मनोरे’ ही त्यांची पहिली कविता, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली. त्यांनतर विविध नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७० मध्ये मेलडी हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९९१ मध्ये देखणी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. पण त्यांना ओळख मिळाली ती १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ या कादंबरीमुळे आणि नंतरच्या त्यांच्या समीक्षालेखनामुळे.

नेमाडे यांची साहित्यसंपदा – मेलडी (१९७०), देखणी (१९९१) हे कवितासंग्रह;  कोसला (१९६३), बिढार (१९७५), झूल (१९७९) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ (२०१०) ह्या कादंबऱ्या ; साहित्याची भाषा (१९८७), टीकास्वयंवर (१९९०), तुकाराम (१९९४), साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (२००१) दि इनफ्लुअन्स ऑफ इंग्लीश ऑन मराठी (१९९०), सोशिओलिंग्विस्टिक ॲन्ड स्टायलिस्टिक स्टडी, नेटिविझम मराठी-इंग्रजी समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मलयाळम्, गुजराती, पंजाबी, उर्दू, उडियामध्ये अनुवाद झाले असून विशेष म्हणजे त्यांच्या झूल आणि हिंदू कादंबरीचे ब्रेल या अंधांसाठीच्या लिपीतही रूपांतर झाले आहे.

नेमाडे यांच्या लेखनातील टोकदारपणा, तिरकसपणा, परंपरेची मोडतोड करणारी परखड शैली, चिकित्सक दृष्टी, देशीवादाचा प्रखर पुरस्कार आणि त्यांनी मांडलेला मूल्यविचार या साऱ्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. मेलडी या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण सतरा कविता आहेत. पण नंतर वीस वर्षांनी प्रकाशित झालेल्या देखणी (१९९१) या काव्यसंग्रह मेलडीतील सतरा कविता आणि नंतर लिहिलेल्या २० कविता अशा मिळून एकूण सदतीस कविता आहेत. तेव्हा देखणीचे उपशीर्षक मेलडी आणि नंतरच्या कविता असे आहे. नेमाडे यांच्या कवितेला कोणत्याही एका काव्यपरंपरेत समाविष्ट करणे अवघड आहे. त्यांच्या कवितेत विशाल मानववादाचा उत्कट करुणेचा आविष्कार दिसतो. तसेच त्यांचा अनेक कविता निवेदक ‘मी’ चे आत्मचरित्र सांगणाऱ्या आहेत. ‘फर्ग्युसन कॉलेजात पुन्हा’ ही कविता जर सरळपणे आठवणींचा बंध असलेली, नॉस्टॅलजिक स्वरुपाची आहे. त्यांची कविता प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्वत:च्या आयुष्याबद्दल बोलत राहते. चांगल्या माणसाचे मनोहर तसेच कारुण्यपूर्ण चित्रणही त्यांच्या कवितेत दिसते. नेमाडे यांच्या कवितांमध्ये संगीत, लोकसंगीत, चित्रपटसंगीत यांचे संदर्भही विखुरलेले दिसतात. अनेक कवितांमध्ये लोकगीतांच्या लयी आविष्कृत झालेल्या आहेत. उदा., ‘भगनाची वही’ हे खानदेशातील लोकगीत आहे. तर ‘सेरनाद: आडवाटेक’, आकाशी रूसला गो चंद्र’ ही कोकणी लोकगीते आहेत. अशाप्रकारे भाषेची, विषयांची विविधता त्यांच्या काव्यात दिसते.

कोसला पासून हिन्दूपर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक आत्मभान असलेले लेखक आहेत. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या कोसला या पहिल्याच कादंबरीने मराठी कादंबरी लेखनाची परिमाणेच बदलून टाकली. या कादंबरीतून महाविद्यालयीन तरुणाचे-नायक-पांडुरंग सांगवीकरचे भावविश्व समर्थपणे रेखाटले आहे.‘पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात गावाकडून शिक्षणासाठी आल्यावर ही चार वर्षे जे आयुष्य मी जगलो, ते जसच्या तस कोसला मध्ये आले आहे. कोसलातले दिवस हे जवळपास माझेच त्यावेळचे दिवस आहेत. कोसला प्रथमपुरुषी निवेदनात लिहिली आहे. त्याचा नायक पांडुरंग सांगवीकरच, ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो, अशी आहे. म्हटलं तर ही स्वत:ची कहाणी आणि म्हटलं तर त्या पिढीतील लोकांची कहाणी आहे. कॉलेजचे शिक्षण घेणारा पांडुरंग चित्रित करताना नेमाडे यांनी आपल्या शैक्षणिक पद्धतीतला पोकळपणा चित्रित केला असे नव्हे तर जीवनाच्या इतर अंगातही असलेला सच्चेपणाचा अभाव त्यांनी दाखविला आहे. नेमाडेंनी ‘कोसला’ची निर्मिती केली ती वयाच्या चोवीस-पंचविसाव्यावर्षी. कादंबरीचा रूढ पारंपरिक साचा टाळून देशीय, महानुभाव, संत, शाहिरी, चिपळूणकरी-फुले अशा जुन्या-नव्या शैलीचा आकर्षक वापर त्यांनी कोसलामध्ये केला आहे. निवेदनासाठी विविध तंत्रे वापरली असून भाषाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तोंडची वाटावी अशी अनौपचारिक स्वरूपाची उपयोगात आणली आहे. हे सगळे करून जीवनाबद्दलचा गंभीर विचार, सखोल चिंतन त्यांनी कादंबरीत दाखविले व रूढ स्वरूपाच्या कादंबरी लेखनाला जोरदार धक्का देऊन नवी अभिरूची निर्माण केली. कोसला कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली. अनेक आवृत्त्या निघाल्याच आणि इतर अनेक भारतीय भाषात त्याचे अनुवादही प्रसिद्ध झाले.

कोसला नंतर १९७५ मध्ये बिढार ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर जरिला, हूल, झूल या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनुभवाचा भाग या कादंबऱ्यात आला आहे. महाराष्ट्राच्या या भागातील जीवनाचे त्यातील भाषाविशेषांसकट चित्रण आहे. आपल्या शैक्षणिक तसच सामाजिक जीवनाचे अंतर्भेदी चित्रण करून वाचकांना अंतर्मुख करायला लावले. त्यांच्यामते कादंबरीने वाचकांना अस्वस्थ केले पाहिजे. शिवाय त्या कृतीने समाजाची इंचभर का होईना, प्रगती झाली पाहिजे. या भूमिकेतूनच नेमाडे यांनी आपले कादंबरीलेखन केले आहे. एकूणच महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व, प्रेमाकर्षण, तरुणपण, बेकारी, सर्वत्र आढळणारा मूल्यऱ्हास, नोकरीतील-शिक्षणक्षेत्रातील कमालीची बकाली, समाजातील आणि नात्यातील गुंतागुंत या साऱ्या वास्तवाला तोंड देणारा ‘झूल’ कादंबरीतील चांगदेव पाटील. चांगदेवचा सहप्रवासी नामदेव भोळे कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर हे सारे आपल्यातलेच वाटत असल्याने आपल्याच आयुष्याचे प्रतिबिंब असल्याने, त्यांच्या कोसला, बिढार, जरिला ते हिंदू पर्यंतच्या साऱ्या कादंबरऱ्या लोकप्रिय झाल्या. हिंदू ही ६०३ पानांची दीर्घ कादंबरी आहे. नेमाडे यांनी हिंदू संस्कृतीचे केवळ भारतदेशाच्या संदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या नकाशावर, आपल्या देशी अस्तित्वानिशी मांडलेले आख्यान केवळ अपूर्व आहे. आज उग्र होऊ पाहणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेला आव्हान देणारा आणि हिंदू या संकल्पनेचाच मूळापासून विचार करायला लावणारा हा व्यापक पट आहे.

