बी. रघुनाथ : (१५ ऑगस्ट १९१३-७ सप्टेंबर १९५३) मराठीतील सुप्रसिद्ध ललित लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार व लघुनिबंधकार.
बी. रघुनाथ यांचा जीवन परिचय
भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्यांचे मूळ नाव. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातले सातोना हे त्यांचे मूळगाव. बी.रघुनाथांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण सातोना येथेच झाले. पुढचे शिक्षण हैदराबाद येथील विवेकवर्धिनी या शाळेत झाले.१९३० साली ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांना दोन बहिणी व एक भाऊ होता. वडील वारले होते. ते थोरले असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. मॅट्रिकनंतर ते सातोन्याला परत आले. १९३२मध्ये त्यांना संस्थानच्या बांधकाम खात्यात कनिष्ठ कारकुनाची नोकरी मिळाली. बी. रघुनाथांनी कोणतीही तक्रार न करता हैदराबाद संस्थानात वीस वर्षे कारकून म्हणून नोकरी केली. त्या काळी मराठवाडा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. हैदराबाद संस्थान भारतातल्या संस्थानांपैकी आकाराने सर्वांत मोठे आणि आर्थिकदृष्ट्या सर्वांत श्रीमंत संस्थान होते. निजामाची राजवट सरंजामी स्वरूपाची होती. अत्यंत जुलमी होती. त्या राजवटीला धार्मिक संघर्षाचीही किनार होती. राजा मुस्लीम होता आणि बहुसंख्य प्रजा हिंदू होती. सत्ता हाती असणाऱ्यांनी बहुसंख्य लोकांवर अन्याय केला.
बी. रघुनाथ यांच्या साहित्य प्रेरणा
समाजाचा एक भाग म्हणून जगताना व सरकारी नोकरी करताना बी. रघुनाथांना जे दिसत होते, नि जे त्यांच्या अनुभवाला येत होते, त्यामुळे त्यांची घुसमट होत होती. पण, थेटपणे त्या व्यवस्थेशी दोन हात करणे किंवा ती व्यवस्थाच मोडून काढणे त्यांना शक्य नव्हते. जे वाट्याला आले ते भोगण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा मार्ग नव्हता. आई, बहिणी, भाऊ, पत्नी, मुलगी असा त्यांचा परिवार होता. त्या परिवाराची त्यांच्यावर जबाबदारी होती. मात्र, त्यांच्या संवेदनशील मनात अस्वस्थेची कालवाकालव सुरूच होती. ती बेचैनी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या तशा अवस्थेतच त्यांनी त्यांच्या सभोवतालाला शब्दबद्ध केले आहे. कविता, कथा, कादंबऱ्या आणि ललित निबंधांच्या माध्यमातून त्यांनी त्या काळाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक वास्तव नोंदवले आहे. स्वतःची आणि सभोवतालाच्या समाजाची घुसमट अधोरेखित केली आहे.
बी. रघुनाथ यांचे साहित्य
निजामी राजवटीत ललित लेखन करणाऱ्या लेखकांपैकी बी. रघुनाथ हे महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचे आलाप आणि विलाप (१९४१) व पुन्हा नभाच्या लाल कडा (१९५५ मृत्यूनंतर प्रकाशित) हे दोन कवितासंग्रह; साकी (१९४०), फकिराची कांबळी (१९४८), छागल (१९५१), आकाश (१९५५ मृत्यूनंतर प्रकाशित) व काळी राधा (१९५६ – मृत्यूनंतर प्रकाशित) हे पाच कथासंग्रह; ओऽऽ…. (१९३६), हिरवे गुलाब (१९४३), बाबू दडके (१९४४), उत्पात (१९४५), म्हणे लढाई संपली (१९४६), जगाला कळलं पाहिजे (१९४९) व आडगावचे चौधरी (१९५४ मृत्यूनंतर प्रकाशित) या सात कादंबऱ्या आणि अलकेचा प्रवासी (१९४५) हा लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाला आहे.
सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीत गुदमरलेले जीवन जगताना बी. रघुनाथांचे संवेदनशील मन अस्वस्थ होते. त्यांच्या अस्वस्थ मनाची ही अभिव्यक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. मराठी साहित्याला समृद्ध करणारी आहे. बी. रघुनाथ हे एकमेव असे कवी व लेखक आहेत की ज्यांच्या साहित्यातून निजामी राजवटीतील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय स्थितिगतीत जगणाऱ्या व्यक्तीच्या व्यवहारांचा कलात्मकपणे शोध घेतला गेला आहे. त्या व्यवहारांच्या पाठीमागील कारणांची मीमांसा आली आहे. निजामी राजवटीतील सामाजिक वास्तव, त्या वास्तवात जगणारी भलीबुरी माणसे आणि त्या माणसांच्या जीवनप्रेरणा हा बी. रघुनाथांचा आस्थाविषय होय. हे सगळे घटक त्यांनी साहित्यरूपात मुखर केले. या घटकांना त्यांनी दिलेले वाङ्मयीन रूप कलात्मक पातळीवर अव्वल दर्जाचे ठरते.
व्यक्तीच्या कृतींना आणि उक्तींना आकार देण्यात त्या-त्या व्यक्तीचा सभोवताल व त्या सभोवतालाच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेल्या त्या-त्या व्यक्तीच्या मानसिक प्रेरणा या बाबी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, ही वस्तुस्थिती बी. रघुनाथांच्या साहित्यात ठळक होत जाते. त्यांच्या साहित्यातील व्यक्ती (पात्रे) त्यांच्या सभोवतालच्या सर्वांगीण व्यवस्थेचा एक अतूट भाग या स्वरूपात येतात. अर्थात, बी. रघुनाथांच्या साहित्यातील पात्रे सामाजिक वास्तवाच्या चित्रणाचे घटक बनतात, पात्रचित्रणाच्या माध्यमातून बी. रघुनाथ मराठवाड्यातील तत्कालीन सरंजामशाही व्यवस्थेची स्थितिगती नोंदवतात.
संदर्भ : १. समग्र बी.रघुनाथ (तीन खंड ), गणेश वाचनालय व बी. रघुनाथ सभागृह विश्वस्त समिती, परभणी, १९९५.