(क्वायर). चर्चमधील धार्मिक गायकवृंदाची जागा. धार्मिक संगीत गाणाऱ्या गायनसमूहाला आणि गायनस्थळ या दोन्हीला इंग्रजी संज्ञा ‘क्वायर’ अशीच आहे. ही जागा बहुदा वेदी (altar) आणि लोकसभागृह (nave) यांमधील असून जेथे धर्मगुरू (पाद्री) बसतात, अशा ठिकाणी असते. वेदीच्या मागच्या बाजूला किंवा चर्चच्या प्रवेशद्वाराच्या वर सज्जात याची व्यवस्था करण्यात येते. गायकवृंद आणि धर्मगुरू बसू शकतील, प्रार्थना करू शकतील किंवा गुडघे टेकू शकतील अशी सर्वसाधरण त्याची रचना असते. तसेच या स्थळी ऑर्गन ठेवण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येते.
सुरुवातीला चर्चमध्ये धर्मगुरूद्वारे धार्मिक गायन होत असल्याने गायनाकरिता वेगळी जागा नव्हती. परंतु दहाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा धार्मिक विधी विस्तृत झाले, तेव्हा अधिकाधिक लोकांना सामावून घेणाऱ्या जागेची गरज भासू लागली. त्यामुळे गायकवृंदासाठी विशिष्ट जागा राखली जाऊ लागली. सुरुवातीला गायनस्थळी बसण्याकरिता साध्या जोडलेल्या खुर्च्या असायच्या, परंतु गॉथिक शैलीच्या उदयानंतर गायनस्थळावर नक्षीदार बाकसदृश्य आसने तयार करण्यात आली. ही आसने पंक्तीच्या (पायऱ्यांच्या) स्वरूपात टांगलेली असायची. दुमडलेल्या स्वरूपात या आसनाच्या खालून कडा बाहेर यायचा, ज्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या प्रार्थनेदरम्यान व्यक्तीला आधार देण्यास मदत व्हायची. चर्चमध्ये सध्या गायनस्थळांच्या कडांवर पायऱ्यांच्या दोन ओळींमध्ये एकमेकांसमोर आणि वेदीच्या काटकोनात ही बाकसदृश्य आसने असतात.

मध्ययुगीन काळात प्रार्थनेवेळी भाविक वेदीभोवती प्रदक्षिणा घालत असत. प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांमुळे प्रार्थनाविधीत व्यत्यय येऊ नये म्हणून गायनस्थळ आणि वेदी यांच्याभोवतील दगडी किंवा लाकडी जाळी उभारली गेली. ओक वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या बाकसदृश्य आसनावर कमानदार छत असायची, तर बाजूचे जाळीदार कठडे विशेष रुची घेऊन तयार केलेले असायचे.

चर्चमधील गायनस्थळ जितके प्रशस्त, तितकी प्रार्थनेच्या स्वरांची गुणवत्ता जास्त असते. परंतु त्याचा विस्तार खूपच जास्त असल्यास प्रार्थनेतील स्वर सुस्पष्ट ऐकू येत नाहीत. गायनस्थळावरील छतांच्या विविध आकारामुळे प्रार्थनेचा ध्वनी वेगवेगळा ऐकू येतो. तिथे वापरण्यात आलेले लाकूड, दगड आणि कापड याचा परिणाम आवाजाच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे चर्चमध्ये गायनस्थळाची जागा निश्चित करताना गायकवृंदाचे सूर भाविकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचतील याचा विचार केलेला असतो. तसेच वापरण्यात येणारे साहित्य आवाजाच्या गुणवत्तेवर भर घालणारे असतील याची काळजी घेतली जाते.
संदर्भ :
- https://www.britannica.com accessed on July 15,2025
- https://www.notredamedeparis.fr accessed on July 15, 2025
- https://medievallondon.ace.fordham.edu accessed on July 17, 2025
- https://www.choirofthesound.org accessed on July 19,2025
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.