खानदेशातील सातपुडा पर्वतांच्या परिसरातील मोरगाव या गावातल्या शेतकरी, वारकीर कुटुंबातील खंडेराव हा या कादंबरीचा नायक आणि निवेदकही आहे. पुरातत्त्व विद्येमध्ये संशोधन करून पीएच्.डी. मिळविण्यासाठी तो पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये आला आहे.कृषी संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती, श्रमविभागणी, रीतिरिवाज, नात्यागोत्यांचा सांभाळ, आपल्या पूर्वजांच्या कथा, नातेसंबंधातील गलबला हे सारे इथल्या संस्कृतीचे एक व्यवच्छेदक लक्षण असल्याचे खंडेराव सुचवितो. हे इथले एक वास्तव आहे असे त्याला जाणवते. मात्र तो त्याचे समर्थनही करीत नाही.खंडेरावाच्या जाणिवेमध्ये ‘स्थलांतर’ हे महत्त्वाचे विषयसूत्र अखंडपणे वावरताना दिसते. मोरगाव आणि अवतीभवतीच्या परिसरात स्थिरावलेल्या जाती-जमाती, जगण्याच्या गरजेतून स्थलांतरीत होऊन आलेल्या लोकांचे प्राथमिक स्तरावरचे जगणे आणि इतरांशी आलेला संबंध आणि व्यवहारही तो बघत असतो. विशिष्ट भूप्रदेशात आता स्थिरावलेले लोकसमूहही एकेकाळी स्थलांतरित होऊनच आले असणार असे अनेक विचार त्याच्या मनात येत असतात.मोरगावच्या परिसरातील निसर्ग, महाखाडा, मांगवाडा, चांभारवाडा, भटके विमुक्त आणि स्थलांतरित, बलुतेदार अशा असंख्य आणि वैविध्यपूर्ण तपशीलातून खंडेरावाच्या मनोभूमीवर मोरगावचा परिसर सगुण आणि साकार होतो.मोरगावच्या परिसरातील खानदेशी बोली, इतरांच्या बोली, आदिवासी, भिल्ल-लमाणांची भाषा, त्यातील वैविध्य, म्हणी, वाक्प्रचार, लोकगीतांची भाषा अशा अनेकविध स्तरांवरील भाषा, या साऱ्या घटकांचे सार्वभौम स्वरूप आणि त्याचा सहजसंचार हे हिंदू कादंबरीचे फार मोठे वैशिष्ट्य आहे.अशा या समर्थ लेखकाला २०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. नेमाडे हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त चौथे मराठी साहित्यिक आहेत.

नेमाडे जसे समर्थ कादंबरीकार आहेत. तसेच ते समर्थ, परखड समीक्षकही आहेत. अनेक दिग्गज लेखकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. त्यांचा पहिला सडेतोड लेख ‘निरस्तपादपे देशे:’ श्री. के. क्षीरसागर यांचा वादसंवाद हा रहस्यरंजनच्या ऑक्टोबर १९६१ च्या अंकात प्रसिद्ध झाला. लघुपत्रिका चळवळीचाही तो प्रारंभ होता. मराठीतील अनेक लेखकांच्या ननैतिक वाङ्मयीन व्यवहारावर त्यांनी – ‘हल्ली लेखकराव होतो, तो कां?’ या समीक्षालेखात टीका केली आहे. टीकास्वयंवर, साहित्याची भाषा या दोन्ही समीक्षाग्रंथाच्या लेखनात त्यांनी भाषेचे स्वरूप, लेखकाचा पेशा, साहित्यातील सांस्कृतिक देशीयता, नवनैतिकवाद या संकल्पनाचे स्पष्ट आणि परखड विवेचन केले आहे.तुकाराम या साहित्य अकादमीसाठी लिहिलेल्या पुस्तकात नेमाडे यांनी आधुनिकतेची परंपरेशी सांगड घातलेली आहे. तुकारामांनी ऐहिक, पारलौकिक, सीमारेषा पुसून कालातीत जीवन व्यतीत केले. हे तुकारामाच्या कार्यकर्तृत्वाचे थोरपण त्यांनी उलगडून दाखविले आहे. या व्यतिरिक्त त्यांचे अनेक शोधनिबंध, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत.

नेमाडे हे मातृभाषा मराठीचा देशीयतावादी पुरस्कार करणारे लेखक असल्याने, त्यांनी आपली पहिली कादंबरी ‘कोसला’ ते ‘टीकास्वयंवर’मधील जवळजवळ सर्वच समीक्षालेखातून देशीवादाचा पुरस्कार सतत केला आहे. आधुनिक मराठी आणि भारतीय साहित्य, इंग्रजीसारख्या संकुचित साहित्य संकल्पनांवरच नको इतके विसंबून राहत आहे ही टोचणी एक प्राध्यापक, संशोधक, समीक्षक म्हणून त्यांना सतत अस्वस्थ करीत होती. यासंदर्भात एका मुलाखतीत ते म्हणतात, “देशी सौंदर्यशीलता अस्तित्त्वातच नाही. किंबहुना तिची गरजही नाही, असं मानून, आपले साहित्य काँग्रेस गवतासारखे फोफावत होते. या सगळ्यामुळे माझ्या मनात क्षोभ निर्माण होत असे. या एकंदर परिस्थितीतूनच माझ्या मते देशीवाद मांडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.’’ “खरंतर कुठल्याही निर्मितीप्रक्रियेत आपापल्या परिसराचं, इतिहासाचचं, भूगोलाचं, समाजाचं आणि एकंदर सर्व प्रकारच्या पर्यावरणाचं भान गृहीत धरलेलं असतं. प्रदीर्घ काळच्या आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक गुलामगिरीमुळे आणि सांस्कृतिक आयातीच्या व्यापाराची सवय जडल्यामुळे, परकीय प्रतिमाने समोर ठेवून, नि:सत्त्व संवेदनशीलतेची परकीय प्रतिमाने समोर ठेवून, साहित्यनिर्मितीची सवय लागली आहे. त्यामुळे देशी वास्तवाला फारच वाईट दिवस आले आहेत. आपल्या साहित्य परंपरेचे भान ज्याला नसत, असा लेखक निश्चितपणे श्रेष्ठ होऊ शकत नाही. साहित्यकृतीच्या अस्सलपणाची ही एक कसोटी आहे. प्रादेशिक अस्मिता आणि देशीयता यांचे निकटचे संबंध आहेत. सगळ्या स्वातंत्र्यचळवळी  प्रादेशिक अस्मितेपोटीच निर्माण होतात. संयुक्त महाराष्ट्र हे काय होते? प्रादेशिक अस्मिता असण्यात आणि ती बाळगण्यात काहीही अनैतिक नाही वस्तुत: जगात सर्वत्र राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळी जिथे जिथे झाल्या, तिथे तिथे देशीवाद उफाळून आला…देशीयता हा देशीपणावर आधारलेला उदारवृत्तीचा विचारपंथ असून, त्यातले फुले, रानडे, म. गांधी, राम मनोहर लोहिया, विनोबा भावे, सानेगुरुजी हे देशीवादी विचारवंत, त्या काळातील बिगर देशीवादी, परसंस्कृतीवादी कोणाहीपेक्षा, परसंस्कृतीच्या आकलनात अधिक तेज, अधिकज्ञानी, अधिक सर्जनशील, अधिक उदारवृत्तीचे होते. देशीवाद आणि देशीपणा या दोन्ही अवस्थांना सामावणारा शब्द म्हणून आपण ‘देशीयता’ ही संज्ञा वापरली. या शब्दांनी व्यक्त होणारं, त्या त्या प्रदेशाचे व्यक्तिमत्त्व स्वाभाविकत:च कलानिर्मितीत उतरतं.”

त्यांच्या साहित्यसेवेच्या  सन्मानार्थ त्यांना ह. ना. आपटे पुरस्कार (१९७६ बिढारसाठी), कुरुंदकर पुरस्कार (१९८७), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१), कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), बहिणाबाई पुरस्कार (१९९१), महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (२००१), लाभसेटवार फाउंडेशन पुरस्कार (२००३), पद्मश्री (२०११), जनस्थान पुरस्कार (२०१३), साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (२०१४) इ. अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

संदर्भ :

  • देशमुख,श्रीकांत(संपा),भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य,साक्षात प्रकाशन,औरंगाबाद.
  • सानप,किशोर,भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा,साकेत प्रकाशन,औरंगाबाद.

 

This Post Has One Comment

  1. Vikas Jadhav

    so use full information thank u so much

प्रतिक्रिया व्यक्त करा