नव-निश्चयवाद.थांबा व जा निसर्गवाद (स्टॉप अँड गो डिटरमिनिजम). नव-निसर्गवाद हा एक भौगोलिक सिद्धांत असून त्यात निसर्गवाद आणि संभववाद या दोन्हींमधील घटकांचा एकत्रित विचार करून पर्यावरणाचा मानवी क्रिया आणि त्याच्या कृतीवर (क्रियाशीलतेवर) कसा परिणाम होतो, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निसर्गवाद व संभववाद या दोन विचारसरण्या परस्परविरोधी आहेत. विसाव्या शतकातील भूगोलशास्त्रज्ञांनी या दोन विचारसरण्यांचा मध्यबिंदू साधण्याचा प्रयत्न केला. याच विचारसरणीस नव-निसर्गवाद किंवा थांबा व जा निसर्गवाद असे म्हणतात. ग्रिफिथ टेलर हे या विचारसरणीचे प्रवर्तक आहेत. या विचारसरणीनुसार केवळ निसर्ग प्रभावी नाही. काही ठिकाणी निसर्ग शक्तिमान असतो. अशा ठिकाणी मानवाला निसर्गाचे रहस्य जाणून व त्याच्याशी मिळतेजुळते घेऊन आपले जीवन जगावे लागते; परंतु काही ठिकाणी निसर्गापेक्षा मानव शक्तिमान ठरतो. काही ठिकाणी मानव आपल्या बुद्धिचातुर्याने विजय मिळवू शकतो. त्यामुळे भूगोलाच्या अभ्यासामध्ये निसर्ग व मानव या दोन्ही घटकांना सारखेच महत्त्व आहे. यालाच थांबा व जा विचारसरणी म्हणतात. अर्थात नव-निसर्गवाद ही विचारसरणी नव-निसर्गवादाकडे झुकलेली आहे, हे विसरून चालणार नाही.
वुलरीज फ्लूअर, हरबर्टसन, रॉक्सबी या ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञांनी, तसेच एल्सवर्थ हंटिंग्टन कार्ल सायर या अमेरिकन भूगोलशास्त्रज्ञांनी या विचारसरणीचे समर्थन केले आहे. या सिचारसरणीत निसर्ग-मानव संबंधाची तुलना शहरातील गजबजलेल्या रस्त्यावरील लाल व हिरव्या वाहतूक नियंत्रक संदेश दिव्यांशी (सिग्नलशी) केलेली आहे. लाल दिवा म्हणजे प्रतिकूल निसर्ग आणि हिरवा दिवा म्हणजे अनुकूल निसर्ग. जेव्हा लाल संदेश दिवा लागतो, म्हणजेच जेव्हा निसर्ग प्रतिकूल असतो, तेव्हा मानवाने हिरवा संदेश दिवा लागेपर्यंत म्हणजेच निसर्ग अनुकूल होईपर्यंत थांबले पाहिजे, अन्यथा त्याचा विनाश अटळ आहे. अशा तुलनेमुळेच या विचारसरणीला थांबा व जा निसर्गवाद म्हणून ओळखले जाते. उदा., जून महिन्यात जेव्हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावरून नैर्ऋत्य मॉन्सून वारे वाहू लागतात, तेव्हा समुद्र खवळलेला असतो; समुद्रात उंचउंच लाटा निर्माण झालेल्या असतात; म्हणजेच निसर्ग प्रतिकूल असतो, तेव्हा कोळी लोकांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे संदेश दिले जातात. त्यामुळे कोळी लोकांना साधारण सप्टेंबरपर्यंत, म्हणजेच निसर्ग अनुकूल होईपर्यंत (पावसाळा संपेपर्यंत) मासेमारीसाठी अरबी समुद्रात जाता येत नाही.
निसर्ग प्रतिकूल असताना मानवाला आपल्या योजनांची पूर्तता करता येत नाही. त्याला मन मानेल ते उद्योग, व्यवसाय करता येत नाहीत. टेलर पुढे म्हणतात की, निसर्गाने घालून दिलेल्या चौकटीतच मानवाला मुक्तपणे विकास करता येतो; परंतु निसर्गरूपी नियंत्रकाचे इशारे न पाळल्यास गंभीर अपघात होण्याचा संभव असतो. टेलर यांच्या मते, मानव हा काही कमी महत्त्वाचा घटक नाही. जेथे मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याने विकास करून घेतलेला आहे, तेथे त्याला निसर्गाची साथ मिळालेली आहे. कॅनडाच्या प्रेअरी भागात मानवी प्रयत्नांमुळेच ते गव्हाचे कोठार होऊ शकले; परंतु प्रेअरीतील सपाट, सुपीक प्रदेश व उन्हाळ्यात गहू घेता येईल, अशी अनुकूल परिस्थिती मूलत: निसर्गाची असते; म्हणूनच मानवी प्रयत्न तेथे यशस्वी झाले.
टेलर यांचे निष्कर्ष जरी निसर्गवादास जवळचे असले तरी, मानवी पसंती, निवड या गोष्टीही महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणतात. विकासातील उद्दिष्टे गाठताना निसर्गाने काही ठिकाणी अनेक पर्याय दिलेले आहेत. त्यातला कोणता पर्याय निवडायचा हे मानव ठरवितो. प्रत्येक विभागात काही नैसर्गिक बंधने असतातच. उदा., कॅनडाचा उत्तरेकडील ध्रुव प्रदेश, ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेश, हिमाच्छादित अंटार्क्टिका खंड, टंड्रा प्रदेश येथील निसर्ग अतिप्रबळ असल्यामुळे तेथे मानवी प्रयत्नांना यश मिळणे कठीण आहे. अशा ठिकाणी संभववादाचा पुरस्कार करण्यात काहीच अर्थ नाही.
ऑस्ट्रेलिया व अरेबिया यांसारख्या रूक्ष प्रदेशात शुद्ध पाणी पुरविले, अंटार्क्टिकातील खनिजे व कॅनडातील वन व पशुधन यांच्या साहाय्याने विकास घडवून आणला, तरी तेथील भाग उजाडच राहणार; कारण ज्या प्रमाणात निसर्गाची अनुकूलता दिसते, तेवढ्याच प्रमाणात मानवी प्रयत्न यशस्वी होण्यास वाव असतो. जेथे निसर्गाची थोडी अनुकूलता दिसते, अशाच ठिकाणी मानवी मन विकासाचा विचार करू शकते. अशाप्रकारे थांबा व जा निसर्गवादाचे स्वरूप समायोजनेसारखे असते. निसर्ग व मानव हे दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी प्रसिद्ध भूगोल व इतिहासतज्ज्ञ ओ. एच. के स्पेट यांनी संभाव्यतावाद (प्रोबॅबलिजम) ही नवीन विचारप्रणाली मांडली आहे.
संदर्भ :
- Freedman, T. E., Hundred years of Geographer, London, 1961.
- Husain, Majid, Human Geography, Jaipur and Delhi, 1994.
समीक्षक ꞉ सुरेश फुले