वैद्यकीय किंवा शल्यक्रियेनंतर रुग्णाची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्यास सूक्ष्मजंतूंपासून संसर्ग होण्याचे धोके संभवतात. अशा प्रकारच्या रोगजन्य सूक्ष्मजंतूंचा संसर्ग रुग्णास होऊ न देणे म्हणजे वैद्यकीय अपूतिता होय. या प्रक्रियेत परिचारिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. रुग्णाच्या रोगनिदावरून रुग्ण केवळ औषधोपचाराने बरा होणार असेल तर अशा चिकित्सेस वैद्यकीय चिकित्सा व त्यादरम्यान देण्यात येणाऱ्या परिचर्येस वैद्यकीय परिचर्या (Medical Nursing) असे म्हणतात. परंतु जेव्हा रुग्णाला केवळ औषधोपचाराने बरा करता येत नाही, तर त्यासाठी शल्यक्रियेची देखील आवश्यकता असते अशा चिकित्सेस शल्यक्रिया चिकित्सा व परिचर्येस शल्य परिचर्या (Surgical Nursing) असे म्हणतात.

वैद्यकीय अपूतिता परिचर्या प्रक्रियेचा उद्देश (Medical Asepsis Nursing Procedure) : वैद्यकीय अपूतिता परिचर्येत मुख्यत: विलगीकरण तंत्राचा वापर करणे, रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तींसाठी बचावात्मक उपाय योजनेचे नियोजन करणे, रुग्णासाठी वापरलेल्या सर्व वस्तूंचे आणि त्याच्या उत्सर्जक पदार्थांचे निर्जंतुकीकरण करणे यांचा समावेश होतो.

विलगीकरण तंत्र : या प्रक्रियेत हात धुण्याची पद्धत, गाऊन घालण्याची वा काढण्याची पद्धत आणि मास्क वापरण्याची पद्धत यांचा समावेश होतो.

हात धुण्याची प्रक्रिया

१) हात धुण्याची प्रक्रिया : रुग्णास परिचर्या देण्यापूर्वी व नंतर हात धुणे अनिवार्य आहे. हातांद्वारे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. हात धूत असताना सर्व प्रथम कोपरापासून खालचे हात ओले करून घ्यावेत. त्यानंतर कोपरापासून बोटांपर्यंत संपूर्ण हाताला चक्राकार गतीने साबण लावावा. साबण लावत असताना बोटांच्या बेचक्यांमध्ये व नखांजवळी व खालील भागांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. भरपूर पाण्याने लावलेला सर्व साबण स्वच्छ करावा आणि स्वच्छ टॉवेलने हात कोरडे करावेत व जंतूनाशक लोशन लावावे.

 

मास्क वापरण्याच्या पद्धती

२) मास्क वापरण्याच्या पद्धती : गाऊन घालण्यापूर्वी मास्क बांधावा. प्रथम निर्जंतुक चिमट्याने निर्जंतुक पेटीमधील मास्क काढून घ्यावा. त्यानंतर फक्त मास्कच्या बंधांना धरूनच सोडावा, इतर भागास हात न लावता तोंड व नाक झाकले जाईल अशाप्रकारे डोक्याच्या मागील बाजूस बंध बांधावेत. सर्व काम करून झाल्यानंतर बाहेर पडण्याच्या वेळेस प्रथम गाऊन काढावा व नंतर मास्क काढावा आणि त्यानंतर वापरलेला मास्क कचरा टाकण्याच्या बादलीत टाकावा.

गाऊन घालण्याची पद्धत

३) गाऊन घालण्याची व काढण्याची पद्धत : हातातील घड्याळ व इतर वस्तू काढुन त्या योग्य ठिकाणी ठेवाव्यात. अडकवून ठेवलेला गाऊन आतील भागास धरून घ्यावा कारण तो भाग स्वच्छ असतो आणि गाऊनच्या बाहेरील भागावर रुग्णालयातील /वातावरणातील जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रथम गाऊनच्या बाह्या मध्ये दोन्ही हात घालून मानेजवळील बंध बांधावेत. ते बांधत असताना मानेला किंवा केसांना स्पर्श होऊ देऊ नये. त्यानंतर मागील बाजूने गाऊन सरळ करत असताना गाऊनच्या डाव्या बाजुवरून उजवी बाजू घेऊन कमरेजवळील पट्टा पाठीमागे बांधावा. रुग्ण शुश्रूषा प्रक्रिया संपल्यावर किंवा गाऊनच्या वापरानंतर, प्रथम कमरेजवळील पट्टा सोडून गाऊन सैल करावा, हात स्वच्छ धुवावेत व नंतर मानेजवळी गाठ सोडावी आणि गाऊन काढून तो निर्जंतुकीकरण्यासाठी द्यावा. परत एकदा हात स्वच्छ धुवावेत.

 

 

संदर्भ :

  • Black, Joyce M.; Hawks, Jane Hokanson, Medical-Surgical Nursing, 8th edition. 
  • Jacob, Annamma; Rekha R. Clinical Nursing Procedures : The Art of Nursing Practice, 3rd edition.
  • सफिया सिराज मोमीन, वैद्य – शल्य चिकित्सा : परिचर्या भाग १.

समीक्षक : सरोज वा. उपासनी