संयुक्त राष्ट्र संघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेची शैक्षणिक विकासार्थ एक महत्त्वपूर्ण योजना. मानव होण्यासाठी अध्ययनाची आवश्यकता असून शिक्षणाचा मुख्य उद्देश शाश्वत अर्थात चिरंतर विकास असा संयुक्त राष्ट्रसंघाने मत मांडले. शिक्षण हे केवळ समाज परिवर्तनाचेच साधन नव्हे, तर मानवी जीवनात क्रांतिकारक परिवर्तन घडविण्याचे मूलभूत आणि प्रभावी साधन आहे, हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने एकविसाव्या शतकातील शिक्षण कसे असावे, याचा अभ्यास करण्यासाठी १९९८ मध्ये एका आयोगाची स्थापना केली. फ्रान्सचे अर्थमंत्री जॅक डेलॉर यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांच्या आयोगामध्ये भारतीय शिक्षणतज्ज्ञ करणसिंग हे एक सदस्य होते.

‘शाश्वत विकास’ हा शब्दप्रयोग विश्व पर्यावरण विकास आयोग म्हणजेच ‘बर्टलँड’ आयोगाने १९८७ मध्ये पहिल्यांदा वापरला आहे. या आयोगाच्या मते, सध्याच्या पिढीला गरजांची पूर्तता पुढील पिढीच्या गरजा भागविण्यासाठीच्या क्षमता अबाधित राखून करणे म्हणजे, शाश्वत विकास होय. काहींनी ‘धारणाक्षम विकास’ किंवा ‘प्रतिपालनिय विकास’ असाही शाश्वत विकासाचा अर्थ लावलेला आहे; मात्र शाश्वत विकासाची संकल्पना ही प्रथम संयुक्त राष्ट्राच्या ‘पर्यावरण व विकास’ या १९९२ च्या विश्व पर्यावरण विकास आयोगाने रीओ दे जानेरो येथील वसुंधरा परिषदेत मांडली. ज्यामध्ये शाश्वत विकास म्हणजे, ‘असा विकास की, ज्यात वर्तमान काळातील विकासासाठीच्या गरजा भागविताना भावी पिढीच्या विकासाच्या क्षमतांशी तडजोड न करणे होय.’ थोडक्यात, आपल्या विकासाच्या परिणामाची फार मोठी किंमत पुढील पिढीला मोजावी लागू नये, विकास करीत असताना लागणारे घटक योग्य प्रमाणात वापरून जतन करून संवर्धन करणे म्हणजे शाश्वत विकास होय. विकास या शब्दाचा अर्थ व अन्वयार्थ जीवनशैलीची उत्तरोत्तर प्रगती होणे असा आहे. शिक्षण, आरोग्य, निसर्ग या घटकांचा यात मोठा हातभार असतो. शिक्षण हे भविष्यातील जगाला तसेच व्यक्ती व समाजाला ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने काम करण्यास प्रवृत्त करणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. या दृष्टीने १९९२ च्या रीओ दे जानेरो येथील परिषदेत शाश्वत विकासासाठी शिक्षणाचा चार अंगानी विचार करण्यात आला. एक, मूलभूत शिक्षणाचे उन्नयन व सुधारणा; दोन, शाश्वत विकासासाठी सर्व स्तरावरील शिक्षणाची पुनर्रचना; तीन, शाश्वत विकासाबाबत जनसामान्यामध्ये जाणीव जागृती व सामंजस्याचा विकास आणि चार, प्रशिक्षण.

संयुक्त राष्ट्राच्या २०१२ मधील रीओ दे जानेरो येथे पार पडलेल्या परिषदेमध्ये शाश्वत विकासाची सुमारे १७ उद्दिष्टे ठरविण्यात आली आणि ती सप्टेंबर २०१५ मध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेत अधिकृतपणे मान्य करण्यात आली. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी २०१६ ते २०३० असा १५ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला. यामध्ये सर्वांसाठी समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हे शैक्षणिक उद्दिष्ट महत्त्वाचे असून या उद्दिष्टांतर्गत एकूण दहा विविध लक्ष्ये ठरविण्यात आली. त्यामध्ये २०३० पर्यंत सर्व स्त्री-पुरुषांना परवडणारे व गुणवत्तापूर्ण असे तंत्र, व्यावसायिक आणि विद्यापीठ स्तरावरील शिक्षण सुनिश्चित करणे; रोजगार व उद्योजकतेसाठी आवश्यक तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य असलेले तरुण आणि प्रौढांच्या संख्येत लक्षणीय वाढ करणे; लिंग असमानता दूर करून समाजातील प्रत्येक असुरक्षित व्यक्तीला सर्व प्रकारचे शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणात समान प्रवेश-संधी सुनिश्चित करणे या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा समावेश होतो.

