उत्तर गोलार्धातील कल्पित प्राचीन भूखंडीय भूभाग. त्यामध्ये उत्तर अमेरिका, यूरोप, ग्रीनलंड आणि भारतीय द्वीपकल्प वगळून आशिया खंडाचा समावेश होतो. जर्मन भूवैज्ञानिक रूडॉल्फ स्टॉब यांनी लॉरेंशियन पर्वत (कॅनडाच्या ढालक्षेत्राचा भाग) व यूरेशिया या दोन नावांवरून या खंडाला लॉरेशिया हे नाव दिले (इ. स. १९२६). जर्मन वातावरण वैज्ञानिक अॅल्फ्रेड व्हेगेनर (वॅगनर) यांनी इ. स. १९१२ मध्ये मांडलेल्या खंडविप्लव (खंडवहन) सिद्धांतानुसार एकेकाळी खंडांचे विभंजन व त्यांचे वहन होण्यापूर्वी पॅन्जिया हे एकच महाखंड अस्तित्वात असल्याचे गृहीत धरले होते. ट्रायासिक आणि जुरासिक कालखंडात पॅन्जियाचे विखंडन होऊन उत्तरेकडील लॉरेशिया आणि दक्षिणेकडील गोंडवनभूमी (गोंडवाना) ही दोन महाखंडे अस्तित्वात आली. दक्षिण आफ्रिकन भूवैज्ञानिक अॅलेक्झांडर दु टॉइट यांनी आपल्या अवर वाँडरिंग काँटिनंट्स (आपली परिभ्रामी खंडे) या पुस्तकात लॉरेशिया या भूखंडीय भूभागाचे अस्तित्व ग्राह्य धरले होते. हे पुस्तक म्हणजे वॅगनर यांनी मांडलेल्या खंडवहन सिद्धांताची केलेली पुनर्मांडणी होय. अॅलेक्झांडर यांनी मात्र उत्तरेकडील लॉरेशिया व दक्षिणेकडील गोंडवनभूमी अशी दोन महाखंडे अस्तित्वात होती आणि टेथिस या महासागरी प्रदेशामुळे ती एकमेकांपासून अलग झाली होती, अशी तात्विक कल्पना मांडली होती. क्रिटेशसच्या (१४५ द. ल. ते ६६ द. ल. वर्षांपूर्वीचा काळ) अखेरीपासून ते पॅलिओसीनचा (६६ द. ल. ते २३ द. ल. वर्षांपूर्वीचा कालखंड) बहुतांश काळ या कालखंडात लॉरेशियाचे विखंडन होऊन त्यापासून आजची उत्तर अमेरिका, यूरोप व आशिया (भारतीय द्वीपकल्प वगळून) ही खंडे अस्तित्वात आली.
उत्तर अमेरिकेतील अॅपालॅचिअन पर्वत आणि स्कॉटलंड व नॉर्वेमधील कॅलेडॉनियन पर्वत यांमध्ये आढळणारी भूगर्भरचना सातत्याने एकाच कालखंडात निर्माण झालेली आढळते. यावरून सुरुवातीला या सर्व भूखंडांचे मिळून लॉरेशिया हे एकच खंड अस्तित्वात होते, या गृहीतकाला पुष्टी मिळते. प्राचीन खंडाचे दोन तुकडे एकमेकांकडे सरकल्यामुळे कॅलेडॉनियन-अॅपालॅचिअन पर्वतप्रणाली निर्माण झाल्याचे मानले जाते. पृथ्वी गोलावरील पृथ्वीचा नकाशा पाहिला, तर असे दिसून येते की, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा आणि यूरोपचा पश्चिम किनारा हे एकमेकांशी इतके जुळते आहेत की, उत्तर अमेरिका खंड पूर्वेस सरकवले, तर त्याचा पूर्व किनारा यूरोपच्या किनाऱ्याला सलग जोडला जाईल. किनाऱ्यांची अनुरूपता हेच दर्शविते की, पूर्वी ही दोन्ही खंडे एकमेकांना जोडलेली एकसंध होती.
एडुआर्ट झ्यूस व वॅगनर यांनी हल्ली अस्तित्वात असलेली भूखंडे पूर्वी एकत्रित असावीत आणि नंतर त्याची शकले होऊन ती एकमेकांपासून दूर गेल्याने हल्लीची भूखंडांची भौगोलिक रचना अस्तित्वात आली असावी, असा युक्तिवाद केला होता; परंतु भूभौतिकीच्या अभ्यासकांना हा युक्तिवाद मान्य नव्हता. त्यांनी खंडवहन सिद्धांताला कडाडून विरोध केला होता. अँटोनिओ स्नायडर-पेलेग्रिनी या फ्रेंच शास्त्रज्ञांच्या मते, जर उत्तर अमेरिका आणि यूरोप ही दोन खंडे एकत्र होती असे मानले, तर त्या दोन्ही खंडांवरील दगडी कोळशाच्या साठ्यांमध्ये समान जीवाश्म वनस्पती आढळतात का, त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, अन्यथा हा युक्तिवाद मान्य होऊ शकत नाही.
समीक्षक ꞉ शेख महम्मद बाबर