अधश्चेतक ग्रंथी (अधोथॅलॅमस) अंत:स्त्रावी ग्रंथी-प्रणालीचा (Endocrine system) मध्यबिंदू मानली जाते. ही ग्रंथी चेतासंस्था (Nervous system) व अंत:स्त्रावी ग्रंथी-प्रणाली यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. आकाराने लहान असलेली ही ग्रंथी विविध संप्रेरकांची निर्मिती आणि उद्दिपन यामागील महत्त्वाची भूमिका बजावते. एवढेच नव्हे तर विविध ग्रंथींच्या माध्यमातून जवळपास सर्व महत्त्वाच्या शारीरक्रिया संतुलित करते. अर्थात शरीराची समस्थिती (Homeostasis) राखण्याचे काम अधश्चेतक ग्रंथी पार पाडते.
अधश्चेतक ग्रंथीला ग्रीक भाषेमध्ये हायपोथॅलॅमस (Hypothalamus) असे नाव आहे. ग्रीक भाषेमध्ये हायपो (Hypo) म्हणजे खाली व थॅलॅमस (Thalamus) म्हणजे चेतक. चेतकाच्या खाली आढळणारा मेंदूचा भाग म्हणून या ग्रंथीला अधश्चेतक असे नाव दिले गेले.
शरीरशास्त्राच्या अभ्यासकांना अधश्चेतकबद्दल प्राचीन काळापासून माहिती होती. अधश्चेतकाचा सर्वांत जुना उल्लेख दुसऱ्या शतकात आढळतो. गालेन (Galen) या ग्रीक वैद्याने सर्वप्रथम अधश्चेतक व पीयूषिका (Pituitary) यांचे वर्णन केल्याचे पुरावे आढळले आहेत. यानंतरची अनेक शतके अधश्चेतक या ग्रंथीने शरीरशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. या ग्रंथीची जटिल रचना व विविध कार्ये यांचा सखोल अभ्यास केला गेला. विल्हेम हिस (Wilhelm His) या स्विस वैज्ञानिकाने १८९३ मध्ये अधश्चेतक हे नाव दिले.
एकोणिसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञनात झालेल्या प्रगतीमुळे अंत:स्रावी ग्रंथींच्या अभ्यासाला चालना मिळाली. विविध प्राण्यांमधील अधश्चेतक ग्रंथीचा तपशीलवार अभ्यास झाल्यानंतर तिचे कार्य व शरीरातील महत्त्व स्पष्ट झाले. तसेच अनेक विकारामागे अधश्चेतकाला झालेली इजा कारणीभूत असल्याचे देखील उलगडले.
बदामाच्या आकाराची असलेली ही ग्रंथी म्हणजे चेतापेशींचा (Neurons) समूह असतो. एखाद्या गुच्छाप्रमाणे बांधलेल्या चेतापेशी पुंजांना केंद्र (Nucleus) म्हणतात. केंद्रे विशिष्ट प्रकारच्या स्त्रावी पेशींपासून बनलेली असतात. या पेशींना महापेशीय स्त्रावी चेतापेशी (Magnocellular Nuerosecretary cells) असे म्हणतात. यापैकी काही केंद्रे अंत:स्रावी ग्रंथींचे नियंत्रण हाताळतात. अन्य काही केंद्रे चेतासंस्थेशी संवाद साधून शरीरप्रक्रिया नियंत्रित करतात. (पहा: तक्ता).
अधश्चेतक हा अंत:स्त्रावी ग्रंथी-प्रणालीचा केंद्रबिंदू आहे. शरीरातील अन्य ग्रंथीशी संवाद साधण्यासाठी अधश्चेतक संप्रेरके चेतातंतू व प्रमस्तिष्कमेरू द्रव (Cerebrospinal fluid) यांचा वापर करते. पीयूषिका ग्रंथी या मार्गातील सर्वोच्च दुवा असते. अधश्चेतकामधील केंद्रे व पीयूषिका यांमध्ये चेतातंतूंचे गुंतागुंतीचे जाळे असते. तसेच केंद्रे विविध मुक्तक (Releasing factors) व अवरोधक घटक (Inhibitory factors) स्रवतात. ही संप्रेरके पीयूषिका ग्रंथीचे कार्य नियंत्रित करतात. मुक्तक घटकाला प्रतिसाद म्हणून पीयूषिका ग्रंथी योग्य मुक्तक संप्रेरके (Releasing hormones) तयार करते व ग्रंथींना सक्रिय करते. याउलट अवरोधक घटकांच्या प्रभावाखाली पीयूषिका मुक्तक संप्रेरके तयार करण्याचे थांबवते. परिणामी विशिष्ट ग्रंथींच्या कामाला अटकाव होतो. अधश्चेतकापासून सुरू होणाऱ्या संदेशवहनाच्या या मार्गांना मध्यवर्ती अंत:स्रावी अक्ष (Central endocrine axes) असे म्हणतात. अधश्चेतक-पीयूषिका-अधिवृक्क (Hypothalamus- Pituitary-Adrenal glands), अधश्चेतक-पीयूषिका-जननेंद्रिये (Hypothalamus-Pituitary-Gonads) आणि अधश्चेतक-पीयूषिका-अवटु ग्रंथी (Hypothalamus-Pituitary-Thyroid gland) हे तीन मध्यवर्ती अंत:स्रावी अक्ष आहेत. अशाप्रकारे सर्व ग्रंथींच्या कार्यावर अधश्चेतक ग्रंथी नियंत्रण ठेवते. शिडीप्रमाणे काम करणाऱ्या या प्रणालीला संप्रेरकीय नियंत्रण प्रणाली (Regulatory hormonal cascade) असे म्हणतात.
तक्ता : अधश्चेतक-केंद्र व त्याचे कार्य
केंद्र | कार्य |
पूर्व प्रकाशीय केंद्र (Preoptic nucleus) | तापमान नियंत्रण करणे. |
अभिमध्य प्रकाशीय केंद्र (Medial preoptic nucleus) | जननग्रंथिपोषी (Gonadotropins) संप्रेरकांचे कार्य नियंत्रित करणे, तापमान नियंत्रण करणे. |
ऊर्ध्व प्रकाशीय केंद्र (Supraoptic nucleus) | व्हॅसोप्रेसीन (Vasopressin) व ऑक्सिटॉसिन (Oxytocin) या संप्रेरकांची निर्मिती करणे. |
मस्तिष्क निलय केंद्र (Paraventrical nucleus)
(याचे स्थान तिसऱ्या मस्तिष्क निलयाजवळ असते). |
कॉर्टिकोट्रोपीन मुक्तक संप्रेरक (Corticotropinreleasing hormone; CRH), थायरोट्रोपीन मुक्तक संप्रेरक (Thyrotropinreleasing hormone; TRH), सोमॅटोस्टॅटिन (Somatostatin), व्हॅसोप्रेसीन, ऑक्सिटॉसीन या संप्रेरकांची निर्मिती करणे. |
अग्र अधश्चेतकीय केंद्र (Anterior hypothalamic nucleus) | तापमान नियंत्रण, घाम येणे व दम लागणे या प्रक्रियांचे नियंत्रण, थायरोट्रोपीन (Thyrotropin) या संप्रेरकाची निर्मिती थांबवते. |
सुप्राकाईझमॅटिक केंद्रक (Suprachaismatic nucleus;SCN) | दैनिक लय (Circadian rhythms) नियंत्रित करणे. |
मध्यपृष्ठीय अधश्चेतकीय केंद्र (Dorsomedial hypothalamic nucleus) | रक्तदाब व हृदयाच्या ठोक्यांचा वेग नियंत्रित करणे. पचनसंस्थेतील इंद्रियांचे कार्य उत्तेजित करणे व थांबवणे. |
मध्योदरी केंद्र (Ventromedial nucleus) | आहाराशी संबंधित तृप्तीची (Satiety) भावना नियंत्रित करणे. मज्जा-अंत:स्त्रावी ग्रंथी प्रणालीमधील काही विशिष्ट पेशींशी संवाद साधणे. |
