पशुवैद्यकीय क्षेत्रात अब्जांश तंत्रज्ञानाचा वापर केवळ रोगावर प्रतिबंध आणि उपचार एवढ्यापुरता मर्यादित नाही. जनावरांचे संगोपन, पोषण, पुनरुत्पादन, आजारांवर उपचार अशा अनेक गोष्टींसाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. प्राण्यांच्या आजारांवरील उपचारासाठी पारंपरिक पद्धतींमध्ये मुख्यत्वे प्रतिजैविक औषधांचा वापर केला जातो. प्रतिजैविके ही विविध आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व उपचार करण्यासाठी निश्चितच प्रभावी आहेत. परंतु, त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत जाऊ लागल्यावर बदलत्या परिस्थितीला अनुसरून रोगजनक सूक्ष्मजीवांनी (Pathogenic microorganisms) प्राण्याच्या शरीरातील पेशीविरुद्ध आपली प्रतिकारशक्ती जनुकीय विकासाद्वारे वाढवली. परिणामत: अशी औषधे उपचारासाठी प्रभावहीन ठरू लागली. नंतर संशोधकांनी पशुरोगांवर औषधनिर्मितीसाठी अब्जांश तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना असे आढळून आले की, अब्जांश कणांचा वापर केलेली औषधे रोगजन्य जीवाणू (Bacteria) आणि परजीवी (Parasites) यांना मारण्यासाठी किंवा त्यांची शक्ती क्षीण करण्यासाठी खूपच परिणामकारक आहेत.

अब्जांश तंत्रज्ञान : पशुवैद्यकीय औषधे

पशुवैद्यकीय औषधांमध्ये अब्जांश तंत्रज्ञानाचे विविध उपयोग :

(१) औषध वितरण प्रणाली : पारंपरिक पद्धतीमध्ये प्राण्यांना द्यावयाची औषधे तोंड, नाक अथवा डोळे या मार्गांद्वारे दिली जातात किंवा अंत:क्षेपणाद्वारे देखील त्वचेतून औषध दिले जाते. यालाच ‘त्वचापारित औषध वितरण प्रणाली’ (Transdermal Drug Delivery) असे म्हणतात. अब्जांश तंत्रज्ञानावर आधारित औषधे देताना वरील पद्धतींपैकी एका पद्धतीचा सोयीनुसार अवलंब केला जातो.

लक्ष्यित औषध वितरण प्रणाली ही मुख्यत: तीन टप्प्यांवर आधारित आहे – इच्छित औषधाचे संपुटन (Encapsulation) करणे; शरीराच्या लक्ष्यित भागात औषध पोहोचवणे (Targeted drug delivery) आणि निर्धारित ठिकाणी औषधाची मुक्तता करणे. या प्रणालीचे काही प्रमुख फायदे आहेत. ते म्हणजे रुग्णाला द्यावयाच्या मात्रेची वारंवारता कमी होते. औषधांचा बाधित भागावर एकसमान प्रभाव पडतो. तसेच औषधांचे अनुषंगिक दुष्परिणाम खूपच कमी असतात.

विशेषत: पशुवैद्यकीय लस किंवा औषध वितरण प्रणालीमध्ये वाहक म्हणून अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. उदा; लिपोसोम, डेंड्रिमर, कायटोसॅन, कार्बन अब्जांश नलिका इत्यादी. पशुवैद्यकीय औषधांमध्ये नैसर्गिक तसेच कृत्रिम अब्जांश कण असतात.

लिपोसोम (Liposome) : जनावरांना शरीरात होणाऱ्या ब्रुसेलोसिस (Brucellosis) या आजारावर उपचार करण्यासाठी लिपोसोम आधारित स्ट्रेप्टोमायसीन हे औषध वापरले जाते.

कायटोसॅन (Chitosan) : कायटोसॅन हे पॉलिॲमिनोसॅकॅराइड या प्रकारचे अब्जांश कण आहेत. हे कण लस वितरण आणि औषध वितरण या दोन्हींमधे महत्त्वाची भूमिका बजावतात. जखमेच्या जागी लावावयाच्या मलमपट्टीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

डेंड्रिमर  (Dendrimer) : हे अब्जांश आकाराचे प्रमाणबद्ध रेणू आहेत. त्यांची विद्राव्यता चांगली व सुलभ असते. तसेच त्यांच्या वापरामुळे औषधांपासून होणारे अनुषंगिक दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असतात.

कार्बन अब्जांश नलिका (Carbon nanotube) : कार्बन अब्जांश नलिकेचा वापर कर्करोग तसेच संसर्गजन्य रोग यांच्यावरील उपचारांसाठी औषध वितरण प्रक्रियेतील वाहक म्हणून केला जातो.

(२) लस वितरण प्रणाली : संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी लसीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. प्राणी किंवा मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास लसीकरण खूप उपयुक्त आहे. लसीमध्ये रोगाला कारणीभूत असणारे परंतु, कमजोर असे सूक्ष्मजीव असतात. शरीरात प्रवेश करणाऱ्या आरोग्यास बाधक अशा बाह्य विषाणूंना ओळखणे, त्यांचा नाश करणे किंवा त्यांना निष्प्रभ करणे, त्यांच्या शरीरातील वाढत्या संख्येची नोंद ठेवणे या गोष्टी लसीद्वारे केल्या जातात.

लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत; त्यातील एक प्रकार म्हणजे पशुधन संग्रहित लस (Livestock vaccine). पशूंतील प्रजनन यंत्रणेसाठी लस हे एक आवश्यक साधन आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय लस उत्पादनाच्या क्षेत्रात अब्जांश कणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक पाळीव प्राण्यांना अब्जांश कणांवर आधारित लस दिली जाते. लसीमध्ये तांबे, चांदी, सोने, जस्त अशा विविध धातूंचे अब्जांश कण प्राधान्याने वापरलेले असतात.

संदर्भ :

  • https://www.espublisher.com/uploads/article_pdf
  • https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6968591/
  • https://www.scielo.br/j/cr/a/s9Mc4NZ8pkfrYRrRDhDZ4fy/?format=pdf&lang=en

समीक्षक : वसंत वाघ