प्रस्तावना : लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येचे वितरण, रचना आणि हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास आहे. याचा परिचर्या व आरोग्यसेवा यांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.विविध वयोगटातील लोकसंख्येला योग्य व उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्याकरिता परिचारिका कटिबद्ध असतात.

लोकसंख्येचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करत असताना लोकसंख्येविषयी घडणाऱ्या स्थित्यंतरांचे निरीक्षण नोंदविणे; लोकसंख्येच्या आकारमानातील बदल; स्त्री, पुरुष अशा प्रकारची संरचना; भौगोलिकदृष्ट्या वर्गीकरण या संकल्पनांचा विचार करावा लागतो. लग्न, गर्भधारणा, लोकांची सामाजिक चलनशीलता (social mobility), स्थलांतर आणि मृत्युदर या लोकसंख्या शास्त्राच्या पाच प्रक्रिया आहेत. या पाच प्रक्रियांचा लोकसंख्येचे आकारमान, संरचना आणि वर्गीकरण या तीन घटकांवर नियमित आणि सातत्याने परिणाम होत असतो.

लोकांचे आरोग्य हे लोकसंख्येचे प्रमाण, ग्रामीण किंवा शहरी असा भौगोलिक विस्तार आणि उपजीविकेकरीता निवडलेले व्यवसाय किंवा उद्योगधंदे यांमधील बदलत्या संबंधांवर अवलंबून असते.

जागतिक लोकसंख्याशास्त्राच्या इतिहासान्वये प्रत्येक देश लोकसंख्या चक्राच्या पाच स्थित्यंतरातून जात असतो. १) पहिल्या टप्प्यात जन्मप्रमाण व मृत्युप्रमाण साधारणपणे सारखेच असल्याने लोकसंख्या प्रमाण बदलत नाही. या स्थित्यंतराला लोकसंख्येची उच्च स्तर स्थिरता उसे म्हणतात. जेव्हा देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात कमकुवत असते जेव्हा ही स्थिती उद्भवते. १९२० पर्यंत भारताची लोकसंख्या याच टप्प्यात होती. २) दुसरा टप्पा म्हणजे जलद वाढणारी लोकसंख्या. या टप्प्यात मृत्युप्रमाणात घट होते, परंतु जन्मप्रमाण उच्च स्तरावर असते. परिणामी लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. आरोग्य आणि रहाणीमानात झालेली सुधारणा हे यामागील प्रमुख कारण आहे. ३) तिसऱ्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो. यामध्ये मृत्युप्रमाण कमी होत असते व तुलनेने जन्मप्रमाण अधिकच घटते. तथापि जन्मप्रमाण हे मृत्युप्रमाणापेक्षा जास्तच असते. जन्मप्रमाणात घसरण ही प्रामुख्याने गर्भनिरोधक, महिला सक्षमीकरण अशा कारणांमुळे दिसून येते. भारत सध्या या टप्प्यात आहे. ४) निम्न स्थिरता हा चौथा टप्पा होय. यामध्ये जन्मप्रमाण व मृत्युप्रमाण अत्यंत कमी असते. परिणामी लोकसंख्या स्थिर राहते. याला “शून्य वाढ-प्रमाण” असेही म्हणतात. ५) पाचवा टप्पा म्हणजे लोकसंख्येचा होत जाणारा ऱ्हास. यात जन्मप्रमाण हे मृत्युप्रमाणापेक्षा खूपच कमी असते. अशा वेळी लोकसंख्येचा ऱ्हास होत जातो.

लोकसंख्या वाढ-घट याचे प्रमाणीकरण (सरासरी %)

अ.   क्र. लोकसंख्या वाढीचा दर % श्रेणीकरण अथवा प्रमाणीकरण
     ‘०’ शून्य वाढ स्थिर लोकसंख्या (Stationary – no growth)
     ० ते ०.५ लोकसंख्या वाढीची मंद गती (Slow growth)
     ०.५ ते १ लोकसंख्या वाढची मध्यम गती (Moderate growth)
     १ ते १.५ लोकसंख्या वाढीची जलद गती (Rapid growth)
    १.५ ते २ लोकसंख्या वाढीची अतिजलद गती (Very Rapid growth)
     > २ लोकसंख्येचा विस्फोट (Explosive growth of population)

लोकसंख्या वर्गीकरण व त्याचा अन्वयार्थ : लोकसंख्येचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करत असताना जगातील आणि भारतातील लोकसंख्या, लोकसंख्येचे वर्गीकरण, त्यात होणारे बदल, लोकसंख्या निर्देशक व उपयोग तसेच लोकसंख्या मोजण्याच्या पद्धती, स्रोत इ. समावेश केला जातो. हे सर्व घटक लोकांना देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांचे नियोजन करताना मार्गदर्शक ठरतात कारण या बाबींचा लोकांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. लोकसंख्येची घनता, वाढीचा दर, जन्म-मृत्यू दर, प्रजनन दर, आयुर्मान, लिंग गुणोत्तर, वयाची रचना (age structure), अवलंबन गुणोत्तर (dependency ratio), साक्षरतेचा दर इ. घटक हे लोकसंख्येचे निर्देशक आहेत. या निर्देशकांचा शासनाला आरोग्य विषयक कार्यक्रमांचे नियोजन करताना, धोरणात्मक निर्णय घेताना, कार्यक्रमांची दीर्घ तसेच लघु कालीन उद्दीष्टे ठरवताना, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना उपयोग होतो.