चापाकार केंद्र (Arcuate nucleus) | वृद्धी संप्रेरक मुक्तक संप्रेरकाची (Growth hormone releasing hormone; GHRH) निर्मिती करणे, भूक लागणे व पचनाशी संबंधित प्रक्रिया नियंत्रित करणे. प्रोलॅक्टिन (Prolactin) संप्रेरकाचे कार्य थांबवणे. |
पश्च केंद्र (Posterior nucleus) | व्हॅसोप्रेसीन संप्रेरकाची निर्मिती करणे, रक्तदाब वाढवणे, शरीराची तापमानाला प्रतिसाद म्हणून होणारी थरथर नियंत्रित करते. डोळ्यातील बाहुल्यांचे आकुंचन-प्रसरण यावर नियंत्रण ठेवणे. |
पार्श्वी केंद्र (Lateral nucleus) | ओरेक्झिन (Orexin) या विशिष्ट चेतातंतूंचे उगमस्थान येथे असते. |
स्तनाकार केंद्र (Mammillary nucleus) | स्मृती तयार होणे, साठवणे व पुसल्या जाणे या प्रक्रिया नियंत्रित करणे. |
गोल-स्तनाकार केंद्र (Tuberomammillary nucleus) | एकाग्रता, मेंदूची शिकण्याची प्रक्रिया, जागरूकता व झोपेचे चक्र (Sleep cycle) आणि स्मृती यांवर नियंत्रण ठेवणे. |
शरीरातील बहुतेक सर्व प्रक्रिया अधश्चेतकग्रंथीच्या कार्यावर अवलंबून असतात. काही कारणाने त्यात अडथळा आल्यास शरीरातील अन्य प्रक्रियांवर त्याचा परिणाम दिसून येतो. यातून विविध प्रकारचे विकार व व्याधी उत्त्पन्न होतात. आघात किंवा डोक्याला मार लागणे, मेंदूचा संसर्ग, किरणोत्सर्गी पदार्थांशी संपर्क येणे तसेच अचानक वजनात मोठी घट होणे यामुळे अधश्चेतकाचे कार्य विस्कळीत होऊ शकते. यातून विविध प्रकारचे विकार व व्याधी उद्भवतात. बहुमूत्रता (Diabetes insipidus) म्हणजेच मधुमेह हे याचे ठळक उदाहरण आहे. अधश्चेतकाने तयार केलेले अँटी डाययुरेटिक संप्रेरक (Antidiuretic Hormone; ADH) अर्थात व्हॅसोप्रेसीन यासाठी कारणीभूत ठरते. काही आनुवंशिक कारणे किंवा मेंदूला झालेल्या इजेमुळे या संप्रेरकाची मात्रा कमी होते. व्हॅसोप्रेसीनच्या अभावामुळे वृक्कामधील (Kidney) पाणी पुन्हा शोषून घेण्याची प्रक्रिया घटते. परिणामी मूत्रावाटे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते व शरीरात शुष्कता (Dehydration) येते.
पीयूषिका ग्रंथीचे कार्य अधश्चेतकावर अवलंबून असते. अधश्चेतकाचे कार्य कमी-अधिक झाल्यास त्याचा थेट परिणाम पीयूषिकेच्या संप्रेरकांवर दिसून येतो. तसेच अवटु ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी आणि जननेंद्रिये यांच्या कार्यात देखील अडथळे येतात. अधश्चेतकीय विकार व त्यावरील उपचार पद्धती यावर जगभरात संशोधन चालू आहे. या विकारांवरील उपचार विकसित करण्यासाठी अधश्चेतकाची संरचनाव कार्य यांचा अभ्यास मोलाचा ठरत आहे.
पहा : पीयूषिका ग्रंथी संप्रेरक, मनोभाव (पूर्वप्रकाशित नोंद), संप्रेरक, हॉर्मोने (पूर्वप्रकाशित नोंद).
संदर्भ :
- https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK279126/
- https://doi.org/10.1007/978-3-319-47829-6_483-1
- https://www.endocrineweb.com/endocrinology/overview-hypothalamus
- https://en.wikipedia.org/wiki/Hypothalamus
समीक्षक : प्रमोद जोगळेकर