घरगुती सांडपाण्यामध्ये ९९.८ टक्क्यांहून अधिक पाणी असते; उरलेल्या ०.२ टक्क्यांपर्यंत दूषितके असतात. आजकाल उपलब्ध असलेल्या शुद्धीकरण प्रक्रियांमुळे ही दूषितके काढून टाकणे आर्थिक दृष्टीने शक्य आहे, असे शुद्ध केलेले सांडपाणी पुन्हा वापरणे हितावह असते.

पुनर्वापर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन प्रकारांनी करता येतो. ह्या दोन्ही प्रकारांमध्ये प्रारंभिक, प्राथमिक आणि द्वितीय टप्प्यांमध्ये शुद्धीकरण केलेले सांडपाणी, गरज पडल्यास अधिक शुद्ध करून पुनर्चक्रित करता येते. ह्या पाण्याच्या शुद्धतेची पातळी त्याच्या प्रस्तावित वापरावर अवलंबून असते.

शुद्ध केलेल्या घरगुती सांडपाण्याचा पुनर्वापर पुढील प्रकारांनी करता येतो : (१) शेतीसाठी, (२) भूजलाचे पुनर्भरण, (३) जमिनीवर साठवलेल्या पाण्याचे झिरपणे आणि बाष्पीभवन ह्यामुळे कमी झालेले साठवण भरून काढणे, (४) समुद्रकिनार्‍याजवळ असणार्‍या भूगर्भातील गोड्या पाण्याचे समुद्रातील खार्‍या पाण्याबरोबर होणारे मिश्रण थांबविणे; (५) औद्योगिक वापरामध्ये : (अ) वाफ उत्पन्न करण्यासाठी, (आ) यंत्रे थंड ठेवण्यासाठी, (इ) अग्निशमनासाठी, (ई) बागकामासाठी, (उ) फरशी स्वच्छ करण्यासाठी, (ऊ) स्वच्छता गृहांमध्ये, (ए) मानवी अन्नसाखळीमध्ये न येणारे उत्पादन : उदा., खते, कीटकनाशके इ. ह्यांच्या उत्पादनामध्ये कच्चा माल म्हणून, (ऐ) औष्णिक विद्युतकेंद्रांमधील कोळशाची राख वाहून नेण्यासाठी, (ओ) कोळशापासून कोल बनवताना तयार झालेला कोल थंड करण्यासाठी; (६) मत्स्यपालनासाठी, (७) सार्वजनिक उद्यानांमध्ये आणि रेसकोर्स व गोल्फकोर्स येथील हिरवळीसाठी, (८) जेथे नैसर्गिक पाण्याचा स्रोत अपुरा असेल तेथे अत्यंत उच्च प्रतीची शुद्धीकरण प्रक्रिया करून अपुर्‍या स्रोतामध्ये हे पाणी मिसळणे आणि ह्या मिश्रणाचे घरगुती वापरासाठी शुद्धीकरण करणे, जेणेकरून हे पाणी पिण्यायोग्य होईल.

सांडपाण्याचा पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण करण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते : (१) उपलब्ध पाण्यापैकी किती पाणी पुनर्वापरासाठी/पुनर्चक्रीकरणासाठी मिळेल, (२) ह्या पाण्याच्या शुद्धीकरणाची पातळी किती असली पाहिजे (हे त्याच्या वापरावर अवलंबून राहील), (३) ह्या अतिरिक्त शुद्धीकरणासाठी किती जमीन लागणार असेल, (४) त्यासाठी लागणारी ऊर्जा, मनुष्यबळ इ., किती असेल, (५) अतिरिक्त शुद्धीकरणामुळे उत्पन्न होणारा गाळ किती असेल आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी लागेल आणि (६) पुनर्वापर/पुनर्चक्रीकरण ह्यासाठी होणारा खर्च आणि पाणी वाचवल्यामुळे होणारी बचत ह्यांचे गणित.

शेतीसाठी पुनर्वापर : जमिनीवर शुद्धीकरण, कृत्रिम पाणथळ (Land treatment constructed wetlands) या नोंदीमध्ये सांडपाण्याचा वापर करण्याच्या पद्धतींची माहिती दिलेली आहे. ह्या दोन्हींमध्ये सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि पुनर्वापर करता येतो. कृत्रिम पाणथळ हा प्रकार लहान आणि मध्यम लोकवस्तीसाठी वापरणे योग्य ठरते. शहरांमधील छोट्या गृहनिर्माण संस्थांच्या सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी ह्या संस्थांच्या स्वतःच्या जागेवरसुद्धा अशी योजना राबवता येते. ज्या ठिकाणी पूतिकुंडांचा (septic tank) वापर केला जातो त्यामधून बाहेर पडणार्‍या अर्धवट शुद्ध झालेल्या सांडपाण्याच्या अधिक शुद्धीकरणासाठी कृत्रिम पाणथळ याचा उपयोग होतो; असे शुद्ध झालेले सांडपाणी बागकामासाठी, शेतीसाठी वापरता येते, तसेच त्याचे निर्जंतुकीकरण केल्यास ते पाणी स्वतंत्र नलिकांच्या जाळ्यांद्वारे शौचालयांमध्ये उत्सर्जनासाठी (flushing) वापरता येते.