शाश्वत विकासाचे महत्त्व लक्षात घेता एकविसाव्या शतकातील शिक्षण काय आणि  कसे असावे, या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून संयुक्त राष्ट्रसंघाला सादर केलेल्या अहवालाला ‘जॅक डेलॉर रिपोर्ट’ संबोधले जात असले, तरी आयोगाने अहवालाला ‘शिक्षण एक अनमोल आंतरिक ठेवा’ असे अतिशय समर्पक नाव दिले आहे. यामध्ये भूतकाळाच्या प्रकाशात वर्तमानकालीन कृती करायच्या असतात आणि भविष्यातील स्वप्ने रंगवायची असतात, यालाच ऐतिहासिक दृष्टी म्हणतात. यापूर्वीच्या अहवालात तेच केले होते आणि मागील पिढीच्या समस्या आणि उद्भवलेले संघर्ष यांचा धांडोळा घेतला होता (१९७२). याच जोडीला शतकातील लोकसंख्या, ज्ञान आणि आकांक्षा यांमध्ये झालेल्या प्रचंड स्फोटाची गंभीरपणे दखल घेतलेली होती. त्यामुळे शिक्षणाची केवळ लांबी-रुंदीच वाढली असे नाही, तर शिक्षणाची खोलीही वेगाने विस्तारत असून काळ घटनांची चौथी मितीसुद्धा शिक्षणाला लागू होत असल्याचे म्हटले जाते.

विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुयोग्य बदल घडून येण्यासाठी शाश्वत विकासाच्या शिक्षणात जास्तीत जास्त विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची आवश्यकता आहे. त्यामुळे अध्यापकाने अध्यापन करताना बुद्धीमंथन, प्रश्नोत्तर पद्धती, प्रकल्प पद्धती, संशोधन पद्धती, गटचर्चा पद्धती, क्षेत्रभेटी इत्यादी पद्धतींचा वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरित करावे, त्यांच्यात स्वतंत्र विचारशक्ती व दूरदृष्टीचा विकास होण्यासाठी प्रयत्न करावे, विद्यार्थांमध्ये सामाजिक व व्यावसायिक कौशल्ये विकसित होण्यास प्रयत्न करावे.

शाश्वत विकासासाठी शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमात पुढील घटक असावेत ꞉ (१) स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही लोकशाही मूल्ये असावित. (२) प्राथमिक ते उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरण शिक्षण सक्तिचे असावे. (३) अभ्यासक्रमात प्रत्येक नागरिकाचे हक्क, कर्तव्य व जबाबदारी असणारे घटक असावे. (४) त्यात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश असावा. (५) भाषा, विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी विषयांचा शाश्वत विकासामध्ये मोलाचे स्थान असल्याबाबत अभ्यासक्रमात नमुद असावे. (६) संपूर्ण जगाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत सद्यस्थितीची माहिती अभ्यासक्रमात असावी. (७) समानता व बंधुता यांबाबत माहिती असावी.

एकविसावे शतक हे ज्ञानाधिष्ठित समाजाचे युग आहे. ज्ञान हीच शक्ती, संपत्ती आणि ऊर्जा बनणार आहे. जगाचे अर्थकारणही ज्ञानाधिष्ठित असेल आणि अध्ययन करण्याची संघटना राष्ट्र आणि जगाची शासक असणार आहे. ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञानसंग्रह, ज्ञानविश्लेषण, ज्ञानव्यवस्थापन आणि जीवनाच्या व जगाच्या विविध क्षेत्रांत संपादित ज्ञानाचा उपयोग करणे, अशी कौशल्ये शिक्षणातून व्यक्तीला मिळाली पाहिजे. केवळ बौद्धिक व पुस्तकी शिक्षणाने या सर्व गोष्टी मिळणार नाहीत, तर तंत्रविज्ञानातील नेत्रदीपक प्रगती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गरजा सदैव शोधत राहण्याची वृत्ती शिकणाऱ्याच्या मनात निर्माण करता आली पाहिजे. शिक्षणातून व्यक्तीच्या जीवनात निरंतर गतिमानता आली पाहिजे. उपजत कार्यक्षमता, सर्वोत्तम विकास, सृजनशीलतेचे संगोपन आणि नव्या संकल्पना प्रसवण्याचे सामर्थ्य शिक्षणातून व्यक्तीच्या ठायी निर्माण करता आले पाहिजे. शिक्षणातून विमर्शी चिंतक निर्माण झाले पाहिजे. म्हणूनच विकासासाठीचे शिक्षण हे सहजीवनासाठी शिक्षण; ज्ञानसाधनेसाठी शिक्षण; कार्यसंस्कृती शिक्षण आणि आत्मशोधनासाठी शिक्षण या चार स्तंभावर उभे असेल. या स्तंभांमुळे शिक्षण हे जीवनशिक्षण होऊ शकेल.

समीक्षक ꞉ अनंत जोशी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.