सामाजिक संकल्पना व वर्तन आणि अर्थशास्त्रीय सिद्धांत व तत्त्वे यांचा मेळ घालणारी अर्थशास्त्राची एक शाखा. यामध्ये सामाजिक मानदंड, सांस्कृतिक धारणा, शैक्षणिक, आरोग्यविषयक, मानसशास्त्रीय घटक इत्यादी सामाजिक घटकांचा प्रभाव व्यक्तीच्या आर्थिक निर्णयावर आणि व्यक्तिगत आवड-निवडींवर पडत असतो. तसेच सामाजिक कृती आणि अर्थव्यवस्था या दोहोंतील संबंधांचाही सामाजिक अर्थशास्त्रात विचार केला जातो. यात सामाजिक लाभाच्या वस्तू आणि सेवांचा विचार केला जाऊन सामाजिक कल्याण, सामाजिक धोरणे, सामाजिक आणि आर्थिक न्याय या दृष्टीने अभ्यास केला जातो.

सामाजिक अर्थशास्त्र हे मानवी वर्तनाच्या केवळ आर्थिक बाजूंचा विचार न करता त्याच्या आर्थिक वर्तनाशी निगडित सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचाही प्रभाव लक्षात घेते. बाजारपेठ आणि किंमत तसेच स्वहित यापलीकडे समाजात वावरताना व्यक्तीच्या आर्थिक वर्तनावर अनेक सामाजिक संकल्पनांचा प्रभाव पडत असतो. उदा., सण-समारंभात व्यक्तीकडून केला जाणारा खर्च हा केवळ आर्थिक निकषावर किंवा स्वहित साधणे एवढ्या मर्यादित उद्दिष्टांशी निगडित नसतो, तर त्यास सांस्कृतिक संदर्भ असतो. अर्थशास्त्रीय सिद्धांत अनेक गृहीतांवर आधारलेले असून ही गृहीते लक्षात घेतली, तरच ती खरी ठरतात. आर्थिक सिद्धांतांच्या मांडणीतील ही मर्यादा आहे. या मर्यादांच्या पलीकडे व्यक्तीच्या आर्थिक निर्णयावर आणि निवडीवर जे सामाजिक, तसेच अन्य घटक प्रभाव टाकतात, त्यांचा अभ्यास सामाजिक अर्थशास्त्रात केला जातो. व्यक्तीकेंद्रित ज्या वर्तन प्रतिमानांचा अर्थशास्त्र विचार करते, तो संकुचित असल्याच्या असमाधानातूनच सामाजिक अर्थशास्त्राच्या अभ्यासास चालना मिळाली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. बाजार आणि किंमतयंत्रणा यांशिवाय अन्य अनेक घटकांचा निवडीवर परिणाम होतो.

सामाजिक अर्थशास्त्रातून अर्थशास्त्राच्या मुख्य प्रवाहाच्या पलीकडे अर्थशास्त्राच्या कक्षा अधिक विस्तृत करता येतात. सामाजिक आणि आर्थिक घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध सामाजिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. आर्थिक आणि शैक्षणिक दर्जामुळे सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते. तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्न, आयुर्मर्यादा, साक्षरता, रोजगार या घटकांच्या साहाय्याने सामाजिक आणि आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करता येते.

आर्थिक घटकांचा सामाजिक घटकांवर आणि सामाजिक घटकांचा आर्थिक घटकांवर परिणाम होत असतो. याबाबत पुढील काही परिणामांचा उल्लेख करता येतो :

  • एखादा कारखाना बंद झाल्यास त्याचा परिणाम  म्हणून उत्पन्न, उत्पादन, वस्तुंची मागणी, रोजगार यांसह शिक्षण, आरोग्य, सामाजिक शांतता, स्वास्थ्य या सर्वांवरही होत असतो.
  • पायाभूत सोयींमुळे जलद आर्थिक विकास होतो, हे खरे आहे; परंतु त्यामुळे नसर्गिक साधनांची हानी, पर्यावरणीय समतोल ढासळणे असे परिणामही दिसून येतात.
  • आंतरजाल आणि भ्रमणध्वनी यांमुळेही आर्थिक तसेच सामाजिक परिणाम दिसून येतो.
  • उत्पन्न विषमतेतून सामाजिक विषमता दिसून येते.

अर्थशास्त्राचा मानवी विकासाच्या संदर्भात विचार करणे हे सामाजिक अर्थशास्त्रात अनुस्यूत आहे.

समीक्षक : अजली राडकर