गाल्टन, फ्रान्सिस : (१६ फेब्रुवारी, १८२२ – १७ जानेवारी, १९११) फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म मध्य इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम शहराजवळच्या, स्पारब्रूक गावी झाला. आधी घरी, नंतर शिक्षिकेच्या घरात चालणाऱ्या बालवाडीत आणि पुढे बर्मिंगहॅमच्या किंग एडवर्ड शाळेत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. गॅल्टन यांनी स्वतः नमूद केले आहे की त्यांना शाळा, धर्ममंदिरे यात मिळालेले पारंपरिक शालेय वा धार्मिक शिक्षण फारसे उपयुक्त वाटत नव्हते.

गाल्टन यांचा चुलतभाऊ, चार्ल्स डार्विन जगप्रसिद्ध उत्क्रांती शास्त्रज्ञ होता. लहान वयात गाल्टन आणि चार्ल्स यांची फारशी घट्ट मैत्री नव्हती. परंतु मोठे झाल्यावर काही काळाने एकमेकांची पुस्तके आणि अन्य लिखाण वाचून ते दोघे सतत भेटत वा पत्रसंपर्कात राहिले.

गाल्टन यांनी बर्मिंगहॅमच्या जनरल हॉस्पिटलला संलग्न विश्वविद्यालयात एक वर्ष आणि किंग्स कॉलेज, लंडनमध्ये आणखी एक वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतले. दुर्दैवाने त्यांच्या वडलांचे निधन झाल्याने त्याना वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मग ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे गणित विषय घेऊन गाल्टन यांनी पदवी संपादन केली.  

वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीमुळे गाल्टन यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करता आपली प्रवासाची हौस भागवावी असे ठरविले. प्रवासातून, स्वानुभवातून मिळणारे ज्ञान, पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त सकस आहे असे त्याना प्रकर्षाने वाटले. रॉयल जिओग्राफिक सोसायटीच्या नियामक मंडळाशी गाल्टन यांनी विचार विनिमय केला. आफ्रिका खंडात वायव्येला बोट्सवाना जवळ कलाहारी वाळवंटासमीप एक मोठा तलाव आहे. या एन्गामी तलावाच्या अभ्यासासाठी, त्यांनी एक मोहीम काढली. सुमारे दोन वर्ष ही मोहीम चालली. पूर्ण नव्या भूभागात नकाशे उपलब्ध नसल्याने अडचणी येऊन ती पूर्णत: यशस्वी झाली नाही. एन्गामी तलावापर्यंत पोहोचण्यात यश आले नाही तरी गाल्टन यांना अनेक प्रकारची नवी माहिती मिळवता आली. या धाडसी आणि जीवावरचे धोके पत्करून ज्ञान मिळवणाऱ्या अभ्यास मोहिमेचा परिपाक म्हणून त्यांना वयाच्या केवळ एकतिसाव्या वर्षी रॉयल जिओग्राफिक सोसायटीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर आणखी तीनच वर्षांत त्यांना रॉयल सोसायटीचे सदस्यत्त्व मिळाले.

गाल्टन यांना नानाविध विषयांत रस होता. यापैकी एक  म्हणजे – हाताच्या बोटांच्या ठशांचे शास्त्र, अनुवंशशास्त्र, सु-प्रजननशास्त्र, संख्याशास्त्र, मानववंशशास्त्र, मानवी बुद्धिमत्तामापन, भूगोल आणि हवामानशास्त्र. हाताच्या बोटांच्या ठशांच्या शास्त्राला, अंगुलीमुद्राशास्त्र असेही म्हणतात. या शास्त्राचा उपयोग गुन्हे तपासासाठी, व्यक्तीगत आणि संस्था सुरक्षेसाठी, तसेच पुराव्यांच्या छाननीसाठी होतो. सुप्रजननशास्त्र ही ज्ञानशाखा आणि सुप्रजननशास्त्र ही वैज्ञानिक संज्ञादेखील त्यांनीच निर्मिली आणि वापरायला सुरुवात केली. अतिशय बुद्धिमान, उच्चशिक्षित, श्रीमंत, निवडक स्त्री-पुरुषांच्या विवाहांना सामाजिक, शासकीय उत्तेजन मिळावे. असे गाल्टन यांना वाटे. अशा गुणी युवक, युवतींपासून झालेली   संतती साहजिकच उत्तरोत्तर अधिक चांगला समाज निर्माण करील ही त्यांची धारणा होती.

गणितात गती आणि हातांनी काम करण्याचे कौशल्य असल्यामुळे भूगोल आणि हवामानशास्त्रात उपयोगी ठरतील अशा काही उपकरणांचा, पद्धतींचा शोध त्यांनी लावला. पर्वतमय भूभागांचे त्रिमित नकाशे काढणे. गावोगावच्या हवामानासंबंधी नकाशे आणि तक्ते तयार करणे आणि ते जपून ठेवणे याची आवश्यकता त्यांनी लोकांच्या मनावर ठसवली.

