सामाजिक आणि वर्तनविज्ञानातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठीचे एक उपागम. हे उपागम व्याख्यावादी दार्शनिक गृहितांवर (अभिगृहित किंवा विश्वदर्शन) किंवा विचारसरणीवर आधारित आहे. या उपागमाबरोबरच संख्यात्मक उपागम आणि मिश्र पद्धती उपागम हेसुद्धा प्रचलित आहेत. संख्यात्मक उपागम हे प्रत्यक्षार्थवादी दार्शनिक गृहितांवर आधारित आहे.
अभिगृहिते ꞉ गुणात्मक संशोधन हे उजव्या मेंदूच्या वर्चस्वाखाली काम करणारे असते. ते अरेखीव, पुनरावृत्तीय, सर्जनशील आणि आंतरक्रियात्मक असते. लिंकन आणि गूबा यांच्या मान्यतेनुसार संख्यात्मक दृष्टिकोण आणि गुणात्मक दृष्टिकोण हे प्रतिमानाच्या मुळाशी परस्पविरोधी अशी एक अभिगृहितीय व्यवस्था आहे. अभिगृहिते (मूलभूत विश्वास) स्वयंसिद्ध असतात. त्याच्या स्वीकृतीमागे कोणतेही सबळ कारण अथवा पुरावा नसतो. त्यांची सत्यता पडताळून पाहता येत नाही. अभिगृहित व्यवस्था ही विशिष्ट घटनासापेक्ष असते. अभिगृहिते ही एखाद्या संकल्पनात्मक अथवा सैद्धांतिक संरचनेचे मूलाधार म्हणून स्वीकारलेली असतात. गुणात्मक संशोधनातील काही अभिगृहिते पुढील प्रमाणे आहे :
(१) वास्तवतेचे स्वरूप (सत्तामीमांसा) : (अ) प्रत्यक्षार्थवादी मान्यता : वास्तवता ही एकमात्र, मूर्त, पृथक्करणक्षम आणि व्यक्तिनिरपेक्ष असते. वास्तवतेचे अस्तित्व मानवी अनुभव, मन आणि जाणीव यांच्याबाहेर, तसेच यांच्यापासून स्वतंत्र म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी त्यांच्यावर अवलंबून नसते. भौतिक किंवा सामाजिक वास्तवता मानवी जाणिवेच्या बाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात.
(आ) प्रकृतिवादी मान्यता : वास्तवता ही निर्मित आणि बहुविध असते. त्याचा अभ्यास संपूर्णपणे करता येणे शक्य आहे. वास्तवांच्या बहुविध अभ्यासातून वास्तवतेचे थोडेफार आकलन होऊ शकले, तरी त्यांना नियंत्रण करणे अथवा त्याबाबत पूर्वानुमान बांधणे शक्य होत नाही.
(२) ज्ञाता आणि ज्ञात (ज्ञानमीमांसा) : (अ) प्रत्यक्षार्थवादी मान्यता : ज्ञाता व ज्ञात अथवा निरीक्षक आणि निरीक्ष्य वस्तू यांच्यात पूर्णतः द्वैत/पार्थक्य असते. ते कोणत्याही प्रकारच्या आंतरक्रियांद्वारा एकमेकांना प्रभावित करीत नाही.
(आ) प्रकृतिवादी मान्यता : निरीक्षक आणि निरीक्ष्य वस्तू या एकमेकांना प्रभावित करण्याच्या दृष्टीने सतत आंतरक्रिया करीत असतात. ज्ञाता आणि ज्ञात यांना एकमेकांपासून अलग करणे अशक्य असते.
(३) सामान्यीकरणाची संभाव्यता : (अ) प्रत्यक्षार्थवादी मान्यता : निरीक्षण हे स्थलकाल निरपेक्ष असते. ते एका विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट वेळी, तसेच इतर ठिकाणी आणि इतर वेळीदेखील आढळून येते. याचा अर्थ असा की, काल आणि संदर्भनिरपेक्ष अशी नियमसापेक्ष सामान्यनियम व्यक्त करणारी विधाने करणे शक्य होते.
(आ) प्रकृतिवादी मान्यता : अन्वेषण प्रक्रियेतून खरी सार्वत्रिक, स्थलकाल निरपेक्ष, नेहमी आणि सर्वत्र लागू पडणारे व्यापक असे नियमसापेक्ष सामान्यनियम निष्पादित करणे शक्य नसते. म्हणजेच फक्त काल आणि संदर्भसापेक्ष कामचलाऊ परिकल्पना मांडणे तेवढे शक्य असते.
(४) कारण-कार्य-संबंधाची संभव्यता : (अ) प्रत्यक्षार्थवादी मान्यता : विश्वात घडणारी प्रत्येक घटना अथवा कृतीच्या मागे काही ना काही कारण असते. कारणाशिवाय कार्य संभवत नाही आणि घटना कोणत्यातरी कारणाचा परिणाम असतो. कारण आणि कार्य यांमधील संबंध म्हणजे एका प्रकारच्या घटनेनंतर दुसऱ्या प्रकारची घटना नित्यक्रमाने घडून येणे होय; कारण हे ‘पूर्ववृत्ती’ असते. इतकेच नव्हे, तर ‘नियतपूर्ववृत्ती’ असते.
(आ) प्रकृतिवादी मान्यता : कारण आणि कार्य यांच्यात फरक करणे अशक्य आहे; कारण विश्वातील सर्व व्यक्ती, वस्तू आणि घटना या एकसमयावच्छदेकरून एकदुसऱ्यांना प्रभावित करण्याच्या स्थितीतच असतात. त्यामुळे प्रत्येकाचे रूप व आकार सतत बदलत असतात. व्याख्यावादी कारण-कार्य-संबंध या संकल्पनेऐवजी एकसमयावच्छदेकरून परस्परांना आकार देणे या संकल्पनेचा स्वीकार करतात.
(५) अन्वेषात मूल्यांची भूमिका : (अ) प्रत्यक्षार्थवादी मान्यता : अन्वेषण हे मूल्यमुक्त असते. प्रत्यक्षार्थवादी अन्वेषणासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करतात आणि या पद्धतीत संशोधन परिस्थितीपासून संशोधकाचे व्यक्तिगत प्रभाव पूर्णतः वेगळे ठेवण्याची विशिष्ट व्यवस्था म्हणजे प्रायोगिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
(आ) प्रकृतिवादी मान्यता : अन्वेषण हे मूल्यबद्ध असून ते मूल्यनिरपेक्ष नसते. अन्वेषकाच्या मूल्याचा अन्वेषकाने निवडलेल्या उपागमाच्या मुळाशी असलेली स्वंयसिद्धके, त्याने आधारसामग्रीच्या संकलनासाठी, तिच्या विश्लेषणासाठी व प्राप्त परिणामांच्या अन्वयार्थासाठी प्रयुक्त मौलिक सिद्धांताच्या मुळाशी असलेली स्वयंसिद्धके आणि संदर्भांतर्गत मूल्ये या सर्वांचा अन्वेषणावर फार मोठा परिणाम होत असतो. याबरोबरच संशोधनसमस्या, उपागम, सिद्धांत आणि संदर्भ यांच्या मूल्य-सुसंगततेचा किंवा मूल्य-विसंगततेचा परिणामही अन्वेषणावर होत असतो.
(६) संशोधनप्रक्रियेचे स्वरूप : (अ) प्रत्यक्षार्थवादी मान्यता : गुणात्मक संशोधनाची प्रक्रिया पूर्वनिर्धारित असते. संशोधनाच्या अभ्यासाची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यापूर्वी संशोधकाने संशोधनप्रक्रियेच्या सर्व घटकांचे तपशीलवार नियोजन करायचे असते आणि त्यानुसारच संशोधनाची अंमलबजावणी करायची असते.
(आ) प्रकृतिवादी मान्यता : संख्यात्मक संशोधनसुद्धा पूर्वनिर्धारित असते. संशोधनाचे नियोजन शोधाभ्यासाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीच्या अगोदर निश्चित करता येत नाही; कारण घटनांचे अर्थ संदर्भसापेक्ष असतात. संशोधकास प्रत्यक्ष अभ्यासक्षेत्रात जे काही जाणून घ्यायचे असते, ते नेहमीच संशोधक आणि अभ्यासातील सहभागी व्यक्ती यांच्यातील आंतरक्रियांमधून होणाऱ्या परस्परांमधील बदलाचे स्वरूप प्रत्यक्ष डोळ्यानी पाहिल्याखेरीज समजणे अशक्य असते.
