फ्रबेल, फ्रीड्रिख : (२१ एप्रिल १७८२–२१ जून १८५२). जर्मन शिक्षणतज्ज्ञ व बालोद्यान शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म ओबरव्हाइसबाख (थुरिंजिया) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव फ्रीड्रिख विल्हेल्म ऑगस्ट फ्रबेल होय. त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे रीतसर प्राथमिक शिक्षण घेता आले नाही. पंधराव्या वर्षी त्यांना एका वनव्यावसायिकाकडे उमेदवार म्हणून दोन वर्षांसाठी ठेवण्यात आले. या दोन वर्षांच्या काळात प्राणी व वनस्पती यांचे निरीक्षण करण्याची संधी त्यांना लाभली.

फ्रबेल हे सतरा वर्षांचे असताना येना विद्यापीठात शिकत असलेल्या आपल्या वडीलभावाला भेटण्यास गेले आणि शिकण्याच्या तीव्र इच्छेने ते विद्यापीठात दाखल झाले. आर्थिक अडचणींमुळे वर्षभरातच त्यांना शिक्षण सोडावे लागले; त्याचबरोबर शिक्षणासाठी कर्ज घेतले असता ती कर्जफेड न झाल्याने त्यांना थोडे दिवस तुरुंगातही जावे लागले. नंतरच्या चार वर्षांत त्यांनी अनेक प्रकारची कामे केली; पण कशातही त्यांचे मन रमले नाही. १८०५ साली फ्रँकफुर्ट येथे वास्तुकलेचा अभ्यास करीत असताना फ्रबेल यांची योहान हाइन्‍रिक पेस्टालॉत्सी (Johann Heinrich Pestalozzi) या स्विस शिक्षणतज्ज्ञांच्या ग्रुनेर नावाच्या शिष्याशी ओळख झाली. ग्रुनेर यांच्या आग्रहाखातर त्यांच्याच शाळेत फ्रबेल शिक्षक म्हणून काम करू लागले. हा व्यवसाय त्यांच्या आवडीचा होता. १८०८ साली ते स्वित्झर्लंडमधील इव्हरडन येथे पेस्टालोत्सी यांच्या शाळेत दाखल झाले. तेथे दोन वर्षे राहून त्यांनी पेस्टालोत्सी यांच्या अध्यापनपद्धतीचा सूक्ष्म अभ्यास केला.

फ्रबेल यांनी स्वतंत्रपणे शिक्षकाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि गटिंगेन व नंतर १८११ साली बर्लिन विद्यापीठात अध्ययन केले. विद्यापीठात शिकत असतानाच १८१३ मध्ये ते सैन्यात दाखल झाले. सैन्यात त्यांची लँगेथल व मिडेनडॉर्फ या दोघांशी मैत्री झाली. हे दोघे त्यांचे अखेरपर्यंत सहकारी होते. सैनिकी दलातून परतल्यावर बर्लिन विद्यापीठात त्यांना नोकरी मिळाली. तेथेच त्यांनी भौतिकी, रसायनशास्‍त्र, भाषाशास्‍त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला.

