संवेदनाचा एक महत्त्वाचा प्रकार. सर्व सजीवांना गंध संवेदातून अत्यावश्यक माहिती उपलब्ध होते. बहुतेक सजीवांतील गंध मार्गातील ग्राही प्रथिने आणि गंधज्ञान कार्यपद्धती जवळजवळ एकसारखी आहे. गंध ग्राहीभोवती असलेल्या द्रवामध्ये गंध रेणू मिसळल्याशिवाय गंधज्ञान होत नाही. अशा ग्राहीभोवती असलेल्या आवरणामुळे हे ग्राही परिग्राही संवेद (Perireceptor) या नावाने ओळखले जातात. त्यांचा गंध संवेद आणि मध्यवर्ती चेता संस्थेतील स्मृती कार्यपद्धती यांमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
मानवी मेंदू दृष्टी संकेतावर अधिक अवलंबून असल्याने त्यांच्यामध्ये रासायनिक संकेतांना अधिक महत्त्व नसते. परंतु, मानवेतर सजीवांमध्ये रासायनिक संकेत अधिक महत्त्वाचे असतात. प्राथमिक रचना असलेले सजीव (उदा., जीवाणू, आदिजीव आणि स्लाईम मोल्ड) रासायनिक संकेतावर बहुतांशी अवलंबून असतात. प्रत्यक्षात सर्व सजीव पेशी रसायन संवेदी असतात. पेशींचे रसायन संवेदी असणे हा त्यांच्या ग्राही प्रथिन उत्क्रांतीचा भाग आहे. गंध संकेत हा रसायन संकेतांचा एक लहान भाग आहे. गंध संकेत ग्राही प्रथिनांच्या शोधाबद्दल २००४ मध्ये लिंडा बक (Linda B. Buck) आणि रिचर्ड अॅक्सेल (Richard Axel) या वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जमिनीवरील पृष्ठवंशी आणि कीटक यांचे गंध संवेद हे कमी गंध कण असलेले व हवेमधून पसरणारी बाष्पनशील रसायने असावीत अशी समजूत आहे. मासे आणि कवचधारी जलचर यांचा हवेतील बाष्पनशील रसायनांशी संपर्क येत नाही. परंतु, त्यांची गंध इंद्रिये रचनेच्या दृष्टीने जमिनीवरील प्राण्यांसारखीच असतात. जलचर प्राण्यांच्या गंध संवेदातील गंध कण द्रवातील चवकण (Sapid) असतात. मार्जार मीन (कॅटफिश) मधील रुची संवेद त्याच्याच अमिनो अम्लाशी जुळतात. गंध संवेद रसायने व रुची संवेद हे एकसारखे आहेत की वेगळे याबाबत संशोधन सुरू आहे.
प्राण्यांचे गंध संवेद उलगडणे एक आव्हान आहे. कारण या संवेदांनी दिलेली माहिती सजीव वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात. उदा., परिसरातील गंध अन्न, पाणी व लपण्याच्या जागा शोधण्यासाठी सजीवास उपयोगी पडतात. तसेच इतर सजीवांनी उत्सर्जित केलेले गंध भक्ष्याचा शोध घेणे, स्वगृह शोधन, सहचर संबंध, आपल्या परिसराची ओळख, शत्रुला ओळखणे आणि त्याला टाळणे, जीवन चक्र आणि परागण यांच्याशी आहे.
विशिष्ट उगमापासून निघालेल्या गंधद्रव्यांना एकत्रितपणे कामगंध (Pheromone) असे म्हणतात. याचा उपयोग नर आणि मादी यांना एकत्र आणण्यासाठी होत असला तरी याचे कार्य अधिक विस्तृत आहे. उदा., ओळखीची खूण, समूहातील स्थान, हल्ला करण्यासाठीचा संकेत, तसेच स्वसमूहाची कमीत कमी हानी होण्यासाठी दुसऱ्या स्वजातीयांपासून ठरावीक अंतर ठेवणे इत्यादी. काही गंध संवेद बहुधा गुंतागुंतीचे किंवा किचकट असतात. यातील बहुतेक रेणूंचे आकार व रचना सैद्धांतिक मर्यादेत असतात. यांची मर्यादा जलचर सजीवांमध्ये बदलते, कारण जल माध्यमात गंध रेणू मोठ्या संख्येने असतात. गंध रेणू म्हणजे एक गंध रसायन नसून ते विविध रसायनांचे मिश्रण असते. कीटकांमधील कामगंध हा एक रेणू असावा व त्यानुसार नर कीटक मादी कीटकाकडे आकर्षित होतो असा अंदाज होता. परंतु, एका संशोधनानुसार असे सिद्ध झाले की, कोबीमधील लूपर पतंग वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने नैसर्गिक कामगंधानुसार प्रवास करतो. यासाठी मादीच्या शरीरातून स्रवणारे सहा रसायनांचे मिश्रण नरास आकर्षित करण्यास प्रवृत्त करते.
बहुतेक सजीवांना गंध संवेद अधून मधून ग्रहण करता येतात. कारण संवेदांचे आकलन हे माध्यमांवर अवलंबून असते. विशेषेकरून मोठ्या आकाराच्या सजीवांना हवा किंवा पाणी या माध्यमातून मिळणारे संवेद त्यांच्यापर्यंत प्रवाह उगमापासून मिळत राहणे यात अडचण येते. कारण या माध्यमातील गंधकण लाटा अनिश्चित स्वरूपाच्या असू शकतात. त्यामुळे अशा स्थितीत माध्यमातून सजीव गेला किंवा माध्यम सजीवावरून गेले तरीही अधून मधून गंध निश्चित येत राहतो.
पहा : संवेदन; संवेदनग्राही.
संदर्भ :
- https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0896627305008949
- https://en.wikipedia.org/wiki/Sense_of_smell
समीक्षक : प्रमोद जोगळेकर