जनसांख्यिकी दर व गुणोत्तर : लोकसंख्याशास्त्रात जनसांख्यिकी दर व गुणोत्तर हे प्रमुख घटक आहेत, यांद्वारे लोकसंख्येतील बदल आणि वैशिष्ट्ये मोजता येतात.

जनसांख्यिकी दर म्हणजे आकडेवारी जी लोकसंख्येची वैशिष्टे (जन्मप्रमाण, मृत्युप्रमाण, स्थलांतर दर इ.), लोकसंख्येचे गतितत्त्व, कल किंवा प्रवृत्ती समजून घेण्यासाठी वापरली जाते. दर हे साधारणत: स्थूल, विशिष्ट व प्रमाणीकृत अशा तीन प्रकारचे असतात.

लोकसंख्याशास्त्रात जनसांख्यिकी गुणोत्तराचा (प्रमाण) उपयोग लोकसंख्येच्या दोन किंवा अधिक गटांतील संबंधांचे वर्णन करण्यासाठी केला जातो. उदा., लिंग गुणोत्तर, अवलंबन गुणोत्तर इत्यादी. एका पूर्ण संख्येच्या किंवा एखाद्या संपूर्ण भागाच्या तुलनेत एखाद्या समूहाची संख्या दर्शविणे म्हणजे प्रमाण होय. ही संख्या किंवा आकडेवारी नेहमी दर शंभरी प्रमाणात (percentage) गणली जाते.

गणक व भाजक (numerator and denominator) :

  • गणक (Numerator) : एखादी घटना ठराविक लोकसंख्येत आणि ठराविक वेळी किंवा ठराविक काळात किती वेळा घडते याच्याशी गणकाचा संबंध आहे. उदा., जन्म, मृत्यू, आजारपण अथवा होणारा एखादा रोग इत्यादी. दर मोजताना गणक हा भाजकाचा अविभाज्य घटक असतो. परंतु गुणोत्तर मोजताना त्याची गरज नसते.
  • भाजक (Denominator) : भाजकाचा संदर्भ लोकसंख्येशी जोडला जातो. उदा., संपूर्ण वर्षातील लोकसंख्या किंवा वर्षाच्या मध्यांतरीतील लोकसंख्या (जानेवारी ते जून) अथवा शिशु बालक मृत्यू दर, रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण इ. गणक या संकल्पनेस भाजकाशी जोडले तरच ती संख्या अर्थपूर्ण असू शकते.

भाजकाचे मुख्य घटक (Components of denominator) :

१. वर्षाच्या मध्यांतरीतील लोकसंख्या (MYP) : दर किंवा गुणोत्तर काढताना सर्वसाधारणपणे लोकसंख्येच्या आकारमानात जन्म व मृत्यू यामुळे बदल होत असल्याने वर्षाच्या मध्यांतर (प्रत्येक वर्षाचा १ जुलै) हा काल धरला जातो.

२. आजार किंवा रोग होण्याचे प्राबल्य असलेल्या व्यक्ती (Population at risk) : ही रोगपरिस्थितीविज्ञानच्या (Epidemiology) संदर्भातील महत्त्वाची संकल्पना आहे ज्यामध्ये एका व्यक्ती ऐवजी अनेक व्यक्तींना रोग होण्याची शक्यता केंद्रीभूत मानली जाते. उदा., तोंडाचा किंवा  फुप्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असणाऱ्या ४० वर्षे वयोगटावरील सिगारेट ओढणारे किंवा तंबाखू सेवन करणारे एकूण पुरुष ही संख्या भाजकाचा घटक असते.

३. रोग होणारी व्यक्ती व रोग होण्याची वेळ (person–time) : रोगशास्त्रावरील काही संशोधनात्मक अभ्यासात असे दिसते की, वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्यांना होणाऱ्या रोगांचा कालावधी या दोन बाबी भाजकात एकत्रितपणे गृहीत धरावयाच्या असतात. उदा., प्रत्येक व्यक्ती / प्रत्येक वर्षी (per person/per year)

४. रोग होणारी व्यक्ती व रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे ठिकाण किंवा ठिकाणापासूनचे अंतर (person-distance)

५. लोकांचा उप-समूह (sub group of population) : भाजकामध्ये जनतेतील वयोगट, लिंग, व्यवसाय/धंदा, सामाजिक व आर्थिक स्तर अशा प्रकारचे उप-समूह समाविष्ट असतात.

 लोकसंख्याविषयक माहिती मिळविण्याचे स्रोत :

  • महत्त्वपूर्ण घटनांची नोंद : लोकसंख्येतील जन्म, मृत्यू, लग्न यांसारख्या महत्त्वाच्या घटनांची नोंद करून ठेवणे. याकरिता भारत सरकारने १८७३ ला कायदा तयार केला आहे. तसेच १९६९ पासून जन्म-मृत्यू ची नोंद ही देशांतर्गत सक्तीची करण्यात आली आहे.
  • जनगणना : दर दहा वर्षांनी होणारी जनगणना ही माहिती मिळविण्याचा सर्वोत्तम स्रोत आहे. यामध्ये गोळा केलेल्या माहितीचे एकत्रिकरण करून तिचे विविध प्रकारांत वर्गीकरण केले जाते. जनगणनेमुळे लोकांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याचे विश्लेषण करण्यास उपयोग होतो.
  • गृहभेटी : विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांतर्गत गृहभेटींद्वारे प्रत्येकाची वैयक्तिक माहिती घेता येते.
  • राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण : याद्वारे दर सहा महिन्यांनी स्वतंत्रपणे सर्वेक्षण करून दुहेरी नोंदी ठेवण्यासाठी माहितीचे संकलन केले जाते. या सर्वेक्षणातून प्राप्त झालेली माहिती विश्वासार्ह असते. या माहितीच्या आधारे बाल मृत्यू दर, वयस्क मृत्यू दर, मुलींचे वय व त्यांची प्रजोत्पादन क्षमता इत्यादींविषयी विश्लेषण करणे सोपे होते.

लोकसंख्या वाढीची कारणे : 

  • प्राथमिक कारणे : (१) जन्म दारात होणारी वाढ – लग्नपद्धतीची वैश्विकता, कमी वयात होणारी लग्न, भारतीय मुलींमध्ये लवकर येणारी पौगंडावस्था, लोकांचे निम्नस्तरीय राहणीमान, शिक्षणाचा अभाव, योग्य कुटुंब नियोजन पद्धती वापरण्याचा अभाव इ. कारणांमुळे जन्म दरात वाढ होत राहते. (२) मृत्यू दरात घट – आरोग्य सेवांतील सुधारणा, लसीकरण व वैद्यकीय उपचार यांतील शास्त्रीय शोध, संसर्गजन्य आजारांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण, लोकांचे विविध भागांतून होणारे स्थलांतर, पर्यायाने सर्वसाधारणपणे वाढलेले आयुर्मान अशा विविध कारणांमुळे मृत्यू दरात घट होत आहे.
  • दुय्यम कारणे : (१) चालीरीती, परंपरा, शैक्षणिक स्तर, विश्वास-अंधविश्वास, लग्नपद्धती, घटस्फोट, लैंगिक सवयी इ. सामाजिक, (२) आर्थिक, (३) राज्यस्तरीय आरोग्य सेवा, (४) हवामानाचा आरोग्यावरील परिणाम, राजकीय समर्थन, शेतीसाठी मदत म्हणून मोठे कुटुंब इ. काही लोकसंख्या वाढीची दुय्यम कारणे आहेत.

लोकसंख्या वाढीचे परिणाम (Effects of population growth) :

  • सामाजिक व भौतिक (Social & Physical ) : अन्नधान्याचा तुटवडा, असमान किंवा असमांतर जमिनीची वितरण व्यवस्था इत्यादी कारणांमुळे लोकांमध्ये होणरी कुपोषणाची समस्या व इतर अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच साथीचे आजार.
  • कमी दर्जाचे राहणीमान (Lower standard of living) : अधिक लोकसंख्येमुळे तयार होणाऱ्या झोपडपट्ट्या व त्यामुळे वाढणारी असामाजिक वृत्ती आणि कृत्ये, उदा., अनैतिकता,चोरी, मारामाऱ्या, भीक मागणे, वेश्या व्यवसाय, गुन्हेगारी, अनारोग्यकारक घरे इ. यांमुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आजारात वाढ होण्याची शक्यता बळावते.

संदर्भ :

  • Cox, Peter R. Demography, 5th, 1976.
  • Park, K. Textbook of Preventive and Social Medicine, 27th, 2023.
  • Preston, Samuel H. Demography : Measuring and Modeling Population Processes, 2000.
  • कुलकर्णी, अविनाश, लोकसंख्याशास्त्र, २०२०.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.