सय्यद हुसेन अलातस (Syed Hussein Alatas) : (१७ सप्टेंबर १९२८ – २३ जानेवारी २००७). प्रसिद्ध मलेशियन समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक विज्ञान संस्थांचे संस्थापक. अलातस यांचा जन्म इंडोनेशियातील बोगोर येथे सय्यद अली अलतास आणि शरीफाह रगुआन अलयद्रस यांच्या पोटी झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण जोहोर, मलेशिया येथे झाले. त्यानंतर ते काही काळ व्यवसायादरम्यान (इ. स. १९४२ – इ. स. १९४५) सुकाबुमी, जपान, पश्चिम जावा येथे वास्तव्यास होते. महायुद्धानंतर अलातस जोहोर बहरू येथे इंग्लिश कॉलेजमध्ये शालेय प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी परतले. त्यांनी ॲम्स्टरडॅम विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९५६ मध्ये त्यांनी तेथेच पदव्युत्तर पदवी आणि १९६३ मध्ये पीएच. डी. या यादव्या संपादन केल्या.

अलातस यांनी १९५८ मध्ये दिवाण बहासा दान पुस्ताका (भाषा आणि साहित्य संस्था, मलेशियाची सरकारी संस्था) येथे संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये मलाया विद्यापीठात अर्धवेळ व्याख्याते म्हणून अध्यापनास सुरुवात केली आणि १९६३ मध्ये ते मलाया विद्यापीठाच्या मलय अभ्यास विभागातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बनले. १९६७ मध्ये सिंगापूर विद्यापीठात मलय अभ्यास विभागाचे प्रमुख पद स्वीकारून त्यांनी जवळपास २० वर्ष (१९८७) या विभागाचे नेतृत्व केले. त्यानंतर ते क्वालालंपूर येथील मलाया विद्यापीठाचे कुलगुरू झाले; परंतु लाचलुचपत प्रतिबंधक संस्थेने कार्यालयीन प्रक्रियेच्या कथित उल्लंघनाच्या चौकशीनंतर त्यांची नियुक्ती अचानक रद्द केली. त्यांनी विद्यापीठामध्ये केलेल्या बदलांमुळे त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मानले जात होते. अखेरीस त्याना या सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले.

अलातस यांची शेवटची शैक्षणिक कारकीर्द ही मलेशियामध्ये युनिव्हर्सिटी केबांगसान येथे गेली. तेथे ते १९९५ ते १९९७ या काळात जनरल स्टडीज सेंटरमध्ये कार्यरत होते. त्यानंतर ते मानवशास्त्र आणि समाजशास्त्र या विभागांशी संलग्न होते (१९९७ ते १९९९). प्रिन्सिपल रिसर्च फेलो म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते इन्स्टिट्यूट ऑफ द मलय वर्ल्ड अँड सिव्हिलायझेशन येथे कार्यरत होते. अलातस यांनी त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत धर्म, विकास, भ्रष्टाचार, राजकारण, विचारधारा, वसाहतवाद यांसह इतरही विषयांवर विपुल लिखाण केले. त्यांच्या सर्वोत्कृष्ट कार्यापैकी द मिथ ऑफ द लेझी नेटिव्ह हा त्यांचा ग्रंथ आहे. ज्यात त्यांनी स्थानिकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी यूरोपियन वसाहतवादाने आळशी मूळ लोकांची मिथक कशी तयार केली, हे शोधून काढले. यासाठी एडवर्ड सैद यांनी आपल्या ओरिएन्टालिझम या पुस्तकात अलातस यांचे ऋण मान्य केले आहे.

अलातस हे आग्नेय आशियातील प्रख्यात सामाजिक शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांना आग्नेय आशियातील समाजशास्त्रीय संशोधनाचे संस्थापक मानले जाते. त्यांनी उपनिवेशिक भांडवलशाही आणि त्याचे समाजशास्त्रीय परिणाम यांचे भेदक विश्लेषण करणारे द मीथ ऑफ द लेझी नेटिव्ह हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या विपुल विद्वत्तापूर्ण लेखनाने भ्रष्टाचाराचे समाजशास्त्र, राजकीय समाजशास्त्र आणि धर्माचे समाजशास्त्र, तसेच आधुनिकीकरणातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अलातस यांनी ट्यूनिशियन समाजशास्त्रज्ञ इब्न खाल्दून यांचे इतिहास आणि समाजशास्त्राच्या तत्त्वज्ञान संदर्भातील योगदान नेमकेपणाने ओळखले होते.

