कॉकरन, विल्यम जेमेल : (१५ जुलै १९०९ – २९ मार्च १९८०). स्कॉटलंडमध्ये जन्मलेले अमेरिकन संख्याशास्त्रज्ञ.

कॉकरन यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात स्कॉटलंड मधील रथरग्लेन येथे झाला. शालेय वयात त्यांनी भरपूर शैक्षणिक बक्षिसे मिळविली. याचा फायदा त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी झाला. ग्लसगो विद्यापीठातील बर्सी स्पर्धेतील पहिल्या स्थानामुळे त्यांना त्याच विद्यापीठात पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तसेच कला विद्यार्थ्यांतील उत्कृष्ट शिक्षकांसाठी असलेल्या लोगन पदकामुळे आणि शिष्यवृत्तीमुळे त्यांना केंब्रिज विद्यापीठात जॉन विशर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली गणित, उपयोजित गणित, संख्याशास्त्र अध्ययन करण्याची संधी मिळाली.

कॉकरन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पीएच.डी पदवी संपादन न करता रोदमस्टेड रिसर्च येथून केली. त्यांनी तेथे असतांना १८ शोधनिबंध प्रकाशित केले आणि अमेरिकेत जाण्याअगोदर इंग्लंडमध्येच आर. ए. फिशर यांच्या व्याख्यानाने ते प्रभावीत झाले. अमेरिकेमध्ये त्यांनी हवामानाच्या समस्यांवर प्रयोग, बीजांड व शुक्राणूचा वेगवेगळ्या पद्धतीने होणारे मीलन आणि पुनरुत्पत्ती होण्याचा अभाव या सर्व गोष्टींचे नमुना सर्वेक्षण केले. नमुना सर्वेक्षण आणि प्रयोगांमध्ये यादृच्छिकतेचे महत्त्व समजून घेण्यासाठी कॉकरनच्या कार्याचे व्यावहारिक मूल्य दर्शविण्यात येते. १९३६मध्ये कॉकरन यांनी एम्पायर जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल ॲग्रीकल्चर या नामांकित जर्नलमध्ये आपला शोधनिबंध प्रसिद्ध केला.

कॉकरन यांनी १९३९मध्ये लोवा स्टेट विद्यापीठात संख्याशास्त्र शिकविण्यास सुरुवात केली. तेथे त्यांना रेमंड जेसेन यांच्याबरोबर गणित विभागाच्या पदवी परीक्षेच्या संख्याशास्त्राचा आराखडा व विकास करण्याची जबाबदारी देण्यात आली. याचकाळात त्यांनी अमेरिकेच्या जनगणना समितीचे अध्यक्षपद भूषविले. १९४३-४४या दरम्यान प्रिन्स्टन येथे त्यांना सांख्यिकी संशोधनचमू आणि सॅम्युयल विल्क्स यांसह काम करण्याची संधी प्राप्त  झाली. १९४५मध्ये त्यांनी युद्धकाळातील बॉम्बफेक हल्ला धोरण विकसित केले.

दुसऱ्या महायुद्धानंतर कॉकरन नॉर्थ कॅरोलिना इन्स्ट‍िट्यूट ऑफ स्टॅटिस्ट‍िक संस्थेत पदवी अभ्यासक्रम साहाय्य करण्याकरिता रुजू झाले. त्यानंतर तीन वर्षानंतर ते जॉन हॉपकिन विद्यापीठाच्या जीवसंख्याशास्त्र विभागात विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. याचकाळात त्यांनी संख्याशास्त्राचा उपयोग शेतीसाठी तसेच आरोग्यासाठीही करण्याचा निर्णय घेतला. येथेच त्यांनी नमुना सर्वेक्षण व प्रयोग आखणी (Sampling Techniges and Expertimental design) या  पुस्तकाचे लेखन केले. १९५७–७६दरम्यान हार्वर्ड येथे संख्याशास्त्र विभागाची उभारणी करण्यासाठी त्यांना पाचारण केले. हार्वर्ड येथे गुणश्री प्राध्यापक पदावर ते कार्यरत होते.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कॉकरन यांनी विद्यापीठाव्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रात काम केले. यात मानवाच्या लैंगिक वागणुकीचा किन्सी रिपोर्ट, हिरोशिमा बॉम्बफेकीत बळी पडलेल्या माणसांवर होणारा किरणोत्साराचा परिणाम, पोलिओ लसीकरण, अल्सरवरील शस्त्रक्रिया, शैक्षणिक संधीच्या समानता यांचा समावेश होतो. अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत कॉकरन यांना धूम्रपानाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी खास आमंत्रित केले होते. हाच अहवाल धूम्रपान फुप्फुसाचा कर्करोग होण्यास कारणीभूत आहे आणि या कर्करोगाचा तंबाखू सेवनाशी असलेला संबंध त्यांनी जाहीरपणे प्रकट केला. त्यांनी पिण्याच्या पाण्याचे सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषण करण्याची संख्याशास्त्रीय पद्धती शोधून काढली. या पद्धतीला एमपीएन अर्थात मोस्ट प्रोबेबल नंबर असे म्हणतात. हा अंक म्हणजे रोगकारक सूक्ष्मजंतूंच्या जास्तीतजास्त शक्यतेचा अंक होय. पाण्यातील रोगकारक जंतूंची संख्या प्रत्यक्ष मोजणे अशक्य असल्यामुळे कॉकरन यांनी या पद्धतीचा शोध लावला. रोगजंतूंचा प्रतिनिधी म्हणून नेहमीच जास्त संख्येने पाण्यात अस्तित्वात असलेल्या इश्चेरिया कोलाय हा दर्शक जीवाणू मानून त्याच्या अस्तित्वाच्या शक्यतेला यात प्रमाणभूत मानले जाते. हा जीवाणू आतड्यात वास्तव्य करतो आणि विष्टेवाटे पिण्याच्या पाण्यात येतो. या जंतू परिवाराला कोलायाफॉर असे म्हणतात. कॉकरन यांच्या या संख्याशास्त्रीय पद्धतीचा आजही सूक्ष्मजीवशास्त्रात अवलंब केला जातो.

कॉकरन यांनी सांख्यिकीशास्त्रात अशा अनेक विविध पद्धतीचा शोध लावला. कॉकरन क्यू टेस्ट दोन विविध घटकांचा (व्हेरीएबल्सचा) परिणाम मोजण्यासाठी वापरली जाते. तृणधान्यांच्या उत्पन्नावर पावसाचा प्रभाव आणि रोगग्रस्त वनस्पतींच्या शेतातील मोजणी यांसारख्या त्यांच्या कृषी अभ्यासासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. गणित-संख्याशास्त्र संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले तसेच, या कालावधीत आंतरराष्ट्रीय बायोमेट्रीक सोसायटीचे ते अध्यक्ष होते. अमेरिकन सांख्यिकी ॲसोसिएशनकडून त्यांना१९६७मध्ये गुगेनहेम फेलोशिप तसेच विल्कस पदक  देण्यात आले. लष्करातील अनेक प्रयोग आखणी व विश्लेषण यांच्या योगदानाबद्दल कॉकरन यांना ग्लासगो व जॉन हॉपकिन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली.

कॉकरन यांनी अनेक लेख तसेच पुस्तकांचे लेखन केले. यातील काही पुस्तके पुढीलप्रमाणे : प्रयोगांची आखणी (सहलेखक गेस्टूड कॉक्स; Experimental Designs), शेती व जीवशास्त्रीय प्रयोगामध्ये सांख्यिकीचा उपयोग (Statistical Methods Applied to Experiments in Agriculture and Biology), निरीक्षणातून केलेल्या अभ्यासाची योजना व विश्लेषण (Planning and Analysis of Observational Studies). कॉकरन यांचे प्रश्नचाचणी तसेच कॉकरन प्रमेय व कॉकरन मॅटल हॅनझेल सांख्यिकी प्रसिद्ध आहे.

कळीचे शब्द : #बॉम्बफेकहल्लाधोरण #पोलिओलसीकरण #धूम्रपान #कर्करोग

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे