रासायनिक चिकित्सा ही कर्करोगावरील एक उपचार पद्धती आहे. या चिकित्सेअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या औषधांचे काही ना काही दुष्परिणाम होत असतात. प्रत्येक औषधांचे वेगवेगळे परिणाम असू शकतात. तसेच एकाच वेळी सर्व परिणाम दिसून येत नाहीत. यातील काही दुष्परिणाम लगेच दिसून येतात, तर काही दीर्घ कालावधीने उद्भवतात. रासायनिक चिकित्सेचे दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा कधी कधी कायम स्वरूपाचे देखील असू शकतात. या दुष्परिणामांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

 • केस गळणे : रासायनिक चिकित्सेदरम्यान उपचार सुरू केल्यानंतर दोन वा तीन आठवड्यांनी केस गळू लागतात. यामध्ये मुख्यत: डोक्यावरील केस जातात, याशिवाय पापण्या व भुवया यांचे केस देखील गळतात. तसेच चेहऱ्यावरील आणि जांघेतील, काखेतील, जननेंद्रियाभोवतालचे व पायावरील केस देखील गळतात. केस गळतीचे प्रमाण हे पूर्णत: उपचारावेळी वापरलेल्या औषधांवर अवलंबून असते. रासायनिक चिकित्सेचे उपचार संपल्यानंतर एक वा दोन महिन्यांत पूर्ववत केस परत येतात.
 • अतिसार व निर्जलीकरण : रसायनोपचांरामुळे अनेक कर्कबाधित रुग्णांस हगवणीचा त्रास होतो. सोडियम व पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा हगवणीमुळे ऱ्हास होतो. त्यामुळे अधिक हगवणीमुळे पाण्याचे शरीरातील प्रमाण अत्यंत कमी होते (Dehydration).
 • बद्धकोष्ठता : (Constipation). रासायनिक चिकित्सेदरम्यान दिलेली वेदनाशामक तसेच उलट्या व मळमळ बंद होण्याकरिता दिलेली औषधे यांमुळे कर्करोगबाधित रुग्णाला बद्धकोष्ठता उद्भवू शकते.
 • मळमळ व उलट्या होणे : रासायनिक चिकित्सेमुळे जठराच्या व पचनसंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे या औषधांच्या सेवनाने उलट्या होणे व मळमळ थांबविणे हे नियंत्रणात ठेवणाऱ्या मेंदूमधील केंद्रावरही परिणाम होत असल्याने कर्करोगबाधित रुग्णात उपचार चालू असताना सातत्याने मळमळणे आणि अनेकदा उलट्या होणे हे विकार उद्भवू शकतात.
 • पांडुरोग किंवा रक्तक्षय : (Anaemia). रासायनिक चिकित्सेदरम्यानअनेक कर्करोगबाधित रुग्णांच्या रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होते. तांबड्या पेशी कमी झाल्याने रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि त्याला पांडुरोग होतो.
 • तोंडामध्ये चट्टे पडणे : रासायनिक आणि प्रारण चिकित्सेमुळे अनेकदा कर्करोग रुग्णास तोंडात चट्टे पडणे, तोंड सुकणे, तोंडातून रक्तस्राव होणे, तोंडाची आग होणे, खाण्यास व गिळण्यास त्रास होणे हे सहपरिणाम जाणवतात. अनेक वेळा तोंडात लहान लहान जखमा/व्रण (Ulcer) देखील होतात.
 • भूक कमी लागणे : अनेक कर्करोगबाधित रुग्णांना रसायनी व शेक पध्दतीच्या उपचारांवेळी भूक कमी लागण्याचा परिणाम जाणवतो. त्याचप्रमाणे या रुग्णांना वांत्या होण्याची भावना, सतत मळमळ होणे, तोंडाला चव नसणे, बध्दकोष्ठता होणे हे विकार होत असल्याने त्याला फार कमी प्रमाणात भूक लागते.
 • अशक्तपणा : (Fatigue). रासायनिक व प्रारण चिकित्सेदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून संरक्षण करण्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे शरीरातील द्रवाचे प्रमाण तसेच रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी झाल्यामुळे कर्करोग रुग्णास अशक्तपणा जाणवतो.
 • उदासीपेशीऱ्हास : (Neutropenia). रसानोपचारांमुळे अनेकदा कर्करोगबाधित रुग्णाच्या अस्थिमज्जेचा (Bone marrow) ऱ्हास होतो. त्यामुळे रक्तात पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होते. सामान्य मानवी शरीराच्या रक्तातील पांढऱ्या पेशींच्या उदासीरागी (Neutrophil) प्रकारातील पेशी शरीरात रोगप्रतिकारक पेशी म्हणून काम करतात. त्यांचे प्रमाण कमी झाले तर कर्करोग रुग्णाची प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या रोग्यास सामान्य विषाणूचा अथवा जीवाणूचा संसर्ग होऊन अनेक प्रकारच्या रोगांची बाधा होऊ शकते. या स्थितीला ‘उदासीपेशीऱ्हास’ असे म्हणतात. अशा रुग्णांना तोंड, त्वचा, फुप्फुस, मूत्रमार्ग, गुदमार्ग वा योनिमार्ग यांपैकी कोणत्याही मार्गाने जंतुसंसर्ग होऊ शकतो.
 • अनियमित रक्तस्राव : (Bruising). रासायनिक चिकित्सेतील औषधांचा अस्थिमज्जेवर परिणाम होऊन रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेतीलप्रमुख पेशी म्हणजेच रक्तबिंबिका (Blood platelets) या पेशी कमी होण्यावर होतो. परिणामी त्वचेखाली किंवा इतरत्र रक्तस्राव होतो. रक्तबिंबिकांचे प्रमाण किती कमी होते हे रसायनोपचारांत वापरलेल्या औषधांवर अवलंबून असते. अनेक रसायनोपचार पध्दतीत रुग्णाच्या जीवास धोका पोहोचेल, इतक्या प्रमाणात या रक्तबिंबिका कमी होत नाहीत. खोकल्यातून अथवा गुदद्वारातून रक्त पडत असेल, तर अशा वेळी त्या रुग्णाला रक्तबिंबिका देणे गरजेचे असते.
 • शरीरावर पुरळ उठणे व खाज सुटणे : (Rashes). कर्करोगावर रासायनिक औषधोपचार चालू असताना रुग्णाच्या शरीरावर पुरळ उठतात. अर्थात हे पुरळ औषधोपचारांचा परिणाम म्हणून उठले आहेत की औषधांचा प्रतिसाद(Reaction) आहे, हे तज्ञवैद्यांना विचारून ठरवावे.
 • त्वचारोग : रासायनिक चिकित्सेमुळे कर्करोगबाधित रुग्णाच्या त्वचेवर चट्टे पडणे, त्वचेला स्तर सुटणे, त्वचा कोरडी पडणे आणि या सर्वांमुळे सूर्यप्रकाशाचा त्रास होणे हे परिणाम दिसून येतात.
 • नखांचे रोग : या उपचारावेळी रुग्णाच्या नखांवरही वेगवेगळे परिणाम झाल्याचे दिसून येते. रुग्णाची नखे काळी पडणे अथवा पिवळी दिसून येतात. नखे ठिसूळ होणे व अनेकदा त्यांचे तुकडे पडणे इ. सहपरिणाम दिसून येतात.
 • मूत्रसंस्थाविकार : कर्करोगबाधित रुग्णामध्ये रासायनिक उपचाराच्या वेळी लघवी करताना त्रास होणे वा दुखणे, रक्तमिश्रित लघवी होणे, काहींच्या बाबतीत लघवी न होणे तर काहींच्या बाबतीत अनेकदा लघवीला होणे हे सहपरिणाम उद्भवतात.
 • फ्ल्यू-सदृश परिणाम : रासायनिक व जैविक उपचार एकत्रपणे एखाद्या कर्करोग रुग्णात जर सुरू केले तर थोडासा ताप येणे, थंडी वाजून येणे, डोके दुखणे, सांधे व पिंडऱ्या दुखणे इ. फ्ल्यू-सदृश परिणाम आढळून येतात.
 • अंगास सूज येणे : शरीरात द्रव पदार्थ साठून राहिल्यामुळे काही कर्करोगबाधित रुग्णामध्ये हात, पाय, तोंड इ. ठिकाणी सूज येते.
 • पुरुषांमध्ये तात्पुरती वा कायमची नपुंसकता येणे : रसायनोपचारांतील अनेक औषधे पेशी विभाजनाचे काम थांबवतात आणि नंतर त्यांचा नाश करतात. त्यामुळे ज्या-ज्या अवयवात, इंद्रियात पेशींची भरपूर प्रमाणात वाढ होत असते त्यांच्यामधील सुदृढ पेशींवर सुध्दा त्या औषधांचा परिणाम होऊन त्याच्यातील पेशी मारल्या जातात. पुरुषामध्ये वृषणामध्ये (Testes) पेशीविभाजनाने शुक्रजंतू तयार होत असतात. व्हीन ब्लॉस्टीन अथवा व्हिन क्रिस्टीन यांसारख्या औषधामुळे हे विभाजन थांबवले जाते. त्याचा अंतिम परिणाम शुक्रजंतूचे प्रमाण कमी होण्यामध्ये होतो. त्यामुळे पुरुषामध्ये या औषधांचा परिणाम म्हणून नपुंसकत्व येऊ शकते. हे तात्पुरते अथवा कायमचे असू शकते. हा सहपरिणाम औषध किती प्रमाणात वापरले, यावर अवलंबून असतो.
 • स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता : रासायनिक चिकित्सेतील औषधांमुळे कर्करोगबाधित स्त्रीमध्ये मासिक पाळीतील रक्तस्राव अनियमित होतो. अनेक स्त्रियांमध्ये स्त्रीची पाळी निरोगी स्त्रीपेक्षा कितीतरी अगोदर थांबते (रजोनिवृत्ती अगोदर होते).
 • तंत्रिका संस्थेवरील परिणाम : काही औषधांमुळे तंत्रिकांवर (Nerve) विपरित परिणाम होतो. त्यामुळे मुंग्या येणे (Tingling), हातापायांना बधिरपणा येणे, शरीराचे संतुलन बिघडणे, मानेमध्ये ताठरपणा येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. औषधांची मात्रा कमी झाल्यावर ही लक्षणे कमी होतात. परंतु अनेकदा हे परिणाम कायमस्वरूपी राहतात.

याव्यतिरिक्त काही व्यक्तींमध्ये निद्रानाश, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे असे परिणाम देखील जाणवतात. परंतु उपचार संपल्यानंतर ही लक्षणे हळूहळू निघून जातात. योग्य उपचार व काळजी घेऊन ही लक्षणे सुसह्य करता येतात.

चिरकालीन आणि विलंबाने उद्भवणारे सहपरिणाम : रासायनिक चिकित्सेचे काही परिणाम हे काही महिने ‍किंवा वर्षे दिसून येत नाहीत, तर कालांतराने उद्भवतात. अनेकदा हे परिणाम चिरकाळ टिकून राहतात. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विचार करण्याची क्षमता कमी होणे तसेच एकाग्रता कमी होणे, हृदयविकार, नपुंसकता आणि द्वितीय कर्करोग असे दुष्परिणाम उद्भवू शकतात.

पहा : कर्करोग; जागतिक कर्करोग दिवस; प्रारण चिकित्सा; रासायनिक चिकित्सा.

संदर्भ :

 • https://www.cancer.net/navigating-cancer-care/how-cancer-treated/chemotherapy/side-effects-chemotherapy
 • https://www.mayoclinic.org/tests-procedures/chemotherapy/about/pac-20385033

 समीक्षक : ऋजुता हाडये