पाणथळीच्या जागा ह्या नैसर्गिक जलचक्राचे महत्त्वाचे भाग आहेत. जमीन आणि पाणी यांचा समन्वय साधणाऱ्या अशा जागा गोड्या वा खारट पाण्याखाली आणि अनेक प्रकारच्या आकारांत असतात. उदा., नद्या, नाले, तलाव, खाजण तलाव, खारपर्णी वने, शेवाळी दलदल, प्रवाळ, खडक-वने, तसेच मानवनिर्मित तलाव, शिवारे, कालवे व कालव्याखालील शेती, मिठागरे, धरणे, इत्यादी. अशा जागांमध्ये प्राथमिक व दुय्यम अशा दोन्ही प्रकारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. शिवाय तेथे जैवविविधताही प्रचंड प्रमाणात असते. एकपेशीय वनस्पती व प्राणी, अनेक प्रकारची लव्हाळी, मुळा-खोडात ऑक्सिजन साठविण्याकरिता पोकळ्या असणाऱ्या विविध वनस्पती आणि त्यांच्या आश्रयाने जगणारे अनेक प्रकारचे प्राणी यांनी पाणथळ जागा समृद्ध असतात. पाण्याखाली वाढणारी एलोडिया-सेराटोफायलम, पाण्यावर तरंगणारी लेम्ना-वूल्फिया-आयकोर्निया, चिखलात रोवून पाण्याबाहेर डोकावणारी रामबाण,रीड, खाऱ्या चिखल-पाण्यात वाढणाऱ्या तिवर-सुंदरी इ. खारपर्णींचे अनेक प्रकार यांचा दलदलीच्या प्रदेशात निवास असतो.
नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यांच्या रेट्यामुळे,पाण्याचा बेसुमार उपसा केल्याने आणि घनकचऱ्याची भर टाकण्यामुळे पाणथळ जागा आक्रसून जात आहेत.याचा अनिष्ट परिणाम जैविक उत्पादकता आणि वैविध्य यांवर होत असतो. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाणथळ क्षेत्रांचे जतन व संवर्धन होणे जरूरीचे आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनक्षमता व जैवविविधता असलेली पाणथळ क्षेत्रे संरक्षित ठेवण्यासाठी इराणमधील रामसर या शहरात दि. २ फेब्रुवारी १९७१ रोजी आंतरराष्ट्रीय अधिवेशनात ठराव केला गेला, त्यास रामसर ठराव ( करार) म्हणतात. भारताने हा ठराव सन २०१० मध्ये मान्य केला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकृत रामसर क्षेत्रांना संरक्षण देणे बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे नियमावलीही तयार करण्यात आली आहे.
विसाव्या शतकाच्या शेवटी केलेल्या अंदाजाप्रमाणे भारतात सुमारे ५८.२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र पाणथळीखाली असून सन २०१० पर्यंत पुढील २६ क्षेत्रे रामसर क्षेत्रे म्हणून नोंदविली आहेत : अश्टामुडी पाणथळ (२००२, केरळ), भितरकर्णिका वन्यजीव (२००२, ओडिशा), भोज पाणथळ (२००२, मध्य प्रदेश), चिल्का सरोवर (१९८१, ओडिशा), डिपोर बील (२००२, असम), पूर्व कोलकाता पाणथळ (२००२, पश्चिम बंगाल), हरिके सरोवर (१९९०, पंजाब), कांजली (२००२, पंजाब), केवलादेव राष्ट्रीय उद्यान (१९८१, राजस्थान), कोलेरू सरोवर (२००२, आंध्र प्रदेश), लोक्तक सरोवर (१९९०, मणिपूर), पॉइंट कालीमीर वन्यप्राणी आणि पक्षी अभयारण्य (२००२, तामिळनाडू), पोंग धरण सरोवर (२००२, हिमाचल प्रदेश), रोपर (२००२, पंजाब), सांबर सरोवर (१९९०, राजस्थान), सास्थमकोटा सरोवर (२००२, केरळ), त्सो मोरीरी (२००२, जम्मू-काश्मीर), वेंबनाड-कोल पाणथळ (२००२, केरळ), वुलर सरोवर (१९९०, जम्मू-काश्मीर), चंद्रताल (२००५, हिमाचल प्रदेश), रेणुका पाणथळ (२००५, हिमाचल प्रदेश), रुद्रसागर (२००५, त्रिपुरा), अपर गंगा (२००५, उत्तर प्रदेश), होकेरा सरोवर (२००५, जम्मू-काश्मीर), सुरीन्सर-मानसर (२००५, जम्मू-काश्मीर), नालसरोवर पक्षी अभयारण्य (२०१२, गुजरात).रामसर यादीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रांपैकी वेंबनाड-कोल (केरळ) हे सर्वात मोठे, तर रेणुका (हिमाचल प्रदेश) सर्वात लहान असे दलदलीचे क्षेत्र आहेत.
पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा सामावून घेणे, त्यातील खनिजे विघटनाद्वारे मुक्त करून जीव-जंतूस उपलब्ध करून देणे, जलशुद्धीकरण, परिसंस्थांचे पुरापासून संरक्षण, जमिनीची धूप आटोक्यात ठेवणे, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म-हवामानावर ताबा ठेवणे, अशा पर्यावरणाच्या अनेक क्रिया पाणथळ क्षेत्रात निसर्गतः होत असतात. त्याचबरोबर सृष्टि-वातावरण सौंदर्यात भर घालणे, करमणूक स्थळे म्हणून आणि सामाजिक कार्यक्रमातही अशा जागा महत्त्वाच्या ठरतात.
संदर्भ :
- प्रा. गंगोत्री निरभवणे, २०१६. रामसर क्षेत्र : पाणथळाच्या संरक्षणाचा करार.जलोपासना दिवाळी अंक ४:१५२-१५३.
- Gazette of India, Pt.II, Sec. 3, SubSec. (ii), Nov. 2010.
- Jyoti Parekh & Kirit Parekh, 1999. Sustainable Wetlands: Environmental Governance. IGIDR, Mumbai.
समीक्षक – बाळ फोंडके
This knowledge about wetlands is very owsome sir . Thank you so much for this information.