भारतातील एक अनुसूचित जमात. हे लोक मुख्यत꞉ ओडिशा राज्यातील कोरापूट जिल्ह्यात आणि काही प्रमाणात विशाखापट्टणम जिल्ह्यातील पर्वतीय भागात वास्तव्यास आहे. गदाबा या मूळ जमातीची परेंगा ही उपजमात असून या जमातीला पुरजा, पारजी, पारंगी, पारजा, परेनजी या नावांनीही ओळखले जाते. यांची २०११ च्या जनगणनेनुसार ९,४४५ इतकी लोकसंख्या होती.

परेंगा जमातीचे वैश्य व पुटुली या दोन कुळींमध्ये भाग (बानसा) पडले आहेत. या दोन कुळींचे ओंताल (कोब्रा), खरा (सूर्य), खिल्ला (वाघ), पांगी (गिधाड), खिनबुडी (भालू), मच्छ (मासा), गोलारी (सर्प) इत्यादी उपप्रकार किंवा उपजमाती आहेत.

हे लोक मध्यम बांध्याचे व सावळ्या रंगाचे असतात. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात बंडी व खांद्यावर उपरणे असा पुरुषाचा पेहराव असते, तर स्त्रीयासुद्धा गुडग्यापर्यंत विशिष्ट पद्धतीने साडी परिधान करतात. याशिवाय काही तरुण व तरुणी आधुनिक पद्धतीचे वस्त्र घालत आहेत. हे लोक आपापसांत ऑस्ट्रो-एशियाटीक भाषा कुलातील गोरुम (मुंडारी), तसेच पारजी ही स्थानिक भाषा बोलतात. ही भाषा पारंगी, पारजा या नावांनीही ओळखली जाते. याशिवाय ते ओडिया भाषासुद्धा परस्परांत बोलतात.

परेंगा जमातीचा स्थिर शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. तसेच शेतमजुरी, विविध बदली पिकांची लागवड ही यांची शेतातील महत्त्वाची कामे होत. या जमातीच्या स्त्रिया शेती, मासेमारी, पशुसंवर्धन, घरकाम इत्यादी कामांत मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. काही मले-मुली शिक्षण घेऊन सरकारी सेवेत कार्यरत आहेत. ही जमात शाखाहारी व मांसाहारी असून भात आणि नाचणी हे त्यांचे मुख्य अन्न आहे.

जमातीमध्ये आत्ते-मामे भावा बहिणीच्या लग्नास मान्यता आहे; परंतु काही लोक सारख्या कुळात लग्न करताना दिसत नाही. मोठ्यांच्या मान्यतेने, पळून जाऊन लग्न करण्याची पद्धत पाहायला मिळते; मात्र लग्नाची बोली (रायबदी) लाऊन लग्न करणे यांच्यामध्ये प्रतिष्ठेचे मानले जाते. वधुचा हुंडा कमित कमी रु. २,०००, काही बकऱ्या किंवा मेंढ्या, धान्य अशा विविध स्वरूपांत घेतला जातो. यांच्यात पुनर्विवाह, विधवा विवाहास मान्यता असून घटस्फोटाचा निर्णय पारंपरिकरित्या गावच्या जेष्ठ व्यक्तीकडून मान्य करण्याची प्रथा आहे. गावाच्या मुख्य व्यक्तीला नाईक असे म्हणतात. तो जमातीतील भांडणे सोडवत असतो.

परेंगा जमातीचे निसानी, हुंडी ही पारंपरिक ग्रामदेवता असून ते त्यांची पूजा करतात. इतर समाजाच्या संपर्कात आल्यामुळे जमातीतील काही लोक हिंदू देव-देवतांनाही पूजताना दिसतात. निसर्गवाद, साम्यवाद आणि नैसर्गिक गोष्टींवर यांचा खूप विश्वास असून ते काळी जादू मानतात.

जमातीचे दिसारी व सिसा हे पारंपरिक सण आहेत. या समारंभाला जमातीचा प्रमुख नाईक सर्व जबाबदारी घेतो. त्यांच्या विभागीय नाईकाला भाट नाईक असे म्हणतात. ते पारंपरिक लोकनृत्य आणि लोकसंगीताला जपतात. ढेमसा, घुमुरा, गोत्तार आणि लाठीदुडिया हे त्यांचे विविध लोकनृत्याचे प्रकार आहेत.

जमातीमध्ये डफ वाजवत मृत व्यक्तीला स्मशानात आणतात आणि त्यावर संस्कार करून पुरले जाते. ते याप्रसंगी ५ दिवसांचा दुखवटा पाळतात.

संदर्भ ꞉  Singh, K. S., People of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक ꞉ लता छत्रे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.