पारंपरिक किंवा प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांसमोर केलेले अध्यापन आणि आभासी पद्धतीद्वारे केलेले अध्यापन या दोन्ही अध्यापनपद्धतींद्वारे एकाच वेळी करण्यात येणाऱ्या अध्ययनाला मिश्र अध्ययन असे म्हणतात. मिश्र अध्ययन, संकरित अध्ययन, तंत्रविज्ञान मध्यस्थी अध्यापन, वेबवर्धित अध्यापन अशा विविध संज्ञा मिश्र अध्ययन पद्धतीसाठी समानार्थाने वापरल्या जातात. मिश्र अध्ययन ही संज्ञा सुरुवातीला अस्पष्ट होती. विविध प्रकारचे तंत्रज्ञान व अध्यापन शास्त्रीयपद्धतींचा समावेश त्यामध्ये होता. कर्टिस बोंक व चार्ल्स ग्रॅहम यांनी २००६ मध्ये प्रथम प्रकाशित केलेल्या मिश्र अध्ययनावरील हस्तपुस्तिकेमुळे ही संज्ञा अधिक सुस्पष्ट होण्यास मदत झाली. त्यांच्या मते, ‘मिश्र अध्ययन ही एक अशी अध्ययन पद्धती आहे, ज्यामध्ये समोरासमोरील अध्यापन (पारंपरिक अध्यापन) आणि संगणक साहाय्यीत अध्यापन यांचे एकत्रीकरण केले जाते’. म्हणजेच यामध्ये पारंपरिक अध्ययन-अध्यापन पद्धती व आभासी अध्ययनांचे एकत्रीकरण किंवा सुरेख मिलाफ केला जातो. या पद्धतीमध्ये विद्यार्थी तंत्रज्ञान व प्रत्यक्ष अनुभव या दोन्ही माध्यमांचा वापर अध्ययनासाठी करतात; कारण संपूर्ण शिक्षणप्रक्रिया पारंपरिक पद्धतीतून पूर्णपणे तंत्रविज्ञानाकडे वळवता येत नाही. तसेच हा संपूर्ण बदल एकदम स्वीकारायला अनेक अडचणी निर्माण होतात. यासाठी मिश्र अध्ययनात प्रत्यक्ष अध्यापनाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. गॅरिसन आणि वॉगन यांच्या मते, ‘विचारपूर्वक निवडलेल्या अनुदेशन, आभासी उपागम व तंत्रज्ञानाचे संघटनात्मक एकात्मीकरण म्हणजे मिश्र अध्ययन होय’.

मिश्र अध्ययन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक व आभासी या दोन्ही अध्ययन-अध्यापन पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते. जर एखादा विद्यार्थी काही कारणास्तव प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्ययनासाठी उपस्थित राहू शकला नाही, तर त्याला आंतरजालीय बहुमाध्यम कृतीद्वारे शिकण्याची संधी प्राप्त करून देता येते. सामान्यत: मिश्र अध्ययनाशी संबंधित दोन मुख्य तत्त्वे आहेत. एक, जे विद्यार्थी माहितीची देवाणघेवाण करू शकतात आणि इतर विद्यार्थ्यांसमवेत सहयोगात्मक वातावरणामध्ये कार्य करू शकतात, त्यांना शिक्षणाचा अधिक समृद्ध अनुभव असतो. दोन, गट कृती आंतरजालीय संसाधनाकडून किंवा धड्यांमधून गोळा केलेल्या माहितीवर अवलंबून असतील, तर विद्यार्थ्यांमधील सहयोग किंवा सहकार्य सुधारू शकते. संवादात्मक, समोरासमोर वर्गकृतींद्वारे आणि आंतरजालीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना समृद्ध शैक्षणिक अनुभव असतात, असे मानले गेले आहे. २०१० मधील संशोधनात मिश्र अध्ययन हे पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक परिणामकारक असल्याचे दिसून आले. तसेच पूर्णतः आभासी किंवा पूर्णतः समोरासमोरील वर्ग अनुभवांपेक्षा मिश्र अध्ययन अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांचे आकलन अधिक प्रभावी होते, असेही निष्कर्ष दिसून आले.

मिश्र अध्ययनाची प्रतिमाने :

  • समोरासमोरील मार्गदर्शन : समोरासमोरील मार्गदर्शन प्रतिमानात शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. गरजेनुसार काही विद्यार्थ्यांना आंतरजालीय माध्यमांतून आभासी अध्यापन पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. या प्रतिमानानुसार विद्यार्थी पारंपरिक वर्गामध्ये जास्त काळ उपस्थित राहतो व तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या गतीने शिकतो.
  • क्रमागत प्रतिमान : प्राथमिक स्तरासाठी क्रमागत प्रतिमान जास्त वापरले जाते. यामध्ये विद्यार्थी आळीपाळीने ठरावीक वेळापत्रकानुसार आभासी पद्धतीने व प्रत्यक्ष वर्ग अनुदेशन घेण्यासाठी फिरत राहतो. आभासी वर्गामध्ये शिकताना ज्या अडचणी निर्माण होतात, त्यांचे स्पष्टीकरण पारंपरिक वर्गामध्ये दिले जाते. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना दोन्ही प्रकारच्या अनुदेशनाचा आनंद घेता येतो. या प्रतिमानाद्वारे शिकताना विद्यार्थी जास्त क्रियाशील बनतात.
  • लवचिकता प्रतिमान : लवचिकता प्रतिमानात आभासी अध्ययनावर भर असतो. यामध्ये आंतरजालाच्या माध्यमातून किंवा आभासी अध्ययन पद्धतीद्वारे अध्ययनसामग्री सादर केली जाते. विद्यार्थी स्वगतीने व स्वतंत्रपणे नवनवीन कल्पनांचे स्वतः अध्ययन करतात. येथे मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक नेहमी उपलब्ध असतात. विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ संगणक कक्षात घालवतो व स्वयंअध्ययनात व्यस्त असतो.
  • आभासी प्रयोगशाळा प्रतिमान : ज्या ठिकाणी आभासी अध्यापन करण्यासाठी भौतिक साधनसुविधांची कमतरता असते, तेथे आभासी प्रयोगशाळा या प्रतिमानाचा वापर केला जातो. यामध्ये विद्यार्थी फक्त आभासी अध्ययन करतात. आभासी अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी संगणक कक्षात जावे लागते. बाहेरच्या संगणक प्रयोगशाळेत जाऊन विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करतात. तेथे विद्यार्थ्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक असतात; परंतु ते प्रशिक्षित शिक्षक असतातच असे नाही.
  • स्व-मिश्र प्रतिमान : स्व-मिश्र प्रतिमान माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वापरले जाते. विद्यार्थी पूरक अध्ययनासाठी स्वतः आभासी अभ्यासक्रम निवडतात. शालेय वातावरणात जे काही शिकविले जाते, त्यापेक्षा जास्त आणि पूरक अध्ययन म्हणून विद्यार्थी आभासी अभ्यासक्रम निवडतात. विद्यार्थी असा विषय निवडतात, जो शालेय वातावरणात शिकविला जात नाही.
  • आभासी मार्गदर्शक प्रतिमान : आभासी मार्गदर्शक प्रतिमान पारंपरिक मार्गदर्शक प्रतिमानाच्या नेमके विरुद्ध असते. यामध्ये मार्गदर्शक आभासी पद्धतीने म्हणजेच अप्रत्यक्ष उपलब्ध असतात. अध्ययन हे आभासी माध्यमातून होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आभासी पद्धतीद्वारेच उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना शंका विचारण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शकाचा विकल्प असतो. या प्रतिमानाद्वारे अध्ययन करताना विद्यार्थी आपली शंका आभासी पद्धतीतूनच विचारतात व शंकानिरसन करतात. ज्यांना आपल्या अध्ययनात जास्त स्वातंत्र्य आणि लवचिकता हवी असते, त्यांच्यासाठी हे प्रतिमान आदर्श असते.

पारंपरिक किंवा आभासी अध्यापनापेक्षा मिश्र अध्ययन अधिक परिणामकारक असल्याचे दिसून येते. या पद्धतीने विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वाढल्याचे आढळते. विद्यार्थी स्वयंअध्ययनाने स्वगतीने शिकतात. विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सहकार्यात्मक अध्ययन अनुभव सुलभतेने पुरविले जातात. याच्या वापरामुळे शिक्षणावरील खर्च कमी करता येतो व वेळेचीही बचत होते. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ अनुदेशनावर भर देते. म्हणून व्यक्तिनिष्ठ अनुदेशन पद्धतीचे सर्व फायदे मिश्र अध्ययनाला लागू पडतात. ज्या विद्यार्थ्यांना व्यक्तिगत अनुदेशनाची गरज आहे, त्यांना व्यक्तिगत अनुदेशन करण्याची संधी मिळते. हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या मदतीने त्यांच्या कौशल्यांमध्ये प्रगती करण्याची संधी उपलब्ध होते.

तंत्रविज्ञानाची साक्षरता नसेल, तर मिश्र वर्गांमध्ये अध्ययन संसाधनाचा वापर करताना अडचणी उद्भवू शकतात. उदा., मिश्र अध्ययनामध्ये गटकार्य हे एक आव्हान ठरू शकते. आभासी अध्ययन-अध्यापनामध्ये गटकार्याचे आयोजन करताना व्यवस्थापकीय अडचणी निर्माण होऊ शकतात. आभासी विषय सामग्री शोधणे आणि पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जाचे तांत्रिक ज्ञान असलेले विद्यार्थी असावे लागतात. तसेच भौतिक साधनसुविधांची कमतरता असेल, तर ही पद्धत वापरणे खूप कठीण जाते.

संदर्भ : सुशील कुमार; पाथरे, नीला, अध्यापनाच्या आधुनिक कार्यनिती, जळगाव, २०१९.

समीक्षक : अनंत जोशी; कविता साळुंके