पर्यावरणवाद, अशक्यतावाद, नियतिवाद, पर्यावरणीय किंवा भौगोलिक निसर्गवाद अशा नावांनीही ही संज्ञा वापरली जाते. तत्त्वज्ञान, साहित्य व कला या विषयांतही निसर्गवाद, नियतिवाद या संज्ञा वापरल्या जातात; परंतु सदर नोंदीत केवळ भौगोलिक निसर्गवाद म्हणूनच ऊहापोह केलेला आहे. भूगोलाची मानव भूगोल ही प्रमुख शाखा विकसित होत असताना मानव-निसर्ग यांच्या संबंधांवरून वेगवेगळ्या विचारप्रणाली (वाद) पुढे आल्या. त्यांपैकीच निसर्गवाद ही एक विचारप्रणाली होय. ही विचारप्रणाली एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात प्रचलित झाली. निसर्गवाद्यांनी भूगोलाच्या अभ्यासात केवळ नैसर्गिक पर्यावरणाचाच विचार केला आहे. त्यांच्या मते, मानव त्याच्या प्रत्येक कृतीच्या बाबतीत कृतीशील किंवा मुक्त नसून तो पूर्णपणे अकृतिशील किंवा नैसर्गिक नियमांचा गुलाम आहे. मानवाचे जीवन सर्वस्वी निसर्गाधीन असून सभोवतालच्या पर्यावरणानुसार ते घडत असते. मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक असून इतर प्राणिमात्रांप्रमाणेच त्याच्या सर्व हालचाली नैसर्गिक घटाकांनुसार होत असतात. याच विचारप्रणालीला निसर्गवाद असे म्हणतात. भूपृष्ठरचना, जमीन, नदी, जलाशय, हवामान, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, वेगवेगळी नैसर्गिक संसाधने (उदा., विविध खनिजे, शक्तिसाधने इत्यादी) इत्यादी नैसर्गिक पर्यावरणाचे प्रमुख घटक आहेत. मानवी समाजाचा आर्थिक, सामाजिक व सांकृतिक विकास, समाजरचना, त्याचे व्यवसाय, वर्तन, संस्कृती, निर्णय क्षमता, मानवाची इच्छा व स्फूर्ती, तेथील रहिवाशांचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन इत्यादी गोष्टी सभोवतालच्या प्राकृतिक पर्यावरण व हवामानानुसार निश्चित होत असतात. उदा., मानवी जीवनास प्रतिकूल असणाऱ्या विषुववृत्तीय अति उष्ण व आर्द्र हवामानाच्या प्रदेशांतील लोकांना उदरनिर्वाहासाठी किंवा जगण्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे जगातील अशा हवामानाच्या प्रदेशांतील समाज मागासलेला राहिला आहे. विषुववृत्तीय प्रदेशातील देश हे उच्च अक्षांशातील देशांपेक्षा कायमच गरीब व आर्थिक दृष्ट्या मागासलेले राहिले आहेत; कारण विषुववृत्तीय प्रदेशातील प्राकृतिक पर्यावरण आर्थिक विकासाच्या व मानवी जीवनाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. द्वीपीय स्थान असलेल्या देशांची संस्कृती अद्वितीय असते; कारण त्या बेटांवरील समाज हा खंडांवरील समाजापासून दूर एकाकी असतो. ही पर्यावरणीय निसर्गवादाची उत्तम उदाहरणे आहेत. विशिष्ट प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीनुसार घरे बांधावी लागतात. तेथील हवामानानुसार वस्त्रांचा वापर करावा लागतो आणि तेथे उपलब्ध असलेल्या खाद्यांचाच अन्न म्हणून उपयोग करावा लागतो. उदा., पर्वतीय प्रदेशांत राहणाऱ्या जमातींचे अन्न, वस्त्र, निवारा, आचार-विचार हे पूर्णपणे तेथील पर्यावरणावर अवलंबून असतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे तेथील लोक धष्टपुष्ट आणि कष्टाळू असतात.
