नाईक, चित्रा (Naik, Chitra) ꞉ (१५ जुलै १९१८ – २४ डिसेंबर २०१०). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ. चित्राताई यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील मुंबईतील नामांकित डॉक्टर, तर आई गोदावरी या गृहिणी होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील सर नारायण चंदावरकर प्राथमिक शाळेत झाले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांची चाचणी घेवून त्यांना एकदम चौथीत प्रवेश दिला. प्राथमिकनंतर त्या राममोहन इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. पुढील शिक्षणासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी. ए. ऑनर्समध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. भगिनी सुमती यांच्या आग्रहाखातर जून १९४२ मध्ये नाशिक येथील मुलींच्या सरकारी शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्याच दरम्यान ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडोचा ठराव झाला आणि त्यांनी सरकारी शिक्षिकेचा राजीनामा देवून मुंबईला परतल्या. मुंबईत त्यांनी शिकवणी सुरू केली. शिकविणी घेतच त्यांनी सेकंडरी टीचर्स ट्रेनिंगमध्ये प्रवेश घेतला आणि बी. टी. च्या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करून महाविद्यालयाची फेलोशिप मिळविली. त्यातून त्यांनी एम. एड. शिक्षणासाठी नाव नोंदविले. चित्राताई यांनी इ. स. १९४५ मध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडलेल्या मोठ्या घटनांवर पत्रकारीतेतून लेखन करण्यास सुरुवात केली; मात्र त्याचा सुमती यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्या परत अध्यापनाकडे वळल्या. कालांतराने त्या मुंबई महानगर पालिकेच्या मुलींच्या शाळेत इन्स्पेक्टर झाल्या. त्यानंतर सेकंडरी टीचर्स ट्रेनिंगमध्ये साहाय्यक प्राध्यापक आणि काही काळातच शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्या. एम. एड. चे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी रा. वि. परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इ. स. १९४९ मध्ये मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली. या कालावधीत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये मानद प्राध्यापक म्हणून व्याख्यानेही दिली.
चित्राताईंना १९५० मध्ये ब्रिटनमधील मनोदुर्बल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळाली. तेथील अभ्यास पूर्ण करून त्या मुंबईला परतताच त्यांची मुंबई सरकारच्या शिक्षण सेवेत ‘साहाय्यक शैक्षणिक तपासणी अधिकारी’ या पदावर नेमणूक झाली. ही जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांना १९५३ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात शैक्षणिक अर्थशास्त्र आणि ग्रामीण शिक्षणाचे व्यवस्थापन अभ्यासण्यासाठी फुलब्राइट फेलोशिप मिळाली. त्या तेथेही गेल्या आणि आपला अभ्यास पूर्ण करून मायदेशी परतताच सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदी नियुक्त झाल्या. गारगोटी येथे १९५२-५३ मध्ये ‘मौनी विद्यापीठाची’ स्थापना झाली. या वेळी चित्राताई यांना संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण मिळाले. या भेटी दरम्यान त्यांची जे. पी. नाईक आणि आचार्य भागवत यांच्याशी ओळख झाली. आचार्य भागवत आणि त्यांचे स्नेही यांच्या आग्रहाखातर १९५५ मध्ये चित्राताई आणि जे. पी. नाईक यांचा आंतरजातीय विवाह घडून आला. त्यांचे माहेरचे व सासरचे आडनाव नाईकच.
चित्राताई यांनी जून १९६१ मध्ये कोल्हापूरच्या शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या, १९६३ मध्ये राज्य शिक्षणशास्त्र संस्था पुणेच्या संचालिका, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका इत्यादी पदे भूषविली आहेत. जे. पी. नाईक यांनी सुरू केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेचे १९७६ मध्ये पुण्यात स्थलांतर झाले, तेव्हा संस्थेच्या मानद संचालिका म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. शिक्षण आणि समाज या त्रैमासिकाच्या संपादक म्हणूनही त्यांनी शेवटपर्यंत कार्य केले. जे. पी. नाईकांच्या निधनानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या विविध कामांत स्वत:ला वाहून घेतले. या संस्थेतर्फे त्यांनी ग्रामीण भागातील महिला, बालके, शेतकरी, शेतमजूर, छोटे कारागीर यांच्या विकासासाठी संशोधन व प्रशिक्षणांची व्यवस्था केली. पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर संशोधन केंद्र, पाबळ येथील विज्ञान आश्रम, ग्रामीण विज्ञान विनिमय केंद्र, श्रमिक विद्यापीठ, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण साधन केंद्र, जे. पी. नाईक शिक्षण व विकास केंद्र, मौनी विद्यापीठ, गारगोटी इत्यादी संस्थांची बांधणी व विस्तार केला.
चित्राताईंनी अंशवेळ प्राथमिक शिक्षण हा प्रकल्प राबविला आणि त्यामध्ये विविध शैक्षणिक संशोधन व सुधारणा केल्यात. त्यांच्या या प्रकल्पाची प्रशंसा युनेस्कोने केली आणि त्यासाठी त्यांना ‘जॅनअेमॉस कोमेनिअस मेडल’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला. त्यांचा हा प्रकल्प अनेक विकसनशील देशांनी स्वीकारून तो आपापल्या देशांत राबविला. या कार्याची दखल घेत भारत सरकारनेही त्यांना १९८६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविले. त्यांच्या प्रौढ शिक्षणातील कार्यामुळे अनेक देशांनी त्यांना प्रौढ शिक्षणतज्ज्ञ म्हणून निमंत्रित कले. भारत सरकार व अन्य संस्थांनी प्रौढशिक्षण आंदोलनासाठी त्यांची सल्लागार म्हणून नियुक्त केली. त्यांनी सतत महिला, बालकल्याण, वंचित आणि प्रौढ यांसारख्या घटकांसाठी कार्य केले आहे. त्यांनी नवसाक्षर प्रौढांसाठी व लहान मुलांसाठी ८२ पुस्तके लिहिली. त्यांतील काही पुस्तकांचे इतर भारतीय भाषांमध्येही प्रकाशन झाले.
चित्राताईंना त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांमध्ये सर्वांसाठी शिक्षण या योगदानाबद्दल राजा रॉय सिंग पुरस्कार, महिला व बालकल्याण कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर साक्षरता पुरस्कार, एनसीआरटीचा राष्ट्रीय पुरस्कार, साक्षरता कार्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान गोदागौरव पुरस्कार, महात्मा गांधी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने बापू पुरस्कार इत्यादी.
चित्राताईंचे श्वसनाच्या त्रासामुळे निधन झाले.
संदर्भ ꞉ पाईकराव, व्ही. (संपा.), संवादपत्रिका, नाशिक, २०२२.
समीक्षक ꞉ कविता साळुंके