(७) संशोधनाची भाषाशैली : (अ) प्रत्यक्षार्थवादी मान्यता : संशोधनाची भाषा (लेखन) जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असणे आवश्यक असते. यासाठीच लेखनात ‘मी’, ‘माझे’ यांसारख्या प्रथमपुरुषी व्यक्तिवाचक सर्वनामांचा उपयोग न करता संशोधक/शोधकर्ता/अन्वेषक यांसारख्या तृतीय पुरुषवाचक सर्वनामांचाच वापर करणे इष्ट असते.
(आ) प्रकृतिवादी मान्यता : व्याख्यावादी संशोधनाचे लेखन जास्तीत जास्त व्यक्तिनिष्ठ आणि शोध अभ्यासातील सहभागी व्यक्तींच्या स्वाभाविक भाषाशैलीत असणे आवश्यक असते. लेखनात ‘मी’, ‘माझे’ यांसारख्या प्रथमपुरुषी व्यक्तिवाचक सर्वनामांचा उपयोग करता येतो.
लक्षणे : लिंकन आणि गूबा यांनी आपल्या नॅचरॅलिस्टिक इन्क्वायरी या मौलिक ग्रंथात व्यवहारयोग्य गुणात्मक अन्वेषणाच्या एकूण १४ लक्षणांची चर्चा केली आहे. ही लक्षणे प्रकृतिवादी दृष्टिकोणाच्या मुळाशी असलेल्या अभिगृहितांशी सुसंगत आणि परस्परावलंबी आहेत. ही लक्षणे सहक्रियाशील व सहयोगी आहेत. म्हणजे कोणत्याही एका लक्षणाची निवड केली असता त्याच्या मागोमाग इतर लक्षणेही येत असतात.
- (१) स्वाभाविक परिसर : गुणात्मक संशोधन हे स्वाभाविक परिसरात म्हणजेच प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणात केले जात नाही. गुणात्मक संशोधक आधारसमयी संकलित करण्यासाठी स्वतः कार्यक्षेत्रात जाऊन सहभागी व्यक्तींच्या अनुभवांचा आणि समस्यांचा अभ्यास करीत असतो; कारण शोधाभ्यासातील विविध घटनाचा (भौतिक, रासायनिक, जैविक, सामाजिक, मानसिक) जो स्वाभाविक अंगभूत अर्थ असतो, तितकाच अर्थ त्यांना त्यांच्या संदर्भानेही प्राप्त होत असतो.
- (२) मानवी साधन : गुणात्मक संशोधनात संशोधक स्वतःच आधारसामग्री संकलनाचे एक प्रमुख साधन म्हणून काम करतो. तो कागद-पेन्सील, चाचण्या यांसारख्या अचेतन किंवा जड साधनांचा उपयोग करीत नाही; कारण मानवी साधनांच्या ठिकाणी अंतरंग ओळखण्याची कुवत, लवचिकता आणि प्रतिसाद क्षमता अधिक असते. याबरोबरच मानवी साधनाला संपूर्णात्मक दृष्टिकोण घेणे, शब्दांत न मांडता येणारा, मात्र समजलेल्या ध्वनितज्ञानाचा उपयोग करणे आणि एकसमयावच्छदेकरून माहितीचे संपादन व तिच्यावर प्रक्रिया करणे शक्य असते.
- (३) ध्वनितज्ञानाचा उपयोग : गुणात्मक संशोधन करतांना शब्दांकित करता येणाऱ्या ज्ञानाबरोबरच शब्दात न मांडलेला (अव्यक्त), परंतु समजलेल्या ज्ञानाचा उपयोगही वैध मानला जातो.
- (४) गुणात्मक पद्धती : गुणात्मक संशोधनातील आधारसामग्री अंक अथवा संस्थेच्या स्वरूपात नसते. ती प्रामुख्याने संशोधनातील सहभागी व्यक्तींच्या शब्दांमध्ये म्हणजेच शब्दांच्या स्वरूपात असते.
- (५) सहेतुक प्रतिदर्शन : गुणात्मक संशोधनात सामान्यीकरणाऐवजी संदर्भघटक खूपच महत्त्वाचे असतात. यात वास्तवतेच्या बहुविध अंगांबाबत शक्य तितकी जास्त माहिती मिळविणे हा प्रधान हेतू असल्याने सैद्धांतिक सहेतुक प्रतिदर्शनाचा अवलंब केला जातो.