फ्रबेल यांनी १८१६ साली ग्रीशायम (जर्मनी) येथे शाळा काढली व ती १८१७ साली कीलां (जर्मनी) येथे हलविली. ही शाळा पेस्टालोत्सी यांच्याच शैक्षणिक तत्त्वावर सुरू केली होती; परंतु पेस्टालोत्सी यांच्या पद्धतीतील काही उणिवा त्याना जाणवू लागल्या. त्यांचे शिक्षणविषयक विचार परिणत होत गेले. १८२६ साली द एज्युकेशन ऑफ मॅन (इं. भा. १८८५) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. फ्रबेल यांच्या एका मित्राने स्वित्झर्लंडमधील लूझर्न प्रांतातील आपला एक किल्ला (दुर्ग) फ्रबेल यांना शाळा काढण्यासाठी दिला. त्यामुळे १८३१ साली त्यांनी त्या दुर्गात शाळा काढली व लवकरच ती त्याच प्रांतातील व्हिलिझाऊया या गावी हलविली. दोन्ही ठिकाणी कॅथलिक धर्मगुरूंचा विरोध झाल्यामुळे शाळा यशस्वी झाली नाही; पण स्विस सरकारने त्यांना शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम दिले. ते १८३७ पर्यंत स्वित्झर्लंडमध्ये राहिले. त्याच वर्षी त्यांनी ब्‍लांकेनबुर्ग येथे पहिली बालवाडी काढली. ही शाळा १८४४ साली आर्थिक अडचणींमुळे बंद करावी लागली; तथापि या वेळेपर्यंत त्यांच्या शाळेला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली होती आणि तिच्या धर्तीवर अनेक शाळा जर्मनीत निघाल्या होत्या. १८४४ ते १८४९ या काळात त्यांनी जर्मनीभर व्याख्यानांद्वारा आपल्या शिक्षणविषयक विचारांचा प्रसार केला. १८४९ साली मारिएंथल (थुरिंजिया) येथे त्यांनी प्रशिक्षण शाळा काढली. दुर्दैवाने १८४८ साली यूरोपात झालेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर त्यांची विचारसरणी स्फोटक समजली जाऊ लागली व १८५१ साली बालोद्यान पद्धतीवर प्रशियन सरकारने बंदी घातली.

फ्रबेल यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर त्यांच्या वैयक्तिक जीवनातील, विशेषतः त्यांच्या बालपणातील, प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम झालेला आहे. रोपट्याच्या संगोपन-संवर्धनासाठी माळी हा जसा प्रयत्‍न करतो, तसाच प्रयत्‍न आईवडिलांनी मुलांच्या विकासासाठी केला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाला नैतिक व सामाजिक अशा दोन बाजू आहेत. बालकांच्या निकोप व प्रबळ इच्छाशक्तीचा संपूर्ण विकास हे त्यांचे शिक्षणविषयक ध्येय होय. ऐच्छिक कृती व स्वयंप्रेरित कृती हा शिक्षणाचा पाया असल्याने कृतियुक्त शिक्षणपद्धती हीच शिक्षणाची खरी पद्धती होय, अशी त्यांची भूमिका होती. त्यांची शिक्षणपद्धती क्रीडन पद्धतीवर आधारलेली आहे. खेळ ही एक बालस्वभावविशिष्ट क्रिया असून तीमुळे बालकाच्या वृत्ती व जीवन यांचा विकास होतो. खेळांतून मुलांचा निसर्गाशी व जगाशी संबंध येतो. खेळाद्वारे विश्रांती, सहेतुकता, शिस्त आणि स्वातंत्र्य यांसारख्या गोष्टी साध्य करता येतात. नैसर्गि‌क खेळांमुळे मुलांना पूर्णत्व प्राप्त होते. म्हणूनच रूसोप्रमाणे फ्रबेल यांनी निसर्गशिक्षणाला चालना दिली. भिन्न कार्यांतून आणि व्यवसायांतून शिक्षण द्यावे, असाही विचार त्यांनी मांडला. फ्रबेल यांनी पुरस्कारलेली बालोद्यान पद्धती (Kindergarten) आधुनिक शिक्षणशास्‍त्रात महत्त्वाची समजली जाते. जगभर माँटेसरी शिक्षण पद्धती इतकीच ती प्रचलित आहे.

फ्रबेल यांचे ग्रंथ पुढील : दि एजियुकेशन ऑफ मॅन (१८२६), इन्वेटींग किंडरगार्टन (१८२७), मदर्स साँग्ज, गेम ॲण्ड स्टोरीज (१८४५), दि पेडॉगॉजिक्स ऑफ दि किंडरगार्टन (१८६१), दि साँग्स ॲण्ड म्युझिक ऑफ फ्रीड्रिख फ्रबेल्स मदर प्ले (१८९५), रिव्हायवल : ऑटोबायग्राफी ऑफ फ्रीड्रिख फ्रबेल (१९९५), इत्यादी.

फ्रबेल यांचे मारिएंथल येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा