एक्लिस, सर जॉन (कॅऱ्यू) : (२७ जानेवारी १९०३ – २ मे १९९७). ऑस्ट्रेलियन शरीरक्रियाविज्ञानशास्त्रज्ञ. तंत्रिकासंवेदना (मज्जातंतूंद्वारे होणारी संवेदना) एका पेशीतून दुसरीत प्रविष्ट होण्याच्या संशोधनकार्याबद्दल एक्लिस व त्यांचे सहकारी ए. एल्. हॉजकिन आणि ए. एफ्. हक्सली या तिघांना १९६३चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयांचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.
एक्लिस यांचा जन्म नॉर्थकोट येथील मेलबोर्न या शहरी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. गणिताची आवड असूनही त्यांनी मेलबोर्न विद्यापीठाची वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर (१९२५) ते इंग्लंड येथील ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळाल्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांनी चेताक्रियाशास्त्रज्ञ चार्ल्स स्कॉट शेरींगटन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादन केंली (१९२९) आणि ऑक्सफर्ड येथेच संशोधक पदावर १९३७ पर्यंत कार्यरत राहीले. त्यानंतर ऑस्ट्रेलियात परत आल्यानंतर १९४४ पर्यंत सिडनी हॉस्पिटलाच्या वैद्यकीय संशोधन संस्थेचे संचालक या पदावर ते कार्यरत होते. त्यांनी न्यूझीलंडमधील ड्यूनेडीन येथील ओटागो वैद्यक विद्यालयात प्राध्यापक पदावर काम केल्यानंतर (१९४४–५१ पर्यंत) ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील राष्ट्रीय विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. तेथेच त्यांनी नोबेल पारितोषिक प्राप्त होणारे महत्त्वाचे संशोधन कार्य केले (१९५१–६६). त्यानंतर ते अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्चमध्ये (१९६६) आणि १९६८ मध्ये बफलो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेथेच ते निवृत्त होईपर्यंत सेवारत राहिले (१९७५). मात्र ते सेवानिवृत्तीनंतर स्वीत्झर्लंडला स्थलांतरित झाले. एडिंबरो विद्यापीठात त्यांनी गिफर्ड भाषणमाला गुंफली (१९७८). या भाषणांत त्यांनी धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांचा एकात्म विचार केला हाेता.
तंत्रिका तंत्राचे (मज्जा संस्थेचे) एकक म्हणजे तंत्रिका-पेशी. या पेशींचे प्रवर्ध (बारीक तंतुमय वाढी) एकमेकांस जोडलेले नसून संलग्न अथवा चिकटून बसविल्यासारखे असतात. त्या स्थानाला ‘उपागमस्थान’ (synapse) असे म्हणतात. या उपागमस्थानी तंत्रिकासंवेदना एका पेशीपासून दुसऱ्या पेशीत प्रविष्ट होते. तेथे होणारे हे संवेदनासंचरण उत्तेजक आणि रोधक अशा दोन स्वरूपांचे असते. उत्तेजक संवेदनेमुळे पेशी उत्तेजिक होऊन तिच्यातून त्या संवेदनेचे क्षेपण होते. रोधक संवेदनेमुळे उपागमस्थानी रोध उत्पन्न झाल्यामुळे संवेदना पुढे जाऊ शकत नाही. संवेदनासंचरणाबद्दलचे हे ज्ञान पूर्वीच माहित झालेले होते.
एक्लिस यांनी उपागमस्थानी संवेदनासंचरणाबद्दल संशोधन केले. पेशीमध्ये काचेच्या अतिसूक्ष्म (०·०१३ मिमी.) नळ्या खोचून ठेवून तेथे होणारी क्रिया त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. या नळ्यांतून सोडियम, पोटॅशियम इ. लवणांचे विद्राव पेशींच्या शरीरात घालून त्यामुळे काय प्रतिक्रिया दिसते, त्याचे त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. एक्लिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दाखवून दिले की, पेशीपटलाववरील विद्युत् भार उत्तेजक संवेदनांमुळे कमी होतो, तर रोधक संवेदनांमुळे तो वाढतो. या त्यांच्या शोधाकरिताच त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर या संशोधकांनी असे सिद्ध केले की, पेशीपटलातील अतिसूक्ष्म (१०–१० मिमी.) रंध्रे उघडल्यामुळे पोटॅशियम व क्लोराइड आयन पेशीशरीरात प्रवेश करतात व त्यामुळे संवेदनासंचरणाला रोध उत्पन्न होतो. पेशीपटलावरील जवळजवळ दुप्पट आकाराची रंध्रे उघडल्यास सोडियमासारखे अधिक मोठे आयन (विद्युत् भारित अणू वा रेणू) पेशीशरीरात प्रविष्ट होऊ शकतात व त्यामुळे पेशीचे उत्तेजन होते. उपागमस्थानी होणारे हे मूलभूत तंत्रिकाकार्य त्यानंतरच्या इतर संशोधकांनी प्रयोग करून मान्य केलेले आहे. एक्लिझ यांनाही चेतापेशीचे काम संवेग निर्मिती, संवेग वहन इ. केवळ विद्युतप्रवाह, विद्युतविdhaभव (potential) यांवर आधारित आहे असे इतरांप्रमाणे वाटत होते. परंतु बर्नार्ड कात्झ यांच्यासह काम केल्यानंतर, त्यांच्या लक्षात आले की, एका चेतापेशीच्या अंतिम टोकाबाहेर उपागमस्थानामध्ये स्रवलेल्या ॲसिटिलकॉलिनसारख्या संप्रेरकामुळे पुन्हा एकदा जवळच्या दुसऱ्या चेतापेशीच्या वृक्षिकेतील पेशीपटलात विद्युतप्रवाहात रूपांतर होते. एक्लिझ आणि कात्झ यांच्या कामामुळे इतर अनेक संशोधक, चेतासंप्रेरकांकडे वळले आणि रेणूपातळीवर चेतासंस्था, चेतापेशी यांच्या अभ्यासाला गती मिळाली.
एक्लिस यांचे द न्यूरोफिजिऑलॉजिकल बेसिस ऑफ माइंड : द प्रिन्सिपल्स ऑफ न्यूरोफिजिऑलॉजी (१९५३), द फिजिऑलॉजी ऑफ नर्व्ह सेल्स (१९५७) आणि द फिजिऑलॉजी ऑफ सायनॅप्सेस (१९६४) हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके पुढीलप्रमाणे : फेसिंग रिॲलिटी, रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी ऑफ द स्पायनल कॉर्ड, द ह्युमन मिस्टरी, द ह्युमन साय, हाऊ द सेल्फ कंट्रोल्स द ब्रेन, माइंड अँड ब्रेन : द मेनी फॅसीटेड प्रॉब्लेम्स, द वंडर ऑफ बिइंग ह्युमन : अवर ब्रेन अँड अवर माइंड, इव्हॉल्युशन ऑफ द ब्रेन : क्रिएशन ऑफ द सेल्फ.
एक्लिस यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली (१९४१). त्यांना ‘नाईट’ किताब देण्यात आला (१९५८). ऑस्ट्रेलियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे ते १९५७–६१ या काळात अध्यक्ष होते. ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे जॉन कर्टिस मेडिकल स्कूल ऑफ रिसर्चच्या वतीने एक्लिस इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेसची स्थापना करण्यात आली (२०१२).
एक्लिस यांचे लोकॅर्नो, स्वित्झर्लंड येथे निधन झाले .
कळीचे शब्द : #चेतापेशीविज्ञान #वैज्ञानिक #तत्त्ववेत्ता
संदर्भ :
- https://www.newworldencyclopedia.org/entry/John_Carew_Eccles
- https://www.bionity.com/en/encyclopedia/John_Carew_Eccles.html
- https://www.informationphilosopher.com/solutions/scientists/eccles/
- https://adb.anu.edu.au/biography/eccles-sir-john-carew-jack-338
- https://en.wikipedia.org/wiki/John_Eccles_(neurophysiologist)
समीक्षक : स्नेहा दिलीप खोब्रागडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.