निसर्गवादी विचारसरणी मांडणाऱ्यांच्या मते, मनुष्य तेथील परिस्थितीशी जुळते घेऊन राहतो; परंतु याबाहेर गेला, तर त्याचा विनाश होऊ शकतो. उदा., ऊष्ण प्रदेशातील मनुष्य थंड प्रदेशात गेला, तर तो आपल्या जुन्या सवयी विसरू शकत नसला, तरी थंड प्रदेशात गेल्यावर त्याला आपले अन्न, वस्त्र, निवारा, विचार, धार्मिक विश्वास इत्यादी गोष्टींत बदल करावा लागतो आणि तेथील नैसर्गिक परिस्थितीनुसार राहावे लागते. मानवाचे जीवन पूर्णपणे नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असते. हे टंड्रा प्रदेशात राहणाऱ्या एस्किमो, काँगोच्या खोऱ्यात राहणाऱ्या पिग्मी, कालाहारी वाळवंटात राहणाऱ्या बेदूइन अरब जमाती यांच्या जीवनात कशी भिन्नता आहे, यावरून स्पष्ट होते. भारतातील नागा, गोंड, संथाळ, तोडा इत्यादी जमाती भिन्न पर्यावरणात राहत असल्यामुळे त्यांचे जीवन भिन्न आहे. अशाप्रकारे मानवाचे जीवन हे निसर्गाधीन आहे, अशी विचारप्रणाली निसर्गवादी शास्त्रज्ञांनी मांडली. निसर्गवाद या विचारप्रणालीचे समर्थन हिपॉक्राटीझ, स्ट्रेबो, प्लेटो, अॅरिस्टॉटल, झां बॉदँ, अलेक्झांडर फोन हंबोल्ट, कार्ल रिटर, फ्रीड्रिख राट्सेल, कु. अॅलन सेंपल, एल्सवर्थ हंटिंग्टन इत्यादी शास्त्रज्ञांनी केले आहे.
निसर्गवाद आणि प्राचीन भूगोल : औपचारिक भूगोल अभ्यासात पर्यावरणीय निसर्गवाद हा विचार खऱ्या अर्थाने एकोणिसाव्या शतकात मांडण्यात आलेला असला, तरी त्याचा उगम प्राचीन कालखंडापर्यंत मागे जातो. ही विचारप्रणाली मांडणाऱ्यांमध्ये व त्याचा पुरस्कार करणाऱ्यांमध्ये ग्रीक व रोमन शास्त्रज्ञ प्रमुख होते. त्यांमध्ये सुप्रसिद्ध प्राचीन ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ, प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो, ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल, ग्रीसमधील प्रसिद्ध इतिहासकार थ्यूसिडिडीझ, प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार हीरॉडोटस इत्यादींनी आपल्या लेखनातून भौगोलिक परिस्थितीचा मानवी समाजावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गाधीन आहे. भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने मानवाला आपले व्यवसाय करावे लागतात. इ. स. पू. पाचव्या शतकात हिपॉक्राटीझ यांनी निसर्गवादाचे समर्थन करताना आशियातील आळशी व विलासी जीवन जगणाऱ्या आणि यूरोपातील कर्तव्यदक्ष व उद्योगी माणसांच्या जीवनाचा संबंध तेथील हवामानाशी जोडला आहे. याचे विश्लेषण करताना त्यांनी आशियातील पर्यावरण अधिक सुखदायी व यूरोपातील पर्यावरण थोडे कष्टप्रद दाखविले आहे. अशाच प्रकारचे विचार अॅरिस्टॉटल आणि इतर काही शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. त्यांच्या मते, यूरोपातील थंड हवामानामुळे तेथील लोक सुदृढ व बहादूर असतात; परंतु कलागुणांच्या दृष्टीने ते तेवढे प्रगत नसतात. याउलट, आशियातील लोक अधिक हुशार व कल्पक असतात; परंतु या गुणांचा विकास करण्यासाठी त्यांच्यात इच्छा व चिकाटी नसते. हा पर्यावरणाचा परिणाम आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हेच मत प्रसिद्ध फ्रेंच विधिवेत्ता व राजकीय तत्त्वज्ञ माँतेस्क्यू यांनी मांडले आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ झां बॉदँ यांनी प्रदेशाची उंची व कटिबंधाचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो, असे म्हटले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे पर्वतमय प्रदेशातील लोक उंच, धिप्पाड, वीर व कष्टाळू असतात; तर सपाट प्रदेशातील लोक बुटके, आळशी व अकार्यक्षम असतात. बॉदँ यांच्या मते, समशीतोष्ण कटिबंधातील परिस्थिती ही मानवी विकासासाठी चांगली असते. त्यामुळे तेथील लोक कष्टाळू, स्फूर्तिदायक व उद्योगशील बनतात. आशिया व यूरोप यांच्या मध्यस्थ स्थान असलेल्या ग्रीक लोकांमध्ये मात्र दोन्ही प्रदेशांतील गुण आढळतात. या मध्यस्थ स्थानामुळेच प्राचीन काळात उष्ण व थंड प्रदेशांतील समाजापेक्षा ग्रीक लोक अधिक प्रगत होते. याचे विश्लेषण करण्यासाठी स्ट्रेबो (प्रसिद्ध भूगोलवेत्ता व तत्त्वज्ञ), प्लेटो व अॅरिस्टॉटल यांनी हवामान या घटकाला अधिक महत्त्व दिले. अॅरिस्टॉटल यांनी आपल्या हवामान वर्गीकरण पद्धतीद्वारे विशिष्ट प्रदेशात वसाहती स्थापन करण्यास लोक कमी का होते, याचे विश्लेषण केले. त्यांनी नाईल नदीच्या ईजिप्तवर होणाऱ्या परिणामाची शास्त्रीय चिकित्सा केली. स्ट्रेबोच्या लिखाणामध्येसुद्धा निसर्गाचा मानवावर कसकसा परिणाम होतो, हे दर्शविणारी तुलनात्मक उदाहरणे आढळून येतात. उदा., इटलीचा आकार, उंचसखलता, हवामान इत्यादी घटकांचा रोमच्या उत्थापनावर व शक्तीवर कसा परिणाम होत गेला, याचे विवेचन केले आहे. अशा तऱ्हेने प्राचीन काळातील शास्त्रज्ञांनी निसर्गवादामध्ये समाविष्ट होऊ शकतील, असे विचार त्या काळातील निरीक्षणांद्वारे मांडले. केवळ समाजाची संस्कृतीच नाही, तर समाजातील लोकांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचे विश्लेषण करण्यासाठी पूर्वीच्या इतर तज्ज्ञांनीही पर्यावरणीय निसर्गवादाचा उपयोग केला होता. पूर्व आफ्रिकेतील लेखक अल-जाहिझ यांनी लोकांच्या त्वचेच्या रंगाशी पर्यावरणीय घटकांचा संबंध असल्याचे सांगितले. अरब भूगोलज्ञ अल इद्रीसी, अल मसूदी, इब्न हौकल, अल बट्टानी, अरब समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार इब्न खल्दून यांच्या लेखनातून निसर्गवादी विचारसरणी दिसून येते. अल मसूदी यांच्या मते, ज्या प्रदेशांत मुबलक पाणी उपलब्ध असते, तेथील लोक विलासी व विनोदी असतात; तर कोरड्या व दुर्जल प्रदेशांतील लोक चीडखोर असतात. मोकळ्या हवेत राहणारे भटके लोक शारीरिक व मानसिक दृष्ट्या कणखर असतात. इब्न खल्दून यांना पहिले अधिकृत पर्यावरणीय निसर्गवादी मानले जाते. त्यांनी संपूर्ण जगाचा इतिहास लिहिला आणि त्यात त्यांनी स्पष्ट केले की, उष्ण हवामानामुळे उपसहारा प्रदेशातील लोकांच्या शरीराची त्वचा गर्द काळी आढळते. अठराव्या शतकातील भूगोलज्ञ जॉर्ज ताथम यांनी भूपृष्ठरचनेनुसार मानवी जीवन कसे बदलते, याचे वर्णन केले आहे. सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांट हे निसर्गवादाचेच पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते, न्यू हॉलंड येथील लोकांचे डोळे अर्धवट बंद असतात आणि डोके मागे वाकविल्यशिवाय ते दूरचे पाहू शकत नाहीत. याचे कारण ते सांगतात की, त्या भागात असंख्य माशा असतात आणि त्या त्यांच्या डोळ्यात जातात म्हणून त्यांच्या डोळ्यांची रचना निसर्गत:च अशी झाली आहे. वैद्यक व आहारतज्ज्ञ रॉबर्ट मॅकॅरिसन यांच्या मते, दक्षिण भारतातील तमिळ लोकांच्या तुलनेत उत्तर भारतातील शीख लोक अधिक सुदृढ, उंच व चांगली प्रतिकारशक्ती असणारे आहेत; कारण त्यांचा आहार भरपूर प्रथिनांनी युक्त असतो. याउलट, मेघालय पठारावरील खासी लोक कमी प्रथिनयुक्त आहारामुळे तुलनेने दुबळे आढळतात.
निसर्गवाद व आधुनिक भूगोल : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जर्मन भूगोलज्ञ फ्रीड्रिख राट्सेल यांनी निसर्गवादविषयक सिद्धांत मांडला. त्यांच्या अगोदर प्रसिद्ध जर्मन भूगोलज्ञ कार्ल रिटर व अलेक्झांडर फोन हंबोल्ट यांनी पृथ्वीवरील अनेक घटकांचे कार्यकारण संबंध अभ्यासले होते. ते अभ्यासताना त्यांनी कांट यांचे तत्त्वज्ञान वापरले. हंबोल्ट यांनी भूरचना, नैसर्गिक वनस्पती व हवामान यांचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो, असे म्हटले आहे. अशा कार्यकारण संबंधाची मीमांसा करताना राट्सेल यांना प्राकृतिक घटकांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम अतिशय महत्त्वाचे वाटले. त्यातूनच पर्यावरणवाद ही विचारप्रणाली उदयास आली. प्राकृतिक रचनेचा अभ्यास त्याच्या अगोदर अनेक शास्त्रज्ञांनी केलेला होता; परंतु राट्सेल यांच्या कार्याचे महत्त्व म्हणजे विविध प्राकृतिक रचना असलेल्या प्रदेशातील मानवी जीवनाची वैशिष्ट्ये त्यांनी अभ्यासली. त्यांच्या अँथ्रोपोजिऑग्रफी या ग्रंथात त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मानवी समूहांचे वितरण नैसर्गिक शक्ती कशा प्रकारे नियंत्रित करतात, हे सांगितले आहे. राट्सेल यांचा सिद्धांत निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या क्रमविकासवाद (उत्क्रांतिवाद) या सिद्धांतावर आधारित होता. डार्विन यांच्या सिद्धांतानुसार उत्क्रांती घडत असतानाच पर्यावरणाशी जुळवून घेत मानव विकसित होत असतो. राट्सेल यांची विद्यार्थिनी व प्रसिद्ध भूगोलवेत्ती एलेन चर्चिल सेंपल (अ. स. सं. मधील मॅसॅचुसेट्स राज्यातील क्लार्क विद्यापीठातील प्रोफेसर) यांनी निसर्गवाद या विचारप्रणालीचे जोरदार समर्थन केले. त्यांनी लिहिलेला इन्फ्ल्युएस ऑफ जिऑग्राफीकल इन्व्हिरॉनमेंट (भौगोलिक पर्यावरणाचे परिणाम) हा मानवी भूगोलातील एक श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात त्यांनी मानव हा निसर्गाचा गुलाम आहे, असे म्हटले आहे. मानवाची संपूर्ण जडणघडण सर्वस्वी निसर्गानुसार होते, ही त्यांच्या विवेचनातील मध्यवर्ती कल्पना होती. अगदी टोकाची भूमिका घेताना मानवास लाभलेली बुद्धी, स्फूर्ति आणि कार्यक्षमता तसेच त्याचे आचार-विचार, रीतिरिवाज इत्यादी नैसर्गिक घटकांवरच अवलंबून असतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. पर्वतीय प्रदेशात निसर्गाने मानवास डोंगर चढण्यासाठी जसे जास्त शक्तिशाली पाय आणि स्नायू दिले, तसे किनारपट्टीच्या प्रदेशांत त्यास होडी चालविण्यासाठी भरदार छाती आणि ताकदवान हात दिले. अशाप्रकारे निसर्गवाद आवर्जून सांगणाऱ्या या विदूषीने धर्म, धार्मिक कल्पना, रूढी यांवरही निसर्गाचा परिणाम कसा होतो, हे स्पष्ट केले. राट्सेल यांच्या उत्क्रांतिवादी जीवविज्ञान (इव्होल्युशनरी बायोलॉजी) या मूळ विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. राट्सेल यांचा दुसरा विद्यार्थी व भूगोलज्ञ एल्सवर्थ हंटिंग्टन यांनीही सेंपल यांच्याच कालावधीत या सिद्धांताच्या प्रचारासाठी कार्य केले. हंटिंग्टनच्या सिद्धांताला हवामानीय निसर्गवाद असे म्हटले आहे. त्यांच्या सिद्धांतानुसार विषुववृत्तापासूनच्या अंतरावर आर्थिक विकास अवलंबून असतो. ते म्हणतात, समशीतोष्ण कटिबंधीय हवामानात मानवी प्रगतीला, आर्थिक वृद्धीला व कार्यक्षमतेला चालना मिळते. याउलट, उष्ण कटिबंधीय प्रदेशात विकासात अडथळे येतात. हंटिंग्टन यांनी सौम्य व कडक असे पृथ्वीचे दोन हवामान विभाग पाडले. यांपैकी सौम्य हवामानाच्या सुपीक नद्यांच्या खोऱ्यांत ईजिप्शियन, मेसोपोटेमियन, चिनी, सिंधु या प्राचीन संस्कृतींचा उगम आणि विकास झाला; याचे कारण तेथील अनुकूल हवामान. कार्ल मॅकी यांनी जमीन व वनस्पती या पर्यावरणीय घटकांचा मानव आणि प्राणी यांच्या आरोग्य व उंचीवर होणारे परिणाम उदाहरणांसह स्पष्ट केले. उदा., ब्रिटिश बेटांपैकी सर्वांत उत्तरेकडील बेटावर जगातील सर्वांत बुटके (उंची फक्त सुमारे ०.९ मी. ते ३ फूट) घोडे आढळतात; परंतु ते जेव्हा संयुक्त संस्थानांत नेले, तेव्हा तेथील नवीन वातावरणात त्यांच्या पुढील पीढीतील घोड्यांची उंची वाढत जाऊन ती तेथील इतर जातीच्या घोड्यांच्या सामान्य उंचीपर्यंत वाढत गेली. जे चिनी व जपानी लोक यूरोप-अमेरिकेत स्थलांतरित झाले, तेथे त्यांच्या वारसांचे वजन व उंची वाढलेली आढळली. जीवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, नगररचनाकार व भूगोलज्ञ पॅट्रिक गेडिस यांच्या मते, पौष्टिक आहार न घेणारे मलेरियाने पीडित बनतात. उदा., भारतात शाकाहारी हिंदू लोकांपेक्षा मटण खाणाऱ्या मुस्लिम लोकांना तुलनेने मलेरियाची बाधा फारच कमी होते. अशाप्रकारे निसर्गवाद्यांच्या मते, मानवी जीवन हे पर्यावरणीय घटाकांनुसार निश्चित होत असते. त्यासाठी त्यांनी वरीलप्रमाणे वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.
निसर्गवादावरील आक्षेप : एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात निसर्गवादाचा प्रसार करण्यात निसर्गवादी यशस्वी झाले असले, तरी इ. स. १९२० च्या दशकात या सिद्धांतात अनेक चुकीचे दावे असल्याचे आढळले. टिकाकारांच्या मते, हा सिद्धांत म्हणजे वांशिक भेद व कायमस्वरूपी जुलमी साम्राज्यशाहीचा पुरस्कार करणारा आहे. अमेरिकन भूगोलज्ञ कार्ल सॉयर यांच्या मते, पर्यावरणीय निसर्गवाद म्हणजे प्रदेशाच्या संस्कृतीबद्दल अपरिपक्व असे सामान्यीकरण असून त्याला प्रत्यक्ष निरीक्षणाचा किंवा इतर संशोधनाचा आधार नाही. वर्तमानकाळात विज्ञानात एवढी प्रगती झालेली आहे की, अशा परिस्थितीत अनेक भूगोलशास्त्रज्ञ निसर्गवाद ही विचारप्रणाली मान्य करीत नाहीत. निसर्ग हा एकसुरी असून त्याच्यात शिस्त नाही. ती शिस्त व कल्पकता मानवाने आणली असून त्यातील विविधता मानवाने निर्माण केली आहे. माणसाचा हात लागेपर्यंत पृथ्वीचा बहुतेक भूभाग जंगलांनी आणि दलदलींनी व्यापला होता. त्या हिरव्या पाणथळ आवरणात भव्यता होती; पण विविधता नव्हती. प्राचीन काळी जंगलांनी पृथ्वीवरील विविधता जवळजवळ झाकून टाकली होती. मानवाने पृथ्वीवर जी सृजनशील परिवर्तने घडवून आणली, त्यामुळे विविधता निर्माण झाली. सर्वांत चित्तवेधक भूप्रदेश म्हणजे प्राचीन अरण्ये किंवा मानव स्पर्शविरहित निसर्ग नव्हे, तर माणसाने फुलबागा, पायवाटा, कुरणे, उद्याने, शेती, तलाव अशी मानवीकरण केलेली दृष्ये आहेत. काश्मिरमधील दल सरोवर, ऊटकमंड येथील उटीबाग अशी पृथ्वीच्या मानवीकरणाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. मानवनिर्मित परिसर निकोप ठेवणे हे निसर्गाला जमत नाही. पृथ्वीचे मानवीकरण प्रचंड वेगाने झाल्यामुळे परिसराचे आरोग्य माणसाने घेतलेल्या काळजीवरच अवलंबून असते. शेतकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास हजारो वर्षे उत्पन्न देणाऱ्या शेतजमिनी गवत आणि झुडुपांनी व्यापून जातात. दलदली साफ न ठेवल्यास मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे निसर्ग माणसाने लक्ष दिल्याशिवाय आपली गुणवत्ता राखू शकत नाही. काही तज्ज्ञांच्या मते, मानव आता इतका शक्तिमान झाला आहे की, ज्या अशक्य गोष्टी होत्या, त्या शक्य करीत आहे. समान पर्यावरण असूनदेखील तेथील लोकांच्या जीवनावर सारखा परिणाम झालेला दिसत नाही. उदा., विषुववृत्तीय प्रदेशात राहणाऱ्या काही जमाती शिकार, काही फळे व कंदमुळे गोळा करणे व काही मासेमारी करतात. बिहारमधील काही संथाळ शेती करतात, तर काही पशुपालन करतात. निलगिरी पर्वतीय प्रदेशात राहणारे तोडा पशुपालन करतात, तर त्याच प्रदेशात राहणारे कोटा हे मातीची भांडी बनवितात. वरील उदाहरणांवरून असे स्पष्ट होते की, एकाच प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर तेथील पर्यावरणाचा समान परिणाम होत नाही. आजपर्यंत मानवाच्या प्रगतीचा इतिहास पाहिला, तर मानवाने प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती केली. पूर्वी शीत प्रदेशात शेती अशक्य होती, तेथे आता शेती होत आहे. वाळवंटी प्रदेशांतदेखील मानवाने जलसिंचनाचा विकास केला आहे. त्यामुळे काही शास्त्रज्ञ केवळ निसर्ग शक्तिमान आहे हे मान्य करीत नाहीत.
