(स्थापना : १९७०). भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारा (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन; इस्रो; ISRO) केल्या जाणाऱ्या अंतराळ संशोधनासाठी जी केंद्रे उभारण्यात आली, त्यांपैकी ‘शार’ (श्रीहरिकोटा हाय अल्टीट्युड रेंज; एसएचएआर; SHAR) केंद्राची स्थापना श्रीहरिकोटा येथे करण्यात आली आहे. १९७० मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले. इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली म्हणून या अंतराळ केंद्राचे नाव ‘सतीश धवन अंतराळ केंद्र’ असे करण्यात आले (२००२). हे केंद्र आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या प्रक्षेपणासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याचे कार्य हे केंद्र करते. या केंद्रात घन प्रणोदक प्रक्रिया (solid propellant processing), घन मोटर्सची स्थिरचाचणी (static testing of solid motors), प्रक्षेपकाची जोडणी (launch vehicle integration), प्रक्षेपकाशी अधिभाराची जोडणी (integration of payload with launch vehicle), प्रत्यक्ष प्रक्षेपण, टेलिमेट्री, ट्रॅकिंग व कमांड नेटवर्क आदी रेंज ऑपेरेशन्स आणि मिशन कंट्रोल सेंटर या सर्व सोयी आहेत.
केंद्रावर दोन प्रक्षेपण तळ (launch pads) असून आहेत येथूनच इस्रोच्या पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, एसएसएलव्ही आदी प्रक्षेपकांचे प्रक्षेपण केले जाते. या केंद्राला पुढील जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत : (अ) इस्रोच्या प्रक्षेपकांसाठी घन प्रणोदक गतिवर्धकाचे (बूस्टर्सचे) उत्पादन करणे, (आ) विविध उपप्रणालींच्या आणि घन प्रक्षेपक मोटर्सच्या पात्रता चाचण्यांसाठी पायाभूत सुविधा पुरविणे आणि आवश्यक चाचण्या घेणे तसेच (इ) उपग्रह आणि प्रक्षेपक यांच्या प्रक्षेपणासाठी तळ उपलब्ध करून देणे.
या केंद्रामध्ये साउंडिंग अग्निबाण गतिमान करण्यासाठी वेगळे प्रक्षेपक मंच (लाँच पॅड) आहे. हे केंद्र इस्रोच्या साउंडिंग रॉकेट्ससाठी आवश्यक प्रक्षेपण सुविधा तसेच साउंडिंग अग्निबाण आणि अधिभार (पेलोड्सचे) एकत्रीकरण आणि प्रक्षेपण यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करते.
श्रीहरीकोटा हे विषुववृत्तानजीक आहे. त्यामुळे भूस्थिर (जिओस्टेशनरी) कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्यास नैसर्गिक अनुकूलता मिळते. विषुववृत्ताजवळ उपग्रह प्रक्षेपित केल्यामुळे पृथ्वीच्या स्वांगभ्रमणाचा फायदा मिळून उपग्रह भूस्थिर कक्षेत लवकर पोहोचतो. असे भूस्थिर कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या गतीने फिरत राहतात. १९६० च्या दशकात विक्रम साराभाई यांनी देशाच्या भविष्याचा विचार करून अंतराळ संशोधनावर भर देत ‘मनुष्य आणि एकंदरीतच समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आपण अग्रेसर असले पाहिजे’ असे प्रतिपादन केले होते.
उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी देशाच्या पूर्वकिनाऱ्यावर दाट लोकवस्तीपासून दूर अशा ठिकाणी प्रक्षेपण तळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध मोहिमांसाठी एक चांगला अझीमूथ कॉरिडॉर, विषुववृत्ताजवळ आणि सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठे निर्जन क्षेत्र आदी वैशिष्ट्यांमुळे श्रीहरीकोटा हे अंतराळ प्रक्षेपणासाठी आदर्शस्थान मानले गेले. आंध्र प्रदेशातील एस.पी.एस.आर. नेल्लोर जिल्ह्यातील हेस्पिंडलच्या आकाराचे बेट पुलिकत तलावाच्या पाण्यामध्ये आहे. पश्चिमेला बकिंगहॅम कालवा आणि पूर्वेला बंगालचा उपसागर यांच्यामध्ये असलेले हे बेट १९६९ साली आपल्या देशाचे रॉकेट प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी निवडले गेले. ९ ऑक्टोबर १९७१ रोजी ‘रोहिणी १२५’ या रॉकेटच्या उड्डाणाने हे कार्यान्वित झाले. त्यानंतर इस्रोच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथील सुविधांचा हळूहळू विस्तार करण्यात आला. चेन्नईनजीक असलेल्या सुलुरूपेटा या तालुक्याच्या गावापासून हे १७ किलोमीटरच्या अंतरावर आहे. वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर हा पाऊसमानाचा काळ सोडला तर येथील वातावरण स्वच्छ व निरभ्र असते, त्यामुळे बाह्यस्थिर चाचण्या आणि प्रक्षेपणासाठी मोठा कालावधी मिळतो.
प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्यासाठी इस्रोने ५००० प्रेक्षकक्षमता असणारी आसनक्षमता सतीश धवन अंतराळ केंद्राजवळ दूर उभारली आहे. दोन्हीपैकी कोणत्याही प्रक्षेपण तळावरून केले जाणारे प्रक्षेपण येथून स्पष्ट पाहता येते. प्रक्षेपण पाहून परततांना त्याच इमारतीत अंतराळ संग्रहालय आहे. त्यात इस्रोचा इतिहास, प्रतिकृती व माहिती फलकांद्वारे जाणून घेता येतो. जवळच रॉकेट गार्डन म्हणून एक उद्यान आहे. तेथे काही सुंदर वास्तुकलेचे नमुने व प्रक्षेपकांच्या पूर्णाकार प्रतिकृती उभारल्या आहेत.
कळीचे शब्द : #इस्रो #लाॅच पॅड
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा