बेशुद्धावस्था ही एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःविषयी व आजूबाजूच्या वातावरणाविषयी जागरूक नसतो, तसेच कोणत्याही क्रियाकलापांना प्रतिसाद देत नसतो. मेंदूवर आघात होणे किंवा मुका मार लागणे, मेंदूमध्ये गाठ तयार होणे, मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या आवरणात जंतुसंसर्ग होणे किंवा पाणी साचणे, रक्तातील सोडीयमचे प्रमाण खूपच कमी होणे, विषबाधा होणे, काही औषधे किंवा मद्य जास्त प्रमाणात घेणे इत्यादी काही कारणांमुळे बेशुद्धावस्था येऊ शकते.
रुग्णाचा बाहेरील आवाज किंवा स्पर्श यांना मिळणारा प्रतिसाद, रुग्णाने हेतुपूर्वक केलेली हालचाल किंवा सततची लागलेली तंद्री, रुग्णाचे बोलणे तसेच श्वास घेण्यास होणारा त्रास, मलमूत्र विसर्जनावरील नियंत्रण इ. रुग्णामध्ये दिसणाऱ्या लक्षणांच्या आधारे परिचारिका रुग्ण शुश्रूषेचे नियोजन करतात. बेशुद्धावस्थेचे योग्य कारण कळण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. जसे, कवटीला काही इजा झाली आहे का याकरिता क्ष-किरण चित्रण; मेंदूमध्ये गाठ, रक्तार्बूद, मुका मार किंवा जंतुसंसर्ग इत्यादींची तपासणी करण्यासाठी चुंबकिय अनुस्पंद प्रतिमाकरण (MRI); मेंदूची सूज किंवा आवरणातील पाण्याचे प्रमाण यांच्या तपासणीसाठी संगणकीय छेदलेखन-क्रमवीक्षण (CT scan); दोन मणक्यांमधील द्रवातील जंतुसंसर्ग तपासणीसाठी कटि-सूचिवेध (lumbar puncture) घेतला जातो. अशा प्रकारच्या विविध चाचण्या करताना परिचारिका तज्ज्ञांना साहाय्य करतात.
परिचारिकेची कर्तव्ये व जबाबदारी :
- बेशुद्धावस्थेतील रुग्णाला श्वासोच्छ्वास प्रक्रियेस साहाय्य करणे ही परिचारिकेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आवश्यकता असल्यास वातायकाद्वारे (ventilator) अथवा श्वासनलिकेला छिद्र पाडून (tracheostomy) तेथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. श्वसन मार्गातील द्रव फुप्फुसात जाऊ नये म्हणून नळीच्या साहाय्याने द्रव शोषून बाहेर काढला जातो. रुग्णाला जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता त्याच्या नाकाची व तोंडाची स्वच्छता ठेवली जाते, तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला छातीची भौतिक चिकित्सा (chest physiotherapy) देण्याचे नियोजन केले जाते. यामुळे छातीतील व घशातील साचलेले द्रव बाहेर काढण्यास मदत होते. श्वास घेण्यास सुलभता असावी याकरिता रुग्णाच्या डोक्याच्या बाजूकडील बिछाना ४५ अंशामध्ये ठेवला जातो.
- परिचारिका रुग्णाचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व नाडी यांची ठराविक अंतराने नोंद करून ठेवते व आवश्यकता असल्यास डॉक्टरांनी सुचवलेली औषधे देते.
- रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे व विद्युत अपघटनींचे (electrolyte; सोडियम, पोटॅशियम इ.) प्रमाण सामान्य राखण्याकडे परिचारिका विशेष लक्ष देतात. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा कोरडी पडणे, मूत्राचे प्रमाण कमी होणे; तर अधिक झाल्यास अंगावर सूज येणे यांसारखी लक्षणे दिसतात.
- रुग्णास आकडी / झटका येऊ नये याकरिता शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे. त्याकरिता आकडी विरोधक (anti-epileptic) व ताप विरोधक (antipyretics) औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जातात. रुग्णाला ताप असल्यास ओल्या कापडाने पुसून घेतात. तापामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते, अशावेळी आवश्यकतेनुसार सलाईन लावली जाते.
- बेशुद्धावस्थेतील रुग्णाला तोंडवाटे अन्न देणे शक्य नसते. त्यांच्या नाकातून अन्ननलिकेद्वारे पोटात नळी टाकून फळांचा रस, भाजी व डाळी यांचे सूप, दूध इ. द्रव अन्नपदार्थ दिले जातात. जेवण देण्याआधी नळी पोटातच आहे, याची खात्री करावी आणि नळीला व नाकाला लावलेली चिकटपट्टी आवश्यकतेनुसार बदलावी. छोक्याच्या बाजूने बिछाना ४५ अंशात वर करावा व नंतर काहीवेळ तसाच ठेवावा. परिचारिका दिलेल्या पदार्थांची व प्रमाणाची नोंद ठेवते.
- मेंदूतील अंतर्गत रचना सामान्य आहे, याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी कर्परांतर्गत दाब (Intracranial pressure) तपासून त्याची नोंद करून ठेवली जाते. ग्लुकोजचे प्रमाण अधिक असलेले सलाईन टाळावे, त्यामुळे कर्परांतर्गत दाब वाढण्याची शक्यता असते.
- बेशुद्धावस्थेतील रुग्ण हालचाल करू शकत नाही, त्यामुळे त्याच्या संपूर्ण स्वच्छतेची जबाबदारी परिचारिका पार पाडतात. त्याबरोबरच दर चार तासाने रुग्णाला पाठीचा मसाज दिला जातो. त्यामुळे पाठीच्या पेशींमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो. शय्याव्रण होऊ नये याकरिता पाण्याची किंवा हवेची गादी दिली जाते आणि जर जखमा असतील तर त्यावर पावडर टाकतात. प्रत्येक दोन तासाला रुग्णाची झोपण्याची स्थिती बदलतात. रुग्णाच्या त्वचेवरील बदलाचे नियमित निरीक्षण करून त्वचेवर जखम, लालसरपणा, फोड किंवा आलावा असे काही आढळल्यास त्वरित औषधोपचार करतात. हातांच्या खाली व पायांच्या मधे उश्यांचा वापर करून घर्षण टाळावे.
- तोंडात ठेवलेला माऊथ पीस काढून क्लोहेक्सिडीन द्रवाने (chlorhexidine solution) तोंड स्वच्छ करतात, तसेच निर्जंतूक केलेल्या उपकरणाच्या साहाय्याने तोंडात साचलेला द्रव शोषून बाहेर काढतात. डोळ्यांचेदेखील दररोज निरीक्षण केले जाते. कोरडेपणा, सूज, लालसरपणा इ. तपासून साध्या सलाईनच्या साहाय्याने व निर्जंतुक केलेल्या कापसाने डोळे स्वच्छ करतात. ओलावा टिकवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांत औषधांचे थेंब टाकतात. काहीवेळा बेशुद्धावस्थेत डोळे उघडेच राहतात, तेव्हा कोरडेपण येऊन जखम होण्याची शक्यता असते. अशावेळी मऊ कापड किंवा कापूस यांचा वापर करून डोळे झाकून ठेवावेत.
- परिचारिका रुग्णाच्या मल-मूत्राच्या विसर्जनाकडे लक्ष देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल पातळ होण्याचे औषध देऊन, रुग्णाचा डायपर बदलल्यानंतर सर्व भाग स्वच्छ व कोरडा करतात. रुग्णाला मूत्राकरिता मूत्र-शलाका टाकून ती दिवसातून दोन वेळा स्वच्छ केली जाते. मूत्राचे रंग व प्रमाण याचे निरीक्षण करून नोंद करून ठेवावी.
- रुग्णाची हालचाल नसल्याने पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी (venous thrombosis; शिरा घनास्त्रता) होण्याची संभाव्यता असते. ती रक्तप्रवाहासोबत वाहत फुप्फुसांपर्यंत जाऊन रक्तपुरवठा बंद होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी रुग्णाच्या पायांना व्यायाम देणे, पोटरीवर दाब येणारे लांब मोजे घालणे, तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने पोटऱ्यांवर घट्ट पट्ट्या लावून पायांवर दाब निर्माण करणे अशा प्रक्रिया सतत चालू ठेवल्याने शिरा घनास्त्रता टाळली जाते.
- रुग्णाला व नातेवाईकांना मानसिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे असते. परिचारिका रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाविषयी सर्व माहिती देते, तसेच ओषधे, तपासण्या, आहार, रुग्णाची स्वच्छता, व्यायाम या सर्व बाबी समजावून सांगते जेणेकरून घरीदेखील रुग्णाची शुश्रूषा व्यवस्थित होऊ शकते.
संदर्भ :
- Sr. Nancy, Principles and Practice of Nursing, Vol I : Nursing Arts Procedures, 2019
- मोमीन, एस्. एस्. परिचर्या : शास्त्र, तंत्र, कला, २०१७.
समीक्षक : राजेंद्र लामखेडे