महाराष्ट्रातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेले एक पर्यटनस्थळ. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यापासून आग्नेयीस सुमारे ३० किमी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात हे गाव वसले आहे. सोळशी व कोयना या दोन नद्या तापोळ्याजवळ एकत्र येतात. कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या शिवसागर जलाशयाच्या (पश्चजलाच्या) काठावर, सह्याद्री पर्वतरांगेतील एका सोंडेवर हे स्थळ वसले आहे. तापोळ्यापासून पश्चिमेच्या बाजूने बऱ्याच आतपर्यंत कोयना धरणाच्या पाण्याचा फुगवटा पसरलेला दिसतो. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला विस्तीर्ण शिवसागर जलाशय, त्यातील स्वयंचलित बोटी, कयाक होड्या व स्पीडबोट यांमधून नौकाविहाराच्या सुविधा, जलाशयात विखुरलेली लहानलहान बेटे, पर्यटकांना, नवदांपत्यांना त्या एकाकी बेटांवर दिवसातील काही क्षण निवांत एकांतात घालविण्याच्या दृष्टीने निसर्गरम्य वातावरण, चोहोबाजूंनी हिरव्यागार दाट वनश्रीने वेढलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा व इतर भूदृश्ये, परिसरातील वासोटा किल्ल्यासारखी ट्रेकिंगची स्थळे, कँपिंगसाठी उत्तम परिसर, पॅराग्लायडिंगच्या सुविधा, परिसरातील विविध सुंदर भूदृश्ये अशा अप्रतिम सृष्टीसौंदर्यामुळे तापोळ्याला ‘मिनी काश्मीर’ म्हणून संबोधले जाते.
तापोळा येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. आजच्या धकाधकीच्या शहरी वातावरणातून विश्रांती व मन:शांती मिळविण्यासाठी, मनमुराद आनंद मिळविण्यासाठी आणि कौटुंबिक सहलीसाठी हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ निश्चितच चांगले आहे. त्यामुळे दरवर्षी देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. विशेषत: सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांत येथे पर्यटकांचा ओढा अधिक असतो. हौशी पर्यटकांना रात्र शिबिरांसाठीही (कँम्पिंगसाठी) हा परिसर अतिशय सुंदर आहे. पर्यटक येथे स्वयंचलित तसेच वल्हविण्याच्या बोटींमधून साहसी नौकाविहाराचा, पोहणे इत्यादींचा आनंद घेतात. विविध कृषिपर्यटन संस्थांद्वारे पर्यटकांना रात्रीच्या मुक्कामासाठी निवास व भोजनाची सशुल्क सुविधा उपलब्ध केली जाते. शिवाय हॉटेल्सही आहेत. येथील काही स्थानिक कुटुंबे पर्यटकांना मागणीनुसार घरगुती स्वरूपाचे जेवणही बनवून देतात. शिवसागर जलाशयाभोवती ट्रेकिंगसाठी अनेक स्थळे आहेत. या ठिकाणापासून जयगड, वासोटा यांसारख्या किल्ल्यांकडे ट्रेकिंग व पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या खूप असते. किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटा घनदाट अरण्यांतून जात असून त्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो. ट्रेकिंगसठी वासोटा किल्ल्याचे आकर्षण सर्वाधिक असते; परंतु त्या परिसरात फिरण्यासाठी शासनाचे काही नियम किंवा निर्बंध आहेत.
महाबळेश्वर ते तापोळा हा घाटरस्ता आहे. तापोळ्याला जाण्यासाठी महाबळेश्वर येथून खाजगी टॅक्सी मिळतात. तसेच तेथे टॅक्सी सुविधा पुरविणाऱ्या काही खाजगी संस्थाही आहेत. येथे पॅराग्लायडिंग सुविधाही आहे. पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा अधिक आनंद घेता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने तापोळा ते अहीर यांदरम्यान अत्याधुनिक पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलामुळे पर्यटकांसोबतच स्थानिक लोकांनासुद्धा दळणवळणाची सोय उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च यांत बचत होण्यास मदत होईल.
समीक्षक : वसंत चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.