कॅलात्राव्हा, सांत्यागो : (२८ जुलै १९५१). स्पॅनिश वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंते, शिल्पकार आणि चित्रकार. त्यांनी बांधलेल्या पूला आणि इमारतींबाबत ते जगप्रसिद्ध आहेत.

कॅलात्राव्हा यांचा जन्म स्पेनमधील व्हॅलेंशियातील बेनिमानेत (Benimanet) या गावी झाला. जन्मापासूनच त्यांना कलेची आवड आणि जाण विलक्षण होती. १९५७ पासून व्हॅलेशियाच्या शाळेत त्यांचे प्राथमिक आणि उच्‍च प्राथमिक शिक्षण झाले. ते वयाच्या ८व्या वर्षापासून कलेचे वर्ग घेऊन मुलांना शिकवत असत. त्यांनी व्हॅलेंशियातील स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट येथे वयाच्या १३व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले. नंतर त्यांनी पॅरिसमधील कलेच्या एका शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला (१९६८). परंतु तेथील विद्यार्थ्यांच्या चळवळीमुळे व्हॅलेंशिआला परत आले आणि तेथील आर्ट स्कूलमध्ये अभ्यास सुरू ठेवला. या सर्व काळात खिशात पेन्स‍िल आणि सतत नवनवीन चित्रे टिपत रहाणे, अशा व्यापात एके दिवशी त्यांना एका दुकानात जगप्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद ल कार्ब्यूझ्ये (Le Corbusier) यांच्यावर लिहिलेले एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकाने कॅलात्राव्हा भारावून गेले आणि त्यांनी वास्तुविशारद पदवीकरिता व्हॅलेंशियातील विद्यापीठात प्रवेश घेतला व पदवी संपादन केली (१९७४). वास्तुकलेतील महान संरचनांविषयी त्यांना आकर्षण वाटत असे. वास्तूंच्या सौदर्यांच्या ज्ञानासोबतच  वास्तूंच्या अभियांत्रिकीविषयी फारच कमी माहिती आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. त्यानंतर त्यांनी झुरिकमधील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीमध्ये प्रवेश घेतला (१९७५) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली (१९७८). त्यांनंतर त्यांनी झुरिकमध्ये स्वतःची कंपनी काढली (१९८१).

कॅलात्राव्हांचे कार्यक्षेत्रात पूल, बहुमजली इमारती, रेल्वे स्थानके, विद्यापीठे, क्रीडासंकुले, वास्तुसंग्रहालये अशा अनेक बहुआयामी संरचनांचा समावेश होतो. या सर्वच संरचनांमध्ये त्यांनी नवनवीन वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांचा वापर केला आहे. त्यांचे पूर्ण झालेले जगातील वेगवेगळया देशातील प्रकल्प आणि सध्या चालू असलेले अनेक प्रकल्प यांची यादी फार मोठी आहे. येथे काहीं वास्तू संरचनेचा उल्लेख केला आहे. स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्या १० वर्षांच्या कालावधीतच त्यांनी ५०च्या वर पुलांचे अभिकल्प केले. त्यातले बरेचसे यूरोपमधील आहेत.

स्पेनमधील सेव्हील्या येथे बांधलेला ॲलामिलो पूल (Alamillo Bridge) हा केबलस्थित पूल आहे. २०० मी. कमाल अवधी असलेला हा पूल ५८ अंशाने कललेल्या एकाच खांबावर बांधला असून त्याच्यावरून ताणलेल्या तारा आणि पुलांची लादी (Slab) यांच्यात एक जणू विलक्षण संवाद निर्माण करून त्यामुळे हा पडणारा पूल तोल सांभाळून उभा आहे असे चित्र दिसते.

ॲलामिलो पूल, सेव्हील्या, स्पेन.

फ्रान्समधील लॉयरे (Loire) नदीवरील ऑर्तिअन्स जवळचा पूलदेखील थोडी कललेली कमान उसळी घेऊन पाण्याबाहेर उडी मारल्याच्या पवित्र्यात आहे असे दिसते. इमारतींच्या संबंधात मिल्वावके आर्ट म्यूझीयमचे (Milwauke Art Museum) विस्तारीकरण कॅलात्राव्हांच्या अगदी प्रारंभीच्या काळातील एक प्रकल्प. इमारतीतील प्रकाश योजना बदलण्यासाठी एखाद्या पक्षाच्या पंखाच्या उघडझापाची कल्पना करून दोन प्रचंड आच्छादने (Sun Shades) करण्याची योजना त्यांनी राबविली. या अभिकल्पामध्ये आणि प्रत्यक्ष कामात अनेक जटिल समस्या उद्भवल्या परंतु त्यावर यशस्वी रीत्या मात करून त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला.

मिल्वावके आर्ट म्यूझीयम

राखेतून बाहेर उडणाऱ्या फीनिक्स पक्षाची कल्पना करून ११ सप्टेंबर, २००१ मध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात नष्ट झालेल्या न्यूयार्कमधील दोन मनोऱ्याजवळील (Twin Towers) रेल्वे संकुलाची (PATH) उभारणी करण्याचा एक मोठा प्रकल्प कॅलात्राव्हांनी हाताळला. मॅलानो (स्कँडिनेव्हिया) येथील टर्निंग टोर्सो टॉवर (Turning Torso Tower) या ५४ मजली इमारतीचे अभिकल्प त्यांनी केले. अनियमित आकाराच्या ५ मजली पंचकोनांचा वापर करून २००५ मध्ये एक जणू नवीन शिल्पकलाच त्यांनी निर्माण केली.

टर्निंग टोर्सो टॉवर,  मॅलानो, स्कँडिनेव्हिया.

ग्रीसच्या अथेन्समधील स्पायरस लुई (Spirus Louis) या १९८२मध्ये बांधलेल्या खेळसंकुलाचे नवीन छत घालून संपूर्ण नूतनीकरणाचे काम कॅलात्राव्हांनी केले. प्रत्येक मजला खालच्या मजल्यापेक्षा २ अंशानी वळलेला शिकागोमधील अशा ११५ मजली इमारतीचे अभिकल्प त्यांनी केले. तसेच न्यूयॉर्कमध्ये ८० साउथ स्ट्रीट टॉवर, कॅनेरी आयलंडमध्ये टेनेरिफ येथे ऑपेरा हाऊस आणि व्हेलेंशियात सिटी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस असे प्रचंड प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत.

खेळसंकुल, स्पायरस लुई, अथेन्स
ऑलिम्पिक स्टेडियम, स्पायरस लुई, अथेन्स.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कॅलात्राव्हांना मिळालेल्या भव्य प्रकल्पांमध्ये बेल्जिअममधील माँस् (Mons) मधील रेल्वे स्थानक (Multi-modal Railway Station) हा प्रकल्प आहे. तर २०२०च्या संयुक्त अरब अमीरातीतील (UAE) एक्स्पो (EXPO) साठी एका प्रचंड पॅव्हिलियनचे काम सध्या कार्यान्वित आहे. आपल्यावर स्विस अभियंता रॉबर्ट मायार (Robert Maillart; 1872 – 1946) यांच्या कामाचा प्रभाव पडला असल्याचे कॅलात्राव्हा म्हणत असतात, पण वस्तुतः त्यांची स्वयंप्रज्ञा एवढी प्रखर आहे की, ते कोणत्याच एका विचारात किंवा शैलीत बंदिस्त राहिले नाहीत. जे सतत गतीमान आहे, जे सतत बदलत असते, ते सौंदर्याचे लक्षण अशी त्यांची धारणा आहे. सजीव स्थिर असावेत हे त्याना पसंत नव्हतेच, पण त्याचबरोबर निसर्गातील कायद्याचे उल्लंघन करून निर्जीव वस्तूमध्येसुद्धा त्यांनी चैतन्य निर्माण केले आहे. लिओनार्दो दा व्हींचींचे (Leonardo da Vinci) पक्ष्यांचे मिटून घेतलेल्या पंखांचे चित्र असो किंवा प्रख्यात फ्रेंच वास्तुकार ल कार्ब्यूझ्ये यांनी साकारलेले विविध प्रकल्प असोत किंवा नासाच्या (NASA) अंतराळातील प्रवासासाठीचे आरेखन असो, या सर्वांचाच कॅलात्राव्हांवर प्रभाव पडल्याचे दिसते. त्यामुळे त्यांचे अभियांत्रिकी प्रकल्प असोत, त्यांच्या शिल्पकलाकृती असोत, किंवा त्यांच्या अन्य कलाकृती (Art Works) असोत, त्यांचे आकार व त्यातील जिवंतपणा हे प्रामुख्याने दृष्टीत भरतात.

कॅलात्राव्हांना त्यांच्या योगदानाबद्दल अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यांत अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसचे आणि इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रक्चर्सचे सुवर्णपदक, यूरोपीयन प्राईझ फॉर आर्किटेक्चर, ऑगस्ते पेरे पारितोषिक (Auguste Perret Prize), यूजीन मॅक्डोमर्ट पारितोषिक अशांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त त्यांना १९९३–२०१६ या कालावधीत जगातील निरनिराळया २३ विद्यापीठांनी मानद पदवी तर दोन विद्यापिठांनी मानद डॉक्टरेट दिली आहे.

कॅलात्राव्हांना त्यांच्या वैशिष्टयपूर्ण विविध प्रकल्पांमुळे अनेक मानसन्मान मिळाले असले तरी त्यांचा व्यावसायिक प्रवास हा निव्वळ साधासरळ नाही. विशेषतः २०१३सालापासून त्यांच्या अनेक प्रकल्पांविषयी कठोर टीका व्यावसायिकांमध्येच नव्हे तर प्रसिद्धीमाध्यमातूनही होऊ लागली आहे. कॅलात्राव्हांच्याच व्हेलेंशिया गावातील सिटी ऑफ आर्ट्स आणि सायन्सेस या  प्रकल्पाची किंमत तिप्पट झाली आणि इतरही काही प्रकल्पांच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. काही प्रकल्प संकल्पित कार्यमर्यादेपेक्षा फारच दिरंगाईने पूर्ण झाल्याची उदाहरणे आहेत. काही ठिकाणी तांत्रिक बाबतीत चुकांमुळे किंवा लक्ष कमी पडल्याने बरेच दोष दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्याने दुरुस्तीसाठी फार खर्च झाला. अशा अनेक कारणांनी कॅलात्राव्हा निरनिराळय़ा अडचणीत येऊन त्रास सोसावा लागत आहे.

कळीचे शब्द : #ॲलामिलो #सेव्हिल # स्पेन #मिल्वावके #आर्ट #टर्निंगटोर्सोटॉवर #स्पायरसलुई #अथेन्स

संदर्भ :

समीक्षक : प्र. शं. अंबिके