(स्थापना : १९८८). पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र आहे. हे केंद्र हवामानाच्या पूर्वानुमानासाठी लागणारी विविध प्रारूपे तयार करते. विश्वासार्ह व अचूक अशा सांख्यिकी हवामान पूर्वानुमान रूपांची निर्मिती करणे व त्यांचा विकास करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी मध्यम कालावधी म्हणजेच ३ ते १० दिवस आधी स्थलनिहाय हवामानाचा अंदाज देणे यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विशिष्ट प्रकल्पाच्या रूपाने (मिशन मोड प्रॉजेक्ट) १९८८ साली या केंद्राची स्थापना झाली. याची सुरुवात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात करण्यात आली. २००४ साली उत्तर प्रदेशातील नोएडा या परिसरात हे केंद्र स्थलांतरित झाले. केंद्र देशातील शेतकऱ्यांसाठी नियमितपणे कृषी सल्ला सेवा पुरवत आहे.

केंद्राची पुढील प्रमुख कार्ये : जागतिक हवामान पूर्वानुमान प्रणाली (Global Forecasting System – GFS) व एकत्रित प्रारूप (Unified Model – UM) यांच्या निर्मितीसाठी हवामानाच्या घटकांच्या निरीक्षणांची वारंवार पडताळणी करून (Data Assimilation) प्रारूपे विकसित करणे हे महत्त्वाचे कार्य राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्रात केले जाते. यांचा उपयोग हवामानच्या पूर्वानुमानाच्या योग्य प्रारूपांच्या निर्मितीसाठी होतो. या केंद्राच्या पूर्वानुमानाचा वापर भारत व शेजारील राष्ट्रांसाठी होतो. या केंद्रातील कार्य मुख्यत: खालील चार विभागांत होते.

(१) हवामानाचे सांख्यिकी प्रारूप तयार करणे : हवामानशास्त्रात संशोधन करणे, निरीक्षणांची प्रणाली तयार करणे व त्यावर आधारित सांख्यिकी पूर्वानुमानाची प्रारूपे तयार करणे हे राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कार्य आहे. हे पूर्वानुमान तयार करण्यासाठी व त्याच्या वापराच्या प्रसारासाठी जागतिक सांख्यिकी हवामान पूर्वानुमान प्रणाली वापरली जाते. वेळोवेळी त्याच्या दर्जात सुधारणा केली जाते. याचा वापर संरक्षण, ऊर्जा, जल स्रोत, वाहतूक, नैसर्गिक आपत्ती निवारण इत्यादी क्षेत्रांसाठी होतो.

राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्राची इमारत

(२) बंगालच्या उपसागरातील हवामानासाठी बहुक्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक सहकार्य केंद्र : बंगालच्या उपसागरातील बहुक्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक सहकार्य म्हणजे बांगलादेश, भारत, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, भूतान व नेपाळ या देशांच्या सरकारांनी एकत्रितपणे केलेला स्वयंघोषित करार आहे. बांगला देश व त्यांच्या सीमेलगतच्या या सहा देशांनी आपापसात आर्थिक सहकार्याला बळकटी देणे या मुख्य उद्देशाने हा करार केला आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणून ४ मार्च २०१४ रोजी एक सामंजस्य करार झाला. त्यानुसार या सहा राष्ट्रांसाठी हवामानाच्या पूर्वानुमानाला आवश्यक असणारी निरीक्षणे, संशोधन व प्रशिक्षण यांसाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये हवामानाची निरीक्षणे व संशोधन यांसाठी नियमितपणे कार्यशाळेसह प्रशिक्षण आयोजित केले जाते. तसेच हवामानाच्या पूर्वानुमानाच्या कौशल्याचा विकास करून सक्षम मनुष्यबळाची निर्मिती केली जाते.

(३) मोसमी पावसासंबंधीचे राष्ट्रीय कार्य : भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या नेतृत्वाखाली भारतीय हवामानशास्त्र विभाग, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती प्रणाली केंद्र आणि राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र यांच्या मार्फत राष्ट्रीय मान्सून मिशन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये ३ ते ५ दिवसांचे लघू कालावधी, ५ ते १५ दिवसांचे मध्यम कालावधी, १० ते ३० दिवसांचे दीर्घ कालावधी आणि ३ महिन्यांचे मोसमी हवामानाचे पूर्वानुमान तयार केले जाते. यामध्ये मोसमी पावसाच्या पूर्वानुमानामध्ये अधिक अचूकता येण्यासाठी विविध प्रारूपे विकसित केली जात आहेत. यासाठी अतिउच्च क्षमता असलेल्या व अती जलद काम करणाऱ्या अत्याधुनिक संगणकाचा उपयोग केला जात आहे.

