अब्राहम, प्रिया : (१९६४). भारतीय वैद्यकशास्त्रज्ञ आणि विषाणुतज्ज्ञ. त्यांनी कोव्हिड विषाणूच्या (SARS-CoV-2; सार्क-कोव्ह-२) चाचणी तंत्र आणि जीनोम अभ्यासाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी), पुणे येथे  त्या संचालक पदावर कार्यरत होत्या.

अब्राहम यांचा जन्म केरळच्या कोट्टयाम जिल्ह्यात झाला. हायस्कूलमध्ये असताना त्यांना जीवविज्ञानाची आवड निर्माण झाली. त्यामुळे हायस्कूलमध्ये विज्ञान आणि गणित शिक्षण झाल्यानंतर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरमधून त्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला. पुढे त्यांनी तेथूनच एम.डी. आणि जीवशास्त्रात पीएच.डी. अशा पदव्या संपादन केल्यात (१९८१). त्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम करण्याची आवड असल्याने त्यांनी विषाणू-विज्ञानात प्राविण्य मिळविण्याचे ठरविले. पीएच.डी.च्या संशोधनात त्यांनी एचजीव्ही (हिपॅटायटिस-जी विषाणू) आणि संसर्ग व कर्करोग यांचा संबंध शोधण्यासाठी मकाव जातीच्या माकडावर प्रयोग केले होते.
अब्राहम यांना विषाणू-विज्ञान हे वैद्यक, कृषी, बालरोग आणि पाळीव प्राणी संगोपनांमध्ये महत्त्वाचे आहे, यांची जाणीव होती. विषाणू-विज्ञान समजल्याने पेशी विषाणूला कसा प्रतिसाद देतात हे अधिक चांगले समजते. तसेच कर्कपेशीचे ज्ञान आणि विषाणू याचा संबंध समजण्यास मदत होते. प्लेग आणि कॉलरा यांशिवाय बहुतेक सर्व संसर्गजन्य आजार विषाणूमुळे होतात. कावीळ (हिपॅटायटिस) आणि मानवी पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही विषाणू) वर त्यांनी ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय जीवशास्त्र (क्लिनिकल बायॉलॉजी) विभागप्रमुख असताना संशोधन केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या विषाणू आजारावरील विभागांमध्ये विविध पातळीवर त्या सल्लागार होत्या. आयसीएमआर – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सल्लागार समितीवर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विषाणू संसर्गजन्य आजारावरील निरीक्षणे केली जातात.
अब्राहम यांचे प्रमुख संशोधन रक्तजन्य हिपॅटायटिस विषाणूवर होते. या संशोधनासाठी त्यांना ब्रिटिश कौन्सिलची दक्षिण भारतातील यकृताच्या कावीळ संसर्गासाठी राखीव ठेवलेली शिष्यवृत्ती देण्यात आली. आवश्यक निधी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हिपॅटायटिस-बी विषाणू संसर्ग व त्याचा जनुकीय संबंध आणि जुनाट यकृत विकार यांवर काम करण्यासाठी पुरविण्यात आला.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांच्या चमूच्या साहाय्याने त्यांनी कोव्ह‍िड विषाणू चाचणी विकसित केली, त्या चाचणीला एलायझा (ELISA; Enzyme Linked Immunosorbent Assay) असे नाव देण्यात आले. ती भारतातील पहिली स्वदेशी लस (कोव्हॅक्सिन) बनवण्यातील यशस्वी पायरी होती. त्यासाठी जिवंत विषाणू प्रयोगशाळेत वाढवण्यात आला. भारतासह असे प्रयत्न फक्त पाच देशांमध्ये यशस्वी झाले होते. अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली आयसीएमआर – एनआयव्ही कोव्हिडसाठी लस बनवता आल्याने कोव्ह‍िड नियंत्रण टप्प्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत बायोटेक या बेंगलोर येथील भारतीय लस निर्मिती केंद्रात लस बनवता आली. त्यांच्या प्रयोगशाळेत केलेल्या सार्स कोव्ह‍िड विषाणूच्या जीनोम क्रम निर्धारणाला जागतिक मान्यता मिळाली आहे.

अब्राहम यांना त्यांच्या कार्याबद्दल पुढील अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळाले  : न्यू दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे बिझिनेस एक्सलन्स अँड इनोव्हेटिव्ह ॲवॉर्ड, जननी ॲवॉर्ड, मेडिकल रिसर्च लीडरशिप २०२१. त्यांनी अनेक जागतिक आरोग्य संघटनेमार्फत म्यानमार आणि श्रीलंकेच्या एचआयव्ही चाचणी कार्यक्रमात भाग घेतला. त्यांचे आजपर्यंत १६० हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. विषाणू चाचण्या आणि लस निर्मितीतील त्यांचे कार्य आता जगमान्य झाले आहे. निपाह आणि झिका विषाणूवर सध्या त्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने काम करीत आहेत. त्याचबरोबर एचआयव्ही ह्युमन सेरोपॉझिटिव्ह व्यक्तीमधील ह्युमन पॅपिलोमा व्हायरस संसर्ग आणि गर्भाशय ग्रीवा व गर्भाशय शीर्ष कर्करोग यावर कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटी आणि न्यूयॉर्कच्या अल्बर्ट आइनस्टाइन कॉलेज यांच्या सहकार्याने संशोधन करत आहेत. सध्या त्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर अंतर्गत येणाऱ्या ॲडव्हान्स्ड व्हॅक्स‍िनॉलॉजी कोर्सेस इन इंडिया या विभागात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

कळीचे शब्द : #एलायझा #व्हायरस #पॅपिलोमा #कोव्हॅक्सिन

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी