युनायटेड स्टेट्समधील रॉकी पर्वताच्या परिसरात असलेल्या कुत्र्यांवरील आणि जंगलातील गोचीड (Wood tick) यांच्या चावण्यामुळे रिकेट्सिया रिकेट्सिआय जीवाणूचा (बॅक्टेरिया) प्रसार होतो. हा जीवाणुजन्य आजार आहे. रॉकी पर्वत व परिसरातील कुत्र्यांवरील विशिष्ट गोचिडीद्वारे जीवाणूचा प्रसार होत असल्याने स्थानविशिष्ट ‘मौंटन स्पॉटेड फीव्हर’ असे नाव या आजारास दिले गेले आहे. कुत्र्यांवरील गोचीड आणि मानवी संपर्क आल्याने आजार होत असल्याने याला प्राणिजन्य आजाराच्या गटात (Zoonosis) असल्याचे म्हणता येईल. गोचीड चावल्यावर शरीरावर पुरळ येतात. या पुरळातून रक्तस्राव होतो. पुरळ येण्याची सुरुवात मनगट आणि घोटा येथे होते. लाल रंगाच्या पुरळ आल्यामुळे या आजाराचे दुसरे नाव स्पॉटेड फीवर असे दिले गेले आहे. स्नायूमध्ये वेदना आणि उलट्या अशी इतर लक्षणे दिसून येतात. आजारातून बरे झाल्यावर ऐकू न येणे आणि हात किंवा पायातील एखादा भाग निकामी होणे असे दीर्घकालीन शारीरिक नुकसान होते. हातापायातील रक्तप्रवाह खंडित झाल्याने हात किंवा पाय कापावा लागल्याची उदाहरणे आहेत.

रिकेट्सिया रिकेट्सिआय  जीवाणू

रोगप्रसार : रिकेट्सिया रिकेट्सिआय  या जीवाणू संसर्गामुळे हा आजार होतो. अमेरिकन कुत्रा, रॉकी पर्वतावरील झाडीतील गोचीड, ब्राऊन डॉगवरील गोचीड यामधून या जीवाणूचा संसर्ग होतो. क्वचित रक्तदानामधून यांचा संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. प्राथमिक अवस्थेतील संसर्गाचे निदान लवकर होत नाही. प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून निदान पक्के होते. परंतु निदान होण्यापूर्वी लक्षणावरून उपचार करणे अधिक श्रेयस्कर ठरते. स्पॉटेड फीव्हर रिकेट्सियोसिस, रिकेट्सिया परकेरी रिकेट्सिओसिस, पॅसिफिक कोस्ट टिक फीव्हर आणि रिकेट्सिया स्मॉल पॉक्स या नावाने ओळखला जाणारा हा आजारांचा गट आहे.

 

रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर : प्रसार

रिकेट्सिया रिकेट्सिआय या जीवाणूचा प्राथमिक आश्रयी डर्मासेंटॉर व्हेरियाबिलीस आणि डर्मासेंटॉर अँडरसोनी प्रजातीचे गोचीड (अष्टपाद – ॲकॅरिना) आहेत. ही दोन्ही गोचीड अमेरिकन कुत्र्यांवरील आणि रॉकी जंगलातील परजीवी असून रिकेट्सिआय बाधित कुत्र्यांमधून मानवी संपर्कात तर अँडरसोनी प्रजातीचे प्रौढ नर आणि मादी गोचीड जंगलांमधून फिरणाऱ्या व्यक्तीच्या कपड्यांमधून मानवी संपर्कात येतात.  डर्मासेंटॉर व्हेरियाबिलीस गोचीड रिकेट्सिया परजीवीचे आश्रयी आणि वाहक सुद्धा आहेत. जीवाणू संसर्ग गोचिड चावण्यामुळे होतो. मादी अंडी घालते, त्या अंड्यातून रिकेट्सिया जीवाणू वाहून नेला जातो (Transovarial transmission). गोचीड शरीरावर चिरडल्याने होणारी संसर्गसंख्या तुलनेने कमी आहे. नर गोचीड शुक्रपेशीमधून मादीमध्ये संसर्ग होतो.

रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर : लक्षणे

लक्षणे : रिकेट्सिया रिकेट्सिआय  आजाराची तीन प्राथमिक लक्षणे म्हणजे ताप, मनगटे, घोटा यावर पुरळ आणि गोचीड चावल्याची घटना ही होय. रुग्ण बहुधा ताप आल्याच्या कारणावरून  वैद्यकीय सल्ला घेण्यास जातो. पुरळ येणे हे लक्षण उशीरा उद्भवते. एकदा हातापायावर पुरळ दिसायला लागले म्हणजे पुरळ पाठ आणि पोटाच्या भागावर पसरतात. इतर लक्षणांमध्ये उलट्या, अन्नावरील वासना कमी होणे, पोटदुखी, तीव्र डोकेदुखी, प्रकाश असह्यता (Photophobia) आणि स्नायूमध्ये वेदना यांचा समावेश होतो.  संसर्ग झाल्यावर पुरळ शरीरावर येण्यास सुमारे सहा दिवस लागतात.

गोचीड चावल्यानंतर दोन ते पाच दिवसांत ताप येतो. त्याचबरोबर पुरळ येऊ लागतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये पुरळ प्रौढ व्यक्तीपेक्षा लवकर येतात. पुरळ लहान आकाराचे सपाट तांबूस रंगाचे आणि खाजविरहित असतात. मनगट, हात आणि घोट्याभोवतीची जागा यावर पुरळ येतात. पुरळ आलेल्या जागेवर दाब दिल्यास पुरळ फिकट रंगाचे होतात. लक्षणे दिसू लागल्यावर सहाव्या दिवशी पुरळ उठून दिसतात. संसर्ग झालेल्या ३५ – ६० % व्यक्तींमध्ये पुरळ येतात. ८० %  व्यक्तींमध्ये हातापायाच्या तळव्यावर पुरळ आठळले आहेत. १५ % व्यक्तींमध्ये पुरळ असल्याचे लक्षण दिसत नाही.

रिकेट्सिया रिकेट्सिआय  जीवाणू लहान रक्तवाहिन्यांच्या अंतस्त्वचा पेशीमध्ये पोहोचतात. या पेशीतून  मेंदू, त्वचा आणि हृदय येथे रक्तप्रवाहातून त्यांचा प्रवास होतो. अंतस्त्वचा पेशी दाह व जीवाणू पुनुरुत्पादन होत असता रक्तवाहिन्याबाहेर रक्त वाहते आणि सभोवतालच्या ऊतीमध्ये पसरते. त्वचेवर उठणारे पुरळ हा रक्तवाहिन्यातील जीवाणू पुनरुत्पादन आणि रक्तवाहिन्या अंतस्त्वचा (Endothelium) संसर्गाचा परिणाम आहे.

प्रयोगशालेय परीक्षण : रॉकी मौंटन स्पॉटेड फीवरचे निदान प्रयोगशाळेतील चाचणीशीवाय किंवा चाचणीतून होते. रक्तरस चाचणी (Serological testing) आणि त्वचा ऊतिपरीक्षण (Skin biopsy) पद्धतीने अचूक निदान करता येते.

उपचार : रॉकी मौंटन स्पॉटेड फीवर १८०० मध्ये रॉकी पर्वताच्या परिसरात आढळल्याने या आजारास रॉकी मौंटन स्पॉटेड फीवर असे नाव देण्यात आले, यावर डॉक्सिसायक्लीन हे टेट्रासायक्लिन गटातील प्रतिजैविक परिणामकारक आहे. लक्षणे दिसू लागल्यावर त्वरित डॉक्सिसायक्लीनचे उपचार सुरू केले तर उत्तम प्रतिसाद दिसून येतो. सर्व वयोगट आणि गर्भवती महिला यांच्यावर हे सुचवण्यात येते. प्रतिजैविके प्रतिबंधक उपाय म्हणून देण्यात येत नाहीत. ४५ किलो (९९ पौंड) पर्यंत वजन असलेल्या मुलांना दर बारा तासांनी १०० मिग्रॅ. डॉक्सिसायक्लीन दिले जाते किंवा ४ मिग्रॅ. प्रति किलो चोवीस तासांत बारा तासांच्या अंतराने दोन विभागलेल्या मात्रेमध्ये (Dosage) द्यावे लागते. ताप कमी झाल्यानंतर तीन दिवस उपचार सुरू ठेवावे लागतात. रुग्ण बरा होण्यास पाच ते दहा दिवस लागतात. तीव्र संसर्ग झाल्यास बरे होण्यास अधिक दिवस लागू शकतात.

दरवर्षी ५,००० व्यक्तींना रॉकी मौंटन स्पॉटेड फीव्हर झाल्याच्या नोंदी आहेत. युनायटेड स्टेट्स, पश्चिम कॅनडा, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे या आजारांचे निदान झाले आहे. जून आणि जुलै महिन्यात या आजाराचे प्रमाण वाढते, यातील सुमारे ०.५ % व्यक्तींचा मृत्यू ओढवतो. १९४० मध्ये  टेट्रासायक्लिन प्रतिजैविकाचा शोध लागण्यापूर्वी या आजाराने १० % व्यक्तींचा मृत्यू होत असे.

दीर्घकालीन आजारात गुंतागुंत झाल्यास एकांगी दुर्बलता/शरीराच्या अर्ध्या बाजूस दुबळेपणा येणे (Hemiparesis), गतिविभ्रम (Ataxia) आणि संज्ञानात्मक घट/आकलन शक्ती कमी होणे (Cognitive deficits) असे प्रकार होतात. आंधळेपणा, बहिरेपणा व क्वचित कोथ (गँग्रीन) झाल्यास अवयव शस्त्रक्रिया करून कापावा लागतो.

पहा : प्रलापक सन्निपात ज्वर, रिकेट्सिया, क्यू ज्वर, रक्तरस चाचणी, त्वचा ऊतिपरीक्षण.

संदर्भ : 1. https://en.wikipedia.org/wiki/Rocky_Mountain_spotted_fever

  1. https://www.cdc.gov/rocky-mountain-spotted-fever/about/index.html

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.