सूक्ष्मजीवांपासून मिळणाऱ्या व अत्यल्प प्रमाणात असतानाही इतर सूक्ष्मजीवांची वाढ रोखू शकणाऱ्या किंवा त्यांना मारक ठरणाऱ्या रासायनिक पदार्थांना ‘प्रतिजैव प्रदार्थ’ किंवा ‘प्रतिजैविके’ (Antibiotics) म्हणतात.

सर्वप्रथम डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी सन १९२८ मध्ये पेनिसिलीन (Penicillin) या रोगप्रतिबंधक लसीचा शोध लावला. यानंतर खऱ्या अर्थाने एक रासायनिक उपचार पद्धती म्हणून प्रतिजैविकांना मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले. एकेकाळी असाध्य समजल्या जाणाऱ्या अनेक आजारांवर प्रतिजैविके विकसित करण्यात आली. १९५० पर्यंत पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसिन (Streptomycin), सल्फोनामाईड (Sulfonamide) अशी विविध प्रतिजैविके निघाली. परिणामत: जंतुसंसर्गामुळे होणारे मृत्यू लक्षणीय प्रमाणात घटले.

विविध जातीच्या रोगकारक जिवाणूंसाठी वेगवेगळी प्रतिजैविके वापरली जातात. कालपरत्वे रोगकारक जिवाणूंची आनुवंशिक संरचना (Genetic structure) बदलत जाते. त्यांच्यामध्ये सभोवतालच्या परिस्थितीनुसार ही रचना बदलण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यामुळे त्यांना प्रतिकार करणारी प्रचलित प्रतिजैविके निष्प्रभ ठरतात. अशावेळी रोगकारक जिवाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी नवीन प्रतिजैविके द्यावी लागतात. रुग्णांची परिस्थिती पाहून त्यांना द्यावयाच्या प्रतिजैविकांची निवड करावी लागते. एखाद्या रुग्णास पेनिसिलिनची अधिहृषता (ॲलर्जी) असेल तर त्यास अशी औषधे देता येत नाहीत. सामान्यत: प्रतिजैविकांचे दोन प्रकार पडतात :

(१) रुंद वर्णपट (Broad spectrum) प्रतिजैविके : ही प्रतिजैविके ग्राम-धन (Gram positive) आणि ग्राम-ऋण (Gram negative) या दोन प्रमुख जिवाणू गटांना प्रतिबंधित करतात.

(२) अरुंद वर्णपट (Narrow spectrum) प्रतिजैविके : ही प्रतिजैविके केवळ जिवाणूंच्या मर्यादित प्रजाती मारण्यास किंवा प्रतिबंधित करण्यास सक्षम असतात.

प्रतिजैविके जशी अपायकारक जिवाणूंवर परिणाम करतात तशीच ती शरीरातील उपयुक्त जिवाणूंवर देखील विपरीत परिणाम करतात. आरोग्याच्या दृष्टीने याचा शरीरावर घातक परिणाम होतो. तसेच रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये देखील त्या प्रतिजैविकांच्या विरोधात प्रतिरोध क्षमता (Resistive power) निर्माण होते. परिणामत: रोगप्रतिबंधक प्रतिजैविकांचा रोगग्रस्त शरीरातील सूक्ष्मजीवांवरील प्रभाव कमी होत जातो. साहजिकच शास्त्रज्ञांना नवनवीन प्रतिजैविके शोधून काढण्यावर भर द्यावा लागतो.

अलीकडील काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये ‘अब्जांश कण आधारित औषधे व उपकरणे’ यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. अब्जांश कणांचे अतिसूक्ष्म आकारमान आणि त्यांच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचे घनफळाशी असलेले गुणोत्तर यांमुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण असे गुणधर्म लाभले आहेत. हे अब्जांश कण प्रतिजैविके आणि इतर नैसर्गिक संयुगांसाठी उत्कृष्ट विद्युतवाहक आहेत. तसेच ते रुंद वर्णपटामधील जिवाणूंचा बंदोबस्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. चांदी, लोह ऑक्साईड, टिटॅनियम ऑक्साईड, कॉपर ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड यांचे अब्जांश कण हे रोगकारक जीवाणूच्या वाढीस अत्यंत प्रभावीपणे प्रतिबंध करतात. सध्या वापरात असलेली प्रचलित प्रतिजैविके तसेच चांदी, सोने इत्यादी धातूंचे अब्जांश कण यांचा संयुक्तपणे वापर केल्याने प्रतिजैविकांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होत असल्याचे संशोधनाद्वारे दिसून आले आहे. त्यामुळे या पुढील काळात विकसित अशी नवनवीन प्रतिजैविके वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होतील यात शंका नाही.

पहा : अब्जांश तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र.

संदर्भ :

  • C. L. Ventola, “The antibiotic resistance crisis : causes and threats,” P T J, vol. 40, no. 4, pp. 277–83, (2015).
  • Felman Adam, Antibiotics : Uses, resistance, and side effects https://www.medicalnewstoday.com/articles/10278,  January 18, 2019.
  • Hauser, A. R. Antibiotic Basics for Clinicians : The ABCs of Choosing the Right Antibacterial Agent; 2018.
  • गोडबोले अच्युत, नॅनोदय,  पुणे, २०११.

समीक्षक : वसंत वाघ