मध्य आशियातील किरगीझस्तान या देशाची राजधानी. लोकसंख्या ११,२७,७२० (२०२४ अंदाज). चू नदीखोऱ्यात, किरगीझ पर्वताच्या नजीक स. स. पासून ७५० ते ९०० मी. उंचीवर हे शहर वसलेले आहे. ग्रेट (बॉलशॉय) चू कालवा ही चू खोऱ्यातील विस्तृत कालवाप्रणाली असून बिश्केक शहराच्या उत्तर भागातून हा कालवा गेलेला आहे. देशातील हे प्रमुख औद्योगिक, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र आहे.

कोकँदच्या उझबेक खानाटे यांनी इ. स. १८२५ मध्ये येथे एक किल्ला बांधला. इ. स. १८६२ मध्ये रशियनांनी हे ठिकाण आपल्या ताब्यात घेतले. स्थानिक लोक या ठिकाणाला बिश्केक नावाने ओळखत असले, तरी रशियनांनी चुकीने याचा उल्लेख पिश्पेक असा केला. इ. स. १९१३ मध्ये या ठिकाणाची वस्ती १४,००० होती, त्यात बहुतांश रशियन होते. त्या वेळी हे जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र होते. इ. स. १९२४ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या किरगीझ या स्वायत्त प्रांताचे प्रशासकीय केंद्र म्हणून बिश्केकची निवड करण्यात आली. इ. स. १९२६ मध्ये याच प्रांताचे रूपांतर किरगीझ ऑटोनॉमस सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिकमध्ये करण्यात येऊन पिश्पेक ही त्याची राजधानी करण्यात आली. त्यानंतर बिश्केक येथे जन्मलेले (जन्म १८८५) क्रांतिकारक व लाल सेनेचे कमांडर म्यिखईल व्हस्यील्येव्ह्यिच फ्रून्झ्ये यांच्या नावावरून याचे फ्रून्झ्ये असे नामांतर करण्यात आले. तुर्किसीब लोहमार्ग सुरू झाल्यानंतर (इ. स. १९२४) या शहराची वेगाने भरभराट झाली. इ. स. १८६२ ते १९२६ या कालावधीत ते पिश्पेक व बिश्केक नावाने, तर १९२६ ते १९९१ या कालावधीत ते फ्रून्झ्ये या नावाने ओळखले जात होते. इ. स. १९९१ मध्ये याचे पुन्हा बिश्केक असे नामांतर करण्यात आले.

शहराचा औद्योगिक विकास दोन टप्प्यांत झालेला आहे. येथे इ. स. १९४१ पर्यंत फक्त स्थानिक उपलब्ध कच्च्या मालावर आधारित खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग व इतर लघुउद्योग सुरू होते; मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम रशियातून अवजड उद्योग बाहेर पडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर यंत्रनिर्मिती व धातुकाम उद्योग स्थापन झाले. शहरातील औद्योगिक विकास प्रामुख्याने १९६० च्या दशकात अधिक वेगाने झाला. आता येथे मांस संवेष्टन प्रकल्प, धातू उद्योग, कापड गिरण्या, बांधकाम साहित्य, कातडी वस्तू, तंबाखू, साबण, अन्नप्रक्रिया, कृषी अवजारे निर्मिती इत्यादी उद्योग सुरू असून हे देशातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र बनले आहे.

शहराची रचना आधुनिक नगररचनेनुसार केली आहे. रुंद व दुतर्फा दाट झाडी असलेल्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. हे लोहमार्ग व महामार्गाचे केंद्र असून तेथे मानस हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. उद्याने, वृक्षवाटिका, आसमंतातील हिमाच्छादित पर्वत शिखरे यांमुळे शहराच्या सौंदर्यात चांगलीच भर पडलेली आहे. येथील ऑपेरा बॅले थिएटर प्रसिद्ध असून येथे किरगीझ भाषेतील कार्यक्रम सादर केले जातात. वेगवेगळ्या शासकीय इमारतींबरोबरच रंगमंदिरे, विज्ञान अकादमी (स्था. १९५४), किरगीझ राज्य विद्यापीठ (१९५१), अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल एशिया, बिश्केक ह्यूमॅनिटी युनिव्हर्सिटी, किरगीझ-उझबेक विद्यापीठ, कृषी, वैद्यकीय, तंत्रनिकेतन, शिक्षक प्रशिक्षण इत्यादी शैक्षणिक संस्था येथे आहेत.

समीक्षक ꞉ चौधरी वसंत


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.