गॉटमन, झां (Gottman, Jean) : (१० ऑक्टोबर १९१५ – २८ फेब्रुवारी १९९४). फ्रेंच भूगोलज्ञ. युक्रेनमधील खारकॉव्ह येथे एली गॉटमन व सोनिया फॅनी एटिंगर या दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. इ. स. १९१८ मध्ये त्यांच्या आई-वडिलांची हत्या झाली. त्यानंतर एमिली गॉटमन व मिशेल बर्चिन या दांपत्याने त्यांना दत्तक घेतले. त्यांच्याबरोबर गॉटमन इ. स. १९२१ मध्ये पॅरीसला गेले. तेथे त्यांनी आपले इव्हान हे मूळ नाव बदलून झां हे फ्रेंच नाव स्वीकारले. मेगॅलोपलिस (महानगरीय संकुल) हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणाऱ्या मोठ्या नागरी वस्तीच्या सापेक्ष स्वरूपासाठी त्यांनी मूळ ग्रीक मेगॅलोपलिस (मोठे शहर) ही संज्ञा १९६१ मध्ये प्रथम वापरून त्या संकल्पनेचे विवेचन केले. ही संज्ञा त्यांनी मुख्यत꞉ अमेरिकेच्या शहरीकरण केलेल्या ईशान्य समुद्रकिनाऱ्याच्या विश्लेषणासाठी वापरली.
गॉटमन यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळी उच्च पदे भूषविली. त्यांनी इ. स. १९३७ – इ. स. १९४२ या कालावधीत फ्रान्समधील सॉरबॉन विद्यापीठात मानवी भूगोलाचे संशोधक, इ. स. १९४२ – इ. स. १९४४ या कालावधीत वॉशिंग्टन डी. सी. येथे परराष्ट्रीय आर्थिक प्रशासन सल्लागार, तर इ. स. १९४३ – इ. स. १९४८ मध्ये अमेरिकेच्या मेरिलंड राज्यातील बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात आणि पॅरिस विद्यापीठात व्याख्याते म्हणून सेवा केली. ‘ट्वेंटीएथ सेंचुरी फंड’ या सार्वजनिक धोरण संशोधन संस्थेत संशोधक संचालक (१९५६ – १९६१), तर ‘एकोल प्रतिक देस ओट एतूदेस’ या उच्च दर्जाच्या फ्रेंच पदव्युत्तर शिक्षण संस्थेत संचालक (१९६० – १९८४) ही पदे त्यांनी भूषविली. १९६८ मध्ये ते ऑक्सफर्ड विद्यापीठात भूगोलाचे प्राध्यापक झाले. ‘रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी’चा, भूगोल विषयातील संशोधनाच्या विशिष्ट गुणवत्तेसाठी असलेला ‘व्हिक्टोरिया मेडल’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.
गॉटमन यांनी ए जिऑग्रफी ऑफ यूरोप (१९५०), मेगॅलोपलिस : दी अर्बनाइज्ड सीबोर्ड ऑफ दी युनायटेड स्टेट्स (१९६१) आणि मेगॅलोपलिस रिव्हिझिटेड (१९८७) ही पुस्तके लिहीली.
गॉटमन यांचे ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे निधन झाले.
समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे