खाँ, हबीबुद्दीन : (? १८९९ — २० जुलै १९७२). भारतातील तबलावादनाच्या अजराडा घराण्यातील श्रेष्ठ तबलावादक. त्यांचा जन्म मेरठ येथे झाला. त्यांचे वडील उस्ताद शम्मू खाँ हे अजराडा घराण्याचे आधारस्तंभ होते. त्यांच्याकडे वयाच्या बाराव्या वर्षापासून हबीबुद्दीन खाँ यांनी तबलावादनाची तालीम घेण्यास सुरुवात केली; पण वडिलांच्या अकाली मृत्युमुळे (१९१५) चार वर्षांतच या तालमीत खंड पडला. यानंतर सुदैवाने दिल्ली घराण्याचे खलिफा उ. नत्थू खाँ यांची शिकवणी त्यांना मिळाली. त्यांच्याकडे दहा वर्षे अत्यंत कठोर मेहनतीने त्यांनी तबलावदनाचे शिक्षण घेतले. तद्‌नंतर उ. मुनीर खाँ यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. या सर्व शिक्षणामुळे त्यांचे तबलावादन चौफेर व समृद्ध बनले.

प्रचंड तयारी, गोडवा, लयबंधांची प्रभावी मांडणी, मुठीचे धिरधिर, बायाँवरील कल्पनातीत प्रभुत्वामुळे वाजणारे ‘घेतक घेतक’ ‘धाती धागेना’ हा कायदा (तबला वादनाचे बोल याचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार) ही त्यांची वादन वैशिष्ट्ये. कायद्यांची ३-२-३ अशी व ३१/२ अशी व ३१/२ – ४१/२ अशी रचना, बराबरीच्या लयीमध्ये डगमगती लय ही त्यांची आणखी काही वैशिष्ट्ये. ज्या निकासाने एखादी रचना एकपटीत प्रस्तुत होई, ते निकास चौपटीत जवळजवळ अशक्य असतात; पण त्यांनी निकासामध्ये असे कलात्मक बदल केले की, ती रचना चौपटीत अत्यंत शुद्धपणे वाजल्याचा भास होत असे. हेच कौशल्य म्हणजे अजराडा घराण्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. ते गायन-वादनाची संगतही अतिशय प्रभावीपणे करीत.

हबीबुद्दीन खाँ यांचे मेरठ येथे पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांचे सुपुत्र मंजीखाँ, उ. हशमत अली, उ. रमझान खाँ, पं. श्रीधर, पं. सुधीर सक्सेना हे त्यांचा तबलावादनाचा वारसा पुढे चालवीत आहेत.

समीक्षण : सुधीर पोटे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.