व्यापार आणि आर्थिक घडामोडींमध्ये होणारे बदल मोजण्याचा एक अर्थशास्त्रीय प्रकार. यास ‘इकॉनॉमिक बॅरोमिटर्स’ असेही म्हणतात. हे बदल प्रामुख्याने वस्तूंच्या किमती, औद्योगिक उत्पादन, विक्री, आयात-निर्यात यांत होत असतात. यांतील बदल निर्देशांकाद्वारे मोजले जात असून ते अत्यंत आवश्यक असते. या बदलांचे प्रतिबिंब किंमत आणि उत्पादित वस्तूंची संख्या यांवर पडत असतात.
निर्देशांकाचा वापर अठराव्या शतकाच्या मध्याला इटालियन अर्थशास्रज्ञ कार्ली यांनी प्रथम इटली आणि अमेरिकेतील धान्य, तेल आणि दारू यांच्या किमतीतील तुलना करण्यासाठी केला. त्यानंतर निर्देशांकाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये होऊ लागला.
निर्देशांक नेहमीच टक्केवारीच्या साह्याने तुलनात्मक बदल दर्शवित असतात. तसेच ते काळाच्या संदर्भात मोजतात. उदा., सहा महिन्यांपूर्वी आणि आज किंवा वर्षापूर्वी आणि आज इत्यादी. अशी तुलना करण्यासाठी प्रथम आधारभूत वर्ष निवडावे लागते. असे वर्ष हे सर्वसाधारण वर्ष असले पाहिजे. ज्या वर्षात देशात युद्ध झाले असेल, प्रचंड पूर किंवा दुष्काळ पडला असेल, असे वर्ष सर्वसाधारण वर्ष होत नाही. आधारभूत वर्षाची तुलना चालू वर्षातील किमतीशी करायची असल्यास चालू वर्ष म्हणजे आताचेच वर्ष (उदा., २०२३) असेल पाहिजे असे नाही. २००५ या वर्षाची २०१० या वर्षाशी तुलना करायची असल्यास २०१० हे चालू वर्ष मानले जाते. आधारभूत वर्षाचा निर्देशांक हा नेहमी १०० मनाला जातो. अशी तुलना करताना संख्याशास्त्रीय साधनांचा उपयोग केला जातो. उदा., २०१० च्या निर्देशांकाचे उत्तर ३०० आले आणि २००५ हे आधारभूत वर्ष मानले, तर २००५ पेक्षा किमती तिप्पट झाली असा त्याचा अर्थ होतो.
निर्देशांक तयार करण्यासाठी प्रामुख्याने पुढील गोष्टींचा विचार करावा लागतो ꞉
- निर्देशांक कोणत्या हेतूने तयार करायचा आहे.
- आधारभूत व चालू वर्षातील अंतर किती असावे.
- योग्य तेच संख्याशास्त्रीय साधन वापरावे लागेल.
- जर भारांकित निर्देशांक असेल, तर कोणत्या वस्तूंना किती भार द्यायचा, हे ठरवावे लागेल.
- आधारभूत वर्षाची निवड करताना ते सर्वसाधारण वर्ष असले पाहिजे. आर्थिक दृष्ट्या ते किमती, उत्पादन इत्यादी बाबतींत स्थिर वर्ष असावे. त्यामुळे चालू वर्षाशी तुलना करताना चुकीचे निष्कर्ष मिळणार नाहीत.
आधारभूत वर्ष निवडताना फार जुने वर्ष घेऊ नये (उदा., २००० आणि चालू वर्ष २०१७); कारण तुलना करताना आजचे तंत्रज्ञान, ग्राहकांचा दृष्टीकोन, त्यांच्या सवयी, आवडी-निवडी, पूर्णतः नवीन वस्तूंचे उत्पादन यांत खूपच बदल झालेले असतात. निर्देशांक सर्वसाधारणपणे औद्योगिक व्यापार आणि अर्थशास्त्रीय घडामोडींचे विश्लेषण करीत असते.
प्रकार ꞉ निर्देशांकाचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाते.
किंमत निर्देशांक : यास ‘सिंपल इंडेक्स’ असेही म्हणतात. जेव्हा एकाच घटकातील तुलनात्मक बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो, तेव्हा त्याला किंमत निर्देशांक असे म्हणतात. यात एकाच वस्तूची किंमत दिलेल्या वर्षात आणि पूर्वी ठरलेल्या वर्षाशी तुलना करताना वापरतात; परंतु प्रामुख्याने ‘सर्वसाधारण किंमत पातळीतील बदल’ हवे असतात. म्हणूनच किंमत निर्देशांक तयार करताना वस्तूंचा गट करून त्यांच्या किमतींची तुलना आधारभूत वर्ष व चालू वर्ष यांच्यात केली जाते. या निर्देशांकांचे भारांकित किंमत निर्देशांक आणि भार न दिलेला किंमत निर्देशांक असे दोन उपप्रकार आहेत.
(१) भारांकित किंमत निर्देशांक : भार न दिलेल्या निर्देशांकातील त्रुटी दूर करण्यासाठी भारांकित किंमत निर्देशांक तयार करतात. वास्तवात सर्वच वस्तूंना सारखेच महत्त्व नसते. तसेच त्यांचा उपयोगही सारख्याच प्रमाणात घेतला जात नाही. म्हणूनच गटातील प्रत्येक वस्तूचा भार निश्चित करावा लागतो. वस्तूचा भार ठरविताना त्या वस्तूचा किती प्रमाणात उपभोग घेतला जातो, त्या वस्तूच्या किमतीचा विचार करून भार निश्चित केला जातो आणि तुलनात्मक किमतीचा अभ्यास केला जातो. भारांकित किंमत निर्देशांकाचे निष्कर्ष हे सामान्य माणसाच्या आर्थिक परस्थितीवर परिणाम करणारे असतात.
(२) भार न दिलेला किंमत निर्देशांक ꞉ भार न दिलेल्या किंमत निर्देशांकात निवडलेल्या सर्व वस्तूंना समान महत्त्व देवून किमतीची तुलना केली जाते. उदा., गहू, मीठ, दुध, काडीपेटी अशा वस्तूंना समान महत्त्व दिले जाते. यात प्रामुख्याने पुढील गोष्टी आढळतात.
- सर्वच वस्तूंना समान महत्त्व दिल्यामुळे निर्देशांक चुकीची माहिती देतो. उदा., दुध व गव्हाची किंमत ७% वाढली व मीठ व काडीपेटीची किंमत ७% कमी झाली, तरी खूप महागाई वाढली असेच म्हणावे लागेल.
- गटातील सर्वच वस्तू तितक्या महत्त्वाच्या नसतात आणि त्यांचा उपयोग (वापर) समान प्रमाणात होत नाही. गहू व मीठाच्या वापराचे प्रमाण सारखेच असत नाही. त्यामुळे चुकीचे निष्कर्ष मिळतात.
