एक प्रसिद्ध अर्थशास्त्रीय ग्रंथ. कॅपिटल इन ट्वेन्टी-फर्स्ट सेंचुरी या ग्रंथाचे लेखक फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी असून त्यांनी हा ग्रंथ २०१३ मध्ये फ्रेंच भाषेत प्रकाशित केला. त्यानंतर २०१७ मध्ये आर्थर गोल्डहॅमर यांनी या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करून तो प्रकाशित केला. हे इंग्रजी संस्करण फार झपाट्याने लोकप्रिय झाले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील उत्पन्न आणि मालमत्तेतील विषमता हा एक अपघात नसून त्या अर्थव्यवस्थेचे ते एक व्यवच्छेदक लक्षण आहे. ही असमानता भांडवलावर जागतिक उद्गामी कर लावून नाहीशी होऊ शकते, असे या ग्रंथाचे प्रमुख प्रतिपादन आहे.
पिकेटी व त्यांचे ३० सहकारी यांनी संकलित केलेल्या पाचही महाद्वीपांमधील २० देशांतील गेल्या २५० वर्षांतील सर्वोच्च उत्पन्न व मालमत्ता कर परताव्याचे अभिलेखन हे या पुस्तकातील माहितीचा प्रमुख स्रोत आहे. ब्रिटन व फ्रांस हे दोन्ही देश एकोणिसाव्या व विसाव्या शतकात औपनिवेशक व आर्थिक दृष्ट्या प्रबळ सत्ता असल्याने औद्योगिक क्रांतीपासून संपत्तीच्या विश्वव्यापी विभाजनाची गतिकी जाणून घेण्यासाठी या दोन देशांचा विशेष अभ्यास या पुस्तकात मांडला आहे.
अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत प्रगत देशांमध्ये पराकोटीची विषमता होती. राष्ट्रीय उत्पादनापेक्षा खाजगी संपत्ती अधिक वेगाने वाढून ती फारच थोड्या कुटुंबांमध्ये एकवटली होती. भांडवल परतव्याचा दर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या दरापेक्षा खूपच जास्त होता. त्यामुळे भांडवलाचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा गगनाला जाऊन भिडला होता. म्हणजेच, राष्ट्रीय उत्पन्नाचे कार्यात्मक विभाजन भांडवलाच्या बाजूने झाले. तसेच भांडवलापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे श्रमापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक केंद्रीकरण होत असल्याने व्यक्तिगत विभाजनातील विषमताही वाढली. कामगारांचे वेतन औद्योगिकीकरणाने जरी हळूहळू वाढत होते, तरीही विषमता कायमच होती. या वास्तविकतेतूनच प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांचा अपरिमित भांडवल संचयाचा सिद्धांत आणि भांडवलशाहीच्या अटळ विनाशाचे भाकित मांडले गेले. पिकेटी लिहितात की, कार्ल मार्क्स यांची भविष्यवाणी जरी खरी झाली नसली, तरी एकविसाव्या शतकातील खाजगी संपत्तीतील प्रचंड वाढ ही मार्क्स यांचा सिद्धांत थेट प्रतिबिंबित करते.
विसाव्या शतकात भांडवलाचा नाश करणारी दोन महायुद्धे, जागतिक मंदी, वारसा संपत्ती व उत्पन्नावरील अधिक कर (युद्धांना वित्तपुरवठ्याकरिता आवश्यक), ऋणकोस साह्यकारक व धनकोस असाह्यकारक असणारी भयंकर भाववाढ आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचे श्रमवर्गास अनुकूल राजकीय वातावरण या सर्वांमुळे विषमता कमी झाली; भांडवलाचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा खूप घटला. इ. स. १९४५ ते १९७५ हा भांडवलशाहीचा सुवर्णकाळ होता. भांडवलाचा परतावा आणि भांडवल उत्पादन गुणोत्तर कमी झाले. कर जास्त होते, श्रमाची दर ताशी उत्पादकता जास्त होती. संपत्तीचे कार्यात्मक विभजन श्रमाच्या बाजूने झाले होते आणि व्यक्तिगत विभजनातील विषमताही घटली होती; परंतु भांडवलशाहीच्या इतिहासात असाधारण घटनांमुळे अवतरलेला हा सुवर्णकाळ पुन्हा येणार नाही, असे या पुस्तकात नमुद केले आहे.