अलातस यांचे समाजशास्त्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी तिसऱ्या जगातील बौद्धिक बंदिवानतेची (इंटेलेक्च्युअल कॅप्टिव्हिटी) आणि पहिल्या जगाच्या बौद्धिक साम्राज्यवादाची (इंटेलेक्च्युअल इम्पेरिॲलिझ्म) चिकित्सा केली आहे. त्यांनी बाहेरील वैचारिक परंपरांचादेखील अंतर्भाव असेल, अशी एत्तदेशीय बौद्धिक सर्जनशीलतेची गरज अधोरेखित केली आहे. त्यांनी मलेशियातील सार्वजनिक जिवनातील बुद्धीजीविंच्या अभावाबद्दलची खंत व्यक्त केली आहे. ज्ञानाच्या इस्लामीकरणाच्या एकूण प्रकल्पांबद्दल त्यांना अस्वस्थता वाटत होती. त्यांनी मलेशियन संस्कृती व राजकारणातील सरंजामी धारणा आणि मलेशियन समाजात पुनरुत्पादित होत असलेल्या वसाहतिक धारणा यांबद्दलची चिकित्सा व समाजशास्त्रीय विश्लेषण केले आहे.

अलातस हे शैक्षणिक कार्यासोबतच राजकारणातही सक्रीय होते. बहुसांस्कृतिकतेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी १९६८ मध्ये टॅन ची खून, वांग गुंगवू, लिम चोंग ईयू आणि जे बी ए पीटर यांच्यासमवेत पार्टी गेराकन रकयत मलेशियाची (गेराकान) स्थापना केली आणि तिचे संस्थापक अध्यक्ष बनले. गेराकनने वांशिक राजकारण आणि टोकाच्या पंथांपासून मुक्त असलेला एक व्यवहार्य राष्ट्रीय विरोधी पक्ष बनण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांनी निव्वळ विरोधासाठी सरकारला विरोध करू नये, तर चेक-अँड-बॅलन्स करण्याचे काम केले पाहिजे, असा युक्तिवाद अलातस यांनी केला.

अलातस हे निवडणुकीला उभे राहिले नसले, तरी गेराकनने पेनांग राज्य सरकार ताब्यात घेतले (१९६९). तेव्हा पेनांग राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिवाण नेगारामध्ये अलातस यांची सिनेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते मलेशियाच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य होते (१९६९ ते १९७१). अलातस यांनी १९७२ मध्ये अलायन्स पार्टीमध्ये (बारिसन नॅशनलचे अग्रदूत) सामील झाल्यावर गेराकन सोडले. त्यांनी डाव्या विचारसरणीची राजकीय पार्टी केडिलान मास्याराकट मलेशियाची (पेकेमास) स्थापना करून इतर गेराकन सदस्यांना सोबत घेतले. त्यानंतर शैक्षणिक जबाबदारीचे कारण देत त्यांनी पेकेमासही सोडले.

अलतास हे १९८२-८३ मध्ये राष्ट्रीय आघाडीचा एक घटक असलेल्या बर्जासा पक्षाचे सदस्य होते. ते १९८५ मध्ये युनायटेड मलाया नॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाले. तत्पूर्वीही इ. स. १९४६ मध्ये ते तिचे सदस्य होते. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या भ्रष्टाचाराविरुद्धच्या जागतिक युतीच्या सल्लागार मंडळावर बसणारे अलतास हे एकमेव मलेशियन होते. पेनांग राज्य सरकारने १९९९ मध्ये त्यांना शैक्षणिक आणि राजकारणातील योगदानाबद्दल डीएसपीएन (दारजाह सेतिया पंगकुआन नेगेरी) ‘डाटो’ ही पदवी प्रदान केली.

अलतास यांची पुढील महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत : द शोशलॉजी ऑफ करप्शन, १९६८; थॉमस स्टम्फोर्ड राफ्लेज, १९७१; मॉडर्नायझेशन अँड सोशल चेंज, १९७२; इंटेलेक्च्युअल इन डेव्हलपिंग सोसायटिज, १९७७; द मीथ ऑफ द लेझी नेटिव्ह, १९७७; इंटेलेक्च्युअल क्रिएटिव्हिटी, १९७९; द प्रॉब्लेम ऑफ करप्शन, १९८६; करप्शन, १९९०; द न्यू मलय : हिज रोल अँड फ्युचर, १९९६; डेमोक्रसी अँड ऑथरायटरीअनिझम इन इंडोनेशिया अँड मलेशिया, १९९७; मलयजा मुस्लिम अँड द हिस्टोरी ऑफ सिंगापूर, १९९८; करप्शन अँड द डेस्टिनी ऑफ एशिया, १९९९; अल्टरनेटिव्ह डिस्कोर्सेस इन एशियन सोशल सायन्स, २००६; मॉरल व्हिजन अँड सोशल क्रिटिक, २००७; अकॅडेमिक डिपेंडन्सी इन द सोशल सायन्सेस, २०१०; अप्लाइंग इब्न खाल्दून : द रिकव्हरी ऑफ ए लॉस्ट ट्रॅडिशन इन सोशलॉजी, २०१४ इत्यादी.

अलातस यांचे बुकीत दमांसारा येथे निधन झाले.

समीक्षक : विशाल जाधव