(४) संगणकीय संसाधने : हवामानाच्या पूर्वानुमानासाठी वातावरणीय सामान्य अभिसरण प्रारूपे वापरावी लागतात. वातावरणातील सामान्य अभिसरण म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने तिच्या भोवतीचे फिरणारे तिचे वातावरण. हे अभिसरण मोजण्यासाठी विशेष समीकरणांची प्रणाली आवश्यक असते. या प्रणालीमध्ये पृथ्वीच्या वातावरणाची गती, तापमान, आर्द्रता तसेच महासागरांचे तापमान, त्यावरील हवेचा दाब इत्यादी घटकांचा समावेश असतो. या घटकांचा अंतर्भाव करून विशेष प्रारूपांच्या साहाय्याने मेघ निर्मिती, पावसाचे प्रमाण आणि इतर प्रक्रियांचे पूर्वानुमान मिळवता येते. यासाठी हवामानाच्या आणि महासागरांच्या घटकांच्या निरीक्षणांच्या प्रचंड प्रमाणातील नोंदींचे विश्लेषण करून सांख्यिकी प्रारूपे तयार करावी लागतात. संगणकावर ही प्रारूपे वापरून हवामानाचे पूर्वानुमान मिळवले जाते. यासाठी कराव्या लागणाऱ्या गणनांसाठी व प्रारूपांच्या निर्मितीसाठी अतिउच्च क्षमता असलेल्या व अतिजलद काम करणाऱ्या महासंगणकाची आवश्यकता असते. यासाठी क्रे एक्सएमपी-१४ हा महासंगणक १९८९ साली अमेरिकेहून आयात केला होता.

सध्या २.८ पेटाफ्लॉप कार्यक्षमता व २० पेटाफ्लॉप माहिती साठवण क्षमता असलेला ‘मिहिर’ हा स़ंगणक कार्यरत असून तो पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ४ पेटाफ्लॉप कार्यक्षमता असलेल्या संगणकाला जोडलेला आहे. अलीकडेच या दोन्हीही संगणकाची कार्यक्षमता वाढवली आहे. राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्राच्या संगणकाची कार्यक्षमता ८.३ पेटाफ्लॉप, तर भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या संगणकाची कार्यक्षमता १३ पेटाफ्लॉप केली आहे. हे दोन्ही महासंगणक एकमेकांना जोडून त्यांची क्षमता अनेक पटीने वाढल्याने ते सक्षम व अतिजलदपणे कार्य करणारे झाले आहेत. या संगणकांची नियमितपणे काळजी घेऊन कार्यक्षम ठेवले जातात. तसेच गरजेप्रमाणे त्यांची क्षमता वाढवली जाते.

राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्राने भारतातील कृषी – हवामान क्षेत्रातील विभाग एकमेकांना जोडून एक जाळे तयार केले आहे. या मार्फत वास्तविक वेळेचा कृषीविषयक हवामान ‌सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जातो. यशस्वी चाचणीनंतर कृषी सल्ल्यासाठी ही प्रणाली भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्राचे एकसंध प्रतिमान वापरून तयार झालेले पूर्वानुमान हे जागतिक हवामानशास्त्र परिषदेला तीव्र हवामान पूर्वानुमानाच्या उपयुक्ततेची चाचणी घेण्याऱ्या प्रकल्पासाठी आधारभूत ठरले आहे. याद्वारे अविकसित व विकसनशील देशांना तसेच लहान बेटांना स्थानिक तीव्र हवामानाचे पूर्वामान देऊन जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी मदत होते. यामध्ये भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभाग व राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र यांच्या बरोबर राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र सांख्यिकी हवामान पूर्वानुमानाचे मार्गदर्शन करणाऱ्या जागतिक केंद्रांपैकी एक आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील संस्था तसेच ऊर्जा, क्रीडा, पर्यटन इत्यादी क्षेत्रातील संस्थांना हे केंद्र गरजेप्रमाणे हवामानाचे पूर्वानुमान पुरवते.

केंद्रामध्ये होत असलेल्या संशोधनाचा व प्रारूपांचा उपयोग करून या केंद्राने हवामानशास्त्रातील पुढील काही उपयुक्त गोष्टींची निर्मिती केली आहे – (१) तीव्र हवामानदर्शक तक्ते, (२) शेजारील राष्ट्रांना त्यांच्या गरजेनुसार हवामानासंबंधीच्या विविध सेवा, (३) भविष्यातील तीव्र हवामानाच्या सूचना, (४) विमान वाहतूकीसाठी मार्गदर्शक दैनंदिन माहिती पत्रके, (५) वादळे, चक्रीवादळे, धुके इत्यादी हवामानासंबंधीच्या विविध धोक्यांची दैनंदिन माहिती पत्रके, (६) जमिनीवरील, महासागरावरील व उपग्रहांद्वारे मिळालेल्या हवामानाच्या घटकांच्या निरीक्षणांच्या नोंदींची उपलब्धता, (७) हवामानाच्या पूर्वानुमानासाठी वापरलेली प्रारूपे, तसेच (८) सौर व पवन ऊर्जा यांच्या अक्षय स्रोतासाठीच्या प्रारूपांची मार्गदर्शके.

केंद्राने तयार केलेली प्रारूपे इतर संस्थाना हवामान पूर्वानुमानासाठी तसेच त्यांच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी व दैनंदिन कार्यासाठी नियमितपणे पुरवली जातात. या संस्थांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग, भारतीय वायू सेना, भारतीय नौदल, हिम आणि हिमस्खलन अभ्यास संस्था, भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र, अणु उर्जा महामंडळ, राष्ट्रीय पवन ऊर्जासंस्था, भारतीय विज्ञान संस्थेचे दिवेचा केंद्र व स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, ऊर्जा प्रणाली कार्य महामंडळ इत्यादींचा समावेश आहे.

केंद्राच्या प्रकाशनांसंबंधीची आणि इतर माहिती https://www.ncmrwf.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कळीचे शब्द : #हवामान #पूर्वानुमान #कृषी

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा