दक्षिण गोलार्धातील एक कल्पित प्राचीन भूखंडीय भूभाग. त्यामध्ये सध्याचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या भूखंडीय प्रदेशांचा समावेश होतो; जो एकूण खंडांच्या दोन तृतीयांश भूभाग आहे. ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक एडूआर्ट झ्यूस यांच्या युक्तिवादानुसार प्राचीन काळी दक्षिण गोलार्धाचे बहुतेक सर्व क्षेत्र व्यापणारी एक विस्तीर्ण जोडलेली (एकसंध) भूमी होती, ती म्हणजेच गोंडवनभूमी (गोंडवाना) होय ( इ. स. १८८५). मध्य भारतातील गोंड जमातींची वस्ती असलेल्या प्रदेशाला गोंडवन म्हणून ओळखले जाते. त्यावरून झ्यूस यांनी या कल्पित प्राचीन महाखंडाला गोंडवनभूमी हे नाव दिले असावे किंवा भारतातील गोंडवनी संघावरून गोंडवनभूमी हे नाव दिले असावे. कँब्रियनपूर्व कालखंडाच्या अखेरीस (सुमारे ६०० द. ल. वर्षांपूर्वी) दक्षिण गोलार्धातील या सर्व भूखंडीय प्रदेशांचे मिळून गोंडवनभूमी हे एकसंध महाखंड होते. पुराजीव महाकल्पाच्या (सुमारे ६०० ते २४५ द. ल. वर्षांपूर्वीच्या काळात) उत्तरार्धापासून ते मध्यजीव महाकल्पाच्या (२३० ते ९० द. ल. वर्षांपूर्वीच्या काळात) जवळजवळ अखेरीपर्यंतच्या कालखंडातील, प्रामुख्याने जमिनीवर गाळ साचून तयार झालेल्या खडकांच्या प्रचंड राशी (शैलसमूह) मध्य भारताच्या गोंडवाना प्रदेशातील जमिनीच्या वरच्या थरात आढळतात. तशाच प्रकारचे व त्याच काळातील शैलसमूह दक्षिण गोलार्धातील आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका या सर्वच खंडांमध्ये आढळतात. याच प्रदेशांत कार्बॉनिफेरस ते पर्मियन (सुमारे ३५० ते २४५ द. ल. वर्षांपूर्वीच्या) या कालखंडात तयार झालेल्या खडकांत दगडी कोळशाचे थर व सजातीय (ग्लॉसोप्टेरीस) वनस्पतींचे जीवाश्म (अवशेष) आढळतात. अंटार्क्टिकावरसुद्धा दक्षिण ध्रुवापासून ५०० किमी. पेक्षा दूर नसलेल्या त्याच्या खडकांत सजातीय जीवाश्म सापडलेले आहेत. म्हणजेच त्या काळात दक्षिण गोलार्धातील सर्व भूभागांवर व भारतीय द्वीपकल्पावर  सजातीय वनश्री पसरलेली होती. त्याच काळात तयार झालेल्या उत्तर गोलार्धातील खडकांमधील जीवाश्मांवरून तेथे अगदी वेगळ्या वनस्पती होत्या. तसेच काही अपवाद वगळता तेथे सजातीय वनस्पतींचे जीवाश्म आढळत नाहीत. दक्षिण गोलार्धातील खंडे आणि भारतीय द्वीपकल्प या सर्व भूप्रदेशातील खडकांत आढळलेले दगडी कोळशाचे एकसारखे थर आणि सजातीय वनस्पतींचे जीवाश्म यांवरून हे सर्व भूभाग पूर्वी जोडलेले असावेत. जुरासिक कालखंडाच्या सुरुवातीस (सुमारे १८० द. ल. वर्षांपूर्वी) गोंडवाना खंडाच्या पहिल्या टप्प्यातील विखंडनास सुरुवात झाली. मध्यजीव महाकल्पाच्या उत्तरार्धापासून ते नवजीव महाकल्पाच्या (सुमारे ६५ द. ल. वर्षांपूर्वीपासूनच्या) प्रारंभीच्या काळापर्यंतच्या कालावधीत गोंडवनभूमी भंग पावली. तिचे काही भाग खाली दक्षिण ध्रुवाकडे भरकटत गेले आणि त्यामुळे मधल्या भागात निर्माण झालेल्या पोकळीत दक्षिण गोलार्धातील अटलांटिक व हिंदी महासागर तयार झाले. गोंडवनभूमीचे उरलेले खंडीय भूभाग म्हणजेच आजची दक्षिण गोलार्धातील दक्षिण अमेरिका व आफ्रिका ही खंडे आणि भारतीय द्वीपकल्प होय.

आफ्रिका व दक्षिण अमेरिका (नवे जग) यांचे नकाशे पहिल्यांदा इ. स. १६२० मध्ये उपलब्ध झाले. त्यावरून भूवैज्ञानिक फ्रान्सिस बेकन यांनी पहिल्यांदाच असे दाखवून दिले की, आफ्रिकेचा पश्चिम किनारा आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा, तसेच उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा आणि यूरोपचा पश्चिम किनारा यांचे आकार एकमेकांशी मिळतेजुळते आहेत. जर्मन वातावरणवैज्ञानिक अ‍ॅल्फ्रेड व्हेगेनेर (वॅगनर) यांनी इ. स. १९१२ मध्ये आपल्या खंडवहन सिद्धांताच्या माध्यमातून सविस्तर अशी संकल्पना मांडली की, एकेकाळी आजची सर्व खंडे मिळून एकच महाखंड (सुपरकाँटिनंट) होते. या एकसंध खंडाला त्यांनी पॅन्जिया हे नाव दिले. पॅन्जिया या महाखंडाचा दक्षिणेकडील अर्धा भाग म्हणजे गोंडवनभूमी होय. वॅगनर यांच्या मते, कार्बॉनिफेरस कल्पात आजचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व भारतीय द्वीपकल्प हे भूभाग दक्षिण ध्रुवाभोवती गोळा झालेले होते व ते सर्व मिळून झालेले एकच विस्तीर्ण खंड म्हणजे गोंडवाना खंड होय. या गोंडवनभूमीला दक्षिण गोलार्धातील आजची सर्व खंडे एकमेकांना जोडलेली होती. कालांतराने त्या खंडाला भेगा पडून त्याचे काही लहान व काही मोठे तुकडे झाले व ते निरनिराळ्या दिशांना सरकत जाऊन एकमेकांपासून दूर झाले. अशा प्रवासानंतर त्यांना आजच्या खंडांची स्थाने प्राप्त झालेली आहेत. पृथ्वी गोलावरील पृथ्वीचा नकाशा पाहिला, तर असे दिसून येते की, दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा आणि आफ्रिकेचा पश्चिम किनारा हे एकमेकांशी इतके मिळतेजुळते आहेत की, दक्षिण अमेरिका खंड पूर्वेस सरकविले, तर त्याचा पूर्व किनारा आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याला सलग जोडला जाईल. किनाऱ्याची ही अनुरूपता हेच दर्शविते की, पूर्वी ही दोन्ही खंडे एकमेकांना जोडलेली होती.

दक्षिण आफ्रिकन भूवैज्ञानिक अ‍ॅलेक्झांडर दु टॉइट यांनी इ. स. १९३७ मधील आपल्या अवर वाँडरिंग काँटीनंट्स (आपली परिभ्रामी खंडे) या पुस्तकात वॅगनर यांच्या खंडवहन या सिद्धांताची विस्तारित पुनर्मांडणी केली. त्यांनी दक्षिण गोलार्धातील खंडांच्या संदर्भातील भूशास्त्रीय आणि जीवाश्म विज्ञानविषयक अनेक पुरावे गोळा करून त्या दस्तऐवजांची काळजीपूर्वक मांडणी केली. विदारण न झालेले गाळाच्या खडकाचे जोडलेले पाषाण व हिमनद्यांनी संचयन केलेले अवर्गिकृत आणि स्तरीकरण न झालेले टिलाइट हे पर्मो-कार्बोनिफेरस कालखंडातील (सुमारे २९० द. ल. जुने) खडक, तसेच उत्तर गोलार्धात न आढळणाऱ्या सजातीय वनस्पती व प्राणी यांचा त्या पुराव्यांत समावेश होता. ज्या खडकांच्या राशींत हे पुरावे आढळले, त्या खडकांच्या राशींना भारतात गोंडवन संघ, दक्षिण आफ्रिकेतील राशींना कारू संघ, दक्षिण अमेरिकेत त्यांना सँता कॅथरिना संघ या नावांनी आणि इतर खंडांतील राशींना इतर नावांनी ओळखले जाते. हे पुरावे पूर्व ऑस्ट्रेलियातील मेटलंड संघात, तसेच अंटार्क्टिकातही आढळले आहेत. गोंडवाना ही संकल्पना दक्षिण गोलार्धातील शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली असली, तरी उत्तर गोलार्धातील शास्त्रज्ञ भूपट्ट सांरचनिकी सिद्धांत मांडला जाईपर्यंत (१९६० चे दशक) या संकल्पनेला विरोधच करत राहिले. भूपट्ट सांरचनिकी सिद्धांताने असे दाखवून दिले की, महासागरी तळ हे कायमस्वरूपी वैश्विक भूस्वरूपे नाहीत, तर त्यांचे विस्तारण चालू आहे. त्यामुळे वॅगनर यांचा खंडवहन सिद्धांत दोषपूर्ण आहे, असे समजले जाते.

भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार कँब्रियनपूर्व कालखंडाच्या अखेरीस (सुमारे एक महापद्म ते ५४२ द. ल. वर्षांपूर्वी) खंडांच्या एकमेकांशी झालेल्या टकरींमुळे ती एकमेकांना जोडली जाऊन गोंडवानाची निर्मिती झाली. त्यानंतर गोंडवानाची टक्कर उत्तर अमेरिका, यूरोप, सायबीरिया यांच्याशी होऊन त्यातून पॅन्जिया या महाखंडाची निर्मिती झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गोंडवाना खंड विभंगत गेले. जुरासिक कालखंडात (१८० द. ल. वर्षांपूर्वी) गोंडवानाचा पश्चिमेकडील अर्धा भाग (आफ्रिका व द. अमेरिका) पूर्वेकडील अर्ध्या भागापासून (मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका) वेगळा (अलग) झाला. सुमारे १४० द. ल. वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेपासून आफ्रिका वेगळे झाले. साधारण त्याच सुमारास भारतीय भूखंड मादागास्करला जोडले होते. ते अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियापासून वेगळे होऊन त्यांच्या दरम्यानच्या मधील भागात हिंदी महासागराची निर्मिती झाली. क्रिटेशस कालखंडाच्या अखेरीस भारतीय भूखंड मादागास्करपासून भंग पावून वेगळे झाले. तसेच अंटार्क्टिकापासून ऑस्ट्रेलिया तुटून सावकाशपणे दूर वाहत गेले. सुमारे ५० द. ल. वर्षांपूर्वी भारतीय भूखंडाचा यूरेशिया भूखंडावर आघात होत जाऊन त्यातून हिमालय पर्वताची निर्मिती झाली, तर ऑस्ट्रेलियन भूपट्टाचे उत्तरेकडे वहन सुरू होऊन त्याचा आघात आग्नेय आशियाई भूपट्टाच्या कडांवर सुरू झाला असून तो आघात अजून चालूच आहे.

समीक्षक ꞉ शेख महम्मद बाबर