ज्या गृहनिर्माण संस्थांच्या इमारती नव्याने बांधल्या जात असतील त्यांचा आराखड्यामध्ये पिण्याचे पाणी आणि पुनर्चक्रित सांडपाणी ह्यांच्या नलिकांची वेगळी, स्वतंत्र जाळी करण्याची व्यवस्था त्या संस्थेमधील रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. अस्तित्वात असलेल्या इमारतींमध्येसुद्धा ही काळजी करणे अत्यावश्यक असते. जर स्वयंपाकघर, भांडी, कपडे, स्नानगृह ह्यांचे सांडपाणी (grey water) शौचालयाच्या सांडपाण्यापासून अलग करता येत असेल तर अशा प्रकराच्या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो, कारण त्यामध्ये दूषितकांचे प्रमाण कमी असते.

भूजलाचे पुनर्भरण : विविध कामांसाठी जमिनीमधून काढलेल्या पाण्याचा साठा पूर्ववत करण्यासाठी शुद्ध केलेले घरगुती सांडपाणी उपयोगी पडते. ते जमिनीखाली साठवल्यामुळे त्याचे बाष्पीभवन होत नाही. पुनर्भरणाचा प्रकल्प हाती येण्यापूर्वी जमिनीची प्रत आणि मातीची साठवण क्षमता, पुनर्भरणाची पद्धत, सांडपाण्याला द्यावी लागणारी शुद्धीकरण प्रक्रिया. इ. गोष्टींचा विचार करावा लागतो.

पुनर्भरणाच्या  पद्धती : (१) वालुकामय प्रदेशांत जमिनीवर तळी तयार करून त्यांमध्ये शुद्ध केलेले सांडपाणी साठवणे (spreading basins) आणि (२) थेट पंपाच्या साहय्याने जमिनीत भरणे (direct pumping). ज्या प्रदेशांत तळी तयार करण्यासाठी पुरेशी जमीन नसेल, तेथे ही पद्धत उपयोगी पडते. समुद्रकिनार्‍याजवळ असलेल्या भूगर्भातील पाण्यामध्ये समुद्राचे खारे पाणी मिसळू न देण्याचे काम ह्या पद्धतीने करता येते.

बाष्पीभवनामुळे आणि जमिनीत झिरपण्यामुळे जमीनीवरील कमी होणारा पाण्याचा साठा भरून काढण्यासाठी शुद्ध केलेले सांडपाणी वापरता येते. अशा साठ्याचा उपयोग पिण्याशिवाय इतर कामांसाठी करता येतो, पण तसा उपयोग करायचा असल्यास शुद्ध केलेल्या सांडपाण्यावर अतिरिक्त प्रक्रिया (विशेषतः जीवाणू आणि विषाणू ह्यांना मारणे) करावी लागते.

औद्योगिक पुनर्वापर : वर उल्लेख केल्याप्रमाणे औद्योगिक वापराकरितादेखील हे शुद्ध केलेले घरगुती सांडपाणी वापरता येते, मात्र त्यामध्ये प्रस्तावित वापरासाठी लागणार्‍या शुद्धतेसाठी अतिरिक्त शुद्धीकरण करणे आवश्यक असते, उदा., वाफ उत्पन्न करणे असल्यास तिच्या दाबावर पाण्याची शुद्धता ठरते, जेवढा दाब अधिक तेवढे पाणी अधिक स्वच्छ असावे लागते. कारखान्यांमध्ये असणार्‍या स्वच्छतागृहांमधून उत्पन्न होणारे सांडपाणी शुद्ध करून ह्या व इतर कामांसाठी त्याचा पुनर्वापर करता येतो. असे मिळणारे पाणी कमी पडत असेल तर शेजारच्या शहरांमधील सांडपाणी घेऊन किंवा आपल्याच वसाहतीमधील सांडपाणी शुद्ध करून वापरता येते.

संदर्भ : 

  • Agale, Priyanand; Sadgir, Parag, Aerobic brickbat grit sand (ABGS) purifier : New approach for grey water treatment, Journal Indian Water Works Association, 2018.
  • Arceivala, Soli J.; Asolekar, Shyam R. Wastewater treatment for pollution control and reuse, 3rd New Delhi, 2007.
  • Jaju, Surabhi; Apte, Pradeep. Economics of Wastewater Management, Recycling and Reuse in Pune, Journal Indian water works Association, 2018.