राहणीमानाचा निर्देशांक : यालाच ‘ग्राहकांचा किंमत निर्देशांक’ असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे कामगारांच्या राहणीमान खर्चात किती वाढ झाली आहे, त्याची भरपाई करण्यासाठी त्यांना महागाई भत्ता किती द्यावा लागेल, हे सरकार ठरवीत असते. कामगारातही वेगवेगळे गट करण्यात येतात. ज्याचे उत्पन्न अतिशय अल्प आहे, ते कोणत्या वस्तू वापरतात, त्यांचा दर्जा कोणता आहे इत्यादींचा विचार करून अशाच वस्तूंच्या किरकोळ किमती लक्षात घेऊन हा निर्देशांक तयार केला जातो. अल्प उत्पनवर्ग, उच्च मध्यमवर्ग, श्रीमंतवर्ग असे वेगवेगळे गट करून प्रत्येक गटासाठी वेगवेगळा ‘किंमत राहणीमान निर्देशांक’ तयार करतात. असे करताना प्रत्येक गट कोणत्या वस्तूंचा वापर करतात, त्यांचा दर्जा कसा आहे या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
साखळी निर्देशांक : जेव्हा आधारभूत वर्षाची तुलना प्रत्येक पुढच्या वर्षाशी केली जाते, तेव्हा त्याला साखळी निर्देशांक असे म्हणतात. उदा., २०१६ या आधारभूत वर्षातील निर्देशांकाची तुलना २०१७ या वर्षातील वस्तूंच्या मूल्याशी केली जाते. निर्देशांकात तुलना करताना ती टक्केवारीमध्येच करतात; पण टक्केवारीचे चिन्ह वापरले जात नाही. उदा., २०१५ मध्ये एक लिटर दुधाचा भाव २५ रुपये असेल आणि २०१६ मध्ये तोच भाव ५० रुपये झाला, तर निर्देशांक २०० झाला असे समजतात.
निर्देशांकांचे उपयोग : (१) किंमत निर्देशांक हे आर्थिक व व्यावसायिक घडामोडींची पातळी मोजणारे आहेत. (२) किंमत निर्देशांकाच्या साह्याने किमतीतील बदल आणि जीवनमान पातळीतील बदल मोजता येतात. त्यामुळे जीवनमान पातळीत किती फरक पडला हे समजते. (३) सरकारला आर्थिक धोरण ठरविणे आणि संबंधित निर्णय घेण्यासाठी निर्देशांकांचा उपयोग होतो. (४) ‘ग्राहक किंमत निर्देशांक’ व ‘जीवनमान किंमत निर्देशांक’ यांमुळे पैशाची क्रयशक्ती ठरविण्यास मदत होते. त्याच प्रमाणे आपल्याला मिळणाऱ्या पैशाचे खरे मूल्य काढता येते. सरकार या निर्देशांकावरूनच महागाई भत्ता किती द्यायचा हे ठरवित असते. (५) जेव्हा किंमत निर्देशांक मोठ्या कालावधीसाठी काढले जाते, तेव्हा त्यावरून किंमत पातळीचा कल ठरविता येतो. २००५ ते २०१७ या कालावधीसाठी किंमत निर्देशांक काढण्यास किंमत पातळी सतत वाढत आहे, हे लक्षात येते.
निर्देशांकाच्या मर्यादा ꞉
- किंमत निर्देशांक तयार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट व कठीण असल्याने आपण उपभोग घेत असलेल्या सर्वच वस्तूंचा निर्देशांकात समावेश करता येणे शक्य नसते.
- एकाच वस्तूचे अनेक उपप्रकार असतात. उदा., कपड्याचा किंवा अंगाला लावायचा साबण, टूथपेस्ट, मोबाईल इत्यादी. त्यामुळे निर्देशांकात नेमका कोणता प्रकार घेतला आहे, हे समजत नाही.
- किमती गोळा करताना त्या प्रत्येक बाजारातून न करता काही ठराविक ठिकाणाहूनच गोळा केल्या जातात. त्यामुळे खरे निष्कर्ष मिळणे कठीण असते.
- तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांमुळे ५ ते १० वर्षांत पूर्वी नसलेल्या अनेक वस्तू या प्रथमच बाजारात येतात. त्याच्या आधारभूत वर्षातील किमती उपलब्ध नसतात; कारण त्या वेळेला ती वस्तूच अस्तित्वात नसते. त्यामुळे निष्कर्ष काढताच येत नाही.
- भारांकित निर्देशांक तयार करताना एखाद्या वस्तूला भार किती व कसा द्यायचा यांत अनेक मतभेद असतात.
समीक्षक : राजस परचुरे
भाषांतरकार : दत्ता लिमये
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.