लेखकाने या पुस्तकात म्हटले आहे की, १९७० च्या दशकाच्या शेवटी सुवर्णकाळ मागे पडला आणि भांडवलशाहीचे स्वरूप एकोणिसाव्या शतकाप्रमाणे झाले. नफा व उत्पन्नावरील कर घटले आणि संपत्तीवरील कर नाहीसे केले गेले. त्यामुळे भांडवलाच्या पुनर्बांधणीला वेग आला. भांडवल उत्पादन अनुपात वाढून एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस तो शतकापूर्वीच्या पातळीला पोहोचला. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर घटला आणि कार्यात्मक व व्यक्तिगत उत्पन्नाचे विभाजन अधिक विषम झाले. कार्यात्मक विभाजन श्रमाच्या हिताविरुद्ध गेले आणि व्यक्तिगत विभाजन अतिश्रीमंत १ टक्का लोक सोडून इतर सर्वांच्याच हिताविरुद्ध झाले.
खाजगी मालमत्तेवर आधारित भांडवली अर्थव्यवस्थेत समताकारी शक्ती, ज्ञान आणि कौशल्यांच्या प्रसाराशी संलग्न असतात; परंतु भेदकारी शक्ती विनाशक व अधिक शक्तिशाली असतात; ज्या सामाजिक न्यायावर आधारित लोकशाही समाजाला उलथवून टाकू शकतात. प्रमुख विनाशक शक्ती म्हणजे व्यक्तिगत भांडवल गुंतवणुकीतील लाभाचा दर ‘आर’ (म्हणजे नफा, लाभांश, व्याज, खंड आणि इतर भांडवल गुंतवणुकीतील उत्पन्न) हा दीर्घकाळात ‘जी’पेक्षा (राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर) लक्षणीयरित्या अधिक असतो. आर > जी ही असमानता हे सूचित करते की, भूतकाळापासून संचय केलेली मालमत्ता ही राष्ट्रीय उत्पादन व वेतनापेक्षा फार वेगाने वाढते आणि त्याचे परिणाम म्हणून ‘पैतृक भांडवलशाही’ (पिकेटीची संज्ञा) जन्माला येते. ज्यात मुठभर अतिश्रीमंत कुटुंबांचे (जी देशाच्या लोकसंखेच्या फक्त १ किंवा ०.१ टक्का असतात) भाग्य पैतृक धनातून उजळवितात आणि देशाच्या मालमत्तेचा फार मोठा हिस्सा काबूत ठेवतात. ‘पैतृक भांडवलशाही’ जगभर निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणजे, संपत्तीवर व मोठ्या उत्पन्नावर विश्वव्यापी उद्गामी कर लावणे होय, अशी या पुस्तकात मांडणी आहे.
पिकेटी यांनी आपल्या पुस्तकात अशी शिफारस केली की, विकसित देशांमध्ये प्रत्येक वर्षी १ दशलक्ष डॉलर उत्पन्नावर इष्टतम कराचा दर ८० टक्क्यांहून जास्त असावा, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीवर काही परिणाम होणार नाही. उलट, या वाढीचे सर्व जनतेत व्यवस्थित विभाजन होईल. संपत्ती कर हा वार्षिक मालमत्ता करासारखाच आहे; पण तो सर्व प्रकारच्या संपत्तीला लागू असेल. १ ते ५ दशलक्ष डॉलर निव्वळ मालमत्तेवर १ टक्का कर आणि ५ दशलक्ष डॉलरच्या वरील निव्वळ मालमत्तेवर २ टक्के कर सूचविला आहे; परंतु ही विश्वव्यापी कर योजना प्रत्यक्षात अंमलात यायला उच्च पातळीवरील आंतरराष्ट्रीय सहकार, तसेच प्रादेशिक राजकीय एकीकरणाची गरज आहे आणि ते तेवढे सोपे नाही, असे पिकेटी मान्य करता. तसेच कर परताव्यांच्या आकडेवारीतील त्रुटींची ते, विशेषतः कर बुडविण्यासाठी केलेल्या आश्रयस्थानांच्या वापराचीही नोंद करतात.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रुगमन यांनी या पुस्तकाबद्दल मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, या पुस्तकाने अशा सांख्यीकिय तंत्राच्या वापराची सुरुवात केली की, ज्यायोगे उत्पन्न व संपत्तीच्या अठराव्या शतकापासूनच्या केंद्रीकरणाचा मागोवा घेता आला. परिणामतः विषमतेचा दीर्घकालीन कल अभ्यासण्यात एक क्रांतीच घडून आली. या क्रांतीपूर्वी विषमतेविषयीच्या चर्चांमध्ये अतिश्रीमंत वर्गाकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. या चर्चांमध्ये गरीब व सुखवस्तू, खरे श्रीमंत नव्हे, यांच्यातील दरी किंवा उच्च उत्पन्न थरातील १ ते ५ लोक व कमी उत्पन्न थरातील ४ ते ५ लोक यांची तुलना किंवा पदवीधर तरुणांचे वेतन आणि अशिक्षित तरुणांचे वेतन यांतील फरक लक्षात घेतला जायचा. म्हणून पिकेटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा दाखवून दिले की, जगातील विषमतेस अतिश्रीमंत १ टक्का लोकांची प्रचंड वाढलेली संपत्ती व उत्पन्न हे मोठे कारण आहे, तेव्हा एक मोठे रहस्य उलगडले.
जागतिक बँकेचे भूतपूर्व अर्थशास्त्रज्ञ ब्रान्को मिलानोविक यांच्या मते, या पुस्तकाने आर्थिक वाढीचा सिद्धांत आणि कार्यात्मक उत्पन्न विभाजन व व्यक्तिगत उत्पन्न विभाजनाचे सिद्धांत यांची सांगड घालून भांडवलशाहीच्या कार्यपद्धतीचे उत्तम विश्लेषण केले आहे.
या पुस्तकात उद्धृत केलेले कार्ल मार्क्स, माल्थस यांचे सिद्धांत आणि जेन ऑस्टिन, हेन्री जेम्स, बाल्झाक यांच्या कादंबऱ्या, तसेच इतर सामाजिक शास्त्रांशी घातलेली सांगड यांमुळे हे पुस्तक म्हणजे विषमतेचे सर्वंकष व तितकेच प्रत्ययकारी विवेचन झाले आहे.
टीका ꞉ या पुस्तकावर पुढील टिका करण्यात आल्या ꞉ (१) पिकेटी यांची आकडेवारी व विश्लेषण उत्तरेकडील (विकसित) व दक्षिणेकडील (विकसनशील) देशांमधील उत्पन्नातील दरीवर, तसेच साम्राज्यवादाच्या वास्तविकतेवर, म्हणजेच जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर काहीच भाष्य करत नाही. (२) पिकेटी यांचे विषमतेचे विश्लेषण हे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक नव्हे; कारण त्यात सामाजिक वर्ग संबंधांच्या बदलत्या स्वरूपाची चिकित्सा केलेली आढळत नाही. (३) हे पुस्तक मुख्यतः यूरोप व अमेरिकेवर लक्ष केंद्रित करते. (४) प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सर अँगस एस. डेटन म्हणतात की, जागतिक पातळीवर दारिद्र्य कमी करण्यात आणि लोकांचे आयुर्मान वाढविण्यात बरीच प्रगती झाल्याचे लक्षात घेतले पाहिजे. (५) आजचे अतिश्रीमंत (बिल गेट्स किंवा मार्क झुकेरबर्ग) व्यक्ती कामातून संपत्ती मिळवतात, वारशातून नव्हे.
पिकेटी यांनी वाढत्या विषमतेमुळे समाजात अस्थैर्य येते; परंतु हे नेहमीच घडताना दिसत नाही, असे मत व्यक्त केले आहे.
संदर्भ :
- American Economic Association, 2014.
- Deaton, Angus, The Great Escape : Health, Wealth and the Origins of Inequality, Oxfordshire, 2013.
- Piketty, Thomas, Capital in Twenty-First Century, Cambridge, 2017.
- The Economist, 2014.
- The New York Review, 2014.
समीक्षक ꞉ राजस परचुरे