मानवामधली गुणवैशिष्ट्ये जसे त्वचा, केस, नाक, डोळे, डोके, उंची, चेहरा, ओठ इत्यादी केवळ प्राकृतिक भिन्नतेमुळे येत नाहीत, तर ती अनुवांशिक असून ती माता-पित्याप्रमाणे असतात. प्राकृतिक परिस्थितीमुळे ही गुणवैशिष्ट्ये बनतात असे मानले, तर अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात हजारो वर्षे वास्तव्य करणाऱ्या तेथील माणसांत आफ्रिकेतील निग्रॉईड जमातीप्रमाणे गुणवैशिष्ट्ये आढळत नाहीत. वास्तविक आफ्रिकेच्या काँगो नदीच्या खोऱ्यातील व द. अमेरिकेच्या अॅमेझॉन खोऱ्यातील भौगोलिक परिस्थिती तंतोतंत समान आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, कॅनडा यांसारख्या अनेक देशांतील विद्वानांनी निसर्गवादावर टिकेची झोड उठविली. जुलियन स्टीवर्ड यांनी निसर्गवादी-शक्यतावादी यांच्यातील वादाबाबत प्रतिक्रिया देताना १९५५ मध्ये सांकृतिक परिस्थितिविज्ञान या संज्ञेचा विकास केला. आजच्या भूगोलात निसर्ग व समाज यांचा एकमेकांवर आणि पर्यावरणावर कसा परिणाम होतो, या दृष्टिकोणावर अधिक भर देण्यात येतो. विसाव्या शतकाच्या प्रारंभी अॅल्फ्रेड लूई क्रोबर (अमेरिकन मानवशास्त्रज्ञ) यांच्या सारख्या मानवशास्त्रज्ञांनी पर्यावरणीय निसर्गवादावर टिकेची झोड उठविली. या टिकाकारांनी दावा केला की, काही सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या विस्तारावर पर्यावरणाच्या काही मर्यादा येत असतीलही (उदा., आर्क्टिक प्रदेशात शेती करणे अशक्य आहे); परंतु शेतीसारख्या व्यवसायांचा इतर प्रदेशांत उगम आणि विस्तार कसा झाला, याचे विश्लेषण पर्यावरणवादी देऊ शकत नाहीत.
अशाप्रकारे निसर्गवाद या विचारप्रणालीवर अनेक तज्ज्ञांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे आता ही विचारप्रणाली मागे पडली आहे. अशा टिकेमुळे सांस्कृतिक विकासाचे विश्लेषण करण्यासाठी पर्यावरणीय संभववाद (शक्यतावाद) ही विचारप्रणाली पुढे आली. १९५० च्या दशकात पर्यावरणीय निसर्गवादाची संपूर्ण जागा पर्यावरणीय शक्यतावादाने घेतली.
संदर्भ :
- Freedman, T. E., Hundred years of Geographer, London, 1961.
- Husain, Majid, Human Geography, Jaipur and Delhi, 1994.
समीक्षक ꞉ सुरेश फुले