उच्च समूह दर्जा असलेल्या गटांतील शिक्षण, व्यवसाय आणि संपत्तीमधील फरकांवर आधारित सांस्कृतिक फरक म्हणजे सांस्कृतिक भांडवल होय. पिअर बोर्द्यू या फ्रेंच समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्पादनाच्या सिद्धांतासंदर्भात मांडलेली ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. भांडवल हे आर्थिक भांडवल, सामाजिक भांडवल, सांस्कृतिक भांडवल आणि प्रतिकात्मक भांडवल अशा चार प्रकारचे असतात, असे त्यांनी प्रतिपादित केले.

सांस्कृतिक भांडवल हे वेगवेगळ्या स्वरूपांत अस्तित्वात असून प्रस्तुत क्षेत्रानुसार त्याचे स्वरूपही बदलते. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ते आर्थिक भांडवल, सामाजिक भांडवल आणि प्रतिकात्मक भांडवल यांमध्येही परावर्तीत करता येऊ शकते. शैक्षणिक पात्रतेच्या आधारे त्याचे संस्थीकरण करता येऊ शकते. सांस्कृतिक भांडवल सामान्यतः तीन स्वरूपात अस्तित्वात असते :

  • (१) मूर्त, अंगभूत सांस्कृतिक भांडवल : या स्वरूपातील सांस्कृतिक भांडवल हे मन आणि शरीराच्या माध्यमांतून दीर्घकाळ टिकणारे असते.
  • (२) वस्तुनिष्ठ सांस्कृतिक भांडवल : यामध्ये वस्तू किंवा मूर्त स्वरूपातील गोष्टींचा (चित्रे, पुस्तके, शब्दकोश, साधने, यंत्रे, इत्यादी) समावेश होतो.
  • (३) संस्थात्मक सांस्कृतिक भांडवल : यामध्ये सामाजिक नियम किंवा पद्धती म्हणून रूढ होतात.

भाषेवरील प्रभुत्व हेसुद्धा एक सांस्कृतिक भांडवल आहे. हे भांडवल ज्यांच्याकडे असते, त्यांना समाजात जास्त संधी उपलब्ध असतात. हा वारसा बहुतेक वेळा त्यांच्या पुढील पिढीकडे सोपविला जातो. त्यामुळे हे भांडवल समाजातील प्रथितयश व्यक्तींच्या पुढच्या पिढीला आपोआपच मिळण्याची शक्यता वाढते. ज्यांच्याकडे हे भांडवल नाही, त्यांना ते कमाविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे सर्वांना नेहेमी साधेलच असे नाही. ज्यांच्याकडे हे भांडवल आहे, त्यांना जास्त संधी आणि ज्यांच्याकडे हे भांडवल नाही, त्यांना कमी संधी असे घडत असल्याने सामाजिक विषमता वाढविण्यात आणि टिकविण्यात सांस्कृतिक भांडवल महत्त्वाची भूमिका पार पाडते. भाषा भांडवल हे आर्थिक भांडवलाप्रमाणे तात्काळ परिणाम दाखविणारे किंवा फायदा देणारे नाही. त्याची फळे मिळायला वेळ लागत असून त्यासाठी फार कौशल्याने भाषेचा वापर करावा लागतो.

बोर्द्यू यांनी विविध सामाजिक वर्गांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असमान शैक्षणिक कर्तृत्वाचे स्पष्टीकरण सांस्कृतिक भांडवल या संकल्पनेद्वारे केले. उच्च समूह दर्जा असलेल्या कुटुंबातील मुलांकडे योग्य शिष्टाचार, चांगली अभिरुची, भाषेचा योग्य वापर आणि औपचारिक संस्कृतीविषयी आदर हे सांस्कृतिक भांडवल असते. कुटुंबातील सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत त्यांना औपचारिक सांस्कृतिक मूल्ये, शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रकला, शिल्पकला आणि साहित्य या कलांचे आकलन कसे करायचे हे रुजविले जाते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणांत हे आकलन गृहीत धरले जाते. पालकांचे सामाजिक स्थान आणि त्यांच्या पाल्याची शैक्षणिक प्रगती यांतील संबंध सांस्कृतिक भांडवलाच्या आधारे मांडता येते. हे करताना विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश आणि त्या वर्गाकडे असलेले सांस्कृतिक भांडवल यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करावा लागतो. त्याच प्रमाणे प्रचलित सामान्यज्ञान आणि मानवी भांडवल सिद्धांत जे शैक्षणिक यश किंवा अपयश हे नैसर्गिक क्षमतांचा परिणाम म्हणून पाहत होते, त्यावर सांस्कृतिक भांडवल या संकल्पनेतून हल्ला चढविला गेला. अर्थशास्त्रज्ञ शैक्षणिक गुंतवणुकीच्या धोरणांचा विचार करताना संपूर्ण शैक्षणिक धोरण आणि व्यवस्थेच्या पुनरुत्पादनाचे धोरण यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळे वर्ग आर्थिक आणि सामाजिक गुंतवणुकीमध्ये आपल्या संसाधनांचे वेगवेगळे वाटप का आणि कसे करतात, हे समजण्यास अर्थशास्त्रज्ञ अयशस्वी ठरतात. याच कारणामुळे ते अपरिहार्य पण सूक्ष्म पातळीवर असणाऱ्या सामाजिक दृष्ट्या सर्वांत निर्णायक अशा शैक्षणिक गुंतवणूक म्हणजेच सांस्कृतिक भांडवलाचे घरगुती प्रसारण या घटकाकडे दुर्लक्ष करतात. शैक्षणिक क्षमता, शैक्षणिक गुंतवणुकीच्या संबंधातील अभ्यास आणि हुशारी हे सांस्कृतिक भांडवलाच्या गुणवत्तेचा परिणाम आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामधील फायद्याचे परिमाण हे सामाजिक पातळीवर देशाच्या उत्पन्नातील योगदानावर ठरते. सांस्कृतिक भांडवल हे शिक्षणाकडे पाहण्याचा संरचनात्मक-प्रकार्यावादी दृष्टीकोन आहे. ज्यामध्ये शिक्षणसंस्था सांस्कृतिक भांडवलाच्या पिढीजात हस्तांतराला अधिमान्यता देते आणि सामाजिक पुनरुत्पानात महत्त्वाची भूमिका बजावते.

सांस्कृतिक भांडवलाचे बहुतांश गुणधर्म हे मूलभूत अवस्थेत शरीराशी जोडले गेलेले असतात. सांस्कृतिक भांडवल हे सुसंस्कृत स्वरूपात साठवले जाते, ज्यामध्ये एकप्रकारची मूर्त प्रक्रिया अंतर्भूत असते. त्यामुळेच सांस्कृतिक भांडवल मिळविण्यासाठी गुंतवणूकदाराला वैयक्तिक पातळीवर वेळेची गुंतवणूक करावी लागते. सांस्कृतिक भांडवल संपादन करण्याचे कार्य म्हणजे स्वतःच स्वतःवर काम करणे (स्वत:ची सुधारणा) होय. सांस्कृतिक भांडवलाच्या अधिग्रहणाची लांबी शालेय शिक्षणाच्या लांबीपर्यंत मर्यादित केली जाऊ नये. अंगभूत स्वरूपातील सांस्कृतिक भांडवल हे पैसा, मालमत्ता, खानदानी पदव्या, भेटवस्तू या स्वरूपात हस्तांतरित करता येत नाही. तसेच ते एका स्वतंत्र कर्त्याच्या विनियोजित क्षमतांच्या पलीकडे जमाही केले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक भांडवल व्यक्तीच्या जैविक क्षमतांशी असंख्य मार्गांनी जोडलेले असते. त्याचा प्रसार हा अनुवांशिक मार्गाने होतो, जो नेहमीच मोठ्या प्रमाणात कोणत्या तरी अमूर्त स्वरूपात किंवा अदृश्य असतो. त्यामुळेच सांस्कृतिक भांडवलाची संकल्पना व्यक्तीला वारसाहक्काने मिळालेले गुणधर्म आणि व्यक्तीने संपादित केलेले गुणधर्म या जुन्या फरकाला विरोध करते. सांस्कृतिक भांडवल जन्मजात मालमत्तेची प्रतिष्ठा आणि संपादनाची गुणवत्ता यांना एकत्रित करण्याचे काम करते. सांस्कृतिक भांडवलाचे प्रसारण आणि संपादन करण्याची सामाजिक प्रक्रिया ही आर्थिक भांडवलापेक्षा अधिक अमूर्त स्वरूपाची असते.

वस्तुनिष्ठ स्वरूपात असलेले सांस्कृतिक भांडवल हे त्याच्या अंगभूत स्वरूपाशी संबंधित असते. साहित्य, पत्रकारिता, लेखन, चित्रकला, स्मारके, उपकरणे इत्यादी स्वरूपांतील सांस्कृतिक भांडवल भौतिकरित्या प्रसारित केले जाऊ शकते. उदा., चित्रांचा संग्रह आर्थिक भांडवलात रूपांतरित केला जाऊ शकतो; परंतु चित्र काढण्यासाठीची पूर्वस्थिती, कौशल्य हे संक्रमणीय नाही. केवळ कायदेशीर मालकी या स्वरूपात ते सांस्कृतिक भांडवल संक्रमणीय करणे शक्य होते. आर्थिक भांडवलाद्वारे एखादे मशीन विकत घेता येऊ शकते; परंतु ते चालविण्यासाठी कौशल्याच्या स्वरूपातील सांस्कृतिक भांडवलाची गरज असते. सांस्कृतिक भांडवल हे संस्थात्मक स्वरूपात अस्तित्वात असते. उदा., शिक्षणसंस्था. शैक्षणिक पात्रतेबरोबरच त्याच्या धारकास पारंपरिक, स्थिर, कायदेशीररित्या सांस्कृतिक पात्रतेचे प्रमाणपत्र ही शिक्षणसंस्था देते. शैक्षणिक पात्रता (गुणवत्ता) ही एक प्रकारे सांस्कृतिक भांडवलाचे संस्थीकरण करते. उदा., स्पर्धा परीक्षा. अशा परीक्षांमध्ये मूळ परीक्षेतील कामगिरीतील फरकांच्या बाहेर सांस्कृतिक भांडवल तीक्ष्ण, निरपेक्ष, स्थायी फरक निर्माण करते, जे अयशस्वी उमेदवाराला यशस्वी उमेदवारापासून वेगळे करते.

आर्थिक भांडवलाला ज्या क्षेत्रांत मान्यता किंवा महत्त्व नाही, त्या सर्व क्षेत्रांत सांस्कृतिक भांडवल महत्त्वाचे ठरते. सांस्कृतिक, कला, कला संग्रह, साहित्य, सामाजिक कल्याण इत्यादी क्षेत्रांत सांस्कृतिक भांडवल महत्त्वाची भूमिका बजावते. दैनंदिन व्यवहारांमध्ये सांस्कृतिक भांडवल वर्गीय भेद कायम ठेवण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरते. वर्गीय विषमता व उतरंड हे सांस्कृतिक भांडवलात फरकाने व्यक्त केले जाते. एकीकडे वस्तुनिष्ठ सांस्कृतिक भांडवल विनियोजित करण्याची प्रक्रिया आणि त्यास लागणारा वेळ हे मुख्यतः संपूर्ण कुटुंबातील सांस्कृतिक भांडवलावर अवलंबून असते; तर दुसरीकडे सांस्कृतिक भांडवलाचा प्रारंभिक संचय हा प्रत्येक प्रकारच्या उपयुक्त सांस्कृतिक भांडवलाच्या जलद, सुलभ संचयनासाठी आवश्यक आहे. सांस्कृतिक भांडवल असमान सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनांच्या पुनरुत्पादनात महत्त्वाचा घटक ठरते. सांस्कृतिक भांडवल हे कोणत्याही व्यक्तीच्या अधिवासाचा महत्त्वपूर्ण भाग असते.

संदर्भ : Cuff, E. C.; Sharrock, W. W.; Francis, D. W., Perspectives in Sociology, 1990.

समीक्षक : विशाल जाधव