चतुर्वेदी, नंद : ( २१ एप्रिल १९२३ – २५ डिसेंबर २०१४). हिंदी साहित्यातील लोकप्रिय प्रसिद्ध कवी, गद्यकार, संपादक आणि अनुवादक. त्यांचा जन्म रावजी का पीपत्या या स्वातंत्र्यपूर्व मेवाड संस्थानातील (राजस्थान) गावात झाला. आता हे गाव मध्यप्रदेशातील मनासा जिल्ह्यात आहे. सुदर्शनलाल चतुर्वेदी आणि श्रीमती लीलावती देवी हे त्यांचे आईवडील होत. १९३०च्या दशकात भारतात इंग्रजांची राजवट असली तरी राजस्थानमध्ये तेथील राजघराण्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे राजघराण्यांचे वर्चस्व आणि इंग्रजांची हुकुमत अशा दोन राजसत्ता एकावेळी तेथे कार्यरत होत्या, त्याद्वारा सामान्य जनतेचे शोषण होत होते.
नंद चतुर्वेदी यांचे वडील झालावाडमध्ये एका संस्थानात नोकरी करीत होते. पण त्यांच्या वडिलांना वैराग्य प्राप्त झाले होते. ते आपल्या मधुर आवाजात भजने गात असत आणि तासनतास देवपूजेमध्ये व्यतीत करीत असत. अशा वातावरणात नंद चतुर्वेदी यांच्यावर कवितेचे संस्कार झाले. ‘कवि-दरबार’ या नावाची एक संस्था झालावाडमध्ये होती. तेथील राजा काव्यप्रेमी असल्याने तो वेळोवेळी समस्यापुर्तीचे आयोजन करीत असे. ही समस्यापूर्ती काव्यात करावी लागत असे. त्यासाठी देशातील वरिष्ठ कवींना आमंत्रित करीत असत. कानपूर येथील सुकवि या नियतकालिकाचे संपादक गयाप्रसाद शुक्ल ‘सनेही’ यांनाही तिथे आमंत्रण असायचे . तेव्हा नंद सातव्या इयत्तेत शिकत होते. त्यांनी समस्यापूर्तीत भाग घेतला आणि त्या पहिल्या प्रयत्नात बक्षीसही मिळवले. तेव्हापासून त्यांना ‘ कवि-दरबार’ मध्ये नेहमी बोलावले जाऊ लागले. पुढे त्यांच्या कविता सुकवि या नियतकालिकामध्ये छापूनही येऊ लागल्या.
कवि-दरबारात काव्यभाषा म्हणून ब्रज भाषेला प्रतिष्ठा होती आणि नंद यांची काव्ययात्रा देखील ब्रज भाषेतच सुरु झालेली होती. झालावाडमध्ये राजकवी म्हणून कवींद्र हरनाथ होते. त्यांनी नंद यांच्याकडून उद्धवशतक मधील अनेक कविता पाठ करून घेतल्या होत्या. त्यामुळे काव्यातील लय, छंद इत्यादी विषयी त्यांना खूप माहिती झाली होती आणि स्वतःच्या काव्यलेखनाविषयी मनात एक विश्वास उत्पन्न झाला होता. त्यावेळी पंडित रामनिवास शर्मा हे सौरभ नावाचा एक अंक प्रकाशित करीत असत. ते नंदबाबूंचे शिक्षक होते. नंदबाबूंच्या लेखनावर त्यांचा प्रभाव होता. नंदबाबूंच्या वडिलांनी देखील त्यांना काव्यलेखनासाठी खूप प्रोत्साहित केले. त्यांना अनेक भक्त कवींच्या रचना मुखोद्गत होत्या. ते त्या मधुर स्वरात गात असत. त्यांच्याकडून कवितेत लालित्य किती महत्त्वाचे आहे हे नंदबाबू शिकले.
खडीबोलीला हिंदीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. राजगुरु पंडित गिरीधर शर्मा ‘नवरत्न’ हे त्यातील प्रतिष्ठित कवींमधील एक होते. नंदबाबूंना ब्रज भाषेत लिहित असतानाच खडी बोली हे आपले रचना माध्यम म्हणून स्वीकारावे अशी इच्छा झाली आणि त्यांनी काही काळानंतर त्यात लिहायला सुरुवात झाली. १९४१-४२ येता येता त्यांनी ब्रज भाषेचा निरोप घेतला आणि खडी बोलीत कविता लिहायला सुरुवात केली. नंद चतुर्वेदी यांचे सातवीतील काव्यलेखन हे त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरले. तेव्हापासून ते ‘नंद’ चे ‘कवी नंद’ बनले.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी अजमेरमधील शासकीय महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण प्राप्त केले. त्यात त्यांचे इंग्रजी साहित्य, तत्त्वज्ञान आणि अर्थशात्र हे विषय होते. जगण्यासाठी त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. ते प्रथम अजमेर इथे डी. एड. महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. मग ते बी.टी. करण्यासाठी इंदोर इथे आले. जळगाव जिह्यातील नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांना बोलावणे आले होते. नंदबाबूंनी तो प्रस्ताव स्वीकारला. तेथील अल्पकाळातदेखील त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय घटना घडल्या. या काळातच भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी यांची हत्या झाली. तेथील अस्थिर वातावरणामुळे त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला.
१९५० मध्ये त्यांना उदयपुरच्या गांधीवादी शिक्षण संस्थेच्या विद्याभवन या प्रसिद्ध शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. तिथे त्यांनी सहा वर्ष काम केले. १९५६ मध्ये विद्याभवनने ‘विद्याभवन रुरल इन्स्टिट्यूट’ ही नवीन शिक्षण संस्था काढली. ती ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी सुरु केलेली शिक्षण संस्था होती. तेथे त्यांनी २५ वर्ष अध्यापन सेवा दिली. १९८१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
निवृत्तीनंतर ते झालावाड येथे स्थायिक झाले. त्या दरम्यान ते समाजवादी लोकांच्या संपर्कात आले. त्यांचे कवी म्हणून व्यक्तिमत्व घडण्यात समाजवादी विचारांचा फार मोठा सहभाग आहे. त्या काळात राजस्थानला एकत्र आणावे आणि सामाजिक स्तरावर बदल घडवून आणावा असे विचार त्यांच्या मनात येत होते. त्या काळातील त्यांच्या कवितांवर समाजवादी विचारांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसते. त्या कवितांची भाषा आक्रमक आणि आवेशपूर्ण आहे. नया जमाना, लाल सुरज, नई मशाल, रोशनी, शोषण की दुनिया का आतंक, झोपडी को बचा लेने की प्रतिज्ञायें या कविता त्याची साक्ष देतात.
नंद चतुर्वेदी यांचे सात कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यात यह समय मामुली नही, इमानदार दुनिया के लिये, वे सोये तो नही होंगे, उत्सव का निर्मय समय, जहाँ एक उजाले की रेखा खिंची है , गा हमारी ज़िंदगी कुछ गा, आशा बलवती है राजन यांचा समावेश आहे.
नंद चतुर्वेदी उदयपुरला आल्यावर त्यांची साहित्यातील सक्रियता वाढली. १९४८ च्या उन्हाळ्यात त्यांनी प्रगतीशील लेखकसंघाची स्थापना केली. १९६६ मध्ये त्यांनी आपल्या मित्रांच्या साथीने बिंदू हे साहित्यिक नियतकालिक काढले. त्याचे प्रकाशन आणि संपादन देखील तेच करीत असत. ते नियतकालिक १९७२ पर्यंत चालू होते. राजस्थानातील हिंदी साहित्याला अखिल भारतीय स्तरावर ओळख मिळवून देणे हा त्या मागचा उद्देश होता. राजस्थानमध्ये जे काही लिहिले जात होते त्यावर चर्चा होत नसे. संत मीराबाई यांच्यानंतर राजस्थानी साहित्याबद्दल राजस्थानातील वाचकांमध्येच अज्ञान होते. त्या प्रदेशातील पाठ्यपुस्तकांत राजस्थानी लेखकांना स्थान देण्यात येत नव्हते. म्हणून त्यांनी राजस्थानी लेखकांना त्यांचा मानसन्मान आणि ओळख मिळवून देण्याचे ठरवले.
सामुदायिक संपादकत्वाचा प्रयोग देखील त्यांनी केला पण तो फारसा यशस्वी झाला नाही. बिंदूच्या माध्यमातून ते जीवनाला व्यापक अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे फक्त साहित्यच नाही तर शिक्षण, राजकारण, विकास, पर्यावरण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इत्यादी विषयातील विद्वान देखील त्यांच्याकडे आकर्षित झाले. दक्षिणेकडील विद्वानांचे काही लेख त्यांनी अनुवादित करून छापले. त्यामुळे जे लोक हिंदी नियतकालिकांविषयी उदासीन असत त्यांच्यापर्यंत ते नियतकालिक पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी सप्तकिरण हा काव्यसंग्रहदेखील संपादित केला होता.
राजकारण हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र होते. त्यांनी ‘लोकतंत्र बचाने की आशा’ हा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी लोकशाही म्हणजे लोकांच्या समृद्धीचे, प्रतिष्ठेचे रक्षण करणे होय असे म्हटले होते. नवी पुस्तके मागवणे, नियतकालिके मागवणे, त्यावर चर्चा करणे हे त्यांचे आवडते काम होते. तरुण पिढीशी ते ज्या उत्साहाने संवाद करीत असत ते चकित करणारे होते. आज त्यांचे समग्र लेखन नंद चतुर्वेदी –रचनावली ४ खंडात उपलब्ध झालेले आहे.
नंदबाबू यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले. त्यात बिडला फाउंडेशनचा बिहारी पुरस्कार, राजस्थान साहित्य अकादमीचा सर्वोच्च मीरा पुरस्कार, राजस्थान साहित्य अकादमीचा ‘विशिष्ट साहित्यकार पुरस्कार’, ‘साहित्य वाचस्पती’ ही हिंदी साहित्य संमेलनाची मानद उपाधी, अखिल भारतीय आकाशवाणी ‘श्रेष्ठ वार्ताकार सन्मान’ , केंद्र तथा राजस्थान साहित्य अकादमीची फेलोशीप, नवे विश्व हिंदी संमेलन, लंडनच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्यत्व, राजस्थान साहित्य अकादमीचा संस्कृती सन्मान यांचा समावेश होता.
दूरदर्शन, आकाशवाणीवरून अनेक वेळा त्यांचे कविता वाचन आणि भाषणे प्रसारित झाली. तसेच हिंदी पत्रपत्रिकांमधून त्यांचे लेखन प्रकाशित झाले. त्यांच्या कविता विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या गेल्या होत्या. समाजातील ज्वलंत विषयावर देशविदेशातील वृत्तपत्रातून त्यांचे लेखन प्रकाशित झालेले आहे.
२५ डिसेंबर २०१४ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
संदर्भ : https://archives.ashoka.edu.in/paper_details/333
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.