- (६) आधारसामग्रीचे विगामी विश्लेषक : गुणात्मक संशोधनात संशोधक अभ्यासपूर्व सिद्धांत अथवा चलघटकांपासून सुरुवात करीत नाही. सिद्धांत आणि चलघटक हे संशोधनातून निष्पन्न व्हावेत, अशी अपेक्षा असते. याकरिताच संकलित आधारसामग्रीचे विश्लेषण विगामी पद्धतीने केले जाते.
- (७) सहेतुक प्रतिदर्शन : सर्वसामान्य सिद्धांताची मांडणी आधारसामग्रींतून व्हावी, असा गुणात्मक संशोधनाचा आग्रह असतो; कारण वास्तवता ही बहुविध असते आणि अभ्यासक्षेत्रात अभ्यासकाला ज्या अनेक वास्तवांना तोंड द्यावे लागते, त्यांचा कोणत्याही अनुभवपूर्व सिद्धांताला अंदाज करता येणे शक्य नसते. तसेच स्थानिक स्तरावरील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटकांना सामावून घेणेही अनुभवपूर्ण सिद्धांताला शक्य नसते. म्हणूनच व्यक्तिसापेक्ष अन्वयार्थाचा आधार घेतला जातो.
- (८) उदयोन्मुख अभिकल्प : गुणात्मक संशोधन हे नेहमीच उदयोन्मुख असते. त्याचे काटेकोर पूर्वनिर्धारण करणे अशक्य असते. संशोधकाला अभ्यासक्षेत्रात जे काही जाणून घ्यायचे असते, ते नेहमीच संशोधक आणि प्रतिसादक यांच्यातील प्रतिक्रियांवर अवलंबून असते. आंतरक्रियांमधून होणाऱ्या परस्परांमधील संशोधक अर्थात गुणात्मक अभिकल्प हे नेहमीच विकसनशील असते, उत्क्रांत होणारे असते.
- (९) चर्चेतून किंवा वाटाघाटीतून निष्पन्न परिणाम : गुणात्मक संशोधनात वेगवेगळ्या प्रतिसादकांनी वास्तवतेची पुनर्रचना काय केली आहे, त्यांनी त्याचा काय अर्थ लावला आहे हे जाणून घ्यायचे असते. याबरोबरच आधारसामग्रीचा अर्थ संदर्भसापेक्ष व मूल्याधिष्ठित असल्याने संशोधकाने आधारसामग्रीचा जो अर्थ लावला असेल, त्याची छाननी आधारसामग्री पुरविणाऱ्या प्रतिसादकाकडून करून घेणे क्रमप्राप्त व आवश्यक असते. या छाननीनंतरच संशोधनाचे अंतिम निष्कर्ष मांडायचे असतात. यालाच चर्चेतून किंवा वाटाघाटीतून निष्पन्न परिणाम म्हटले जाते. यातूनच संशोधन निष्कर्षांची विश्वसनीय प्रस्थापित होत असते.
- (१०) प्रक्रियेबरोबर परिणामांवरही लक्ष : लोक एकमेकांशी आंतरक्रिया कशा करतात; विशिष्ट प्रश्नांची उत्तरे कशी दिली जातात; विविध शब्दांचा व कृतींचा अर्थ कसा लावला जातो; अभिवृत्तीचा वर्तनावर कसा परिणाम होतो; शिक्षकांची वागणूक, त्यांचे हावभाव व त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणी यांचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो इत्यादी बाबींवर गुणात्मक संशोधकाचे विशेष लक्ष असते.
- (११) अस्थायी उपयोजन : वास्तवता या बहुविध व वेगवेगळ्या असतात. संशोधनाचे निष्कर्ष हे संशोधक आणि प्रतिसादक यांच्या विशिष्ट आंतरक्रियांवर अवलंबून असते. त्या आंतरक्रियांची हुबेहूब आवृत्ती अन्यत्र आढळून येणे शक्य नसते. ती संशोधनाची मूळ परिस्थिती व नवीन परिस्थिती यांच्या एकरूपतेवर अवलंबून असते. या कारणांमुळे गुणात्मक संशोधक आपल्या निष्कर्षाच्या स्थानांतरणीयतेबाबत कोणतेच स्पष्ट विधान करीत नसतात.
- (१२) अहवाल लेखनासाठी व्यक्तिअभ्यास पद्धती : संशोधनाचे निष्कर्ष अन्य परिस्थितीत खरे ठरतील की, काय (संशोधन निष्कर्षाची स्थानांतणीयता) याबाबतचे निर्णय घेण्यासाठी शोधाभ्यासाच्या मूळ परिस्थितीचे सघन वर्णन अत्यावश्यक असते आणि ते व्यक्तिअभ्यास पद्धतीतून शक्य आहे. यासाठी गुणात्मक संशोधनाचे निष्कर्ष अहवालस्वरूपात सादर करण्यासाठी व्यक्तिअभ्यास पद्धतीचा उपयोग केला जातो.
- (१३) व्यक्तिसापेक्ष अभ्यासात नियमसापेक्ष सामान्यीकरण : व्यक्तिसापेक्ष अभ्यासात नियमसापेक्ष सामान्यीकरण शक्य नसते किंवा उपयुक्तही नसते. घटनाचे अर्थ संदर्भसापेक्ष आणि कालसापेक्ष असतात. याबरोबरच त्या घटनांच्या अन्वयार्थात संशोधकाची मूल्ये आणि अभ्यासक्षेत्रातील घटक यांमधील आंतरक्रियांचाही महत्त्वाचा वाटा असतो. म्हणूनच गुणात्मक संशोधनात व्यक्तिसापेक्ष अन्वयार्थाला प्राधान्य दिले जाते.
- (१४) विश्वास योग्यतेसाठी खास निकष : संशोधन अभ्यासाची विश्वसनीयता निर्धारित करण्यासाठी प्रचलित वैज्ञानिक संशोधन पद्धतीत आंतरिक सप्रमाणता, बाह्य सप्रमाणता, विश्वसनीयता आणि वस्तुनिष्ठता या चार निकषांचा वापर केला जातो; परंतु गुणात्मक संशोधनाच्या स्वयंसिद्धकांशी आणि कार्यप्रणालीशी हे निकष सुसंगत नसल्याने लिंकन आणि गूबा यांनी गुणात्मक संशोधनाची विश्वसनियता निर्धारित करण्यासाठी प्रामाणिकता, स्थानांतरनियता, समर्थनियता आणि अवलंबनियता हे चार निकष सुचविले आहेत.
गुणात्मक संशोधन हे परंपरागत वैज्ञानिक संशोधनाप्रमाणे काटेकोरपणे पूर्वनिर्धारित नसते. ते नेहमीच उदयोन्मुखी आणि उत्क्रांत होणारे असते. गुणात्मक संशोधनात संशोधक व्यक्ती अथवा समूहाने एखाद्या सामाजिक अथवा मानवी घटनेचा किंवा समस्येचा जो अर्थ लावला असेल, त्याची छाननी करून त्यांनी लावलेला अर्थ नेमकेपणाने समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी शोधाभ्यासातील व्यक्ती जेथे (घर, शाळा, मैदान, कार्यालय) राहतात, तेथे दीर्घ कालावधीपर्यंत राहून प्रत्यक्ष निरीक्षण व मुलाखतीद्वारे आधारसाम्रगी संकलित करतो. ही आधारसामग्री प्रामुख्याने गुणात्मक स्वरूपाची म्हणजे सहभागी व्यक्तीच्या प्रत्यक्ष शब्दांत असते. संकलित आधारसामग्रीचे विगमन अनुमान पद्धतीने विश्लेषक केले जाते आणि आधारसामग्रीचे विगमन अनुमानपद्धतीने विश्लेषन केले जाऊन अन्वयार्थ लावला जातो. शोधाभ्यासाच्या अहवाल लेखनाचे स्वरूपही खूपच लवचिक असते.
संदर्भ :
- पंडीत, बडसी बिहारी, शिक्षणातील संशोधन : संस्थात्मक आणि गुणात्मक, पुणे, २००७.
- Denzin, N. K., & Lincoln, Y. S. (Eds.), Handbook of qualitative research, 1994.
- Lincoln, Y. S., & Guba, E. G., Naturalistic inquiry, Beverly Hills, 1985.
समीक्षक ꞉ अनंत जोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.