मानवी बुद्धिमत्तामापन हे नवे क्षेत्र त्यांनीच अभ्यासायला सुरुवात केली. इन्क़्वायरी इन्टू ह्युमन फॅकल्टी हे गाल्टन यांचे पुस्तक मानवी बुद्धिमत्तेचे आकलन वाढवण्यास उपयुक्त आहे. इन्क़्वायरी इन्टू ह्युमन फॅकल्टी या पुस्तकात गाल्टन यांनी शोधून काढलेल्या डॉग व्हिसलचे वर्णन आहे. माणसांपेक्षा कुत्र्यांचे कान तीक्ष्ण असतात. काही उच्च कंप्रतेचे ध्वनी आपल्याला ऐकू येत नाहीत पण कुत्र्यांना येतात. त्यामुळे डॉग व्हिसलने माणसाना कर्णकटू आवाज न ऐकवता, कुत्र्यांना शिकवण्यास ही शिट्टी उपयोगी पडते. कुत्र्यांपेक्षा मांजरांचे कान आणखी जास्त तीक्ष्ण असतात. त्यामुळे मांजरांसाठीही डॉग व्हिसल वापरता येते.

गाल्टन यांना डीएनए, जनुके, गुणसूत्रे यांची कोणतीही वर्णनात्मक, प्रायोगिक माहिती त्या काळी नव्हती. हे सुप्रजननशास्त्र आणि मानवी बुद्धिमत्तेबद्दलचे गाल्टन यांचे विचार वाचून त्यांचे मूल्यमापन करताना लक्षात घ्यावे लागते. गाल्टन यांच्या पूर्वी सर विल्हेल्म हर्षल यांनी गुन्हेगारांच्या हाताचे ठसे त्यांची ओळख पटवण्यासाठी करता येईल असा विचार मांडला होता. परंतु शास्त्रीय निकषांवर हे साध्य करण्यासाठीचे पायाभूत काम गाल्टन यांनी केले. त्यांच्या मानववंशशास्त्राच्या ज्ञानाचा या कामात फायदा झाला. मानववंशशास्त्रीय प्रयोगशाळांत त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हाताचे ठसे संकलित केले. त्यांचे बारीक निरीक्षण करून तुलना कशी, कोणत्या प्रकारे करावी हे त्यांनी ठरवले. कोणत्याही एका व्यक्तीचे हाताच्या प्रत्येक बोटाचे ठसे ते आयुष्यभर कसे बदलत नाहीत हे त्यांनी सांगितले. अन्य कोणत्याही एका व्यक्तीच्या हाताचे ठसे कोणत्या बाबतीत इतरांपेक्षा भिन्न असतील याचा  त्यांनी अभ्यास केला. नऊ हजार नमुना संच त्यांनी त्याकाळी पद्धतशीरपणे संग्रहित करून ठेवले होते. हाताच्या ठशांखेरीजचे निकषही ते तपासत. उदा., दृष्टीची तीव्रता, रंग ओळखण्याची कुवत, ऐकण्याची कुवत, हाताच्या पंजाची दाबण्याची क्षमता, बाहूची धनुष्याची दोरी ताणण्याची ताकद असे अनेक मानवमिती (बायोमेट्रिक) निकष. त्यांच्या मापनांची ते नोंद ठेवत. विल्यम हर्षल, फ्रान्सिस गाल्टन, इ. आर. हेन्री आणि हेन्री फॉल्ड्स यांच्या ज्ञानामुळे आणि संयुक्त प्रयत्नांमुळे या संग्रहाचे वर्गीकरण झाले. त्यामुळे काही काळाने त्याची व्यावहारिक उपयुक्तता पटून पोलीसदलाने गुन्हेगारांची वैज्ञानिक पद्धतीने ओळख पटवण्यास ठसे वापरणे सुरू केले.

गाल्टन यांच्या फिंगर प्रिंट्स या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्यांच्या स्वतःच्याच हाताचे ठसे आहेत. ठसे पुसट असल्यास काय करावे याबद्दलही गाल्टन यांनी त्यानंतर वर्षभराने छापलेल्या डिसायफरमेंट ऑफ ब्लर्ड फिंगर प्रिंट्स या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. पुढे त्यांनी हाताच्या ठशांची सूचीबद्ध यादीही एका पुस्तकात दिली. मानवी हाताच्या ठशांसंबंधी गाल्टन यांनी विपुल लिखाण उच्चशिक्षित व्यावसायिक आणि विद्वानांसाठी वैचारिक शोधनिबंध रूपात केले.

गाल्टन यांनी वेगवेगळ्या विषयांवर शेकडो लेख, हस्तपुस्तिका आणि तेवीस पुस्तके लिहिली. त्यापैकी एक पुस्तक सहसंबंधात्मक कलन (Correlational calculus) या सर्वसामान्यांसाठी गहन विषयावरील आहे.

गाल्टन यांच्या सर्व लिखाणात मोजदाद करणे, मोजमापनातून अभ्यासात, वर्णनात अचूकता आणणे यावर भर आहे. शक्य असेल तेवढी आकडेवारी द्यावी आणि नोंदी ठेवाव्यात. त्याने विचारांत स्पष्टता आणि अचूकता येते, हे ते ठासून सांगत. त्यांच्या या विचाराचे महत्त्व लक्षात घेऊन रॉयल सोसायटीने गाल्टन यांना प्राणी आणि वनस्पती मोजणी समितीचे सदस्यत्व दिले. संख्याशास्त्राचा समाजशास्त्रात वापर करणारे ते पहिले तज्ज्ञ म्हणता येतील.

गाल्टन यांचे लिखाण प्रकाशित करणारी काही प्रतिष्ठित नियतकालिके निवडक वाचक – विषयतज्ज्ञ यांच्यासाठी होती. उदा., नेचर; प्रोसिडीन्ग्ज ऑफ द रॉयल इंस्टिट्युशन; प्रोसिडिन्ग्ज ऑफ द रॉयल इंस्टिट्यूट; जर्नल ऑफ द अंथ्रॉपॉलॉजिकल न्स्टिट्यूट; नाईनटिन्थ सेन्चुरी  (भारत आणि इजिप्तमधील फिंगर प्रिंट्सचा गुन्हे तपासासंबंधी उपयोगी); सायंटिफिक अमेरिकन; द टाईम्स; फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्स ऑफ द रॉयल इंस्टिट्यूटट्रॅन्झॅक्शन्स ऑफ द सेवन्थ इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ हायजीन अँड डेमोग्राफी; रिपोर्ट ऑफ द ब्रिटीश असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स. तसेच जनसामान्यांसाठी गाल्टन यांनी सोप्या भाषेत भरपूर लिखाण केले. लेख, पत्रे, आणि मुलाखतींत त्यांनी मांडलेले विचार सर्वसामान्य वाचकांना वर्तमानपत्रात उपलब्ध झाले. प्रवासात येणाऱ्या लहान मोठ्या अडचणींवर मात कशी करावी याच्या युक्त्या सांगणारे त्यांचे पुस्तक, द आर्ट ऑफ ट्रॅव्हल फार वाचकप्रिय झाले.

बायोमेट्रिका या स्वतःच सुरू केलेल्या नियतकालिकाचे ते सल्लागार संपादक होते.  सुप्रजनन शास्त्राची जैवमापनावर आधारित प्रयोगशाळा गाल्टन यांनी कार्यान्वित केली. त्यांच्या निधनानंतर लंडन विद्यापीठात सुप्रजनन शास्त्राभ्यासावर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी एक खास प्राध्यापकपद निर्माण केले गेले.

गाल्टन यांच्याबद्दल इतरांनी केलेल्या लिखाणात दोन महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश करावा लागेल. रँग्लर कार्ल पीअर्सन, या प्रख्यात गणिती आणि जैवमापनशास्त्राच्या संस्थापकांनी द लाईफ, लेटर्स अँड लेबर्स ऑफ फ्रान्सिस गाल्टन हा ग्रंथ लिहिला. विषयाची व्याप्ती आणि छपाईचा उत्कृष्ट नमूना ठेवण्याचा पीअर्सन यांचा आग्रह यामुळे ग्रंथ लिखाण प्रकाशन यांस कित्येक दशके लागली. गाल्टन यांच्याबद्दलच्या या तपशीलवार ग्रंथाचे चार खंड आहेत. डेरेक डब्ल्यू फॉरेस्ट लिखित संक्षिप्त आवृती, फ्रान्सिस गाल्टन द लाईफ अँड वर्क ऑफ अ व्हिक्टोरिअन जीनिय हा देखील गाल्टन यांच्या कामाचा परिचय करून देणारा आहे. या छोटेखानी पुस्तकात भरपूर संख्याशास्त्रीय आशय आणि वैद्यकशास्त्राचा इतिहास यांचे वर्णन केले आहे.

त्यांना इंग्लंडच्या सरकारतर्फे सर हा किताब देऊन गौरवण्यात आले.

मध्य इंग्लंडमधील हॅसलमिअर गावी त्यांचा मृत्यू  झाला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा